सोमवार दि.२ डिसेंबर २०२४




विधानसभा निकालानंतर राजकीय समीकरणे विस्कटली

आजरा :ज्योतिप्रसाद सावंत
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद व नगरपंचायत निवडणूकितील राजकीय समिकरणे विस्कटल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे या निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी करणाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आजरा तालुका हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला समजला जातो. अण्णाभाऊ संस्था समूहा व्यतिरिक्त इतर सहकारी संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आढळून येते. आजरा तालुका खरेदी विक्री संघ, आजरा साखर कारखाना जिल्हा बँक येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रतिनिधीत्व करीत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वत्र आबादीआबाद स्थिती होती. या निवडणूक निकालानंतर मात्र जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीची धुळधाण झाल्याने तालुक्यातील अनेक प्रस्थापित मंडळींना या निकालाने धक्का बसला आहे.
गेली पाच वर्षे पंचायत समिती जिल्हा परिषदेसह आजरा नगरपंचायतीकरता इच्छुकांची तयारी सुरू आहे. तालुक्याशी संबंधित तीनही आमदार हे महायुतीचे निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेकरीता निश्चितच हे तीनही आमदार आपापल्या मतदारसंघाशी निगडित तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघामध्ये आपल्या विचाराचे प्रतिनिधी निवडून आणण्याकरता प्रयत्नशील राहणार आहेत. याकरिता आवश्यक ती ताकद वरीष्ठ पातळीवरून लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे महाविकास आघाडीशी संबंधित उमेदवार चिंतेत दिसत आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघात तर अपक्ष शिवाजीराव पाटील निवडून आल्याने सेनेसह राष्ट्रवादीच्या इच्छुकांची चांगलीच गोची झाली आहे. यामुळे कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघात नवीन चेहरे दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक असले तरी आजरा नगरपंचायत कार्यक्षेत्रात महाविकास आघाडीचे के. पी. पाटील यांनी मताधिक्य घेतल्याने नगरपंचायतीकरता वेगळीच अवस्था निर्माण होणार असल्याचे दिसते. हे मताधिक्य प्रस्थापितांना धोक्याचा इशारा देणारे आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची समीकरणे वेगळी असली तरीही स्थानिक नगरपंचायत निवडणुकीत मात्र उलटसुलट घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
महिनाभरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे बोलले जाते. तसे झाल्यास विधानसभा निवडणुक निकालाचे पडसाद या निवडणुकीवर उमटणार हे स्पष्ट आहे. जुन्या इच्छुकांपुढे विविध प्रश्न निर्माण झाले असताना नवीन इच्छुक मात्र आता नव्या जोमाने ताकतीने कामाला लागले आहेत.
निवडणुका कोणाच्या जीवावर लढवायच्या…?
यापूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपंचायत निवडणूकांमध्ये वरिष्ठ पातळीवरून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात होती. आता जिल्ह्यातील नेतेमंडळींकडे मदत मागण्यासाठी जाताना अनेक मर्यादा येणार आहेत. मतदारांना विधानसभा निवडणुकीत चांगलेच ‘लक्ष्मी’दर्शन झाले आहे. ‘लक्ष्मी’दर्शन देणारी हीच मंडळी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला स्वतः: सामोरी जाणार आहेत. त्यामुळे ‘अपेक्षा’ वाढलेल्या मतदारांचे ‘समाधान’ करताना उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.



ओल्ड गोव्याच्या दिशेने ख्रिस्ती बांधव पायी रवाना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सेंट फ्रान्सिस झेवियर पदयात्रेद्वारे आजरा तालुक्यातून सुमार २૦૦ यात्रेकरू ओल्ड गोव्याकडे रवाना झाले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ख्रिश्चन व अन्य समाजबांधव या यात्रेत सहभागी झाले आहेत. आजऱ्यातील रोझरी चर्च पासून पदयात्रेला सुरवात झाली.
चारशे सत्तर वर्षापासून सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा पार्थिव ओल्ड गोव्यामध्ये ठेवले असून त्यांच्यावर श्रध्दा असणारे भाविक त्यांच्या दर्शनासाठी गोव्याकडे जातात. २१ नोव्हेंबर पासून ५ जानेवारीपर्यंत त्यांचे पार्थिव भाविकांना दर्शनासाठी ओल्ड गोव्याच्या चर्च समोर ठेवले आहे आजरा तालुक्यातून पदयात्रा करण्याची गेली ३२ वर्षांची परंपरा आहे. फादर प्रभुधर यांनी ही पदयात्रा सुरु केली. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यातून पदयात्रेला ख्रिश्चन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदा आजरा तालुक्यातून सुमारे २०० व गडहिंग्लजमधून सुमारे २०० भाविक सहभागी झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.
फादर मेल्विन व फादर विल्सन यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघाली आहे. मायकेल फर्नांडीस, मनवले बार्देस्कर, मोतीराम बार्देस्कर, शिरीन कुतिन्हो, मिनीन लोबो यामध्ये सहभागी झाले आहेत.



ऊस तोडणी कामगारांची मुले चालली शाळेला…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील प्राथमिक विद्यामंदिर, मुमेवाडी येथे या गावामधील व परिसरातील ऊस तोडीसाठी आलेल्या बीड येथील ऊसतोड कामगारांच्या मुलांनी शाळेची वाट धरली आहे.
ऊसतोड संपेपर्यंत त्यांना शिक्षण मिळावे या हेतूने येथील पालक नागरिकांच्या सहकार्याने कुमारी जान्हवी बालाजी गायकवाड रा. आंबेजोगाई, जिल्हा बीड या ऊसतोड मजुरांच्या मुलीला इयत्ता पहिली मध्ये प्रवेश देण्यात आला. तिचे शाळेमार्फत स्वागत करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, सर्व शिक्षक वृंद व ग्रामपंचायत मुमेवाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.
तालुक्यातील ठिकठिकाणी शाळांमध्ये सदर उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


किल्ले बांधणारे बालचमू चालले प्रत्यक्ष किल्ला दर्शनासाठी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवसेना शाखा भादवणच्या वतीने सालाबाद प्रमाणे दिपावली सुट्टी निमित्य गेली १३ वर्षे भव्य किल्ला स्पर्धा आयोजीत केल्या जातात किल्ला स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व शालेय मुलाना प्रत्येक वर्षी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची जाणीव व्हावी म्हणून किल्ला भ्रमंती केली जाते. या वर्षी किल्ले ‘रांगणा’ वरती मुलांना भ्रमंती साठी पाठवण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील, शिवसेना शाखा प्रमुख श्रीकांत देवरकर, उपशाखा प्रमुख श्रावण पाटील, महेश कोलते, जयसिंग गाडे, ग्राम पंचायत सदस्य अर्जुन कुंभार, प्रमोद घाटगे, संजय देवरकर, एम.टी. मुळीक, भरत पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


उत्तूरच्या नवजीवन व वसंतरावदादा पाटील विद्यालयाच्या खाद्य महोत्सवास खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर ता.आजरा येथील नवजीवन विद्यालय व वसंतरावदादा पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खाद्य महोत्सवाला खवय्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रामपंचायत सदस्या आशाताई पाटील यांचे हस्ते उद्घाटन झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष उमेश आपटे होते .
खाद्य महोत्सवात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले पकोडे, खर्डा भाकरी, डांगरभाकर, वडे, पोहे, बिर्याणी, मिठाईचे पदार्थ, ताक, चहा , सोलकडी , मेथी पराठा , आदींसह विविध पन्नास स्टॉल उभे केले होते.
या कार्यक्रमास सरपंच किरण आमणगी ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, माजी सरपंच वैशाली आपटे , केंद्रप्रमुख संतोष बिल्ले , राजू खोराटे, भास्कर भाईगडे , सुनिल भिंऊगडे, एस . टी . हाळवणकर, शैलेंद्र आमणगी , आशा साळवेकर, मंगल कोरवी, दिगंबर कुंभार, सुरेखा परीट, अर्चना पाटील, रेश्मा आजगेकर, विमल कुराडे, ऋषिकेश हाळवणकर, युवराज कातवरे आदीसह शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्तविक वसंतरावदादा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश कांबळे यांनी केले. स्वागत नवजीवन विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र येसादे यांनी केले . किरण आमणगी यांनी सुत्रसंचालन केले.





