

अशोकअण्णा यांना विधानपरिषद अथवा महामंडळावर संधी द्यावी
वाढदिनी मान्यवरांनी व्यक्त केली अपेक्षा

आजरा तालुक्याचे मतदारसंघ पुर्नरचनेत तीन तुकडे झाले आहेत. त्यामुळे येथील नेत्यांना विधीमंडळात प्रतिनिधीत्व करावयाची संधी मिळत नाही. अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांना विधानपरिषद किंवा महामंडळामध्ये स्थान देवून तालुक्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी केली. देसाई यांच्या सुरात सूर मिसळत राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर, चंदगडचे आमदार राजेश पाटील व माजी मंत्री भरमू पाटील यांनी सहमती दर्शवली.
येथील अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात अशोक चराटी यांचा वाढदिवस उत्साहात झाला. माजी मंत्री भरमू पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपस्थित वक्त्यांनी राजकीय टोलेबाजी न करता आजरा तालुक्याचा विकास व मतदारसंघ पुर्नरचनेत झालेला अन्याय दूर करण्यावर भाषणात अधिक भर दिला.
आमदार श्री. आबिटकर, आमदार श्री. पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्री. देसाई, आजरा कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, बशीर खेडेकर, अंशुमाला पाटील, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.
विजयकुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आमदार श्री. पाटील म्हणाले, श्री. चराटी यांनी निवडणूक लढवल्यामुळे चंदगड मतदार संघात माझा विजय सोपा झाला. त्यांना विधानपरिषदेवर घ्यावे यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील त्याला माझा पाठिंबा राहील.
आमदार श्री. आबिटकर म्हणाले, चराटी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण एका व्यासपीठावर आलो आहोत. आज-याच्या विकासासाठी प्रयत्न करूया.
श्री. शिंपी म्हणाले. चराटीशी युती हा काळाचा महीमा आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासकामासाठी एकत्र येवूया. माजी मंत्री श्री. पाटील म्हणाले, श्री. चराटी यांच्यामुळे आमदार होता आले. ते धडाडीचे कार्यकर्ते आहेत. श्री. डिसोझा, प्रा. शिंत्रे यांची भाषणे झाली.

श्री. चराटी म्हणाले, जनता हीच माझी ताकद आहे. व्यासपीठावरील सर्वजण एकत्र राहीलो तर तालुक्याचा विकास व राजकारणाचे चित्रही वेगळे दिसेल.
या वेळी आनंदराव कुलकर्णी, नामदेव नार्वेकर, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा सौ.अस्मिता जाधव, अंशुमाला पाटील, किशोर भुसारी, सुरेश डांग, रमेश कुरुणकर, डॉ. दिपक सातोस्कर, प्रकाश वाटवे, सुधीर कुंभार, अरुण देसाई, रमेश रेडेकर, दशरथ अमृते, दिगंबर देसाई, राजेंद्र सावंत, शशीकांत सावंत, संजय पाटील,संभाजी सरदेसाई,जी.एम.पाटील,अल्बर्ट डिसोझा,सचिन पावले, डॉ.इंद्रजीत देसाई, समीर पारदे यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. शंकर टोपले यांनी सूत्रसंचालन केले. राजू पोतनीस यांनी आभार मानले.
.…..आम्ही काय ठरवू त्याचा कोणाला पत्ता लागणार नाही…
चराटी यांचे मित्र व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई हे चराटी यांना कोपरखळी देत म्हणाले, आमची दोस्ती जगजाहीर आहे. मतभेद आहेत पण मनभेद नाहीत. आम्ही काय ठरवू याचा कुणाला पत्ता लागत नाही. या वाक्याने उपस्थित राजकीय पदाधिका-यांच्या भुवया उंचावल्या.


निधन वार्ता
हिराबाई भोसले

नाईक गल्ली, आजरा येथील सौ. हिराबाई बाबुराव भोसले ( वय 65 ) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन विवाहित मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
आजरा तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष गौतम भोसले यांच्या त्या मातोश्री होत.



