
कुत्र्यांनी नऊ जणांचा तोडला लचका…

आजरा शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांनी तब्बल नऊ जणांचा चावा घेतल्याने शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आजरा शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. भटक्या कुत्र्यांकडून जीवघेणे हल्ले होऊ लागले आहेत. आठवडाभरात आजरा ग्रामीण रुग्णालयातून नऊ जणांनी याच्यावर उपचार घेतले आहेत. अन्यत्र उपचार घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
शहर व परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणार तरी कधी ? असा सवाल आता शहरवासीय उपस्थित करू लागले आहेत.
दोन महिलांना सर्पदंश
शहरातील दोन महिलांना गेल्या आठवड्यात सर्पदंश झाला आहे अशी माहिती आजरा ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आली.

आज-यात उद्या छ. शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा

हिंदू साम्राज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी साम्राज्याला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.हिंदूपदपातशाही रूपाने नवीन सृष्टी निर्माण करणाऱ्या महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण सर्व हिंदू समाजाने करावे, राष्ट्र जागरण कार्यातील आणि महाराजांच्या योगदानाबद्दल समाजातील महाराजांविषयीचा कृतज्ञतेचा भाव वृद्धिंगत व्हावा यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या पुढाकाराने सकल हिंदू समाजाच्या सहभागाने पश्चिम महाराष्ट्रात भव्य शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आजरा शहरात सोमवार दिनांक सकाळी या यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
शिवछत्रपतींचा पराक्रम स्वातंत्र्य, लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा ७५ वर्षात देशाच्या स्वातंत्र्यरथ पराक्रम अशा सर्वव्यापी तेजस्व रथयात्रेद्वारे समाजासमोर ठेवले जावे, आपल्या पूर्वजांच्याप्रती कटिबद्ध होण्याचा संकल्प तस्व सुसंस्कारित हिंदू युवक घडावा धर्म जागरणासाठी हिंदूंच्या शौर नागरिकांनी तन, मन, धनाने सह योगदान द्यावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
तसेच यावर्षी विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला साठ वर्षे पूर्ण होत आहेत.विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने केलेले हिंदुत्व जागरणाचे, सेवेचे, समरसतेचे, संस्काराचे व हिंदू संघटन गोसेवा संरक्षणाचे काम घेतलेल्या या संघटनेचा षष्ठीपूर्तीनिमित्त ही यात्रा निघणार असून सोमवार दिनांक ०९ ऑक्टोबर,२०२३ रोजी समस्त हिंदू बांधवांनी सकाळी ठीक ७:३० वाजता व्यंकटराव हायस्कूल येथे उपस्थित रहावे असे आवाहन बजरंग दल, आजरा कडून करण्यात आले आहे.

शाळा बंद करण्याच्या निर्णय मागे घेण्यासाठी जनआंदोलन उभारणार
आजरा येथील मेळाव्यात पालक शिक्षकांचा निर्धार

राज्य सरकारने २० पटाखालील शाळा बंद करण्याचे धोरण घेतल्याने राज्यातील पंधरा हजाराहून अधिक शाळा बंद होणार असल्याने या धोरणा विरोधात जन आंदोलन उभा करण्याचा निर्धार आजरा येथे झालेल्या मेळाव्यात करण्यात आला. यावेळी कॉ. संपत देसाई, कॉ. संजय तर्डेकर, शिवाजी बोलके, डॉ. नवनाथ शिंदे, संभाजी बापट,शिवाजी गुरव, महादेव पवार, निवृत्ती कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला.
यावेळी बोलतांना कॉ. संपत देसाई म्हणाले, राज्य सरकारने शाळा बंद करण्याचे धोरण घेऊन वाड्यावस्त्यांवरील दलित, आदिवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्यक समूहासह बहुजन समाजातील कष्टकरी जातवर्गातील मुलांना शिक्षणाच्या प्रक्रियेतून कायमचे हद्दपार करण्याचे ठरविले आहे. शिक्षण हक्क कायद्याचा आधार घेतं त्याच्या आडून आपला छुपा अजेंडा हे सरकार राबवू पाहत आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकरणाऐवजी खाजगीकरणं करू पाहत आहे. याविरोधात तीव्र लढा उभा करूया.
कॉ. संजय तर्डेकर म्हणाले, शाळा बंद करून आम्हाला सरकार देशोधडीला लावत आहे. याविरोधात सर्वजण एकत्र येऊन नेटाने लढा उभा करूया.
आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येत्या शनिवारी १४ ऑक्टोबरला आनंदराव नांदवडेकर प्राथमिक शिक्षक पतसंस्था आंबोली रोड, आजरा येथे सजग पालक, शाळा व्यवस्थापन समिती व तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा व्यापक मेळावा घेण्याचा निर्णय होऊन त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.
यावेळी युवराज पवार, शिवाजी गुरव, डॉ. नवनाथ शिंदे, निवृत्ती कांबळे, शिवाजी बोलके, संभाजी बापट, एकनाथ आजगेकर, डी. के. कांबळे यांनीही मनोगते व्यक्त केली.
मायकेल फर्नांडिस यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रकाश तिबिले यांनी मानले.
मेळाव्याला कृष्णा सावंत, उमाजी कुंभार, रवी दोरुगडे यांच्यासह शिक्षक, पालक मोठ्या संख्येने हजर होते.

आजरा महाविद्यालयात नेत्र तपासणी शिबिर

अण्णाभाऊ स्मृती पंधरवड्याच्या समारोपाचे औचित्य साधून आजरा महाविद्यालय आजरा मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नेत्र तपासणी हिमोग्लोबिन तपासणी जनरल वैद्यकीय तपासणी शिबिर आराध्या फाउंडेशन सातारा व साथ सामाजिक संस्था यांच्यावतीने आयोजित केले होते.
या शिबिराचे उद्घाटन आजरा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना त्यांनी वाढत्या वायू प्रदूषणाने मोठ्या प्रमाणात नेत्ररोग होत आहेत तसेच युवकांचे मोबाईल वापरण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे.या सर्वांचा परिणाम म्हणून दृष्टीदोष सातत्याने वाढत वाढत आहेत असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. एन सादळे होते उपप्राचार्य दिलीप संकपाळ, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, संस्थेचे सल्लागार आय. के. पाटील उपस्थित होते.या शिबिराचा लाभ सुमारे ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी घेतला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. रणजीत पवार यांनी केले आभार प्रा. विठ्ठल हाके यांनी मानले. सूत्रसंचलन प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी केले.
कार्यक्रमासाठी आजरा महाविद्यालयाचा प्राध्यापक वृंद, एन. एस. एस. चे विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निधन वार्ता
सौ.संगीता कुंभार

आजरा येथील कुंभार गल्लीतील सौ. संगीता प्रकाश परळकर (कुंभार), (वय ५० वर्षे) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे,सून असा परिवार आहे.
आजरा अर्बन बँकेचे आजरा शाखा व्यवस्थापक प्रकाश परळकर यांच्या त्या पत्नी होत.


