mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार दि.६ जानेवारी २०२६

आजरा नगरपंचायतीच्या कारभारा विरोधात नागरिक आक्रमक


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायत हद्दीतील गांधीनगर येथील क्रिडासंकुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकून तो वारंवार पेटविण्यात येत आहे. त्यामुळे क्रिडासंकुल, हॉस्पिटल आवंडी वसाहत तसेच गांधीनगर परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून वयोवृद्ध नागरिक, लहान मुले व रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
एकीकडे शासनामार्फत “क्षयमुक्त महाराष्ट्र” अभियान प्रभावीपणे राबविले जात असताना, दुसरीकडे नगरपंचायत हद्दीत कचरा जाळण्यासारखे प्रकार सुरू असल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी अन्याय निवारण समिती व स्थानिक नागरिकांच्या वतीने नगरपंचायत कार्यालयात जाऊन संताप व्यक्त करण्यात आला.

आजरा शहरातील आयडियल कॉलनी, शिव कॉलनी व समर्थ कॉलनी या भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने नगरपंचायतीविरोधात नाराजी वाढली आहे. तसेच चित्री धरण प्रकल्पग्रस्तांची आवंडी वसाहत येथे माणसांनाही व जनावरांनाही पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर जनावरे बांधून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा, इशारा आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने दिला आहे.

या निवेदना वर परशुराम बामणे भाऊजी नगरसेवक, अध्यक्ष, पांडुरंग सावरतकर सचिव, रामचंद्र पंडीत, जोतीबा आजगेकर, संजय जोशी दिनकर जाधव, बंडोपंत चव्हाण, संतोष बांदिवडेकर, मिनीन डिसोझा, मदन तानवडे, महादेव राणे, अभिजीत संकपाळ, सुरज पाटील व महेश खेडेकर,नगरसेवीका आसावरी खेडेकर यांच्या सह्य़ा आहेत.

आजरा अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध

संचालक मंडळात ११ नवीन चेहरे


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये ३५ शाखांसह १८०० कोटी रूपयांचा व्यवसाय करणाऱ्या आजरा अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक सलग दुसऱ्यांदा बिनविरोध करण्यात आण्णा भाऊ संस्था समूहाचे नेते श्री. अशोकअण्णा चराटीसो यांना यश आले आहे. १८ जणांच्या या संचालक मंडळात यंदा तब्बल ११ नव्या चेहऱ्यांना संधी देणेत आली आहे.

श्री. अमोल येडगे (जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कोल्हापूर) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहीले व त्यांनी निवडणूक बिनविरोध झालेचे जाहीर केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गजानन गुरव (निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी कोल्हापूर), श्री.प्रेम राठोड (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था करवीर), मा.श्री. सुजय येजरे (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था आजरा) उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नवनिर्वाचीत संचालक यांची अधिकृतरित्या नांवे घोषित केली त्यामध्ये श्री. अशोक काशिनाथ चराटी, श्री. जयवंत यशवंत खराडे, श्रीमती शैला रामचंद्र टोपले, श्री. विजयकुमार लक्ष्मण पाटील, श्रीमती संध्याताई प्रकाश वाटवे, सौ. कुंदा सुरेश डांग, श्री. विनय भालचंद्र सबनीस, श्री. अशोक देवगोंडा पाटील, श्री. सागर रमेश कुरुणकर, श्री. सिद्धेश विलास नाईक, श्री. संजय विष्णू चव्हाण, श्री. आनंदा वासुदेव फडके, श्री. बसवराज विश्वनाथ महाळंक, श्री. ऋषिकेश दीपक सातोसकर, श्री. किशोर काशिनाथ भुसारी, श्री. किरण आप्पासाहेब पाटील, श्री. कान्होबा शंकर माळवे, श्री. सुनील माधवराव देशपांडे हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

स्व. काशिनाथ (अण्णा) चराटी व स्व. माधवराव (भाऊ) देशपांडे यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने स्थापना केलेल्या बँकेने मल्टी स्टेट दर्जा प्राप्त केला असून सहकारातील अग्रगण्य बँक म्हणून आजरा अर्बन बँकेचा नावलौकिक आहे. हजारो सभासदांच्या विश्वासाच्या पाठबळावर आम्ही दुसऱ्यांदा ही निवडणूक बिनविरोध करू शकलो याचे समाधान आहे. सभासदांना आणखी चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. तसेच बँक लवकरच २००० कोटींचा व्यवसाय पुर्ण करणेचे ध्येय असलेचे उदगार अण्णा भाऊ संस्था समुह प्रमुख मा. श्री. अशोकअण्णा चराटी यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.

यावेळी नवनिर्वाचीत संचालक मंडळ यांचा सत्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गंभीरसो व प्रशासन व बोर्ड विभाग प्रमुख श्री. नितीन बेल्लदसो यांनी प्रशासनाच्या वतीने केले.

सरकारच्या संच मान्यतेच्या धोरणा विरोधात आंदोलन करणार..
१० जानेवारीला आजऱ्यात व्यापक मेळावा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्र शासनाच्या १० मार्च २०२५ च्या शासन निर्णयामुळे झालेल्या संच मान्यतेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सहा ते आठवी वर्गातील वीस पेक्षा कमी पट संख्या असलेल्या २३४ शाळामधील वरिष्ठ वर्गाचे शिक्षक कमी होणार असल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. बहुजन समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणातून हद्दपार करण्याचे हे धोरण असून याविरोधात तीव्र लढा उभारला जाणार असल्याचे शाळा वाचवा आंदोलनाचे निमंत्रक कॉ. संपत देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी कॉम्रेड संजय तर्डेकर, प्रकाश मोरुस्कर, सुरेश शिंगटे उपस्थित होते.

कॉम्रेड संपत देसाई म्हणाले, २०२३ साली राज्यसरकारने २० पटाखालील शाळा समायोजन करण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात आम्ही आजरा ते सावंतवाडी असा लाँगमार्च काढला होता. तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एकही शाळा बंद होणार नाही असे लेखी पत्र दिले. त्यानंतर हा निर्णय थांबवला गेला. आता पुन्हा नवीन निर्णय करून सरकार शिक्षणाचे खाजगीकरण करू पाहत आहे.

संजय तर्डेकर म्हणाले, बहुजन समाजातील मुलांना शिक्षणातून हद्दपार करण्याचे हे धोरण आहे. आम्ही हा सरकारचा डाव उधळून लावू. सरकार शिक्षक संख्या कमी करून गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित ठेवत आहे. त्याला आम्ही तीव्र विरोध करू.

यावेळी प्रकाश मोरुस्कर, सुरेश शिंगटे उपस्थित होते. शनिवारी दि १० जानेवारी २०२५ रोजी, ठीक १२.०० वाजता आनंदराव नंदवडेकर शिक्षक पतसंस्था आंबोली रोड आजरा येथे आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि भुदरगड तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समित्यांचा व्यापक मेळावा आयोजित केला असून या मेळाव्याला सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जीवनात वनस्पतींना अनन्यसाधारण महत्त्व : डॉ. विश्वास बापट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा यांच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत जैवतंत्रज्ञान शास्त्रज्ञ डॉ. विश्वास बापट यांचे ‘वनस्पती: बहुमुल्य, बहुगुणी वरदान’या विषयावरील व्याख्यान झाले. यावेळी डॉ. बापट म्हणाले मनुष्यासह संपूर्ण प्राणीसृष्टी वनस्पतींवर अवलंबून आहे त्यामुळे आपल्या जीवनात वनस्पतींना अनन्यसाधारण महत्व आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजाही वनस्पतींशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. ऑक्सीजन देण्याचे व प्रदुषण शोषून घेण्याचे महत्वपूर्ण कार्य वनस्पतीच करतात त्यामुळे वनस्पतींना देव मानले तर वावगे होणार नाही संत तुकाराम महाराजांनी वृक्ष वेलींना आपले सगे सोयरे मानले आहे. सिध्दार्थ गौतम बुध्दांनी बोधिवृक्षाखाली ध्यानधारणा करून आत्मप्राती साध्य केली.

अन्नधान्ये, फळे, भाज्या, मसाले, या सर्व बाबी वनस्पतीच देतात. आयुर्वेदिक औषधांपासून आधुनिक औषधांपर्यंत सर्व उपचारात वनस्पतींचा उपयोग केला जातो वनस्पतीमुळेच पर्जन्यमान होते आणि जमिनीची धूपही थांबते. जंगलात तर अनेक जिवांचे अन्न आणि निवारा वनस्पतीच असतात. वनस्पतींच्या विविध प्रजाती आणि त्यांचा उपयोग याबाबत त्यांनी चित्रफितींच्या माध्यमातून माहिती दिली.

डॉ. ओ. डी. शिंदे इंजिनिअरींग कॉलज चे प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे प्रमुख उपस्थीत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाच्या उपाध्यक्षा सौ. विद्या हरेर होत्या शिवसहयाद्री चॅरीटोबल फाऊंडेशन पुणे यांच्या सौजन्याने वाचनालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या माता गौरव पुस्कार श्रीमती सरीता समीर घेवडे, भटवाडी, ता. आजरा यांना सौ विद्या हरेर यांच्या हस्ते शाल, साडीचोळी, सन्मानपत्र, ग्रंथभेट व रोख दोन हजार पाचशे रूपये देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला मुकुंददादा देसाई, संभाजीराव सावंत, शिवाजीराव पाटील, विजय बांदेकर, महादेव पोवार, संदिप वाटवे, राजश्री गाडगीळ, उज्वला गुंजकर, शर्मिला सातोसकर, रमा केळकर, डॉ. अंजनी देशपांडे, डॉ. गौरी भोसले, रविंद्र हुक्केरी, संभाजीराव इंजल, बंडोपंत चव्हाण, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, विनायक आमणगी, गीता पोतदार, सुचेता गडडी ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर यासह मोठ्या प्रमाणावर आजरेकर रसिक श्रोते उपस्थीत होते.

कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी पाहुण्यांचा परीचय करून दिला गिता पोतदार यांनी सुत्रसंचालन केले तर विनायक आमणगी यांनी आभार मानले.

विशेष सूचना…

मृत्युंजय महान्यूजच्या बातम्या बऱ्याच वेळा link ओपन होत नसल्याने पहावयास मिळत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. याकरिता कृपया आपल्याकडे 96 37 59 88 66 हा नंबर “मृत्युंजय महान्यूज’ या नावाने save असणे गरजेचे आहे. सदर नंबर आपल्याकडे save नसल्यास आपणाला बातम्या ओपन करताना अडचण येईल. नंबर save करूनही ज्यांना बातम्या मिळणार नाहीत त्यांच्याकरता या नंबरच्या व्हाट्सअप स्टेटस वर बातम्यांची लिंक टाकण्याची व्यवस्था केली आहे. याचबरोबर jyotiprasad savant या Facebook account वरही बातम्या link द्वारे पहावयास मिळतील. बरेच मोबाईल नंबर मृत्युंजय महान्यूजकडे save आहेत परंतु  संबंधितांकडे मृत्युंजय महान्यूज चा नंबर save नसल्याने अशा वाचकांना लिंक पाठवल्यास व्हाट्सअप अकाउंट बंद होत आहे. असा व्हाट्सअप ने नवीन नियम केला आहे.

यापुढे हळूहळू ग्रुप वर बातम्या लिंक पाठवणे बंद/कमी केले जाणार आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी. 

…मुख्य संपादक

छत्रपती युवा ग्रुप उत्तूरच्या शिवजयंती कार्यकारिणी अध्यक्षपदी आयुष जवाहिरे

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

राजमाता जिजाऊ फौंडेशन संचलीत
श्री . छत्रपती युवा ग्रुप उत्तूरच्या संयुक्त शिवजयंती सोहळा-२०२६ कार्यकारणी
अध्यक्षपदी आयुष प्रवीण जवाहीरे तर
उपाध्यक्षपदी विनायक तानाजी कातोरे यांची निवड करण्यात आली.सचिवपदी विनायक बाळासो जवाहीरे, खजिनदारपदी  अवधुत दिनकर कुंभार यांची निवड झाली आहे.

तसेच राजमाता जिजाऊ फाउंडेशन चे अष्टप्रधाण मंडळ जाहीर करण्यात आले त्यामध्ये तुषार घोरपडे, राजेंद्र भोसले,सौरभ कुरूणकर, विश्वनाथ हसबे,रोहीत कुरूणकर,आकाश पोरलेकर,दिलावर लाटवाले,विशाल उत्तूरकर यांचा समावेश आहे.

यावेळी सूरज रक्ताडे व सागर येसादे यांनी आभार मानले व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष योगेश भाईगडे आणि ग्रुपचे मागील वर्षाचे पदा‌धिकारी, सदस्य, ग्रामस्थ, उपस्थित होते.

भादवण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम तालुकास्तरीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत भादवण हायस्कूल,भादवणच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.इयत्ता सहावी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या या परीक्षेमध्ये एकूण सहा विद्यार्थी पात्र झाले असून जिल्हास्तरीय परीक्षेसाठी तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
सानिका प्रकाश वडराळे ७६ गुण, आर्या काशिनाथ कुंभार ७२ गुण, प्रतीक्षा प्रशांत डोंगरे ७० गुण मिळाले.या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झाली.

अमृता शिवाजी गारडे,श्रावणी दीपक सिमणे,वेदांत पांडुरंग गोविलकर,सार्थक सुनील कांबळे हे विद्यार्थी पात्र झाले.

या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक प्रशांत गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी,उपाध्यक्ष के.जी.पटेकर, सचिव अभिषेक शिंपी,सर्व संचालक व मुख्याध्यापक आर.जी.कुंभार यांची प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले.

आज शहरात 

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा यांच्या वतीने ‘  डॉ .पूजा सामंत लिखित ‘द.ना. गव्हाणकर यांचे शाहिरी वाड्मय’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत स्मृती दालनामध्ये सायंकाळी ५-३० वाजता होणार आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पंधरा दिवसाच्या आत उर्वरित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आराखडा बनवण्याचे निर्देश- श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कॉ. संपत देसाई यांच्यासह श्रमुदच्या प्रतिनिधींसोबत सातारा येथे आज मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, सातारा, सांगली, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता, सर्व प्रकल्पांचे कार्यकारी अभियंता यांच्यासोबत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत बैठक झाली.

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

प्रभाग १४ चा आश्वासक चेहरा : सिद्धेश नाईक

mrityunjay mahanews

बहिरेवाडी येथे मुलाकडून वृद्ध बापाचा खून…

mrityunjay mahanews

डॉ. अनिल देशपांडे यांचा एकसष्ठीपूर्ती कार्यक्रम उत्साहात

mrityunjay mahanews
error: Content is protected !!