शनिवार १५ फेब्रुवारी २०२६


रायगडमधील अपघातात सोहाळेच्या युवकाचा मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्रशांत नामदेव दोरुगडे (वय ३८) सोहाळेपैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) याचा अपघाती मृत्यू झाला आहे.रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत श्री. दोरुगडे हा गंभीर जखमी झाला होता. ही घटना माणगाव (जि. रायगड) जवळ शुक्रवार (ता.१३) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली घडली.
याबाबत माहिती अशी,
प्रशांत हा महाड येथे ट्रक चालक म्हणून काम करत होता. शुक्रवारी रात्री तो ट्रक घेऊन मुंबईहून महाडकड़े जात होता. या प्रवासा दरम्यान माणगाव नजीक ट्रक रस्त्याशेजारी थांबवून जेवणासाठी रस्ता ओलांडत होते. दरम्यान अज्ञात वाहनाने प्रशांत याला दिलेल्या जोराच्या धडकेत गंभीर जखमी झाला होता. प्रशांत हा आईवडिलांचा एकुलता मुलगा होता. त्यांच्या आईचे वडिलांचे निधन झाले आहे. प्रशांतच्या अकाली निधनाने सोहाळे परिसरात शोककळा पसरली आहे.
आजपासून रामतीर्थ येथील महाशिवरात्री यात्रा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील रामतीर्थ परिसरात भरणाऱ्या महाशिवरात्री यात्रेस आजपासून प्रारंभ होत आहे. आजरा, गडहिंग्लज, चंदगडसह कोल्हापूर जिल्हा व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या परिसराला भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. निसर्गरम्य अशा धबधब्याच्या परिसरामध्ये भरणाऱ्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरपंचायतीकडून स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात आली आहे.
आजरा आगारामार्फत विशेष बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. उद्या सोमवार हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रास्थळी मेवा- मिठाई, खेळणी, शीतपेये यासह विविध प्रकारचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत.

निधन वार्ता
मोहन शिवणे

आरदाळ ता. आजरा येथील मोहन भैरू शिवणे ( वय ५७ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. मीनाताई ठाकरे दूध संस्थेचे कर्मचारी होते. मोहन सरकार या नावाने परिचित असणाऱ्या व मनमिळावू स्वभावाच्या शिवणे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
तानाजी हसबे

मडीलगे ता. आजरा येथील तानाजी ईश्वर हसबे (वय ६० वर्षे) यांचे आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
उत्तुर पंचायत समिती मतदार संघात
उमेदवार निहाय गावावर पडलेली मते
अनुक्रमे…
संभाजी कुराडे/ विकास चोथे / महेश करंबळी
उत्तूर- १६५२ /१२७८ /१८१०
पेंढारवाडी- ८२ / १६४ /११६
मुम्मेवाडी- १७७ /५१८ /२७९
महागोंड- २१९/ ३८७/ २२०
चव्हाणवाडी- ५४/ ३०७/ १८०
धामणे- २७२ / ५३८ /३८५
आरदाळ- ३०६ /३२०/ १२४
वडकशिवाले- ८९ /३१६/ १२०
बहिरेवाडी- ३४९ / ११५९/ ५६७
बेलेवाडी हु.- ३८२/ ५५३/ २४५
हालेवाडी- २४८/ ३६२/ ८२
होन्याळी- २५६/. ५२४/ ११६
झुलपेवाडी- ९१ / ४०८/ २७५
कर्पेवाडी- ७४/ ३३०/ ७७
चिमणे- २९७/ २९९/ १३२
संभाजी कुराडे – ४६६९
विकास चोथे-७२८१
महेश करंबळी- ४८०९
अभिजीत आरेकर- ४५५
सागर वाघरे-२९५
एकूण झालेले मतदान-१७६६४
विकास चोथे /राष्ट्रवादी काँग्रेस विजयी

दहावी निरोप समारंभ…
भादवण हायस्कूल

भादवण हायस्कूल भादवणमधील एसएससी बोर्ड परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर.जी. कुंभार होते. या कार्यक्रमांसाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून हरीष देवरकर यांनी दहावीनंतर काय? यासंबंधी करिअर मार्गदर्शन केले. “करियर निवडताना विचारपूर्वक शाखा निवडून आपले करिअर पूर्णत्वाकडे न्या” असा अनमोल सल्ला दिला. मुख्याध्यापक आर जी कुंभार यांनी परीक्षेसंदर्भात सूचना दिल्या. आभार श्री.व्ही.एस. कोळी यांनी मानले, सूत्रसंचालन श्रीमती एम एम जाधव यांनी केले.
पंडित दीनदयाळ विद्यालय

पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड .संजय पवार यांच्या हस्ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. कु. युविका पोवार, श्रेयशी बोलके आणि मोहम्मद आगा यांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयीच्या भावना व्यक्त केल्या. ॲड.संजय पवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. राज्यसेवा परीक्षेत यश मिळवलेले मयूर पवार यांनी विद्यार्थ्यांना यश मिळविण्याचे मार्ग सांगितले. अभ्यासातील सातत्य ,स्वतःमध्ये असलेली चिकाटी, यश मिळवण्यासाठी कष्ट ,अवांतर वाचन ,मैदानी खेळ ,सहनशीलता, वेळेचे महत्व , भरपूर अभ्यास, अविरत कष्ट करण्याची तयारी असेल तर यश आपल्याला नक्कीच मिळणार. या सर्व यशाच्या मार्गांचा अवलंब करून परीक्षेत यश मिळवा अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर मुंज यांनीही शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीम. विमल भुसारी, खजानिस रमेश कारेकर, विद्यार्थी – विद्यार्थिनी तसेच शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत बुरुड यांनी तर आभार विजय राजोपाध्ये यांनी मानले.

वाटंगी किणे रस्त्याच्या सुधारकामाचा आज शुभारंभ
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नातून व भाजपा जिल्हाध्यक्ष अशोकअण्णा चराटी आणि भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष जयवंतराव सुतार यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या वाटंगी-किणे या ३० लाखांच्या रस्ता सुधारणा विकास कामांचा उद्घाटन सोहळा आज रविवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता वाटंगी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जयवंतराव सुतार यांनी दिली आहे.
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

छाया वृत्त

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर कै शुभांगी गजानन वायंगणकर यांच्या स्मतीप्रित्यर्थ आयोजित शालेय नाट्यछटा स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम कमांक कु. अनन्या सिध्देश पिळणकर स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आजरा, व्दितीय क्रमांक कु. यशश्री विकास किल्लेदार – रोझरी इंग्लिश स्कुल आजरा तर तृतीय क्रमांक कु. अंतरा कृष्णा पाटील विद्यामंदिर होनेवाडी यांना मिळाला. तर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक कु. रिया संतोष पारपोलकर- आजरा हायस्कुल, आजरा, व्दितीय क्रमांक कु. आरोही कृष्णा पाटील रोझरी इंग्लिश स्कुल आजरा व तृतीय क्रमांक कु. हाजी महम्मद इरफान सय्यद व्यंकटराव हायस्कुल आजरा यांना मिळाला. विजेत्या स्पर्धकांना डॉ. अंजनी देशपांडे, वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी श्री अनिल कांबळे व सौ.वृषाली वाळके ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा विद्या हरेर, सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संचालक बंडोपंत चव्हाण यांच्यासह सर्व संचालक शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक विजय राजोपाध्ये यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.

साक्षी पाटीलची निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालयची नेटबॉल खेळाडू कू.साक्षी धनाजी पाटील विजयवाडा,आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय महिला नेटबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ महिला संघामध्ये तिची निवड झाली आहे. तिला महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

चारचाकी पेटली...

आजरा – आंबोली मार्गावर एका स्थानिक मोटर दुरुस्ती गॅरेजमध्ये उभ्या अवस्थेत असणाऱ्या शॉर्टसर्किटमुळे चार चाकीने पेट घेतला होता. अग्निशमन दलाची गाडी वेळेत आल्याने आग विझवण्यात यश आले.




