mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार 

१९ जून २०२६

अडीच तोळ्याची पाटली हातोहात लंपास…
आजरा बस स्थानकावरील प्रकार


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वाटंगी ता. आजरा येथील सुशीला शंकर वांद्रे या महिलेची हातातील अडीच तोळे वजनाची सोन्याची पाटली बस मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने कट करून लांबवली. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे आजरा बसस्थानक आवारात गोंधळ उडाला. यामध्ये महिलेला सुमारे दोन लाख रुपयांचा फटका बसला आहे.

याबाबतची फिर्याद सुशीला वांद्रे यांनी आजरा पोलिसात दिली असून पुढील तपास हवालदार गवळी करत आहेत.

पावसासाठी
हिंदूंचे साकडे...
मुस्लिम बांधवांची विशेष दुआ

उत्तूर : मंदार हळवणकर

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्ग चिंतेत असताना उत्तूर येथील महालक्ष्मी यात्रा कमिटीच्या वतीने पावसासाठी देवी महालक्ष्मीला साकडे घालण्यात आले. यासाठी आदल्या दिवशी यात्रा कमिटीची बैठक घेऊन शुक्रवारी पाळक दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

शुक्रवारी श्री भावेश्वरी मंदिरात प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर आंबील-घुगरीचा नैवेद्य घेऊन बाजारपेठ, नेहरू चौक, मरगूबाई मंदिर, महादेव मंदिर व मेन रोड मार्गे महालक्ष्मी मंदिरापर्यंत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. महालक्ष्मी मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी दिगंबर गुरव यांनी पाऊस पडावा व शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे, कोणतीही नैसर्गिक संकट येऊ नये यासाठी गाऱ्हाणे घातले. महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. तसेच संपूर्ण महालक्ष्मी यात्रा कमिटी व ग्रामस्थ या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

शुक्रवारी उत्तूर येथे जुम्मा नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी पावसासाठी विशेष दुआ केली. हाफिज सोहेब मुलतानी यांनी दुआचे नेतृत्व करत चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना केली. या दुआमध्ये उत्तूर, चिमणे, धामणे व सेना परिसरातील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती लवकर सुधारावी व सर्वांना दिलासा मिळावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन शिवसेना आजरा तालुक्याच्या वतीने अतिशय उत्साहात साजरा करणेत आला.  शिंदे गटाने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली, आजच्या या शुभ दिन शिवसेना आजराचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सामाजिक भान जपत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे रुग्णांना फळांचे वाटप केले. तसेच नव्याने होत असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयच्या इमारतीच्या कामाला भेट देऊन सविस्तर आढावा घेतला. येणाऱ्या काळात पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून पक्ष संघटना मजबूत करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी आजरा संपर्क प्रमुख जितेंद्र भोसले, शिवसेना शहर प्रमुख विजय थोरवत, पाणंद समितीचे सदस्य इंद्रजित देसाई, उप तालुका प्रमुख काका देसाई, युवासेना तालुका प्रमुख मंदार बिरजे, रणजित सरदेसाई, संतोष भाटले, धनंजय पाटील, महेश खेडेकर, सुनील दिवेकर, अमजद माणगावकर तसेच ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. अमोल पाटील व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

उबाठा गटाकडून ध्वजारोहण व जिलेबी वाटप 

शिवसेनेच्या सठाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवसेना उबाठा गटाच्या वतीने ध्वजारोहणासह जिलेबी वाटप केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील तालुकाप्रमुख युवराज पोवार, दिनेश कांबळे, सागर नाईक, महेश पाटील, समीर चांद, सुजय पाटील, राजू बंडगर , संजूभाई सावंत , भिकाजी विभुते, रंगराव माडभगत, विजय डोंगरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वझरे पोलीस पाटलांविरोधात तहसीलदारांकडे तक्रार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

वझरे गावचे पोलीस पाटील श्री. मारुती गणपती भालेकर हे आजरा सहकारी साखर कारखान्यात नोकरी करत असल्यामुळे गावात नियमितपणे हजर राहत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना विविध शासकीय कामे, दाखले, पडताळणी तसेच कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील बाबींमध्ये अडचणी येत आहेत. पोलीस पाटील म्हणून गावातील शांतता व सुव्यवस्था राखणे, शासकीय कामकाजात सहकार्य करणे, तातडीच्या घटनांची माहिती प्रशासनाला देणे व ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी उपलब्ध राहणे ही त्यांची जबाबदारी आहे.

मात्र ते बहुतेक वेळ गावात अनुपस्थित असल्याने या जबाबदाऱ्यांचे योग्य प्रकारे पालन होत नाही. त्यांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामपंचायत, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाशी संबंधित कामांमध्ये अडथळे निर्माण होत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच गावात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पोलीस पाटील तात्काळ उपलब्ध नसल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून सदर प्रकरणाची चौकशी करून श्री. मारुती गणपती भालेकर यांनी पोलीस पाटील म्हणून कर्तव्यात केलेल्या दुर्लक्षाबाबत योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी वझरे ग्रामस्थांच्या वतीने सरपंचांनी लेखी अर्जाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.

मुक्कामाच्या गाड्या पाहीजेत…
पण वाहक चालकांच्या सोयी सुविधांचे काय…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सध्या अनेक गावांमधून एसटी महामंडळाने मुक्कामाच्या गाड्या सोडाव्यात अशी मागणी केली जात आहे. वेळोवेळी होणारी मागणी व प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरीता महामंडळाकडून मुक्कामाच्या बस फेऱ्या सोडल्या जात आहेत. परंतु ज्या ठिकाणी मुक्कामाकरता बस थांबतात त्या ठिकाणी चालक व वाहकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहेत.

प्राधान्याने पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि डासांचा उपद्रव या बाबींचा सामना करावा लागतो. बहुतांशी वाहक – चालकांना निवासाची कोणतीच सोय नसल्याने एसटीतच झोपावे लागते.

वास्तविक मुक्कामाच्या बस फेरीची मागणी करत असताना वाहक व चालकांच्या पायाभूत सुविधांचा विचार होणे गरजेचे आहे असे प्रकर्षाने जाणवत आहे. ज्या त्या गावच्या ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन सोडवण्याची गरज आहे. मूलभूत सुविधा नसल्याने मुक्कामाच्या बस फेरीला काम करताना वाहक व चालकही नाखुश दिसतात.

अपघाताची शक्यता…

चालकांची पुरेशी झोप न होणे, त्यामुळे थकवा येणे असे प्रकार घडून एसटीचे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

थोडक्यात बातम्या 

♦ पाटबंधारे विभागाने आज शनिवारपासून तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यासाठी उपसा बंदी शिथिल केली आहे. उपसाबंदीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याने सदर निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

♦ आदमापूर बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या गैरव्यवहार पार्श्वभूमीवर तत्कालीन कार्याध्यक्ष तथा धर्मादाय निरीक्षक रागिनी खडके यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे नोंदवत यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले आहे. 

♦ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर आणि इचलकरंजी दौऱ्यावर आले असून त्यांचे विविध कार्यक्रम दिवसभर आयोजित करण्यात आले आहेत.

निधन वार्ता 

सौ.लीला सुतार 

शिवाजीनगर/नबापूर आजरा येथील सौ.लीला दिलीप सुतार ( वय ६० वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा,  मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

त्या रिक्षाचालक बाळू उर्फ दिलीप सुतार यांच्या पत्नी होत. रक्षा विसर्जन उद्या रविवारी सकाळी आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : २० जून २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : षष्ठी (दुपारी ०३.४६ पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
नक्षत्र : मघा नक्षत्र (सकाळी ०९.२५ पर्यंत) त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र
योग : वज्र योग (दुपारी १२.४७ पर्यंत) त्यानंतर सिद्धि योग
करण : तैतुला करण (दुपारी ०३.४६ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : सिंह राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.२२ ते सकाळी ११.०१ पर्यंत.
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१४ ते दुपारी ०१.०७
सूर्योदय : सकाळी ०६.०३
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

हत्तीच्या हल्ल्यात वन कर्मचारी गंभीर जखमी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आईचे दशकार्य करण्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू : आजरा येथील घटना

mrityunjay mahanews

शनिवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!