mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार दिनांक १० मे २०२५       

भादवण येथून विवाहिता बेपत्ता

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     भादवण ता.आजरा येथे यात्रेनिमित्त सासर पेठवडगाव येथून माहेरी आलेली २५ वर्षीय विवाहिता दिनांक ८ मे पासून बेपत्ता असल्याची वर्दी संबंधित महिलेच्या पतीने आजरा पोलिसात दिली आहे.

      भादवण येथील एका स्थानिक यात्रेसाठी संबंधित महिला आली होती. ती यात्रा झाल्यानंतर सासरी  जातो असे सांगून घराबाहेर पडली परंतु अद्याप ती सासरी पोहोचली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

      पोलीस पुढील तपास करीत आहेत.

शहरात ४५ इमारती धोकादायक…
नगरपंचायतीकडून शिक्कामोर्तब…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      अतिवृष्टी, वादळ, पुर, आदी नैसर्गिक आपत्ती कारणाने शहरातील ४५ जुनी घरे धोकादायक झाल्यामुळे सदर घरांमध्ये राहणाऱ्या नागरीकांना व त्या घराच्या आसपास राहणाऱ्या नागरीकांना तसेच तेथील रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास पावसाळ्यामध्ये धोका पोहोचण्याचा संभव असल्याने तो टाळण्याच्या दृष्टीने जुन्या घरांची तपासणी करून संभाव्य धोका नाहीसा करण्याबाबतची शक्यतो सर्व दक्षता घेण्याच्या सूचना संबधीत मालमत्ताधारकांना आजरा नगरपंचायतीकडून करण्यात आलेल्या आहेत.

      संबधीत मालमत्ताधारकांनी आपआपल्या इमारतीची तज्ञ स्ट्रक्चरल इंजिनियर यांचेकडून तपासणी करून घेऊन त्यांचे सूचनेनुसार व आजरा नगरपंचायतकडून आवश्यक ती परवानगी घेऊन इमारत योग्य प्रकारे दुरूस्ती करून घेणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे नगरपंचायतीस कळवून आवश्यक ती उपाययोजना करून घेणे आवश्यक आहे. अशी व्यवस्था संबधीत धोकादायक इमारतीचे मालक यांनी तातडीने करावी व अशा दुरुस्तीचे काम होईपर्यंत सदर धोक्याच्या घरात वास्तव्य करू नये किंवा धोकादायक इमारती किंवा त्याचा भाग योग्यरीतीने पाडून टाकावा, संबंधितांकडून कोणतीही कार्यवाही किंवा पूर्तता न झालेस सदर अधिनियमच्या कलम १९५(४) अन्वये संबंधिताविरूद्ध पुढील कारवाई केली जाईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी असेही नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे.

अफवाच अफवा…
पेट्रोल पंपांवर मरणाची गर्दी...

  आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      भारत – पाकिस्तान राजकीय संबंध बिघडल्यानंतर देशात पेट्रोलची टंचाई निर्माण होणार असून येत्या कांही दिवसात पेट्रोल मिळणार नाही अशा अफवा पसरल्यानंतर आजरा शहर व परिसरातील पेट्रोल पंपांवर वाहन धारकांनी प्रचंड गर्दी केली. परिणामी बघता बघता पेट्रोल पंपावरील पेट्रोलचा साठा संपल्याने अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग निर्माण झाले.

       सध्या सुरू असलेल्या भारत व पाकिस्तान यांच्यामधील लष्करी चकमकीचा परिणाम म्हणून आखाती देशांकडून पेट्रोलसह इतर इंधन भारतात येण्यावर मर्यादा येत असल्याच्या अफवा काल दुपारनंतर पसरू लागल्या. याबाबतचे कांही व्हिडिओही व्हायरल झाले. अफवांवर विश्वास ठेवत नागरिकांनी पेट्रोल टंचाई निर्माण होणार असे गृहीत धरून वाहनांमध्ये इंधन घालण्याकरता पेट्रोल पंपावर एकच गर्दी केली होती. ग्रामीण भागातूनही रात्री उशिरा वाहनधारक पेट्रोल डिझेल वाहनांमध्ये घालण्याकरता शहरामध्ये आले होते. अनेक पेट्रोल पंपावरील इंधन साठे  संपले.

मोरेवाडी येथील शेतकऱ्याचा उपोषणाचा इशारा

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मोरेवाडी ता. आजरा येथील पाझर तलावात गंगाराम आडूळकर यांची तीन एकरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली गेली असून दोन वर्षे झाली तरी अजूनही त्यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. गेली दोन वर्षे हा शेतकरी जलसंधारणच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहे तरी त्याला न्याय मिळालेला नाही. अनेकवेळा निवेदने दिली, गाठीभेटी घेतल्या तरी अधिकारी दाद देत नसल्याने शेवटी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत आहे असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

      तीन वर्षांपूर्वी गंगाराम आडूळकर यांची ३ एकर १६ गुंठे इतकी उसपीक असणारी जमीन पाझर तलावात गेली. गावच्या हिताचा विचार करून गंगाराम यांनी पाझर तलाव करण्यास संमती दिली. पाझर तलावाचे काम पूर्ण होऊन दोन वर्षे झाली पाणी तुंबवलेले आहे. पण त्याचा मोबदला अजून मिळालेला नाही. म्हणून दि १५ मे २०२५ पासून तहसील कार्यालयाच्या दारात सहकुटुंब बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय त्यांनी केला आहे तसे निवेदन तहसीलदार आजरा यांना दिले आहे.

निधन वार्ता
लिलाबाई बोलके

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      गवसे तालुका आजरा येथील श्रीमती लिलाबाई संतू बोलके (वय ७६ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

      गवसे  येथील ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ. निर्मला मारुती डोंगरे व शांता प्रकाश रेडेकर यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

      रक्षा विसर्जन रविवार दि.११ रोजी सकाळी ९ वाजता आहे.

कानोलीत आज होम मिनिस्टर…

      लक्ष्मी यात्रेनिमित्त कानोली येथे आज होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री आठ वाजता सदर कार्यक्रम होणार आहे.

 

संबंधित पोस्ट

विजेचा धक्का बसून आज-यात एकाचा मृत्यू…

mrityunjay mahanews

‘ तो ‘ मृतदेह हात्तीवडेतील महिलेचा…

mrityunjay mahanews

नारायण उर्फ बाबूराव देसाई यांचे निधन स्व. अमृतकाका देसाई कुटुंबीयांवर सहा महिन्यात चौथा आघात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!