
कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून सप्टेंबर पासून काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा…
जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची माहिती…

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने रविवार दिनांक ३ सप्टेंबर पासून जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ही जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. या जनसंवाद यात्रेत आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगांवकर, आमदार राजूबाबा आवळे, आमदार श्रीमती जयश्री जाधव, आदी उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. याच धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या निर्देशानुसार राज्यभरात ३ सप्टेंबर पासून ही जनसंवाद पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी ३ सप्टेबर रोजी आजरा हंदेवाडी येथून सांयकाळी ४.०० वाजता या पदयात्रेला प्रारंभ होणार आहे.
लोक भावना जाणून घेणे हा यात्रेचा मुख्य हेतू आहे. यात्रे दरम्यान महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दे आणि स्थानिक पातळीवरील विविध मुद्यांबाबत लोकांशी संवाद साधला जाणार आहे.
——————-
१) जनसंवाद यात्रा प्रत्येक दिवशी प्रत्येक तालुक्यात काढण्यात येणार आहे.
२) प्रत्येक दिवशी यात्रेचा सकाळचा टप्पा आणि दुपारचा टप्पा असे दोन टप्पे असतील. प्रत्येक टप्प्याच्या शेवटी जाहीर सभा होतील.
३) तसेच दोन टप्प्याच्या मधल्या वेळेत कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर संवाद साधला जाणार आहे. त्या-त्या तालुक्यातील समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत.
—-यात्रेत जिल्ह्यातील माजी आमदार,
प्रदेश व जिल्ह्यातील पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, माजी नगरसेवक-नगरसेविका, माजी जिल्हा परिषद सदस्य-सदस्या, माजी पंचायत समिती सदस्य- सदस्या, सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य- सदस्या, महिला आघाडी, जिल्हा युवक काँग्रेस, विविध सेलचे पदाधिकारी यांचा समावेश असेल. तरी या यात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.

बोगस धनादेश प्रकरणी एकाला शिक्षा…
कर्ज परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्यामुळे कर्जदाराच्या विरोधात आजरा न्यायालयात फौजदारी केस सुरु होती. या प्रकरणातील कर्जदाराला आजऱ्याचे ज्युडीशियल मॅजिस्ट्रेट प्रथम वर्ग न्यायाधीश मा. एस. पी. जाधव यांनी दोषी धरुन शिक्षा सुनावल्याची माहिती बँकेचे असि. जनरल मॅनेजर श्री एम.आर. फर्नांडिस यांनी दिली.
बँकेच्या थकीत कर्जापोटी रु. १२ लाख रुपयांचा धनादेश भादवण, ता. आजरा येथील विष्णु दत्तु खुळे यांनी दिला होता. तो धनादेश वटला नाही. याविरोधात बँकेने आजरा न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार आजरा न्यायालयात फौजदारी केस सुरु होती.
आजरा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या केसमधील कर्जदार विष्णू दत्तु खुळे रा. भादवण यांस १ वर्षाची कैद व रु ५ हजार दंड तसेच दंड न भरलेस ३ महिन्यांची कैद व नुकसान भरपाईपोटी धनादेशातील रक्कमेची दुप्पट रक्कम म्हणजेच रु. २४ लाख निकाल तारखेपासून ३० दिवसांचे आत बँकेत भरण्याचे आदेश दिले आहेत. सदर रक्कम विहीत मुदतीत न भरल्यास ६ महिन्याची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बँकेच्या वतीने अॅड उदय परुळेकर यांनी काम पाहिले.
वनविभागाच्या कार्यालयावर ११ तारखेला धडक मोर्चा
शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्णय……
आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात शेतकरी आणि वन्य प्राणी यांचा संघर्ष टोकाला गेला असून वनखाते मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने वनविभागाला धडा शिकविण्यासाठी सोमवारी ११ सप्टेंबरला वनविभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय आज येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. मोर्चाच्या तयारीसाठी मंगळवार दि ५ रोजी किसान भवन आजरा येथे व्यापक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलतांना कॉ. संपत देसाई म्हणाले, गेले अनेक वर्षे आपण सातत्याने आवाज उठवत आलो आहोत पण वन विभाग त्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. आधीच पावसाने ओढ दिल्याने मान टाकलेली पिके हत्ती, गवे, रानडुकरे, माकडे फस्त करीत आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकरी स्त्री पुरुष जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत याची साधी दखलही घ्यायला वन विभाग तयार नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात तीव्र असंतोष तयार झाला आहे.
प्रकाश मोरूस्कर यांनी शंभर टक्के नुकसानभरपाई मिळाली पाहिजे त्यासाठी मंत्री महोदय स्तरावर धोरणत्मक बैठक झाली पाहिजे अशी भूमिका मांडली.
हरिभाऊ कांबळे म्हणाले, वनविभागाला धडकी भरेल असा मोर्चा काढूया त्यासाठी स्त्रियांनाही मोठ्या संख्येने मोर्चात उतरवूया.
पांडुरंग गाडे यांनी हा मोर्चा वन विभागाने गांभीर्याने नाही घेतला तर त्यांना हिसका दाखवू. अकेशिया आणि निलगिर तोडून स्थानिक प्रजातीची लागवड व्हावी असे सांगितले.
यावेळी शांताराम पाटील, युवराज जाधव, भीमराव माधव यांनीही कांही सूचना माडल्या. बैठकीला कृष्णा सावंत, दशरथ घुरे, एकनाथ खरुडे, शंकर पाटील, आबा पाटील, चंद्रकांत कविटकर,मारुती पाटील, मिनिन परेरा, बाळू जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपास्थित होते. आभार काशिनाथ मोरे यांनी मांडले.
यावेळी झालेले निर्णय :-
१- हा विषय धोरणत्मक असल्याने वन मंत्री सुधीर मुनगुंटीवार आणि प्रधान सचिव वने यांच्यासोबत बैठक झाली पाहिजे.
२- हत्ती आणि इतर वन्यप्राणी बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची शंभर टक्के पिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे
३- पिकांची नुकसान भरपाई आणि वन प्राण्याने हल्ला केल्या नंतर मदत मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली पाहिजे
४- गावोगावी नुकसान भरपाई साठी आणि हल्ल्यात जखमी झाल्यावर मदत मिळण्यासाठी काय कागदपत्रे हवी त्याचे फलक गावोगावी गावचावडी वर लावले पाहिजेत
मोर्चा सोमवार दि २२ रोजी शासकीय विश्रामगृहपासून वनविभागाच्या कार्यालयावर निघेल असेही स्पष्ट करण्यात आले.

…………….



