रविवार दि.१ फेब्रुवारी २०२६



वाटंगी पं.स. मतदार संघात राजू होलम यांच्यासमोर विरोधकांचे नेटके आव्हान…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तालुक्याच्या राजकारणात पंचायत समिती सभापती पद, आजरा कारखाना संचालक पद, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्षपद अशा विविध पदांवर काम केलेल्या सौ.रचना होलम व राजू होलम यांचे राजकारणात मोठे वलय आहे. होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये राजू होलम हे पंचायत समिती निवडणुकीकरिता सामोरे जात आहेत. त्यांच्यासमोर मलिग्रे येथील माजी सरपंच समीर पारदे यांचे भाजपातून तर सुळे येथील सतीश फडके यांचे शिवसेना शिंदे गटातून आव्हान उभे ठाकले आहे. फडके हे तालुक्याच्या राजकारणात नवखे असले तरी त्यांनीही तोडीस तोड यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली आहे. पारदे यांच्यासाठी भाजपाची नेते मंडळी जीवाचे रान करत आहेत. यामुळे या मतदारसंघात मोठी चुरस दिसत आहे.मतदारसंघाला नव्याने जोडल्या गेलेल्या १४ ते १५ नवीन गावांमधील मतदारांची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे.
या भागात राष्ट्रवादीचे जाळे मोठे असले तरीही विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांची भक्कम फळी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून तयार केली आहे. तर विष्णुपंत केसरकर यांच्यासारख्या नेटका उमेदवार जिल्हा परिषदे करीता मिळाल्याने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घातलेले लक्ष फडके यांच्या पथ्यावर पडत आहे.
एकंदर या मतदारसंघात विजयासाठी जोरदार संघर्ष होणार हे स्पष्ट आहे.
जि.प.चे दावेदार पंचायत समितीच्या रिंगणात...
वास्तविक राष्ट्रवादीतून राजू होलम व भाजपाकडून समीर पारदे हे जिल्हा परिषदे करता इच्छुक होते. प्रत्यक्षात मात्र अनेक राजकीय घडामोडी घडल्याने जिल्हा परिषदेकरीता इच्छुक असणारे हे उमेदवार पंचायत समिती रिंगणात उतरले आहेत.

सर्वसामान्य जनतेसाठी २४ तास काम करणार : उमेश आपटे…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेली दोन तपे मी समाजकारणासह राजकारणात काम करत आहे .मी वैयक्तिक काहीही मिळविले नाही २४ तास समाजकारणात काम करण्याची व्यसन व सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्या व्यक्तिगत गरजेसाठी अहोरात्र झटण्याची सवय संपूर्ण तालुक्याला माहित आहे असे प्रतिपादन उत्तूर जि. प. मतदार संघातील ताराराणी आघाडीचे उमेदवार उमेश आपटे यांनी निंगुडगे येथील जाहीर प्रचार सभेत केले. उत्तूरसह अनेक गावात सार्वजनिक कामाबरोबरच माझी व्यक्तिगत कामे आहेत. कोरोना काळात कुटुंबातील व्यक्ती कोणी जवळ जात नव्हते मात्र धाडस करून सहकाऱ्यांना सोबत घेऊन कोरोना सेंटर उभा करून अनेक नागरिकांना जीवदान दिले.
डॉक्टर, नर्स यांच्याबरोबर स्वतः काम केले. उत्तूर पंचक्रोशीत ॲम्ब्युलन्स सेवा मोफत देत आहे, निराधार वृद्ध व्यक्तीना याचा मोठा आधार आहे, प्रत्येक घरात उमेश आपटे पोहचला आहे विद्यार्थी असोत किंवा निराधार मुले असोत याचा पाठीराखा म्हणून मी काम करतोय यापुढेही ही सेवा आपल्या मतरुपी आशिर्वादाने सुरु राहण्यासाठी साथ देण्याचे आवाहन केले.
यावेळी भादवण पंचायत समितीच्या उमेदवार सौ. साधना केसरकर , भाजप तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी भादवण सरपंच माधुरी गाडे, उत्तूर सरपंच शैलेंद्र आमनगी, संभाजी सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी जनार्दन निऊगरे यांनी पंचक्रोशीत आपटे यांना मोठे मताधिक्य देणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी सभापती सौ. वर्षा बागडी, आनंदराव कुलकर्णी,कारखाना संचालक राजेश जोशीलकर, आनंदराव जोशीलकर, कानोली सरपंच सुषमा पाटील, सरोळी सरपंच प्रज्ञा पाटील, गजरगाव सरपंच आनंदा कांबळे, यांच्यासह एम. टी. पाटील, रणजित गाडे, सुरेश रेडेकर सुभाष पाटील, सुधीरकुमार पाटील, धीरज देसाई, दिलीप पाटील, बाजीराव पाटील, दिग्विजय भोसले, शहाजी भोसले परशुराम आपगे भूषण भिऊगडे उपस्थित होते, सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आभार आनंदा चौगुले यांनी मानले.

शिरसंगी, किणे परिसरात भाजपची प्रचारात आघाडी ; महिला व युवकांचा लक्षणीय सहभाग…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आजरा तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. उमेदवारांकडून सुरू असलेल्या प्रचाराला सर्वच ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे. पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार, वाटंगी पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार समीर पारदे यांच्या शिरसंगी व किणे येथील प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वच ठिकाणी उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. या प्रचार रॅलीमध्ये महिला व युवकांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी भाजपा उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार परिसरातील नागरिकांनी केला.
या प्रचारफेरीत बळवंत शिंत्रे, सुरेश गिलबिले, सखाराम केसरकर, तुकाराम बामणे, विष्णू गुडूळकर, संदीप केसरकर, गणपती पाटील, आकाश सुतार, बाबुराव आडे, सदाशिव वांजोळे, अर्जुन पाटील, पंढरीनाथ कांबळे, सुनील सातवणेकर, निलेश सुतार, संतोष सुतार, दयानंद सुतार, सागर बुरुड, विजय गुरव, राजेंद्र बोडके, रोहित बोडके, संजय कांबळे, पांडुरंग सुतार, वसंत सुतार, संजय हंबीरराव यांच्यासह गावातील युवक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पेरणोलीतील सुतार समाज बांधवांचा पाठिंबा…

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आजरा तालुक्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. प्रचारात भारतीय जनता पार्टीने मोठी आघाडी घेतली आहे. सर्वच ठिकाणी भाजपाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. कामाचा उमेदवार म्हणून जिल्हा परिषद उमेदवार जयवंत सुतार यांना पसंती मिळत आहे. पेरणोली (ता. आजरा) येथील सुतार समाज बांधवांनी भारतीय जनता पार्टीचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच यावेळी जयवंत सुतार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार देखील सर्वांनी केला आहे.
यावेळी दशरथ अमृते, जिल्हा परिषद उमेदवार जयवंत सुतार, पांडुरंग लोंढे, राजू दिक्षित, मुकुंद कांबळे यांच्यासह संभाजी सुतार, काका सुतार, जयदीप सुतार, दिलीप सुतार, आनंदा सुतार, धनाजी सुतार, गोविंदा सुतार, दशरथ सुतार, तानाजी सुतार, विठ्ठल सुतार, मुकुंद सुतार हे समाज बांधव उपस्थित होते.
जि. प., पं. स. करीता अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन हाताळण्यासह टपाली मतदाना बाबत मार्गदर्शनपर प्रशिक्षण शिबिर तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवडणूक निर्णय अधिकारी रूपाली चौगुले, तहसीलदार समीर माने यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.
यावेळी ईव्हीएम मशीन हाताळणी, टपाली मतदान याबाबत तीन बूथद्वारे प्रात्यक्षिक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण प्रसंगी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, विकास कोलते यांच्यासह १४४ केंद्राध्यक्ष १४४ मतदान अधिकारी यांच्यासह निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते.

उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात भादवणच्या ‘मुळीक गटाची’ भूमिका अद्याप अस्पष्ट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना याच मतदारसंघातील मोठे गाव असलेल्या भादवण मधील मुळीक गटाची भुमिका अजून गुलदस्त्यात असल्यामुळे ते कोणती भुमिका घेतात याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.
या गटाचे नेते श्री.टी.बी.मुळीक यांचा नुकताच अमृतमहोत्सव कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित असलेल्या मतदारसंघातील जनसमुदायाने या गटाची ताकद अधोरेखित केली आहे. याशिवाय या गटाचे युवा नेते श्री.शैलेश मुळीक यांनी मागील १० वर्षांपासून भाजपच्या माध्यमातून उभा केलल युवकांच संघटन हे या निवडणुकीत महत्त्वाची भुमिका बजावणार आहे. पूर्वीपासूनच या गटाचे नेतृत्व माननारे अनेक लहान मोठे गट मतदारसंघात आहेत. उत्तूर जिल्हा परिषद गटातील चढाओढ बघता मुळीक गटाच्या निर्णयाला महत्त्व आले आहे.
यासंदर्भात मुळीक गटाच्या कार्यकर्त्यांचा कल विचारला असता, या जिल्हा परिषद गटात भाजपचा उमेदवार आणि भाजपचे कमळ चिन्हच नसल्यामुळे आमच्याकडे सगळे पर्याय खुले आहे असे स्पष्ट करण्यात आले.
यामुळे मुळीक गट कोणाला मदत करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

वडाचा गोंड मार्ग होतोय दुर्गंधी युक्त
कोपऱ्या कोपऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील वडाच्या गोंडाकडे जाणारा मार्ग कचऱ्याच्या साम्राज्यामुळे दुर्गंधीयुक्त बनत चालला आहे.
वडाचा गोंड परिसरात निम्म्या शहराची स्मशानभूमी आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्काराची काम वरचेवर होत असतात. मात्र या मार्गावरून जाताना सुरुवातीलाच आजूबाजूच्या रहिवाशांनी कचरा टाकून कचऱ्याचे ढीग तयार केले आहेत. नगरपंचायतीकडून या कचऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने कचऱ्याची दुर्गंधी हळूहळू पसरू लागली आहे.
कचरा टाकण्यास प्रतिबंध करणे शक्य नसेल तर किमान नगरपंचायतीने हा कचरा तातडीने उचलावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा तर्फे शालेय नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा तर्फे कै. सौ. शुभांगी गजानन वायंगणकर यांचे स्मृतिप्रीत्यर्थ आजरा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी गुरूवार, दिनांक १२ फेब्रुवारी, २०२६ रोजी नाट्यछटा स्पर्धा आयोजित केली आहे. इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते दहावी या दोन गटात या स्पर्धा होणार आहेत. दोन्ही गटातील विजेत्या प्रथम रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी वाचनालयाशी संपर्क साधावा असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर व सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी यांनी केले आहे.


