mrityunjaymahanews
अन्य

शुक्रवार – सातच्या बातम्या

शुक्रवार 

१८ जून २०२६

ग्रामपंचायत सदस्यास शिवीगाळ व मारहाण
एका विरोधात गुन्हा नोंद


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

बुरुडे ता. आजरा येथील ग्रामपंचायत सदस्य संजय आप्पा कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद कांबळे यांनी पोलिसांत दिल्याने पोलिसांनी अविनाश अशोक घेवडे या भटवाडी येथील तरुणाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी

कांबळे व सरपंच सौ. वैशाली गुरव या ग्रामपंचायतीमध्ये असताना घेवडे याने ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सांडपाण्या संदर्भात दोघांशी वाद घालण्यास सुरुवात केली. याचवेळी त्याने कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली असे या फिर्यादीत फिर्यादीने म्हटले आहे. या फिर्यादीवरून सदर गुन्हा नोंद आला आहे.

पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी, गडहिंग्लज हे करीत आहेत.

रस्ता झाला…
आता बस फेरीही सुरू होणार…
आवंडी धनगरवाड्यांवर आनंदोत्सव


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गेली ७० ते ८० वर्षे दुर्लक्षित असणारे आवंडी येथील धनगर वाडा क्रमांक दोन व तीन ला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नाने रस्त्यांची कामे तर पूर्ण झालीच परंतु त्याच बरोबर बस फेरी सुरू करण्याच्या उद्देशाने चाचणीही घेण्यात आली.

धनगरवाडे शिक्षण, आरोग्य यासह इतर सुविधांपासून वंचित राहू नयेत या उद्देशाने पालकमंत्री आबिटकर यांनी गेली काही वर्षे विशेष लक्ष दिले होते. दळणवळणाच्या सुविधांचा अभाव यामागचे मुख्य कारण असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या मार्गावर चार चाकी वाहने, बस जातील अशा पद्धतीचा रस्ता तयार करून घेण्यात आला आहे.

एसटी अभावी विशेषत: शालेय विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिकांचे होणारी परवड, करावी लागणारी पायपीट यामुळे बस फेरी सूरु करावी अशी मागणी कांही दिवस सुरू होती. अखेर या मागणीला मूर्त स्वरूप येण्याची चिन्हे असून काल या मार्गावर बस फेरीची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे आता लवकरच या मार्गावर नियमित बस फेरी सुरू होणार आहे.

वझरे मुक्कामाची बस महागोंड येथेच थांबवली…
प्रवाशांनी केली चौकशीची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा आगाराची वझरे मुक्कामाची बस फेरी अचानकपणे महागोंड येथेच थांबवून
वझरे येथील प्रवाशांची ऐनवेळी गैरसोय केल्यामुळे सदर प्रकरणाचे चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी लेखी मागणी आगार व्यवस्थापकांकडे वझरे सरपंचांनी केली आहे.१६ जून रोजी सदर प्रकार घडल्याने वझरे येथील ग्रामस्थ विद्यार्थी महिला व ज्येष्ठ नागरिक यांना सायंकाळच्या वेळी सुमारे तीन किलोमीटर पायपीट करत घर गाठावे लागले. या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

निधन वार्ता

परसू येसणे

मडिलगे ता. आजरा येथील श्री. परसू बाबू येसणे (वय ७० वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व एक विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

छायावृत्त

जय हनुमान सहकारी गृह तारण संस्था मर्यादित पेरणोली यांचे तर्फे विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल राजेंद्रसिंह सावंत व वनविभागामधून सेवानिवृत्त झाल्याबद्दल मारुती शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष देसाई, फिलिप लोबो, दिनकर देसाई, मानसिंग चव्हाण यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक ज्ञानदेव सासुलकर व संस्थेचे संचालक उपस्थित होते.

फोटो क्लिक 

पाऊस पडेल या आशेने भात तरवा पेरल्या… त्या उगवूनही आल्या… परंतु पावसाने ओढ दिल्याने त्या जगवण्यासाठी बळीराजाला मोठी धडपड करावी लागत आहे.

थोडक्यात बातम्या 

♦ सुमारे १०७ दिवस सुरू असलेले अमेरिका इराण युद्ध थांबवण्यात आले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G – 7 परिषद आटपताच आमचे राज्याध्यक्ष मॅक्रोन यांच्या उपस्थिती कराराच्या प्रतिवर स्वाक्षरी केली. या करारावर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांनी तेहरानमध्ये स्वाक्षरी केली.

♦ इचलकरंजी येथे मध्यवर्ती बस स्थानकात भरधाव कार गर्दीत घुसून सहा जणांना धडकली. यामध्ये नंदा वसंत कोळी या ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

♦ मांडेदुर्ग येथील माजी सैनिक अमृत गेनबा कांबळे ( वय ५०) यांचा मांडेदुर्ग-ढोलगरवाडी दरम्यानच्या ओढ्यात पडून मृत्यू झाला.

आजचे पंचांग 

दिनांक : १९ जून २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : पंचमी (सायंकाळी ०४.५९ पर्यंत) त्यानंतर षष्ठी तिथी
नक्षत्र : आश्लेषा नक्षत्र (सकाळी १०.०६ पर्यंत) त्यानंतर मघा नक्षत्र
योग : हर्षण योग (दुपारी ०२.५२ पर्यंत) त्यानंतर वज्र योग
करण : बलवा करण (सायंकाळी ०४.५९ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : कर्क राशी (सकाळी १०.०६ पर्यंत) त्यानंतर सिंह राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०१ ते दुपारी १२.४० पर्यंत.
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१३ ते दुपारी ०१.०६
सूर्योदय : सकाळी ०६.०३
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!