रविवार
९ ऑगस्ट २०२६


शाळेला ठोकणार टाळे…
वाटंगी ग्रामस्थांचा इशारा

प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांच्या जागांच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि.१० रोजी वाटंगी गावातील प्राथमिक शाळेला टाळे ठोकण्यात येणार आहे. तसे लेखी निवेदन ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहे.
गेल्या १०-१२ दिवसांपासून शाळेतील एका शिक्षिकेची पदोन्नती होऊन बदली झाली आहे. मात्र त्यांच्या जागी अद्याप नवीन शिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. याबाबत शिक्षण विभागाकडे चौकशी केल्यानंतर हक्काचा शिक्षक ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहे.
सध्या विद्या मंदिर वाटंगी येथे ९९ विद्यार्थी असून फक्त३ शिक्षक कार्यरत आहेत. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. तातडीने शिक्षकाची नेमणूक होणे अत्यावश्यक आहे.
या संदर्भात गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच पोलीस स्टेशन आजरा येथे निवेदन देण्यात आले आहे.
याबाबतच्या निवेदनावर वाटंगी ग्रामस्थ व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उमेश घोरपडे, संदीप देसाई, अनिल तेजम, लखन नाईक, विश्वास कांबळे, सागर कांबळे आदींच्या सह्या असून निवेदन देताना सी.आर.देसाई, संतोष चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शहराच्या वेशीवर बिबट्याची दहशत…
तालुक्यात बारा ते पंधरा बिबट्यांचे अस्तित्व अधोरेखित

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – साळगांव मार्गावर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास फिरण्यासाठी गेलेल्या चार महिलांना रस्त्या शेजारील कोसळलेल्या झाडावर पहुडलेला बिबट्या दिसला.
सायंकाळी नेहमीप्रमाणे शोभा कुरुणकर, विद्या कुरुणकर, मनिषा जालकर व मंगला घाटगे या महिला नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी साळगांव मार्गावर गेल्या होत्या. मेसकाठीचे बेट असणाऱ्या ठिकाणी एक झाड पडलेले आहे त्या झाडावर बिबट्या बसला होता. महिलांचे लक्ष त्या बिबट्याकडे गेले.घाबरलेल्या महिलांनी तेथून धुम ठोकली.याबाबत वन विभागाला कळविल्यानंतर कर्मचारी येवून पहाणी केली मात्र बिबट्या जंगलात निघून गेला होता.
या मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असून वारंवार गव्यांचा कळप दर्शन देत असतो. आता बिबट्यानेही खुले दर्शन देण्यास सुरुवात केली आहे.
वनविभागाच्या सर्वेनुसार सध्या तालुक्यात १२ ते १५ बिबट्यांचा वावर आहे. येत्या दोन-चार वर्षात ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकाच वेळी अनेक ठिकाणी दर्शन…
तालुक्यामध्ये साळगाव,सोहाळे वझरे या परिसरात एका बिबट्याचे अस्तित्व आहे. तर बहिरेवाडी परिसरात बिबट्या दर्शन देत आहे. हीच अवस्था आवंडी धनगर वाड्यावर आहे तर शुक्रवारी रात्री हाळोली येथील चाळोबा रिसॉर्ट परिसरात बिबट्याच्या जोडीने दर्शन दिले आहे.

पोलीस बांधवांची टेंबलाई यात्रा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान वृत्तसेवा
आजरा येथील जुन्या पोलीस लाईनमध्ये पोलीस बांधवांची श्री टेंबलाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडली.
पूजेची जबाबदारी सागर देसाई आजरा पोलीस पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
यात्रेच्या यशस्वीतेसाठी वैभव गवळी, संदीप मसवेकर, मंतेश पाटील- आजरा बीट, साजिद शिकलगार – शहर बीट, दयानंद बेंनके, अनिल सरबळे, सूर्यकांत सुतार, ओमकार पाटील, पांडूरंग येलकर, विठ्ठल कांबळे, सुदर्शन कांबळे, राहुल पन्हाळकर, सुरेश बदरगे- ट्राफिक हवालदार , अवधूत मोरजकर या कमिटी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
आजरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बाबासाहेब सरवदे यांच्या हस्ते श्री टेंबलाई देवीची पूजा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी गौतम भोसले, गौरव देशपांडे, सुनील मटकर, विलास चव्हाण, धीरज ससाने, ऋषिकेश कांबळे, नंदकुमार कांबळे आणि सर्व भाविक मंडळी यांनी सहकार्य केले. यावेळी पोलीस स्टाफ, सहकारी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी अनंत देसाई यांनी सर्वांचे आभार मानले.

उत्तूर येथे ‘रानभाज्या महोत्सवा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
‘बदलती जीवनशैली आणि वाढत्या शारीरिक समस्यांवर रानभाज्यांचे सेवन हा नैसर्गिक उपाय आहे. रानभाज्यांमधील नैसर्गिक गुणधर्म निरोगी व निकोप शरीरासाठी उपयुक्त ठरतात’ असे प्रतिपादन सरपंच किरण आमणगी यांनी केले.नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेज, योग व निसर्गोपचार महाविद्यालय, सह्याद्री निसर्ग मंडळ आणि संवेदना फाउंडेशन, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाज्या महोत्सवाच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी प्राचार्य रामकृष्ण मगदूम यांनी विविध दुर्मिळ व औषधी रानभाज्यांची माहिती दिली.
प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. धनाजी राणे, तर पाककृती प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. सचिन पवार यांच्या हस्ते झाले.महोत्सवात विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या ३४ प्रकारच्या दुर्मिळ व औषधी रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करत विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले. अनेक वर्षांनंतर दुर्मिळ रानभाज्यांची चव चाखण्याची संधी मिळाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले.

आजरा महाविद्यालय, आजरा येथे ‘क्रांती दिन’ उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालय, आजरा येथील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाच्या वतीने ९ ऑगस्ट ‘क्रांती दिनाचे औचित्य साधून‘ आज मोठ्या उत्साहात व देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने “आधुनिक भारतासमोरची आव्हाने आणि आजचा क्रांती दिन” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून माजी सैनिक, सुभेदार श्री. सुरेश देसाई उपस्थित होते.
आपल्या मनोगतात त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचा इतिहास उलगडून दाखवला. “आजच्या तरुण पिढीने केवळ इतिहास वाचून न थांबता, आधुनिक भारतासमोर असणारी सामाजिक, आर्थिक व सुरक्षेविषयक आव्हाने ओळखून ती लीलया पेलण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने आजच्या क्रांती दिनाची योग्य श्रद्धांजली ठरेल,” असे प्रतिपादन सुबेदार देसाई यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. किरण पोतदार होते.कार्यक्रमास शश उपप्राचार्य श्री. दिलीप संकपाळ, परिवेक्षक श्री. मनोजकुमार पाटील तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील, एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ. संजय चव्हाण उपस्थित होते.
सूत्रसंचालन कॅडेट. मार्टिन फर्नांडीस व आभार कॅडेट नेहा गिलबिले यांनी मांडले.
आज रक्तदान शिबीर
वेळ : सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत
स्थळ : श्री गजानन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., आजरा सांस्कृतिक भवन, आजरा

आजचे पंचांग
दिनांक : ९ ऑगस्ट २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : एकादशी तिथी (सकाळी ११.०४ पर्यंत) त्यानंतर द्वादशी तिथी
नक्षत्र : मृगशीर्ष नक्षत्र (दुपारी ०२.४२ पर्यंत) त्यानंतर आर्द्रा नक्षत्र
योग : हर्षण योग (१० ऑगस्ट पहाटे ०२.०३ पर्यंत) त्यानंतर वज्र योग
करण : बलवा करण (सकाळी ११.०४ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : मिथुन राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त
राहु काळ : सायंकाळी ०५.३३ ते सायंकाळी ०७.०९ पर्यंत
शुभ मुहूर्त
अभिजित : दुपारी १२.१८ ते दुपारी ०१.१०
सूर्योदय : सकाळी ०६.१९
सूर्यास्त : सायंकाळी०७.०९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत



