सोमवार दिनांक १२ मे २०२५


स्मरण दिलेल्या शब्दांचे…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी निमित्त उजळणी सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून जिल्हा मध्यवर्ती बँकेसह आजरा साखर कारखाना, तालुका खरेदी विक्री संघ, आजारा नगरपंचायत, गोकुळ दूध संघ, लोकसभा, विधानसभा यासह विविध संस्थांच्या निवडणूकीवेळी देण्यात आलेल्या उमेदवारीच्या शब्दांची उजळणी व आठवण नेतेमंडळींना इच्छुक कार्यकर्ते पुन्हा एकदा नव्याने करून देऊ लागले असून विशेषत: जिल्हा परिषदेसह पंचायत समिती करिता उमेदवारी देताना नेते मंडळींची चांगलीच दमछाक होणार आहे.
तालुका खरेदी-विक्री संघासह आजरा साखर कारखाना, गोकुळ, जिल्हा बँक निवडणुका अत्यंत चुरशीने पार पडल्या. या निवडणुकीमध्ये मतदारांसमोर जाताना तालुक्यातील नेते मंडळींनी इतरांना जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचे गाजर दाखवले आहे. तसे शब्दही संभाव्य इच्छुक उमेदवारांना वेळोवेळी देण्यात आले. या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील व स्थानिक पातळीवरील राजकीय संदर्भात झपाट्याने बदलत गेले. कार्यकर्तेही सोयीप्रमाणे विखुरले गेले. विशेषतः हा प्रकार विधानसभा निवडणुकीवेळी दिसून आला. उमेदवारीचा शब्द देणारे विधानसभेमध्ये एकाच्या प्रचारात तर शब्द घेणारे दुसऱ्याच उमेदवाराच्या प्रचारात असाही प्रकार आढळून आला. विधानसभा निवडणुकीतील या घडामोडी आता जिल्हा परिषद व पंचायत समितीकरता दिलेले शब्द पाळताना अडचणीच्या ठरू लागल्या आहेत. बदललेल्या संदर्भामुळे अनेक नवे इच्छुक आता दंड थोपटू लागले आहेत.
उमेदवाऱ्या जाहीर करताना दिलेला शब्द पाळणे म्हणजे बदललेल्या संदर्भानुसार विधानसभा निवडणुकीत विरोधात गेलेल्यांना उमेदवारी दिल्यास मदत केलेल्यांची नाराजीला सामोरे जावे लागणार आहे. शब्द न पाळल्यास ज्यांना शब्द दिला आहे त्यांच्याकडून दगाफटका होण्याची शक्यता आहे. हा दगाफटका विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
या सर्व प्रकारात ‘ शब्द ‘ देणारी मंडळीच अडचणीत येत आहेत हे निश्चित.

बापरे...
सर्वसामान्यांनी बाजारपेठेत जायचे की नाही ?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील मुख्य बाजारपेठेतील वाहतुकीची शिस्त पूर्णपणे कोलमडली असून लहान मुले, महिला, वयोवृद्ध नागरिक यांनी बाजारपेठेत जायचे की नाही ? असा प्रश्न आता उपस्थित होण्याची वेळ आली आहे.
मुख्य बाजारपेठेत संभाजी चौकापासून पुढे दर पाच ते दहा मिनिटांना वाहतुकीची कोंडी होताना दिसते. मुळातच अरुंद असणारी बाजारपेठ. रस्त्यावरच दुकानदार व बाहेरगावाहून येणारे विक्रेते यांनी थाटलेली दुकाने. बेशिस्त पद्धतीने लावलेल्या दुचाकी व चार चाकी गाड्या यामुळे बाजारपेठेतून मार्ग काढताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. महागाव मार्गे जाणारी वाहतूक एकेरी करून पर्यायी मार्ग वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.
वारंवार कोंडी होऊनही याकडे संबंधितांकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नाही हे शहरवासियांचे दुर्दैव आहे.

गजरगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वास्तुशांती व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास सुरुवात
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गजरगाव ता. आजरा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वास्तुशांती, श्री मूर्ती प्रतिष्ठापना, कळशारोहण व लोकार्पण सोहळ्यास शनिवारपासून उत्साहात सुरुवात झाली आहे.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कलश मिरवणूक, मानकरी गारवा कार्यक्रम, गृहप्रवेश,महाप्रसाद यासह वास्तुशांती कार्यक्रम गेल्या दोन दिवसात पार पडले.
आज सोमवार दिनांक १२ रोजी श्री मूर्तीची कलश मिरवणूक व त्यानंतर दुपारी बारा वाजता महाप्रसाद व रात्री ह. भ. प. श्री दत्त महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
मंगळवार दिनांक १३ मे रोजी जलाधिवास, पुण्याधिवास, शवाधीवास तर बुधवार दिनांक १४ रोजी प.पू. किसन महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण कार्यक्रम होणार आहे. सकाळी दहा वाजता विठ्ठल- रुक्मिणी सांस्कृतिक सभागृह कोनशीला व लोकार्पण सोहळा माजी गृहराज्यमंत्री/आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व आमदार शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

वाटंगी प्रीमियम लीग स्पर्धा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाटंगी प्रीमियम लीग( पर्व पहिले) गेल्या दोन दिवसांपासून ही स्पर्धा सुरु होती.या स्पर्धेत आठ संघानी प्रवेश घेतला होता.इलाईट टीचर्स हा संघ विजेता तर उपविजेता संघ सुपर किंग हा ठरला .
या स्पर्धेला संघ मालक शिवप्रसाद देसाई,सुजित देसाई,नीलेश सासुलकर,राजेंद्र गिलबिले,प्रकाश कुंभार,सुनील गिलबिले, किशन देसाई, रवींद्र पोवार, गॅब्रियल डिसोझा, कमिटी व्यवस्थापक संदीप देसाई,विकास कुराडे,सागर शिंगटे,उमेश घोरपडे, अविनाश घोरपडे अविनाश मलगोंडे सुधीर सुतार,श्रावण सुशांत जाधव यांचे सहकार्य लाभले.

निधन वार्ता
सौ. सुलोचना पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सौ. सुलोचना विठ्ठल पाटील (वय ६८ वर्षे ) रा. घाटकरवाडी यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
सेवानिवृत्त तालुका संघ व्यवस्थापक श्री विठ्ठल पाटील यांच्या पत्नी व सर्वोदय विकास सेवा संस्था सुळेरानचे चेअरमन लहू विठ्ठल पाटील यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात तीन मुले,सूना, जावई, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

भादवणवाडी येथे उद्या रेकॉर्ड डान्स स्पर्धांचा धमाका…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मसवेश्वर, महादेव, लक्ष्मी यात्रेनिमित्त भादवणवाडी ता. आजरा येथे मसवेश्वर स्पोर्ट्स यांच्या वतीने मंगळवार दिनांक १३ रोजी रात्री ९.३० वा. खुल्या व गाव मर्यादीत रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.


