mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या -२

आजरा कारखाना आर्थिक अडचणीतून सावरूनच दाखवू :पालकमंत्री हसन मुश्रीफ 

                 

                    आजरा:प्रतिनिधी

         आजरा सहकारी साखर कारखाना फार मोठ्या आर्थिक अडचणीतून जात आहे. हा साखर कारखाना या सगळ्या आर्थिक अडचणींमधून सावरूनच दाखवू, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

          होऊ घातलेल्या आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका काय? या प्रश्नावर पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, बिद्री साखर कारखान्याची लढाई संपली आहे. आता आजऱ्याचे रणशिंग फुंकले आह. आजरा कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मी, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व आमदार विनय कोरे यांनी भरपूर प्रयत्न केले, परंतु त्या प्रयत्नांना यश आले नाही.

     आजरा कारखाना फार मोठ्या अडचणीत आहे, या कारखान्याची आर्थिक घडी विस्कटायची नसेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन बिनविरोध करावं यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. परंतु; काही घटना अशा घडल्या की एकमेकांचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर या निवडणुकीत आमचे राष्ट्रवादीचे पॅनल आहे. आजरा कारखाना कोणत्याही परिस्थितीत आर्थिक अडचणीतून सावरूनच दाखवू.

      पालकमंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, कारखाना परिसर इको सेंसिटिव्ह झोनमध्ये असल्यामुळे तिथे डिस्टीलरी व को- जन उभारण्याला बंदी आहे. ती बंदी काढावी लागेल, त्यासाठी प्रसंगी केंद्रात केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटावे लागेल. डिस्टीलरी, इथेनॉल व को-जन हे तिन्ही प्रकल्प केल्याशिवाय तो कारखाना सुरळीत होणार नाही आणि हे करण्याची धमक आमच्यातच आहे असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.



आजरा साखर कारखान्यात एका विचाराच्या आघाडीची गरज : शिरीष देसाई

मुम्मेवाडी येथे रवळनाथ शेतकरी विकास आघाडीची प्रचार सभा


                  आजरा: प्रतिनिधी

       कारखाना आर्थिक अरिष्ठात असताना कारखान्यावरील कर्जाचा बोजा कमी करणे हे मोठे आव्हान असून हा बोजा समर्थपणे पेलणारी व ती कमी करण्यासाठी बांधील असणारी आघाडी सत्तेत येणे आवश्यक आहे. चार पक्षांचे भेंडोळे घेऊन कारखान्यात यापूर्वी आलेले अतिशय वाईट अनुभव पुन्हा सभासदांच्या नशीबी येऊ नयेत म्हणून राष्ट्रवादीने स्वच्छ व एकाच विचाराचे उमेदवार उभे करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार केला आहे. सभासदांनी या आघाडीला भरभरून मतदान करावे असे आवाहन पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री.शिऱीष देसाई यांनी केले. मुम्मेवाडी येथे आयोजित श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार प्रसंगी ते बोलत होते.

       यावेळी बोलताना उमेदवार मारुती घोरपडे म्हणाले, आता संमिश्र आघाड्यांचा प्रकार कारखान्याला परवडणारा नाही कारखान्यासमोर सहवीज प्रकल्प उभा करण्याशिवाय पर्याय नाही. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यासाठी सहकार्य करण्याचे यापूर्वीच आश्वासन दिले आहे. सभासदांनी या आघाडीच्या पाठीशी राहिल्यास हे प्रकल्प मार्गी लागतील असे स्पष्ट केले.

      यावेळी आघाडीचे उमेदवार काशिनाथ तेली, दीपक देसाई, बबन पाटील, यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ  यांचा उत्तूर विभाग दौरा 

         शनिवार दि.९ डिसेंबर
१) भादवणवाडी – सकाळी ९ वाजता
२) जाधेवाडी – सकाळी १० वाजता
३) खोराटवाडी – सकाळी ११ वाजता
४) मासेवाडी – दुपारी १२ वाजता
५) सोहाळे – दुपारी १ वाजता
        – दुपारी ०२ ते ०४ राखीव – 
६) पेंढारवाडी -.सायंकाळी ४ वाजता
७) आर्दाळ – सायंकाळी ०५ वाजता
८) हालेवाडी – सायंकाळी ०६ वाजता
९) वडकशिवाले – सायं ०७ वाजता
१०) मडिलगे – ०८ वाजता जाहीर सभा
११) भादवण- ९ वाजता जाहीर सभा

नव मतदार नोंदणीचे आज विशेष शिबिर

               आजरा: प्रतिनिधी

       मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, मुंबई यांच्या सूचनेनुसार आज शुक्रवार दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी आजरा तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळी ११ ते ५ या वेळेत १८ ते १९ वर्षे वयोगटातील नवमतदार नोंदणीचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती सूरज माने तहसीलदार आजरा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

       भारत निवडणूक आयोगाने ‘विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२४’ घोषित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत १८ ते १९ वयोगटातील नव मतदार नोंदणी ची कार्यवाही सुरू आहे. २०२४ हे वर्ष निवडणूक वर्ष असल्यामुळे येत्या सर्वत्रिक निवडणुकांपूर्वी होणारे हे शिबिर म्हणजे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी शेवटची संधी असणार आहे.

       हे शिबीर यशस्वी करण्यासाठी ३१ डिसेंबर २००५ पूर्वी जन्म झालेल्या मुलांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका येथील जन्म नोंदी, शाळांमधील सन २०२०-२१ मध्ये इयत्ता दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी संबंधितांनी बी एल ओ तथा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्राप्त करून द्यावी अशा सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. नोंदणीचा अहवाल त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता घेतला जाणार आहे.

       शिबिरांच्या ठिकाणी तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेणार आहेत. ज्या मुला- मुलींचा जन्म ३१ डिसेंबर २००५ पूर्वी झाला आहे, त्यांनी जन्मतारीख पुरावा, रहिवासी पुराव्यासह आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जाऊन आपले नाव मतदार यादी त नोंद करून घ्यावे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार सुरज माने, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, विकास कोलते यांनी केले आहे.


निधन वार्ता
महेश सडेकर

     शिवाजीनगर, आजरा येथील महेश भिकाजी सडेकर (वय ५५) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार आहे. येथील साखर कारखान्यामध्ये चालक या पदावर काम करणारे सडेकर हे शिवाजीनगर तरुण मंडळाचे कार्यकर्ते होते. रक्षा विसर्जन रविवार दिनांक १० रोजी आजरा येथे आहे.

जानू आजगेकर

      निवृत्त सुभेदार, भारत बांग्लादेश युद्धात आपल्या अतुल पराक्रमामुळे सेनादला तर्फे सेना मेडल देऊन गौरविण्यात आलेले किणे ता.आजरा येथील जानू बाळू आजगेकर (वय ७९ वर्षे) यांचे आकस्मित निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, नातवंडे आसा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवार दि.१० डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.

अनुराधा वाळके


      आजरा येथील श्रीमती अनुराधा बाळकृष्ण वाळके (वय७४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या पश्चात रुपेश व राजेश ही दोन मुले, विवाहित मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे

गणपती मोहीते

        पेरणोली (ता. आजरा) येथील गणपती कृष्णा मोहीते (वय ८७) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सुन व नातवंडे असा परिवार आहे. साळगाव प्राथमिक विद्यामंदिराचे शिक्षक संजय मोहीते यांचे ते वडील होत.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कुडाळनजीक दुचाकी अपघातात कानोली येथील तरुण ठार… एक जखमी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!