

देवर्डे येथील महिलेचा मृतदेह विहिरीत सापडला…
देवर्डे, ता. आजरा येथील सौ. दीपा दिगंबर पाटील या ४५ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह स्थानिक विहिरीत आढळून आला. सदर पाटील या घरातून बाहेर पडल्यानंतर बराच वेळ परत न आल्याने त्यांचा शोध घेतला असता पाटील कुटुंबीयांच्या मालकीच्या विहिरीमध्ये गुरुवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.
याबाबतची वर्दी पांडुरंग केशव गुरव ( रा. देवर्डे )यांनी पोलिसात दिल्यानंतर रात्री उशिरा या घटनेची नोंद आजरा पोलिसात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आजरा बाजारपेठेतून शेतकऱ्याचे ५० हजार रुपये हातोहात लंपास
स्टेट बँक ऑफ इंडिया येथे कृषी कर्ज भरण्यासाठी आलेल्या हाळोली (ता. आजरा) येथील भिकाजी दत्तू गुरव या शेतकऱ्याचे ५० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केले. गुरूवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली.
गुरव हे एका पिशवीतून ५० हजार रुपये घेऊन कृषी कर्ज परतफेडी करता आजरा येथे आले होते. दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांची पिशवी ब्लेडने कापून आतील पैसे लंपास केले. आजरा पोलिसात याबाबत वर्दी देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


स्व. राजारामबापू देसाई यांचा उद्या स्मृतीदिन
विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, आजरा तालुका संघाचे माजी अध्यक्ष व आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक स्व. राजारामबापू देसाई यांचा पंधरावा स्मृतिदिन उद्या शनिवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशनचे अध्यक्ष वृषाल हुक्केरी यांनी दिली.
मलिग्रे व आजरा येथे रक्तदान शिबिर होणार असून फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. माजी ग्रामविकास मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुकुंदराव देसाई, गोकुळचे माजी संचालक रवींद्र आपटे, विद्यमान संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष सौ. अस्मिता जाधव,सौ.रचना होलम, कॉ. संपत देसाई, संभाजी पाटील, सुधीर कुंभार, वसंतराव धुरे, विष्णुपंत केसरकर, अल्बर्ट डिसोजा, उदयराज पवार, सौ. कामिना पाटील, काशिनाथ तेली जनार्दन टोपले, राजेंद्र गड्ड्याणवर, राजेंद्र सावंत, नागेश चौगुले, मारुती घोरपडे, सुभाष देसाई, प्रा. पी. डी. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी दुपारी तीन वाजता श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे होणार आहे असे हुक्केरी यांनी स्पष्ट केले

निधन वार्ता:-
सौ वनिता घेवडे

होनेवाडी (ता. आजरा) येथील सौ. वनिता सुनील घेवडे (वय ३३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली असा परिवार आहे. येथील महालक्ष्मी दूध संस्थेचे सचिव सुनील शंकर घेवडे यांच्या त्या पत्नी होत.
धार्मिक कार्य सोमवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी आहे

निवृत्ती गुरव

पेरणोली (ता. आजरा) येथील ह.भ. निवृत्ती हरी गुरव (वय ६५) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून नातवंडे असा परिवार आहे



