रविवार दिनांक ११ मे २०२५

अन्यथा सामूहिक आत्मदहन
ग्रामस्थांचा इशारा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील हरपवडे येथील रासूबाई देवालयाबाबत अनेक चुकीच्या गोष्टी आपण प्रशासनाच्या व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या निदर्शनास वेळोवेळी आणून दिल्या आहेत. परंतु राजकीय दबावापोटी चुकीच्या पद्धतीने सदर प्रकरण हाताळले जात असून तक्रारदारांनाच खुलासा करण्याची पत्रे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीकडून पाठवली जात आहेत. देवस्थान कमिटीच्या संबंधितांनी प्रत्यक्ष हरपवडे गावामध्ये येऊन स्थानिक ग्रामस्थ व स्थानिक अधिकाऱ्यांच्या समोर सर्व कागदपत्रांची शहानिशा करणे आवश्यक आहे. ही पद्धत अवलंबल्यास या प्रकरणातील सत्य समोर येईल. सध्या चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले जात असल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीशी संबंधितांनी गावात येऊन या प्रकरणाची माहिती न घेतल्यास सामूहिक आत्मदानाचा इशारा हरपवडे येथील श्रावण धाटोंबे, धनाजी सावंत, संजय हळवणकर, वसंत लटम या ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, हरपवडे गावची ग्रामदैवत रासूबाई मंदिर जीर्ण झाले होते. मागील तीस वर्षे राजकीय पुढाऱ्यांनी मंदिर जीर्णोद्धाराच्या नावावर राजकारण करून लोकांची दिशाभूल केली. मंदिराच्या नावावर स्थानिक नर्सरीतील झाडे अत्यल्प किंमतीत विकून टाकली. वारंवार समित्या बदलल्या, बुडीत पतसंस्थेत खाती काढून पैशाची विल्हेवाट लावली, सभेच्या अध्यक्षपदाचा अधिकार नसलेल्या ग्रामसेवकाला घेऊन बोगस ग्रामसभा दाखवून ग्रामस्थांची बोगस उपस्थिती दाखवण्याचे काम केले, वर्गण्या गोळ्या केल्या यासह विविध आरोप यावेळी त्यांनी केले.
असे असताना न्याय मागणाऱ्यांनाच खुलासा द्या अशी वागणूक मिळत असेल तर आम्हाला आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असा इशाराही पत्रकार बैठकीत देण्यात आला आहे.
खुले आव्हान…
या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या चर्चेस आपण तयार आहोत. सर्व ग्रामस्थांना अधिकाऱ्यांना एकत्र बोलवा व या प्रकरणाची समोरासमोर पुराव्यांनिशी चर्चा करा असे खुले आव्हान संबंधितांनी विरोधकांना दिले आहे.

आजरा साखर कारखान्याकडून ऊस तोडणी-वाहतुक ॲडव्हान्स वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याकडे गळीत हंगाम सन २०२५-२६ करिता ऊस तोडणी – वाहतुक यंत्रणेचे करार केलेल्या कंत्राटदारांना अँडव्हान्स रकमेचे चेक वितरण शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष श्री.मुकुंदराव देसाई, उपाध्यक्ष श्री. सुभाष गणपतराव देसाई व संचालकांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी कारखान्याचे संचालक श्री. उदयसिंह पोवार, श्री. अनिल फडके, श्री. शिवाजी नांदवडेकर, तज्ञ संचालक श्री. नामदेव नार्वेकर, श्री. रशिद पठाण, श्री. दिगंबर देसाई, माजी संचालक श्री. सहदेव नेवगे, सेक्रेटरी व्यंकटेश ज्योती, चिफ अकौंटंट श्री. प्रकाश चव्हाण, मुख्य शेती अधिकारी श्री. विक्रम देसाई, डेप्युटी चिफ अकौंटंट श्री. रमेश वांगणेकर, ऊस पुरवठा अधिकारी श्री. अजित देसाई, तोडणी – वाहतुक कंत्राटदार श्री. सागर देसाई, श्री. आप्पासाहेब पाटील, श्री. संतोष भोपळे, श्री. रमजान किल्लेदार, इत्यादी तसेच शेती ऑफीस स्टाफ व ॲग्री ओव्हरसिअर उपस्थित होते.

सोहाळेवाडीत आज सदगुरू संत बाळूमामांचा भंडारा उत्सव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील सोहाळेपैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथे आज रविवार दि. ११ मे रोजी संत बाळूमामा यांचा भंडारा उत्सव व भाकणूक सोहळा होणार आहे. यावेळी परमपूज्य गुरुमाऊली कृष्णात डोणे महाराज ( वाघापुरे महाराज) यांचे शिष्य मारुती सत्यप्पा डोणे (वाघापूरे महाराज) यांचा भाकणूक सोहळा होणार आहे.
सायंकाळी चार वाजता संत बाळूमामांची आगमन मिरवणूक होणार आहे. सायंकाळी पाच वाजता संत बाळूमामांच्या मूर्तीला अभिषेक व महाआरती होणार आहे. सायंकाळी सहा वाजता हेडाम खेळवणे, भंडारा उधळण व भाकणूक सोहळा होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता महाप्रसाद तर रात्री आठ वाजता ओवीचा कार्यक्रम होणार आहे.
विवाह सोहळे, जत्रा- यात्रा,सुट्ट्या…
वाहने सुसाट…
वाहतुकीची कोंडी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सध्या ऐन बहरात असणारे विवाह सोहळे, जत्रा यात्रांचा हंगाम व उन्हाळी सुट्ट्यांमुळे उन्हाळी पर्यटनासह विविध कारणांनी पर्यटक व नागरिक प्रवासाकरता बाहेर पडू लागल्याने आजरा शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊ लागली आहे. कोकणाकडे जाणा-या व कोकणाकडून येणाऱ्या वाहनांचा प्रचंड त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. हजारोंच्या संख्येने संकेश्वर – बांदा महामार्गावरून रोज वाहनांची वर्दळ सुरू आहे.
आजरा तहसील कार्यालय ते आजरा एसटी डेपो मार्गावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा उभा केलेल्या गाड्या, बेशिस्त पार्किंग, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स या कोंडीमध्ये भरच टाकताना दिसतात.
वाहतुकीला शिस्त लावण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे.

होनेवाडी प्रिमीयर लिगचा उद्घाटन समारंभ उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
होनेवाडी प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
सरपंच श्रीमती प्रियंका आजगेकर व सौ. संगीता सुतार यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले .तसेच देवस्थान कमिटीचे माजी अध्यक्ष श्री अनिल शेंडे ,श्री पांडुरंग पाटील , श्री जीवन आजगेकर , अनिल पाटील , कृष्णा पाटील, संतोष पाटील , विष्णू कातकर, सुरेश आसबे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
सर्व मान्यवरांचे उपस्थितीत ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर पांडुरंग पाटील यांच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सर्व संघ मालकांना व्यायामशाळेच्या वतीने सन्मानित करण्यात आला.

आज उत्तूर मध्ये…
लोकशाहीर द.ना. गव्हाणकर प्रतिष्ठानच्या वतीने विविध पुरस्कारांचे सकाळी ११ वाजता सार्वजनिक आरोग्य मंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण समारंभ…


