मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५


नियोजनाचा अभाव विरोधकांना नडला…
संधी असूनही काँग्रेस सत्तेपासून दूरच…(आजरा नगरपंचायत निवडणूक विश्लेषण)

…ज्योतिप्रसाद सावंत
आघाड्यांच्या घडामोडीत फारसे यश दिसत नसल्याने तातडीने आपल्या समर्थक मंडळींना सोबत घेऊन ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून आघाडीची रचना करून भाजपाचे अशोकअण्णा चराटी यांनी प्रचारात आघाडी घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत विरोधकांचे पॅनल निश्चित न झाल्याने पॅनल मधील दोन जागा रिक्त ठेवण्याची नामुष्की काँग्रेस प्रणित आघाडीला आली. वेळेत केलेली पॅनल रचना व प्रचाराला मिळालेला वेळ ताराराणी आघाडीच्या पथ्यावर पडला. आघाडीने नगराध्यक्ष पद खिशात घातलेच पण त्याचबरोबर आठ नगरसेवक पदाच्या जागाही पटकावल्या. सलग दुसऱ्यांदा संधी असूनही काँग्रेस व मित्र पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यात अशोकअण्णा चराटी व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले.
चराटी – शिंपी गट युती होणार, चराटी- मुकुंदराव देसाई एकत्र येणार अशा सुरुवातीला चर्चा सुरू होत्या. या चर्चा सुरू असताना काँग्रेसकडून हे असे काही घडणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली जात होती. काँग्रेस मधील व राष्ट्रवादी काँग्रेसमधील कांही मंडळींच्या भूमिका या संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्या होत्या. एकीकडे ताराराणी आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अशोकअण्णा चराटी यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दुसरीकडे मात्र अन्याय निवारण समिती राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस ही मंडळी एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्याने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर बैठकांवर बैठकाच होत राहिल्या. याचा पुरेपूर फायदा ताराराणी आघाडीच्या मंडळींना घेता आला. याच कारणामुळे शेवटच्या क्षणी अन्याय निवारण समितीने स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. जे मिळतील त्यांना सोबत घेऊन त्यांनी काही ठिकाणी उमेदवार उभे केले. अन्याय निवारण समिती बाजूला झाल्यानंतर मात्र नगराध्यक्षपदा करता उमेदवारच उपलब्ध नाही अशी अवस्था काँग्रेसची झाली. त्यातूनही जे पर्याय होते त्यांच्यावर अंतर्गत गटातटाच्या राजकारणामुळे निवडणुकीला सामोरे जाताना विचार करण्याची वेळ आली. अखेर संजयभाऊ सावंत यांच्या नावावर ऐनवेळी शिक्कामोर्तब करण्यात आले.
माघारीपर्यंत हे नाट्य सुरूच होते. एकीकडे अशोक चराटी यांनी प्रचाराचा धुरळा उडवला तर दुसरीकडे माघारीपर्यंत काँग्रेस प्रणित आघाडीचे उमेदवारीची चित्र अस्पष्टच होते. त्यातून प्रभाग तीन मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय पुढे आला. अधिकृतरित्या आघाडीत समावेश न झालेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्ह प्रभाग १७ मधून काँग्रेसचा उमेदवार म्हणून मतपत्रिकेवर दिसू लागला. तर प्रभाग १३ व प्रभाग १५ प्रचार पत्रकामध्ये रिक्तच राहिला. घाईगडबडीने एबी फॉर्म वाटप करण्यात आल्याने या गोंधळात भरच पडत गेली. निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवायची की आघाडी म्हणून लढवायची यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेते मंडळींनी सोयीच्या भूमिका घेण्यास सुरुवात केली. ही मंडळी काँग्रेस सोबत होती की विरोधात होती याबाबत एकंदर भूमिका पाहता आजही संभ्रमावस्था आहे. या सगळ्याचा फटका काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजयभाऊ सावंत यांना बसला. अनपेक्षित रित्या त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
आमदार सतेज पाटील वगळता परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराकरता कोणीही फिरकले नाही. दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार शिवाजीभाऊ पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी वैयक्तिक लक्ष घालून अशोक चराटी यांना बळ देण्याचे काम केले.
काँग्रेस अंतर्गत गटबाजीचा फटका अखेर बसलाच. सहा जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागले. प्रभाग ६ व प्रभाग १७ मधील निकाल आत्मपरीक्षण करावयास लावणारा ठरला. ऐनवेळी आघाडी करून निवडणुकीला सामोरे गेलेल्या अन्याय निवारण समितीसह तुतारीच्या चिन्हावर एकाकी लढलेल्या अरीफ खेडेकर यांचा विजय निश्चितच कौतुकास्पद आहे. अपक्ष उमेदवार मंजूर मुजावर यांच्यासह डॉ. श्रद्धानंद ठाकूर यांना काही मंडळींनी कमी लेखले पण याची फार मोठी किंमत मोजावी लागली असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे.
काठावरच्या सत्तेने उपनगराध्यक्ष पदासह ‘स्वीकृत’ चे दावेदार वाढले…
अत्यंत चुरशीने पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा पुरस्कृत ताराराणी आघाडीने आठ जागांसह नगराध्यक्ष पदाची जागा जिंकली असली तरीही विरोधी आघाडीचे बलाबल नऊ असल्याने तूर्तास काठावरचे बहुमत अशी अवस्था ताराराणीची झाली आहे. यामुळे उपनगराध्यक्ष पद निवडीसह स्वीकृत नगरसेवक निवडताना नेतेमंडळींची दमछाक होण्याची शक्यता आहे.
शिवसेना उ.बा.ठा. बॅकफूटवर…
शिवसेनेचे (उ.बा.ठा.) उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी टार्गेट बनवल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. प्रभाग १६ मधील सौ. पुजारी व संभाजी पाटील यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार होते. ते दोन्ही उमेदवार विजयी झाले. यामुळे शिवसेना (उ.बा.ठा.) बॅकफूटवर गेली आहे

तरूण दिग्दर्शक रणजित पाटील यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोळींद्रे (ता. आजरा) गावचे सुपुत्र व सध्या मुंबईस्थित तरूण दिग्दर्शक, टीव्ही सिरियल कलाकार रणजित नाना पाटील (वय. ४४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
रणजित यांना नुकताच ‘जर तरची गोष्ट’ या व्यावसायिक नाटकाचे उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून झी मराठीचा ‘झी नाट्य गौरव पुरस्कार २०२४’ देऊन गौरविण्यात आले होते. रणजित यांने अनेक नाटक, मलिकांचे दिग्दर्शन केले असून झी मराठी ‘ह्रदयी प्रित जागते’ या मालिकेत सहकलाकारची भूमिका साकारली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे.
ग्रामपंचायत उत्तूर शिष्टमंडळाची मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट
विकासकामांच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्रामपंचायत उतूरच्या १२ सदस्यीय शिष्टमंडळाने कागल येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी गावातील विविध विकासकामांच्या मागणीसंदर्भात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन स्वीकारून मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच कागल व गडहिंग्लज नगरपरिषद निवडणुकांमध्ये सत्ता मिळवल्याबद्दल ग्रामपंचायत उत्तूरच्या वतीने मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच किरण आमणगी, ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, राजू खोराटे, मिलिंद कोळेकर, भैरू कुंभार, अनिता घोडके, सुनिता केसरकर, सुनिता हतिरगे, लता गुरव, सरिता कुरुणकर तसेच ग्रामपंचायत अधिकारी पी. के. पाटील उपस्थित होते.

मडीलगे येथे शनिवारी मॅटवरील कबड्डी स्पर्धा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडिलगे ता. आजरा येथे शनिवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता पाटील समाज पटांगणावर श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त ५५ किलो वजनी गटातील मॅटवरील कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १११११/-, ७७७७/-,५५५५/- व ३३३३/- रुपये रोख व भव्य चषक देण्यात येणार आहे.
या व्यतिरिक्त अनेक वैयक्तिक बक्षीसेही देण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. इच्छुक संघांनी शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर पर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

वझरे येथे उद्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वझरे ता. आजरा येथे लक्ष्मी यात्रेनिमित्त उद्या बुधवार दिनांक २४ डिसेंबर रोजी सायंकाळी नऊ वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ३००१/- रुपये २००१/-रुपये १००१/- रोख बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी उमेश पाटील (९६५७०५३४७९) व दिगंबर जाधव (८४५९४११९४२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.



