शनिवार
८ ऑगस्ट २०२६


बिबट्या देऊळवाडी सातेवाडी परिसरात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गुरुवारी रात्री संभाजी पोतनीस याचा पोल्ट्री शेड ते राईवाला देवस्थान दरम्यान बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत.
वनाधिकारी यांनी येऊन या पावलांच्या ठशावरून तो बिबट्याच असल्याची खातरजमा करून घेतली आहे.
या मार्गावरून प्रवास करताना वेळी काळजीपूर्वक प्रवास करावा . बिबट्या अथवा बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्यास आपल्याकडीचल वन अधिकारी यांना कळवावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

आजरा एसटी आगार व्यवस्थापकपदी पृथ्वीराज चव्हाण रुजू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा एसटी आगाराचे नवीन व्यवस्थापक म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला आहे. आजरा तालुका एसटी प्रवासी संघटनेने केलेल्या सातत्यपूर्ण मागणी आणि पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
माजी आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील यांचा एकंदर कारभार वादातीत ठरला होता.आजरा आगाराची बस सेवा पूर्णतः विस्कळीत झाली होती. याचा थेट फटका तालुक्यातील प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना बसत होता. त्यामुळे त्यांच्या बदलीची मागणी आजरा तालुका एसटी प्रवासी संघटनेच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे करण्यात आली होती. संघटनेच्या या मागणीची दखल घेत पाटील यांची बदली करण्यात आली आहे.
एसटी प्रवासी संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी एसटी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन इंदुलकर, सचिव विकास सुतार आणि हितेश कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कर्जमाफी पार्श्वभूमीवर राष्ट्रीयकृत बँकांची तातडीने बैठक घ्या : शिवसेनेची तहसीलदारांकडे मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. राष्ट्रीयकृत बँकांकडून आवश्यक माहिती वेळेत न मिळाल्याने शेतकरी या योजनेपासून वंचित राहत असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आजरा तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थापकांची बैठक तहसील कार्यालयात लावावी अशी मागणी केली आहे.
शिवसेनेचे आजरा तालुका प्रमुख श्री. युवराज पोवार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार, आजरा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतले आहे. कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी बँकांना शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे पाठवणे बंधनकारक आहे.
मात्र काही बँका वेळेत आणि परिपूर्ण माहिती पाठवत नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे सर्व बँक व्यवस्थापकांची एकत्रित बैठक लावून माहिती संकलनाची प्रक्रिया जलद करावी, जेणेकरून एकाही पात्र शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित राहावे लागणार नाही.
या निवेदनावर तालुका प्रमुख युवराज पोवार, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्यासह संजय येसादे, सुनील डोंगरे, संजूभाई सावंत , अमित गुरव, यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

मालूबाई सावंत यांचे निधन

धामणे ता. आजरा येथील मालुबाई कृष्णा सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ६८ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, सुना, पती, नातवंडे असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते विलास सावंत यांच्या त्या आई होत.
आज शनिवारी सकाळी धामणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

निधन वार्ता
काजमील फर्नांडिस

पेरणोली तालुका आजरा येथील काजमील रुजाय फर्नांडिस (वय ६७ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी नातवंडे असा परिवार आहे.
जनता बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी मिनीन फर्नांडिस यांचे ते भाऊ होत.
अंत्यविधी आज शनिवारी दुपारी दोन वाजता पेरणोली येथे आहे.
ज्ञानोबा शिर्के

पेरणोली तालुका आजरा येथील ज्ञानोबा भैरू शिर्के ( वय ८० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले,सुना व नातवंडे असा परिवार आहे ॲड. प्रदीप शिर्के यांचे ते वडील होत.

‘आजच्या काळासाठी तुकोबा ‘ या ग्रंथावर मंगळवारी आजऱ्यात चर्चासत्र

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हभप देवदत्त परूळेकर यांनी लिहिलेल्या आजच्या काळासाठी तुकोबा या ग्रंथावर मंगळवार दिनांक ११ रोजी आजरा येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे. मुकुंददादा देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रणवीर शिंदे, प्रा. सुनील शिंत्रे व सुभाष विभुते हे सहभाग घेणार आहेत याबरोबरच ग्रंथाचे लेखक व दांडेकर मामा दिंडीचे दिंडी प्रमुख ह.भ.प. देवदत्त परूळेकर आणि प्रकाशक अजय कांडर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
वारकरी, महाविद्यालयीन मुले, अभ्यासक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी मंगळवारी जनता सहकारी बँकेच्या सभागृहात दुपारी ठीक १२.०० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री राम कृष्ण हरी वारकरी संप्रदायाचे संस्थेचे अध्यक्ष गौरव सुतार महाराज, गंगाराम येडगे यांनी केले आहे.

आजचे पंचांग
दिनांक : ८ ऑगस्ट २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : दशमी तिथी (दुपारी ०१.५९ पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
नक्षत्र : रोहिणी नक्षत्र (दुपारी ०४.५० पर्यंत) त्यानंतर मृगशीर्ष नक्षत्र
योग : ध्रुव योग (सकाळी ०९.०१ पर्यंत) त्यानंतर व्याघात योग
करण : विस्ती भद्रा करण (दुपारी ०१.५९ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : वृषभ राशी (९ ऑगस्ट पहाटे ०३.४८ पर्यंत) त्यानंतर मिथुन राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.३१ ते सकाळी ११.०८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१८ ते दुपारी ०१.१०
सूर्योदय : सकाळी ०६.१९
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


