mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


म्हैस दूध वाढीसाठी आजरा तालुक्यातील उत्पादकांनी प्रयत्न करावेत : अरुण डोंगळे
आजरा येथे व ‘गोकूळ” ची संपर्क सभा


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) म्हैस दूध ही ओळख आहे. गोकुळ दूध संघाला आजरा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात म्हशीच्या दुधाचा पुरवठा होतो. मात्र गेल्या काही वर्षात तालुक्यातून पुरवठा होणाऱ्या म्हशीच्या दुधाचे प्रमाण घटत चालले आहे. यासाठी तालुक्यातून म्हैस दूध वाढीसाठी आणखी प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले. ते आजरा येथे संस्था प्रतिनिधींच्या संपर्क सभेत बोलत होते.

स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर तालुक्यातील एकूण दूध उत्पादनाचा आढावा घेतला. श्रीमती रेडेकर म्हणाल्या, गोकुळच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी गोकुळच्या यशस्वीतेचा आलेख वाढतच चालला आहे. त्यामुळे सध्या गोकुळची वार्षिक उलाढाल ३६७० कोटी पर्यंत गेली आहे. यावेळी श्रीमती रेडेकर यांनी गाय दुधाप्रमाणे म्हैस दुधाला सुद्धा शासनाकडून अनुदान मिळावे व गोकुळ दूध संघाने वाडी-वस्तीवरील दूध संस्थांना पशुखाद्य देण्याबाबत नियोजन करावे अशा मागण्या केल्या.

     नॅशनल डेअरी असोसिएशनचा बेस्ट वुमन फार्मर अवॉर्ड मिळाल्याबद्दल पेद्रेवाडीच्या सरपंच लता रेडेकर, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श गोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल पेरणोलीचे दत्तात्रय पाईम, महापुरात चांगले काम करणारे सुपरवायझर, दूध वाहतूक ठेकेदार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्पादकांना आर्थिक मदतीचे वाटप देखील करण्यात आले.

     अध्यक्ष अरुण डोंगळे पुढे म्हणाले, आजरा तालुक्याच्या दूध व्यवसायात ग्रामीण भागातील महिला तळमळीने काम करत असतात. महिलांच्या योगदानामुळेच दूध व्यवसायाला समृद्धी आली आहे. त्यामुळे आता दूध वाढीचे आव्हान पेलताना महिलांनी दूध व्यवसायासाठी प्रशिक्षित होण्याची गरज निर्माण झाली आहे.

      ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, आजरा तालुक्यातील म्हैस दुधाचे प्रमाण चांगले आहे हे कौतुकास्पद आहे. गोकुळ संघाच्या संदर्भात आजरा तालुक्याचे कामकाज चांगले आहे. दूध संघाच्या विविध योजनांचा लाभ दूध उत्पादकांनी चांगल्या प्रकारे घेऊन दुधाचे उत्पादन कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे

    अध्यक्ष डोंगळे व दूध संघाचे अधिकारी यांनी संस्था प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी संचालक नाविद मुश्रीफ, बाबासाहेब चौगुले, अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, करणसिंह गायकवाड यांच्यासह सर्व संचालक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, आजरा जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, रणजीत देसाई, दीपक देसाई, कृष्णा येणे प्रकाश कोंडुस्कर उत्तम रेडेकर शिवाजी गिलबिले नंदकुमार सरदेसाई राजाराम पोतनीस, रवींद्र भाटले, अशोक तर्डेकर, शिवाजी गिलबिले, भीमराव वांद्रे, किरण पाटील, सुधीर पाटील, सुभाष देसाई,यांच्यासह गोकुळ दूध

गोकुळच्या वाटचालीत रवींद्र आपटे यांचा सिंहाचा वाटा…

      गोकुळ दूध संघाच्या वाटचालीत माजी संचालक रवींद्र आपटे यांचा सिंहाचा वाटा आहे. गोकुळच्या वाढीसाठी त्यांचे प्रयत्न कदापिही विसरता येणार नाहीत असे यावेळी अरुण डोंगरे यांनी नम्रपणे सांगितले .


माणूसपणाचे मूल्य रुजवणा-या अभ्यासक्रमाची गरज – प्रा. डॉ. नंदकुमार मोरे

.          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       भाषा आणि संस्कृती यांच्या बरोबरच माणूसपणाचे मूल्य रुजविणा-या अभ्यासक्रमाची सध्या गरज आहे, त्यामुळेच शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने तसा अभ्यासक्रम तयार केला असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ .नंदकुमार मोरे यांनी केले. आजरा महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या बी.ए. भाग तीन मराठी विषयाच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित कार्यशाळेमध्ये बीजभाषक म्हणून ते बोलत होते.

       कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. भरत जाधव, शिवाजी विद्यापीठ वाणिज्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. केदार मारुलकर, प्राचार्य डॉ. अशोक सादळे, कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

      आजरा महाविद्यालय, आजरा आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बी.ए. भाग तीन मधील मराठी विषयाच्या अभ्यासपत्रिका क्र. १०, ११, व १५, १६ च्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित एकदिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. दिवसभरामध्ये अभ्यासक्रमावर आधारित चार सत्रांमध्ये ही कार्यशाळा संपन्न झाली.

      ज्ञयावेळी बीजभाषणात बोलताना नंदकुमार मोरे पुढे म्हणाले की, मुलांना अभ्यासक्रम शिकवत असताना प्राध्यापकांनीही बदलत्या काळानुसार नवी तंत्रे अवगत केली पाहिजेत. भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल आणि भाषा टिकवायची असेल तर त्या भाषेमधून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत. त्यासाठी भाषेतील कौशल्ये चांगल्या पद्धतीने आत्मसात केली पाहिजेत. असा मूल्ये, संस्कार आणि कौशल्ये यांची सांगड घालणारा अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने तयार केला आहे.

      कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असणा-या ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ या पुस्तकाचे लेखक आणि चळवळीतील कार्यकर्ते संपत देसाई यांची कवी एकनाथ पाटील यांनी मुलाखत घेतली. तिसऱ्या सत्रामध्ये अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असणाऱ्या ‘स्त्री पुरुष तुलना’ या वैचारिक ग्रंथाच्या अध्यापनावर आधारित डॉ. अरुण शिंदे यांनी मार्गदर्शन केले. मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी या संदर्भातल्या चौथ्या सत्रामध्ये डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी मार्गदर्शन केले.

    ‌ कार्यशाळेचे संयोजन आजरा महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. आप्पासाहेब बुडके यांनी केले. प्रा. राम मधाळे यांनी आभार मानले. यावेळी शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रा. जयवंत दळवी, सचिव प्रा. डॉ‌. मांतेश हिरेमठ, प्रा. नवनाथ शिंदे, प्रा. बाळासाहेब कांबळे यांच्यासह विविध महाविद्यालयांमधील मराठी विषयाचे प्राध्यापक उपस्थित होते.

अन्याय निवारण समितीकडून बाजारादिवशीच शहरातील कचऱ्याची विल्हेवाट


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     अन्याय निवारण समितीकडून बाजारादिवशीच शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आजरा अन्याय निवारण समितीने बाजारपेठेत कचरा विल्हेवाट करणाऱ्या पिशव्यांचे वाटप केले. या उपक्रमास व्यापारी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

      कचरा उचलणाऱ्या कंपनीची मुदत संपल्याने गत आठवडा बाजारा दिवशी वेळेत कचरा उचलला गेला नाही परिणामी शहरभर सर्वत्र कचऱ्याचे ढीग व दुर्गंधीचा सामना स्थानिक नागरिकांना करावा लागला. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या सद्यस्थितीतील मर्यादा ओळखून आजरा अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे उपाध्यक्ष विजय थोरवत व सहका-यांनी नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने आठवडा बाजारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांना लवकर विघटन होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचे वाटप केले. व्यापाऱ्यांनीही या उपक्रमास प्रतिसाद देत दिवसभराचा कचरा या पिशव्यांमध्ये भरून ठेवला त्यानंतर तो उचलण्यात आला.

      या उपक्रमामध्ये परशुराम बामणे यांच्यासह जोतिबा आजगेकर,सी.डी. सरदेसाई, संजय जोशी, नाथा सावंत,मिनीन डिसोजा, संतोष बांदिवडेकर, गौरव देशपांडे,राजू विभुते ,अधिकारी राकेश चौगुले सहभागी झाले होते.

राष्ट्रीय ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत व्यंकटराव हायस्कूलचे यश
गुणवत्ता यादीमध्ये तब्बल ५३ विद्यार्थी…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      शासन मान्यताप्राप्त राष्ट्रीय ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये व्यंकटराव हायस्कूलच्या पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, राज्य,जिल्हा,तालुका व केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये एकूण ५३ विद्यार्थ्यांनी स्थान पटकाविले. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.

      इयत्ता सातवी मधील विवेक धनाजी पाटील, संस्कृती अमित पुंडपळ, विभावरी विक्रम जावळे या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्कृती धनाजी इलगे हिला रौप्य पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इयत्ता पाचवी मधील काव्या विनायक गावडे हिला कांस्यपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रमाणपत्रधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे…

               इयत्ता पाचवी-

आर्या अशोक गिलबिले, पूर्वा प्रताप मोरे, राजवीर चेतन हरेर, तेजस किरण शिपुरकर, श्रेया अशोक वडर, सोहम सुधीर चौगुले, सई संदीप पाटील, सारंग ज्ञानेश्वर सावंत, श्रीरंग अंकुश नांदवडेकर,मंदार वामन सुतार

               इयत्ता सहावी-

वेदांग विद्याधर शिंदे, स्नेहल राजेंद्र सावरकर, अफिया नजीम भडगावकर, शुक्रानी अमित दोरुगडे, सिद्धीका किरण कोंडुसकर, आर्या आनंदा प्रभू, सबिहा जमीर नायकवाडी, जुवेरिया मुस्तफीज भडगावकर.

                इयत्ता सातवी-

शर्वरी नानासो पाटील, हंसिका सुनील नाईक, कार्तिक रमेश दळवी, हाजीक महंमद इरफान सय्यद, अर्णव समीर जाधव, आर्या अशोक कांबळे,आदिती अमर केंबळे, आस्था सचिन गुरव, सानवी लक्ष्मण चौगुले, साक्षी नरेंद्र कुंभार, पियुष संजय कुंभार, पार्थ महेंद्र देसाई, अधिराज अनिल नाईक, जगदीश अनिल चौरे, आयुष ओंकार गिरी, ध्रुव राजाराम हरमळकर, शौर्य कुलदीप देसाई, संस्कार संजय तेजम, गुंजन प्रताप मोरे,अथर्व दीपक कोरवी, गंधर्व गौतम कांबळे, राजवीर सुरज जाधव, स्वराज प्रवीण निंबाळकर

                इयत्ता आठवी-

विजया तानाजी इलगे

                  इयत्ता नववी-

सोनाक्षी संजय गुरव, उत्कर्षा दिगंबर देसाई, श्रावणी विजय गोरे,आसावरी अशोक गिलबिले, श्रेया तानाजी मुळीक,संयोगिता मदन देसाई.

      या विद्यार्थ्यांना प्रशांत गुरव,मदन देसाई,अस्मिता पाटील,आशा गुरव, किशोर खोत,अजित चौगुले,रमेश पाटील या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

पंडित दीनदयाळ विद्यालयात विद्यार्थ्यांनी घडवल्या नाग मुर्त्या…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        नागपंचमी निमित्ताने पंडित दीनदयाळ विद्यालयात नागाची माती पासून प्रतिकृती तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक श्री. प्रभू पी. जी. यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

        या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

निधन वार्ता…
रुक्मिणी मेघूलकर

         धनगरमोळा ता. आजरा येथील रुक्मिणी कृष्णा मेघूलकर (वय ७० वर्षे ) यांचा शुक्रवारी दुपारी आकस्मित मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, सून, जावई,नातवंडे असा परिवार आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पेंढारवाडीत दोन जनावरांना ‘लंपी’ ची लागण ? गडहिंग्लज उपविभाग हादरला….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याला न्याय देण्यास महाराष्ट्र शासन बांधील… पालकमंत्री केसरकर

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews
error: Content is protected !!