mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


   

पैसे नको…
संरक्षण द्या…

कोलकता व बदलापूर प्रकरणी माता भगिनी रस्त्यावर उतरल्या…

 

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       कोलकाता व बदलापूर प्रकरणाचे तीव्र पडसाद आज-यात महिला वर्गात उमटले असून आज सर्वपक्षीय महिला व विविध संघटनांनी थेट मोर्चाद्वारे तहसील कार्यालयावर धडक देत आपला संताप व्यक्त केला. यावेळी शासनाच्या कायद्यांसह भूमिकेविषयी तीव्र शब्दात आपल्या भावना मांडल्या. आम्हाला पैसे नको, संरक्षण द्या. दोषींवर कडक कारवाई करा अशा मागण्या करण्यात आल्या.

       छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मुख्य बाजारपेठेतून सदर मोर्चा आजरा तहसील कार्यालयाच्या आवारात जाऊन त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.यावेळी आजरा साखर कारखान्याच्या संचालिका व माजी सभापती सौ. रचना होलम,गीता पोतदार , धनश्री देसाई, छाया तिप्पट, पद्मिनी पिळणक‍र, शिवाजी गुरव, लावण्या शिप्पूरकर, समीक्षा कांबळे, डॉ. स्मिता कुंभार, प्राध्यापिका शुभांगी सावंत आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

      देशातील व महाराष्ट्रातील मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अलीकडे घडत असलेल्या शालेय मुलींवरील अत्याचारासारख्या घटना अतिशय लांछनास्पद आहेत. कायद्यांची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे कायदा असूनही कांही उपयोग नाही अशीच परिस्थिती आहे. मुली व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.अशावेळी कायद्यांची कठोर अंमलबजावणी करण्यासह मुलींच्या संरक्षणासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत असे आवाहनही करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

      मोर्चामध्ये मुकुंदराव देसाई, कॉ. शांताराम पाटील, राजू होलम, काशिनाथ मोरे, संजय घाटगे, सुधीर सुपल, मानसिंग देसाई,आनंदा घंटे, बंडोपंत चव्हाण, गोविंद गुरव, संभाजी इंजल,प्रकाश मोरुसकर ,गौरव देशपांडे, प्रभाकर कोरवी, अजित हरेर,डॉ. दीपक सातोसकर, डॉ. दीपक हरमळकर, डॉ . कुलदीप देसाई,डॉ. सागर तेऊरवाडकर , डॉ. प्रवीण निंबाळकर,डॉ. सागर पारपोलकर, मेडिकल असोसिएशन आजराचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रमुख मागण्या…

♦महिला अत्याचार विरोधात कडक कायदे करून अंमलबजावणी करावी.

♦पोक्सो कायदा कडक करावा.

♦पॉर्न वर बंदी घालावी.

♦गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी.

महिलांचा सहभाग उल्लेखनीय

       आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. यामध्ये नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, नगरसेविका स सुमैय्या खेडेकर , डॉ. अंजनी देशपांडे, अनुसया पाटील, भैरवी सावंत, कल्याणी सरदेसाई, कल्याणी नार्वेकर, गायत्री पाटील, पुनम पाचवडेकर, माधविका ज़ोशी, चेतना केळकर पूर्वा आपटे सुप्रिया रेळेकर, सुजाता कळेकर, देवयानी आजगेकर,प्रा.धामणेकर,प्रा.केंद्रे, पुनम कांबळे,छाया कांबळे गायत्री पाटील,नसिमा जमादार, स्नेहल कांबळे, कांचन होलम यांच्यासह शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


सरकारचं करायचं काय…?
शिवसेनेकडून बदलापूर प्रश्नी निदर्शने

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुका शिवसेनेच्या (उबाठा) वतीने बदलापूर प्रकरणी आग्रा येथील संभाजी चौकामध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली.

     आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक मोठ्या संख्येने संभाजी चौकामध्ये एकत्र आले. सरकार विरोधी घोषणाबाजी करत झाल्या प्रकरणाचा निषेध करण्यात आला.

     यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, दयानंद भोपळे, संजय येसादे यांची भाषणे झाली.

     मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जर असे प्रकार होत असतील तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांनी मुलींच्या व महिलांच्या संरक्षणासाठी अशा मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा करावी ? असा सवालही उपस्थित करण्यात आला.

    आजरा शहरामध्येही बस स्थानक शाळा महाविद्यालय परिसरासह ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी देऊन अशा घटनांवर पायबंद घालण्यासाठी वेळीच दक्षता घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.

     यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, नगरसेवक किरण कांबळे, ओंकार मातोडकर रोहन गिरी, रवींद्र सावंत, अमित गुरव, चंद्रकांत पाटील, संकेत सावंत, दिनेश कांबळे, शिवाजी आढाव,नंदा माद्याळकर, अनुसया पाटील, समीर चांद, गुलाब दरवाजकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निंगुडगे शाळेजवळील जमीन हडप करण्याचा प्रयत्न…
पत्रकार बैठकीतून माजी सरपंच व ग्रामस्थांचा आरोप

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     निंगुडगे ता. आजरा येथील गावातील प्राथमिक शाळेच्या सार्वजनिक जागेचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरपंच आणि ग्रामपंचायतीची असते. मात्र निंगुडगे येथे संबंधित जागा हडप करण्याचा घाट सरपंचांनी घातला आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य अमृत देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर मोजणीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असून सरपंच ही मोजणीच मॅनेज करण्याच्या तयारी असून चुकीची मोजणी झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निंगुडगेचे माजी सरपंच संभाजी सरदेसाई यांच्यासह ग्रामस्थांनी पत्रकार बैठकीतून दिला आहे.

     प्राथमिक शाळेच्या जागेत सरपंच कृष्णा कुंभार यांनी अतिक्रमण केले असल्याचा आरोप करण्यात आला. तर हे अतिक्रमण काढण्याबद्दल वारंवार सांगूनही दखल घेतली गेली नाही. जिल्हाधिकारी यांनी जागेची फेर मोजणी करण्याबद्दल आदेश देऊनही मोजणी केली जात नाही २०१० मध्ये करण्यात आलेल्या मोजणीत अतिक्रमण स्पष्ट दिसून आले होते. ग्रामस्थांच्या तगाद्यामुळे भूमीअभिलेख मार्फत मोजणी करण्यात आली. अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरपंच मोजणी नकाशात बदल करण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असून या त्यांच्या कर्तव्यात कसूर करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

     गावच्या पाझर तलावाची मोजणी करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत असताना ती टाळण्याचे काम सरपंचांनी केले असून विरोधी गटाच्या शेताच्या बांधापर्यंत तलावाच्या संरक्षक भिंतीचे काम केले आहे. गायरानमध्ये अतिक्रमण केलेल्या आपल्या गटाच्या लोकांना वाचविण्याचा प्रयत्न सरपंचाकडून होत आहे.

     या पत्रकार बैठकीला बसवंत पाटणे, अमृत देसाई, काशिनाथ चौगुले, ईश्वर कांबळे, सयाजी सावंत, दिपक देसाई, रंगराव देसाई, अनिल देसाई आदि उपस्थित होते.

लवकरच या प्रश्न व आरोपांची उत्तरे देणार

     याबाबत सरपंच कृष्णा कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता या सर्व आरोप आणि प्रश्नांची उत्तरे लवकरच पत्रकार बैठक घेऊन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खाजगी बस व्यावसायिकांनी तालुका वासियांची लूट थांबवावी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांना अधिक तिकीट दर लावून प्रवाशांची लूट केली जात असून ती थांबवावी व योग्य असा तिकीट दर घ्यावा अशी मागणी आजरा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

     आजरा तहसीलदारांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आजरा तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.

     आजरा ते मुंबई व मुंबई ते आजरा ये जा करणाऱ्या सर्व खाजगी आराम बस मालकांनी नेहमीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवाच्या काळात तिकिटांचे दर भरमसाठ वाढवले आहेत. साधारणतः पती प्रवासी तिकीट दर सहाशे रुपये आणि स्लीपर कोचला आठशे रुपये असताना त्यांनी ते दर अचानक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात त्यांनी कुणाशीही पत्र व्यवहार केलेला नसून ते ट्रॅव्हल्स मालक मनमानी पद्धतीने कारभार करीत आहेत. भरमसाठ दर आकारून मुंबईतील चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम करत आहेत.

     मुंबईकर चाकरमान्यांनी गणेशोत्सवाकरता गावी परतायचे की नाही ? असा सवाल आता उपस्थित होत असून खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बस चालकांच्या या मनमानीवर तातडीने प्रतिबंध घालावा अशी मागणी करण्यात आली आहे.

     यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा आगारातील चालकाची आत्महत्या…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बहिरेवाडी येथे मुलाकडून वृद्ध बापाचा खून…

mrityunjay mahanews

एक मराठा… कोटी मराठा…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!