

निधन वार्ता
सौ.शोभा घाटगे

पजाब नॅशनल बँकेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी राजेंद्र नानासाहेब घाटगे यांच्या पत्नी व आजरा साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार वसंतराव देसाई यांच्या जेष्ठ कन्या सौ. नीलम उर्फ शोभा ( वय वर्षे ६१ ) यांचे हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे आकस्मिक निधन झाले.
घाटगे यांचा मुलगा हर्षवर्धन हा बुडापेस्ट येथे एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करतो. त्याच्याकडे घाटगे दांपत्य सुट्टीसाठी गेले होते. अचानक प्रकृती बिघडल्याने सौ निलम यांना तेथील इस्पितळात दाखल करण्यात आले.
मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. सौ नीलम या दिवंगत माजी आमदार वसंतराव देसाई यांच्या ज्येष्ठ कन्या होत.
त्यांच्या मागे पती, एक विवाहित मुलगी जावई, विवाहित मुलगा व सून असा परिवार आहे . रक्षाविसर्जन व अन्यविधी शनिवार दि. १७ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे होणार आहेत.

आजऱ्यात २१ डिसेंबर रोजी वारकरी कीर्तन संमेलन
राज्यातील मान्यवर लावणार हजेरी
आजऱ्यात २१ डिसेंबर रोजी वारकरी कीर्तन संमेलन होत आहे. या संमेलनात दिग्गज कीर्तनकार उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सुनिल शिंत्रे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
२१ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत तीन सत्रात बाजार मैदान येथे हे संमेलन होणार आहे.
सकाळी ९ वाजता वारकरी दिंड्या निघणार आहेत यामध्ये सुमारे पन्नासभर दींड्यांच्या माध्यमातून १ हजार वारकरी सहभागी असतील.गाथा व ज्ञानेश्वरीचे पूजनाने संमेलनाची सुरुवात होईल.तीन सत्रात हे संमेलन पार पडणार असून पहिल्या सत्रात माऊली संस्थान, आळंदीचे विश्वस्त अभय टिळक यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार असून ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळयाचेचे राजाभाऊ चोपदार प्रमुख पाहुणे, सुप्रसिद्ध किर्तनकार मुंबई येथील शामसुंदर सोन्नर महाराज संमेलनाध्यक्ष आहेत तर आजरा कारखाना अध्यक्ष सुनिल शिंत्रे स्वागताध्यक्ष असतील.
दुसऱ्या सत्रातील परिसंवाद सचिन परब मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यामध्ये देवदत्त परुळेकर (वेंगुर्ला), संपत देसाई (आजरा), धम्मर्किर्ती महाराज (परभणी), ज्ञानेश्वर बंडगर(सांगोला) व ताई महाराज मंगळवेढेकर यांचा सहभाग राहील.
तिसऱ्या सत्रात दुपारी ३ ते ५ मध्ये डॉ.सुहास फडतरे महाराज (सातारा) यांचे किर्तन यानंतर समारोप व दिंडी प्रमुखांचा सत्कार होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकूळच्या संचालिका अंजना रेडेकर आहेत.
या बैठकीत राजाभाऊ शिरगुप्पे, मुकुंद देसाई,संजय घाटगे, युवराज पोवार, डॉ.नवनाथ शिंदे,रणजीत देसाई,जोतिबा चाळके,शांताराम पाटील यांच्यासह संयोजन समिती सदस्य उपस्थित होते.






