रविवार दि. ६ जुलै २०२५


पाऊस थांबता थांबेना …
चित्री प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात पावसाचा जोर कायम असून सततधार पावसामुळे आंबे ओहोळ सर्फनाला मध्यम प्रकल्पांच्या पाठोपाठ काल शनिवारी सायंकाळी सहा वाजता चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून प्रकल्पातील पाणी सांडव्यावरून पडू लागले आहे.
पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने शेती कामांवर मर्यादा येत आहेत. पावसाचा जोर असाच राहिल्यास चित्री व हिरण्यकेशी नदी काठावरील गावांना याचा फटका बसू शकतो. पाणी साठवण क्षमता संपल्याने आता इथून पुढे पाणी थेट नदीपात्रामध्ये येणार आहे. त्यामुळे जोरदार पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
गाळ काढण्याची गरज…
प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व माती असल्याने प्रकल्प भरले असले तरीही ते पूर्ण क्षमतेच्या आधीच भरले असून प्रकल्पातील गाळ काढण्याची गरज अभ्यासकांकडून बोलली जात आहे.
प्रकल्पांची सद्यस्थिती…
♦ चित्री मध्यम प्रकल्प ६१.६७० द.ल.घ.मी. पाणीसाठ्यासह शनिवार दिनांक ५ जुलै रोजी भरला आहे.
♦ सर्फनाला मध्यम प्रकल्प १८.९८ द.ल.घ.मी. पाणी साठ्यासह २७ जून रोजी पूर्ण क्षमतेने भरला आहे.
♦ आंबेओहोळ मध्यम प्रकल्प ३५.११ द.ल.घ.मी. पाणीसाठ्यासह २ जुलै रोजी पूर्ण क्षमतेने भरला आहे.

प्रशासकीय अधिकारी गुंतले शेती कामात
एक दिवस बळीराजा साठी…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत तहसीलदार समीर माने, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, पशुधन विकास अधिकारी अक्षय औताडे, सहायक कृषी अधिकारी योगेश जगताप, तृप्ती पाटील, तलाठी वंदना शिंदे, तानाजी कांबळे यांनी हात्तिवडे, सरंबळवाडी, कोवाडे येथे चारसूत्री लागवड पद्धतीने चिखलात भातरोप लावणी करण्यासह विविध कामे केली.
तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील यांनी शिवार अंतर्गत विविध गावांत शेतकऱ्यांशी संवाद साधला. पशुधन विकास अधिकारी अक्षय औताडे यांनी जनावरांच्या गोठ्याला भेट देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वझरे ता. आजरा येथील अर्जुन तुकाराम घरपणकर यांच्या भात पुनर्लागवड कामात महसूल व पंचायत विभागाचे अधिकारी सहभागी झाले. यावेळी अधिकाऱ्यांनी बांबू लागवड क्षेत्रात शिवार फेरी करून जनावरांच्या गोठ्यालाही भेट दिली. तसेच कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकर्यांना दिली.
यावेळी शेतकर्यांनी शेती करताना येणार्या समस्या मांडल्या व विविध योजनांचा लाभ मिळाला त्याबद्दल समाधानही व्यक्त केले यावेळी निवासी नायब तहसीलदार श्री. म्हाळसाकांत देसाई, वझरे गावच्या सरपंच शांताबाई गुरव, कृषि सेवक श्रीमती एस. एस. शिंदे, ग्राम महसूल अधिकारी यादव , ग्रामपंचायत अधिकारी देसाई व शेतकरी उपस्थित होते.

आंबेओहोळ पुनर्वसनाच्या बैठका म्हणजे लोकप्रतिनिधींचा वेळकाढूपणा कॉ.शिवाजी गुरव.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आंबेओहोळ हा धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडणारा महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प आहे. आंबेओहोळ धरणग्रस्तांची लोकप्रतिनिधींनी गेली २५ वर्ष कुचेष्ठा चालवली आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गांभीर्याने न घेता लोक भेटण्यासाठी येतात म्हणून बैठका घ्यायच्या अधिकाऱ्यांचा आढावा ऐकून घ्यायचा प्रत्येक वेळी प्रश्न तेच चर्चा तीच मात्र प्रगती काहीच नाही. प्रत्यक्षात ज्यांचे पुनर्वसन बाकी आहे त्यांच्याशी किंवा संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा न करता ज्यांना पुनर्वसनाचे प्रश्न माहीत नाहीत ते आपल्या पक्षाचे कार्यकर्ते बैठकीला बसून आज पर्यंत १०० पेक्षा जास्त बैठका घेतल्याचे सांगून पुन्हा पुन्हा बैठक घेऊन वेळकाढूपणा करणे एवढेच होत आहे असा आरोप आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष कॉ. शिवाजी गुरव यांनी केला आहे.
वास्तविक संकलन, दुरुस्तीसारखे प्रश्न स्थानिक जिल्हा पातळीवर आहेत, कांही शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या पण त्यांच्या सातबारावर चुकीच्या पद्धतीने बोजा चढवला आहे. याला पुनर्वसन म्हणायचे का? असा सवाल उपस्थित करत करार होऊन २ ते ३ वर्षे पूर्ण झाली तरी देखील काही शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांना जमीनी मिळालेल्या आहेत पण घर बांधणीचे भूखंड मिळाले नाहीत. असेच होत गेल्यास अजून दहा ते पंधरा वर्षे पुनर्वसन होईल असे वाटत नाही. लोकप्रतिनिधींनी लोकांची कुचेष्टा थांबवून गांभीर्याने घ्यावे व पुनर्वसन करावे अशी मागणी ही केली आहे.

पंडित दीनदयाळ विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा पं. दीनदयाळ विद्यालयात पार पडला. या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रा. डॉ. सुधीर मुंज या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी केले. गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
यावेळी नागेश यमगर म्हणाले, कष्ट केल्यास यश लांब राहत नाही. यशाकडे व ध्येयाकडे पोहोचण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत, परंतु योग्य मार्गाने शिक्षण घेऊन व्यसनांपासून दूर राहून आपण निश्चितच ध्येय प्राप्त करू शकतो.
दर्जा जपण्याचा या विद्यालयाने नेहमीच प्रयत्न केला आहे विद्यार्थ्यांनी योग्य व चांगल्या रीतीने शिक्षण घेऊन मोठ्या अधिकारी पदापर्यंत झेप घ्यावी असे अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. सुधीर मुंज यांनी सांगितले.
कार्यक्रमाला संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,पालक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत बुरुड, प्रकाश प्रभू यांनी तर अजित पाटील यांनी आभार मानले.

खाजगीकरणाच्या प्रवाहात देखील सहकार टिकून : सुजयकुमार येजरे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खाजगीकरणाच्या प्रवाहात देखील सहकार टिकून असल्याचे मत आजरा तालुका सहाय्यक निबंधक सुजयकुमार येजरे यांनी ‘सहकार काल आज आणि उद्या ‘ या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
जागतिक सहकार दिनाच्या निमित्ताने आजरा महाविद्यालय आजरा ज्युनिअर विभागातील अर्थशास्त्र व सहकार विभागाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविक प्रा.अनिल निर्मळे यांनी केले.
भांडवलशाहीच्या अन्यायकारक जाचातून सहकाराचा जन्म झालेला आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत सहकार चळवळ पोहोचलेली आहे. ज्यामधून प्रत्येक व्यक्तीचा आणि कुटुंबाचा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास मदत होत आहे. आज कांही प्रमाणात खाजगीकरणाच्या माध्यमातून सहकार नष्ट होतो की काय असे वाटते. पण भारतीय समाजामध्ये सहकार्याची वृत्ती जन्मापासून रुजलेली असल्यामुळे भविष्यात देखील सहकार निश्चितच टिकून राहील. व संपूर्ण मानवी समाजाची प्रगती निश्चितच होईल असे मतही सहाय्यक निबंधक सुजयकुमार येजरे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.अशोक सादळे यांनी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये भविष्यकाळातील सहकार चळवळ अवलंबून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सहकार चळवळीचा अभ्यास करून सहकारी संस्थांचे प्रतिनिधित्व स्विकारणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रा. सौ.वैशाली देसाई यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक मनोजकुमार पाटील अधीक्षक योगेश पाटील, प्रा.रत्नदिप पवार तसेच ज्युनिअर विभागातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.आभार प्रा. सौ.रूपाली पिळणकर यांनी मानले.

प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांची शरण अध्यासनास देणगी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांनी शिवाजी विदयापीठातील शरण अध्यासनास एक लाखांची देणगी दिली. कोल्हापूरातील लिंगायत समाजाने विदयापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे महात्मा बसवेश्वर यांची पर्यावरणीय प्रज्ञा हे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी डॉ. शिवशंकर उपासे यांनी शरण अध्यासनासाठी रु. एक लाख इतक्या देणगीचा चेक डॉ. शिंदे यांच्याकडे सुपुर्द केला. तसेच शरणे अध्यासनास उपयुक्त होतील असे दर्जेदार ग्रंथ देणगी म्हणून दिले.
शरण अध्यासन समन्वयक डॉ. तृप्ती करीकटटी यांनी सदर अर्थ व ग्रंथ देणगीबददल कृतज्ञता व्यक्त केली. हया विशेष देणगीबददल कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते डॉ. उपासे यांचा सत्कार करण्या आला. सदर कार्यक्रमास सौ. अपर्णा, सौ. सुधा, दयानंद हे कुंटुंबीय तसेच राजशेखर तंबाखे, डॉ. जी.पी. माळी, यश आंबोळे, साव्यान्नावर, चंद्रशेखर बटकडली व मान्यवर उपस्थित होते.

व्यंकटरावमध्ये अवतरले अवघे पंढरपूर…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव शैक्षणिक संकुल आजरा अंतर्गत व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिरमधील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी आज आषाढी एकादशी निमित्त साक्षात विठ्ठल- रखुमाई, आणि वारकरींची वेशभूषा केली होती. टाळ मृदुंगाच्या नादात या बाल वारकऱ्यांची दिंडी प्रशालेच्या प्रांगणात व विठ्ठल मंदिरासह आजरा शहरात काढण्यात आली. या दिंडीत वेशभूषेतील विद्यार्थी त्यांचे पालक आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
टाळ मृदंग आणि नाम घोषाने शाळेचा परिसर भक्ती सागरात डुंबून गेल्याचे दिसत होते. मैदानावर रिंगणही केले होते व व्यासपीठावर माऊली- माऊली या गीतावर विद्यार्थी विद्यार्थिनी नृत्य सादर केले.
या बाल वारकरी विद्यार्थी मंडळींना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, सचिव अभिषेक शिंपी, खजिनदार सुनील पाटील, संचालक सचिन शिंपी, विलास पाटील, प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे शेलार, देसाई, मुख्याध्यापक, डी.बी.डेळेकर, सौ.एल.पी.कुंभार, सौ.एन. एन.पाष्टे, सौ.एन.सि. हरेर,आर.एच. गजरकर, सौ.एम. व्ही.सावंत उपस्थित होते.

निधन वार्ता
जनाबाई बोलके

सिद्धिविनायक कॉलनी, आजरा येथील श्रीमती जनाबाई परशुराम बोलके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
निधन समयी त्यांचे वय ७२ वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुलगा मारुती, सून, नातवंडे, असा परिवार आहे.

निधन वार्ता
धनाजी देसाई

शिरसंगी ता. आजरा येथील सेवानिवृत्त गिरणी कामगार धनाजी बाबुराव देसाई (वय ६५ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, जावई, मुलगा असा परिवार आहे.
तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक आप्पासाहेब देसाई यांचे ते बंधू होत.

फोटो क्लिक…

धुवांधार पाऊस आणि भाजीचा कचरा…(स्थळ : भाजी मार्केट)

पावसाळ्राभर असंच चालायचं…(स्थळ : चराटी कॉलनी)




