mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार दिनांक २९ मार्च २०२५

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या…
एक ठार, एक जखमी..?

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा – गडहिंग्लज मार्गावर साळगाव फाट्यानजीक दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात संदीप उर्फ राजू कृष्णा सुतार ( वय ४४ वर्षे ) या एकता कॉलनीत राहणाऱ्या व सुतारकाम करणाऱ्या कारागिराचा मृत्यू झाला, तर अन्य एकजण जखमी झाला आहे. शुक्रवारी सकाळी सुळेराननजीक झालेल्या अपघातात एक महिला मृत पावली व तिघेजण जखमी झाले . त्यानंतर सायंकाळी सदर अपघात झाला.

          याबाबत मिळालेली माहिती अशी…

     शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मृत सुतार व जखमी सतीश कल्याणकर (रा. कासार कांडगाव ता. आजरा) या दोघांच्या दुचाकीची समोरासमोर धडक होऊन सदर अपघात झाला. यामध्ये सुतार हे डोक्याला  मार लागल्याने गंभीर जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच गौराई रुग्णवाहिकेचे वाहन चालक सागर नाईक व अन्य साथीदारांनी तातडीने सुतार व जखमी सतीश कल्याणकर यांना आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु गंभीर जखमी असल्याने सुतार यांना उपजिल्हा रुग्णालयाकडे दाखल करत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. सुतार यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

       या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झाली नव्हती.

आजऱ्यात मारामारी… दोघे जखमी…
आठ जणांना विरोधात गुन्हा नोंद

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      लहान मुलांना बोलण्याच्या कारणावरून झालेल्या शाब्दिक वादाचे पर्यवसान शिवीगाळ करण्यासह मारामारीत झाले. यामध्ये नाईक गल्ली आजरा येथील फैजान सुलेमान नसरदी व अबूतला नाईकवाडे या दोघांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी अलरियाज उर्फ मुआज तकिलदार, मुशेब तकिलदार, सफवान उर्फ युसुफ पठाण, उमर माणगावकर, तमिम नेसरीकर, शहाबाज नेसरीकर,कैफ हिंग्लजकर (सर्व रा. नाईक गल्ली) व सोहेल हुसेन लतीफ (रा. दर्गा गल्ली) या आठ जणांविरोधात गुन्हा नोंद केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

       किरकोळ कारणावरून बेकायदेशीररित्या जमाव गोळा करून सदर प्रकार केल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

      याबाबतची फिर्याद फैजान नसरदी यांनी दिली आहे.

मोर्चाने जाऊन वनविभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार…
आजरा येथील बैठकीत निर्णय

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाकडून कांहीच प्रतिसाद न आल्याने सोमवारी ७ एप्रिलला मोर्चा काढण्याचा निर्णय आज शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. मागच्या शुक्रवारी २१ तारखेला शेतकऱ्यांनी शिष्टमंडळाने जाऊन परिक्षेत्र वनाधिकारी यांना निवेदन दिले होते. या निवेदनात ताबडतोबीने प्रश्न सोडवण्यासाठी मुख्य वनसरंक्षक यांचे सोबत शेतकरी प्रतिनिधींची बैठक न झाल्यास मोर्चा काढून कार्यालयाला टाळे ठोकण्याची घोषणा केली होती. आठवडा उलटून गेला तरी वन विभागाकडून कांहीच प्रतिसाद न आल्याने काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

      शेतकरी आणि शेती बाबत जर वन विभाग असंवेदनशील असेल तर असले खाते हवेच कशाला अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी बैठकीत व्यक्त केल्या. सोमवारी सुलगाव फाटा येथे जमून सर्व मोर्चाने जाऊन टाळा लावण्याचा निर्धार केला.

     यावेळी कॉ. संपत देसाई, संजय सावंत, राजू होलम, शांताराम पाटील, बाळू चौगले, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे, नारायण भडांगे, अशोक मालाव, प्रकाश शेटगे, युवराज जाधव, सहदेव प्रभू, भीमराव माधव यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

‘भूमी अभिलेख’च्या कारभाराची चौकशी करा : ग्रामस्थांचा तहसील समोर ठिय्या

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     येधील भूमी अभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभाराच्या चौकशीसाठी किटवडे ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करत ठिय्या मांडला. याबाबतचे किटवाडे ग्रामस्थांनी आजरा तहसीलदार समीर माने यांना निवेदन दिले आहे.

     निवेदनात म्हटले आहे की, येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मनमानी कारभार चालूच आहे व तक्रारी वाढतच आहेत. गावातील गट नंबर १८१ बाबत यापूर्वी दोन वेळा आंदोलन केले. त्यावेळी लेखी आश्वासन दिले व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या सूचनेनुसार २८ ऑगस्ट २०२४ रोजी पत्रातून लेखी आश्वासन उपअधीक्षक यांनी दिले. त्यामध्ये गडहिंग्लज कार्यालयाकडे प्रकरण वर्ग करत असून, सदरची मोजणी नोव्हेंबर २०२४ मध्ये करून हद्दी दाखवल्या जातील, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, पुन्हा लेखी अर्ज, विनवण्या करून देखील कार्यालयाने कोणतीच हालचाल केली नाही. यासाठी मोजणी होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

     निवेदनावर शंकर पाटील, सुधाकर पाटील, भिकाजी सावंत, गावडू पाटील, जयवंत पाटील, यशवंत पाटील, अंकुश सावंत आदींच्या सह्या आहेत.

मागण्यांकडे दुर्लक्ष…
भारत नगरवासीय पुन्हा मोर्चाच्या पावित्र्यात

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     भारत नगर पायाभूत व प्राथमिक सुविधांपासून वंचित आहे. अलिकडे तयार झालेल्या कॉलनीमध्ये रस्ते, गटारी, दिवाबत्ती यासारख्या सुविधा पुरवल्या जात आहेत परंतु भारत नगरमधील नागरिकांनी आंदोलने करून सुद्धा प्रशासन त्यांच्या पायाभूत गरजांकडे दुर्लक्ष करीत आहे हे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहे. मुक्ती संघर्ष समितीने दि. २४ फेब्रुवारी व ३ मार्च रोजी दिलेल्या निवेदनातील मागण्याबाबत ताबडतोब कार्यवाही व अंमलबजावणी न झालेस पुन्हा “संघर्ष मोर्चा “काढून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नगरपंचायत, तहसीलदार, बांधकाम विभाग, विज वितरण व उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

      ३ मार्च २०२५ रोजी नगरपंचायत, बांधकाम विभाग, विज वितरण, पोलीस प्रशासन यांच्या समवेत भारत नगरच्या रहिवाशांची मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वात बैठक झाली यामध्ये सकारात्मक निर्णय झाले परंतु सदर सभेचा इतिवृत्तांत नगरपंचायतीने आज अखेर दिलेला नाही अथवा कोणतीही कार्यवाही केलेली नाही. प्राधान्य क्रमाने भारत नगर मधील रस्ते, गटारी इ. कामे करण्याबाबत ठरले असताना सुद्धा आज अखेर कोणतेही ठोस निर्णय झालेले नाही. त्यामुळे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून भारत नगर मधील वसाहतीत राहणाऱ्या लोकांना न्याय द्यावा अन्यथा “संघर्ष मोर्चा “काढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

      निवेदनावर मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष कॉ. संग्राम सावंत, जिल्हासंघटक समीर खेडेकर, तालुका संघटक मजीद मुल्ला, सलाउद्दीन शेख, वाहिद सोनेखान, सलीम शेख, तौफिक माणगांवकर, तोहीद माणगांवकर, खुद्बुद्दीन तगारे, गुलाब शिकलगार, सलीम नाईकवाडे, मुदस्सर इंचानळकर, यासिन सैय्यद, शौकत पठाण, महम्मद नसरदी, रहुफ नसरदी, सलीम ढालाईत, कासीम लतीफ, मुफिद काकतिकर, रशीद लाडजी, असिफ काकतिकर, मुबारक नसरदी आदींच्या सह्या आहेत.

आजरा येथे आरंभ पालक मेळावा संपन्न

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, कोल्हापुर नागरी यांचे मार्फत, आजरा नगरपंचायत आजरा अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन केंद्र शाळा कुमारभवन, येथे करण्यात आले होते.

      डॉ.सौ. सातोसकर यांनी महिलांचा आहार, पोषण, आरोग्य, स्वच्छतेबाबत मार्गद‌र्शन केले.तर सौ. सुप्रिया कोगेकर यांनी बालसंगोपन या विषयावर मार्गदर्शन केले.

      या मेळाव्यात आनंदाचा बोगदा, बाहुती घर, बौध्दिक विकासाचे खेळ अशा विविध प्रकारचे ४० हून अधिक स्टॉल व खेळ मांडले होते.

या कार्यक्रमासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी निवेदिता महाडीक व पर्यवेक्षिका सुनंदा जाट यांचे मार्गदर्शन लाभले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवती कुंभार , प्रास्ताविक छाया तिप्पट, स्वागत चंद्रभागा तेंडुलकर नसीम जमादार,माधुरी गवंडळकर,लता पाटील यांनी केले. आभार हेमा पाटील यांनी मानले.

आजऱ्यात आज रंगपंचमी

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     प्रथेप्रमाणे आजरा शहर व परिसरात आज शनिवार दिनांक २९ मार्च रोजी रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळांनी ठिकठिकाणी डी.जे. कार्यक्रमासह करमणुकीच्या व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

मडीलगे हायस्कूलच्या आज नूतन इमारतीचे उद्घाटन

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

     जनता एज्युकेशन सोसायटी संचलित मडिलगे हायस्कूल मडिलगेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज शनिवार दिनांक २९ मार्च रोजी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आला असून वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम होणार आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

उर्दू हायस्कूल भ्रष्टाचार प्रकरणी आज-यात मोर्चा

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!