आजरा तालुक्यात काँग्रेस साधणार संवाद…
रविवारी जनसंवाद यात्रा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारणीच्या आदेशानुसार आजरा तालुक्यामध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून तालुकावासीयांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आजरा नगरपंचायतीचे नगरसेवक अभिषेक शिंपी व किरण कांबळे यांनी केले आहे.
गडहिंग्लज उपविभागामध्ये या यात्रेस चंदगड येथून रविवारी सुरुवात होणार आहे. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हांदेवाडी येथून कोळींद्रे , किणे, शिरसंगी, वाटंगी मार्गे सदर यात्रा आजरा येथे येणार आहे. आजरा शहरात हणबरवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून शहरांमध्ये आगमन होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून संभाजी चौक येथे सदर यात्रेचा सांगता समारंभ होणार आहे.
‘ भारत जोडो ‘ च्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध घटकांना भेटून प्रेमाचा संदेश देणे व द्वेषाच्या राजकारणाला तिलांजली देणे हा या यात्रेचा मुख्य हेतू आहे. यात्रेमध्ये जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, नगरसेविका सुमैय्या खेडेकर, सीमा पोवार, यास्मिन बुखन, रेश्मा सोनेखान, नौशाद बूड्डेखान, पंचायत समिती सदस्य बशीर खेडेकर, रवींद्र भाटले यांच्या बरोबरच विविध गावातील भजनी मंडळी, धनगर बांधव, वारकरी संघटना, विविध आघाड्या, पुरोगामी विचाराची मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे शिंपी व कांबळे यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी उपसरपंच अशोक पोवार हे देखील उपस्थित होते.
आजरा अर्बन बँकेच्या वतीने आजरा बस स्थानकावरील पाणपोई लोकार्पण सोहळा संपन्न

हिंदू हृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत आजरा बस स्थानकावर प्रवाशांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणेसाठी दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि. आजरा (मल्टी-स्टेट) च्या वतीने बसविणेत आलेल्या पाणपोईचे प्लॅटफॉर्म वरील गावांचे नाम फलक यांचा लोकार्पण सोहळा अण्णा – भाऊ संस्था समूह प्रमुख व आजरा अर्बन बँकेचे संचालक श्री. अशोक अण्णा चराटी यांचे उपस्थितीत बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे याचे हस्ते संपन्न झाला.
आजरा अर्बन बँकेचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये विस्तारीत असून बँकेचा व्यवसाय महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आहे. प्रवाशांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने आजरा बसस्थानकावर पाणपोईची सुविधा केली, तसेच बँकेच्या वतीने बसस्थानकावरील प्लॅटफॉर्मवर गावांचे नाम फलक बसविले आहेत. याच बरोबर कोरोना काळातही बँकेने सामाजिक दायित्व जाणून शासनाला वेळोवेळी मदत केली आहे.
सदर कार्यक्रमाचे वेळी आजरा अर्बन व्हा. चेअरमन रमेश कुरुणकर, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, किशोर भुसारी,बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस , सुनिल मगदुम, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे व बँकेचे अधिकारी तसेच आजरा बसस्थानक आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे यांनी स्वागत केले. सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित होते. प्रसाद जोशी यांनी आभार मानले.
दिनांक सहा ते आठ सप्टेंबर रोजी हत्तरगी येथील श्रीहरीकाका गोसावी मठात गोकुळ अष्टमी उत्सवाचे आयोजन
दिनांक ६ रोजी आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धा… रुपये ३० हजाराहून अधिक बक्षिसे

हत्तरगी येथील पुरातन श्रीहरी काका गोसावी ऋग्वेदी भागवत मठात दिनांक सहा ते आठ सप्टेंबर अखेर तीन दिवस गोकुळ अष्टमी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. दिनांक ६ सप्टेंबर रोजी आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे ११००१/– रुपये रोख बक्षीस व मानचिन्ह ठेवण्यात आले आहे. या आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धेत भजनी मंडळ संघानी सहभागी व्हावे असे आवाहन पीठाधीश डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी यांनी केले आहे.
दिनांक ६ सप्टेंबर रोजी भजन सम्राट स्पर्धा —सकाळी अकरा वाजता होईल. बेळगावचे पालकमंत्री नामदार सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात येणार आहे .व रात्री दहा वाजता सौ. स्वरदा पटवर्धन- हरिदास (सांगली) यांचे श्रीकृष्ण जन्मसोहळा नारदीय कीर्तन होणार आहे. दिनांक सात सप्टेंबर रोजी पारणे, प्रवचन व भजन यासह सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांची भक्ती संगीत गायन सेवा यासह विविध सांगितिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .माण (तालुका शाहूवाडी) येथून आनंद दिंडी हत्तरगी येथे येणार आहे .दिनांक ८ सप्टेंबर रोजी गोपाळकाला व महाप्रसाद वाटप होणार आहे.
आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धेत सहभागी संघांना सादरीकरणास १८ मिनिटे वेळ असेल. या वेळेत किमान दोन अभंग व एक गवळण सादर करावी लागेल. या रचना संत रचितच म्हणजे गाथ्यामधील असाव्यात. सादरीकरण अभंग रचना मराठी व कानडी भाषेत असावेत. इच्छुक संघानी आपली नावे श्री हरी मंदिर हत्तरगी ,जिल्हा बेळगाव येथे नोंदवावीत असे विश्वस्त मंडळांने आवाहन केले आहे.
द्वितीय क्रमांकास रुपये ७०००/— रोख व मानचिन्ह तृतीय क्रमांकास रुपये ५००० /–रोख व मानचिन्ह, उत्तेजनार्थ रुपये ३०००/– रोख व मानचिन्ह तसेच उत्कृष्ट वादक व गायक यांना प्रत्येकी रुपये १००१/– रोख व मानचिन्ह देण्यात येणार आहे.
हिरकणी कक्षाचे लोकार्पण ..

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत आजरा बस स्थानकामध्ये आपल्या लहान बाळांना घेऊन प्रवास करणाऱ्या स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष आजरा तालुक्यामध्ये अग्रगण्य असणारी सेवाभावी संस्था संवेदना फाऊंडेशन आजरा यांच्या कल्पनेतून स्थापन करण्यात आलं. त्यामध्ये मातांना स्तनपानाचे महत्त्व त्याचबरोबर महिलांच्या आरोग्यासंबंधी विविध माहिती हे चित्राद्वारे प्रसारित केले आहे.. अशा या हिरकणी कक्षाचा लोकार्पण सोहळा आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी तीन वाजता संवेदना फाऊंडेशनच्या महिला सदस्या सौ.गीता पोतदार,सौ.रेश्मा देशमुख,सौ.माधुरी पाचवडेकर,आसावरी मुणनकर,भैरवी सावंत या संवेदना महिला शक्तींच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.
हिरकणी कक्षाची कल्पकता ज्यांनी चित्रातून साकारली आहे असे चित्रकार संवेदना फाऊंडेशन सदस्य गणेश देसाई यांचा संवेदना फाऊंडेशन मार्फत संजय हरेर,तानाजी पावले,डॉ. प्रविण निंबाळकर आणि आगार व्यवस्थापक घुगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संवेदना फाउंडेशन आजरा यांनी आपल्या हाकेला चांगला प्रतिसाद देऊन हिरकणी कक्षाची स्थापना केल्याबद्दल आजरा आगारामार्फत संवेदना फाऊंडेशनच्या उपस्थित सर्व सदस्यांचा एकत्रित सत्कार करण्यात आला..
संवेदना फाऊंडेशन सेवाभावी संस्थेच्या कार्याचा आढावा संवेदना सदस्य देशमुख यांनी मांडला.या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास आजरा आगाराचे व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, कार्यशाळा अधीक्षक पृथ्वीराज चव्हाण, आगार लेखागार सुरेश पत्की,वासुदेव जोशी, संदीप खवरे, नामदेव गुडूळकर यांच्या सह संवेदना महिला सदस्य आणि स्थानिक सदस्य शजीवन आजगेकर,श्रीतेज कवळेकर, फिलिप्स रॉड्रिक्स यांच्यासह प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते..संवेदना फाऊंडेशन आजराचे प्रशासकीय अधिकारी अमर पाटील यांनी आभार मानले.
आजरा महाविद्यालय, आजरा मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा..

आजरा महाविद्यालयामध्ये दिनांक 29 ऑगस्ट रोजी हॉकी चे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय मुले व मुलींच्या शारीरिक तंदुरुस्ती च्या आधारे विविध स्पर्धा घेण्यात आल्या मुलींच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सानिका मुकुंद पाटील, द्वितीय क्रमांक सायली दत्तात्रय मस्कर तर सानिका संजय पाटीलने तृतीय क्रमांक पटकावला.
मुलांच्या वरिष्ठ विभाग तंदुरुस्ती स्पर्धेमध्ये आदित्य सुतार याने प्रथम क्रमांक पटकावला रोशन पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकावला विशाल नाईक याने तृतीय क्रमांक पटकावला
कनिष्ठ विभाग तंदुरुस्ती स्पर्धेमध्ये सिद्धांत कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला अश्विन कांबळेने द्वितीय क्रमांक पटकावला तर साहिल मोहितेने तृतीय क्रमांक पटकावला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, उपप्राचार्य प्रा.दिलीप संकपाळ कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, क्रीडा संचालक डॉ. धनंजय पाटील प्रा. अल्बर्ट फर्नांडिस व प्रा. श्रीमती अलका मुंगुर्डेकर , राष्ट्रीय सेवा योजनाचे प्रकल्प अधिकारी डॉ. रणजीत पवार प्रा.मल्लीकार्जुन शिंत्रे व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व खेळाडू विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


