mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार  दि.१८ फेब्रुवारी २०२५

    पोळगाव येथे एकाला मारहाण…

      दोघांविरोधात गुन्हा नोंद

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       पोळगाव ता. आजरा येथे किरकोळ कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारीत होऊन त्यापैकी बाळू कृष्णा चव्हाण हे जखमी झाले . सोमवारी सायंकाळी सदर प्रकार घडला.

      चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश उर्फ पिंटू शिवाजी सुतार व छाया शिवाजी सुतार या दोघांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

आजरा प्रीमियर लीग – पर्व २

५ मार्च ते ९ मार्च पर्यंत होणार स्पर्धा…
खेळाडू लिलाव २२ फेब्रु. रोजी…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा प्रीमियर लीग – पर्व २ च्या माध्यमातून आजरा तालुक्यातील खेळाडू व क्रिकेट प्रेमींसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे .छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, गांधीनगर येथे पाच ते नऊ मार्च या कालावधीत होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेचे नेटके नियोजन संयोजकांनी केले असून बोली पद्धतीने खेळाडू घेऊन संघमालकांकडून संघ तयार करण्याची प्रक्रिया अण्णाभाऊ सांस्कृतिक हॉलमध्ये दिनांक २२ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता पार पडणार आहे. याकरिता २० फेब्रुवारीपर्यंत फॉर्म जमा करता येणार आहेत.

      सोमनाथ भातखंडे, दीपक कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

      स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. २५०००/-, रू.,१५०००/- रु., ७०००/- व रु.,५०००/- ,अशी रोख बक्षीस देण्यात येणार आहेत.

      स्पर्धेचे नियम व अटी २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या खेळाडू लिलाव प्रसंगी सांगण्यात येणार असल्याचेही संयोजकांनी स्पष्ट केले आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क:

दिपक कांबळे
८०५५५२३००६

उत्तम पाटील
८०८००९९८७८

आसिफ मुल्ला
९९२३८७६४७८

सोमनाथ भातखंडे                    ४२०१३१४८०

योगेश नाईक
९६५७१४०३३६

फिरोज चाँद
९१५८६६७२२७

राहुल नाईक
८६००७१६५६५

मुंबईत दलालांना दणका देण्याची गरज : कॉ. उदय भट

आजऱ्यात गिरणी कामगारांचा मेळावा

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        गिरणी कामगार पूर्ण वेळ मुंबईत काम करत असताना संपाच्यावेळी त्यांना मुंबईतून बाहेर हाकलले आणि मुंबईवर दलालांचे राज्य निर्माण झाले. त्यांना दिवसाही स्वप्न पडू लागली. हे बदलण्यासाठी गिरणी कामगारांची संघटना लाल निशाण पक्षाने एकजूट केली आणि त्यांना मुंबईत गिरणीच्या जागेतच घरे मिळण्यासाठी संघटीत करण्यात आले. यासाठी पुढची लढाई म्हणून ६ मार्चला आझाद मैदानात संघर्ष लढा उभा करणार असून मुंबई येथील दलालांना दणका देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे कॉ. उदय भट यांनी सांगितले. आजरा येथील किसान भवन येथील गिरणी कामगारांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

       स्वागत व प्रास्ताविक नारायण भडांगे यांनी केले. यावेळी भट यांनी महाराष्ट्रभर विखुरलेला गिरणी कामगारांच्या हक्कासाठी एकत्र करण्याचे काम संघटनेने केले असून या संघटनेच्या माध्यमातून गिरणी कामगारांना मुंबईत घर व त्यांची पेन्शन वाढ यासाठी सातत्याने लढाई सुरू असून आताची ही वेळ शासनाला व दलालांना धक्का देण्याची असून सर्व गिरणी कामगारांनी व वारसांनी आझाद मैदानात ताकद दाखविण्याचे आवाहन केले.

      यावेळी कॉ. अतुल दिघे यांनी गिरणी कामगार हा बेघर नाही किंवा भुमीहिन नाही. त्याने आपल्या श्रमाने मुंबई सोन्याची केली. त्यानांच बेघर समजून इकडे घर देऊ… तिकडे घर देऊ असे सांगून फसवणूक केली जात आहे. या फसवणूकीला गिरणी कामगार भुलणार नसून गिरणीच्या जागेतच घर मिळविल्याशिवाय ही संघटना शांत बसणार नाही. तसेच गिरणी कामगारांना किमान मासिक ९ हजार पेन्शन मिळाली पाहिजे यासाठीच्या लढाईसाठी गिरणी कामगारांनी सज्ज होण्याचे आवाहन केले.

      यावेळी कॉ. घोडिंबा कुंभार, कॉ. शिवाजी सावंत, कॉ. शांताराम पाटील, कॉ. दत्तात्रय अत्याळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

      या मेळाव्याला नारायण राणे, जयश्री कुमार, अनिता बागवे, हिंदुराव कांबळे, विठ्ठल बामणे, शिवाजी पोवार, मनाप्पा बोलके, बाबू केसरकर, तुकाराम जाधव यांच्यासह महिला व गिरणी कामगार उपस्थित होते. सूत्रसंचलन कॉ. संजय घाटगे यांनी करून आभार मानले.

टोल नाक्याबाबत बैठक घेऊन निर्णय करू …

पालकमंत्री ना. आबिटकर यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       संकेश्वर – बांदा महामार्गावर आजरा शहरालगत होत असलेल्या टोल नाक्याला तालुका वासीयांचा तीव्र विरोध असून याबाबत अनेक आंदोलनेही झाली. जनतेचा विरोध पाहून सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी या आंदोलनात सहभागी झाले होते. विद्यमान पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्यासह माजी आमदार के‌. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांच्यासह या दोन तालुक्यातील अनेक नेते सहभागी झाले होते.

       यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत शेवटपर्यंत या लढ्यात राहण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीनंतर राज्यात महायुती सत्तेवर आल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांना आरोग्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याने आंदोलकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

         त्यामुळे शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली असता या प्रश्नी आपण लक्ष घालत असून आजरेकरांना त्रास होणार नाही असा निर्णय करून घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी कॉ. संपत देसाई, परशुराम बामणे, यशवंत चव्हाण, पांडुरंग सावरतकर, जावेद पठाण, मयुरेश देसाई इत्यादी उपस्थित होते.

आजऱ्यातील रिक्षा स्टॉपचा प्रश्न मार्गी लागणार…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथील रिक्षा स्टॉप प्रश्नी सर्व विभागाचे शासकीय अधिकारी, अन्याय निवारण समिती अध्यक्ष परशुराम बामणे, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई , नगरपंचायत मुख्याधिकारी सूरज सुर्वे , हायवे ॲथोरिटी ऑफ इंडियाचे डेप्युटी इंजिनिअर अनिल पाटील, डॉ.धनाजी राणे, वाय.बी.चव्हाण, जोतिबा आजगेकर, दिनकर जाधव, रिक्षा संघटना अध्यक्ष रवी तेंडुलकर, उपाध्यक्ष समीर चौगुले, राजू चंदनवाले, व इतर सर्वांची एकत्रित चर्चा पार पडली.

      सर्व उपस्थित अधिकाऱ्यांनी पर्यायी रिक्षा स्टॉपसाठी जागा करून देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या इंजिनिअरना विनंती केली. ती त्यांनी मान्य करून लवकरात लवकर रिक्षाचा स्टॉप करण्याच्या उद्देशाने रिक्षा स्टॉप नजिकच्या महामार्गाची रुंदी वाढवण्याच्या कामाला सुरुवात होईल असे सांगितले.

      यामुळे बसस्थानक परिसरातील रिक्षा स्टॉप प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.

        आजपासून यात्रांचा धमाका…

चिमणे,झुलपेवाडी, मासेवाडीसह तालुकाभर छोट्या- मोठ्या यात्रा

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यामध्ये आजपासून विविध गावच्या यात्रांना सुरुवात होत आहे. यामध्ये प्राधान्याने चिमणे, झुलपेवाडी, वझरे,मासेवाडी या गावांच्या यात्रांचा समावेश आहे. तर मसोली येथे स्थानिक व वार्षिक यात्रा पार पडत आहे.

      आज उत्तूर भागात मासेवाडी, चिमणे, झुलपेवाडी, वझरे येथे  होणाऱ्या यात्रा या बऱ्याच वर्षांनी होत आहेत. त्यामुळे यात्रांचे जंगी नियोजन स्थानिक यात्रा कमिट्या व ग्रामस्थ यांच्यासह विविध मंडळांनी केले आहे. ठीक ठिकाणी सांस्कृतिक, मनोरंजनात्मक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

      रविवारपर्यंत हा यात्रांचा माहोल असाच राहणार असे दिसत आहे. मुंबई- पुण्यासह बाहेरगावी राहणारे चाकरमानी मोठ्या संख्येने यात्रांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात आल्याने या यात्रांमुळे मोठी आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

 क्षेत्र रामतीर्थ येथे तुकोबाराया उत्सव उत्साहात संपन्न...

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      जगद् गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे एक दिवशीय हरिनाम सोहळा भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला.

       या सोहळ्यानिमित्त सकाळी गाथा भजन आणि पुष्पवृष्टी करण्यात आली. सायंकाळी ह.भ.प.श्री. संतोषमहाराज सहस्त्रबुद्धे , सांगली यांची ‘ तुका आकाशाएवढा ‘ या विषयावर प्रवचन सेवा संपन्न झाली. त्यानंतर ह.भ.प.श्री. गुरुवर्य वैभव महाराज राक्षे प्रधानाचार्य श्री. तुकोबाराय गुरुकुल गाथा मंदिर , देहू यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले.

       महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमासाठी आजरा , चंदगड , भुदरगड , राधानगरी , कागल , गडहिंग्लज , सांगली आणि सीमा भागातील वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वॉट्सअपचा एक संदेश…
चिकनचा दर वधारला…
सामान्य ग्राहकांना फटका…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजऱ्यात कोणीतरी वॉट्सअपवर “ग्राहक जागा हो “अशा मथळ्याचे चिकन दराबाबतचे संदेश सोशल मीडियावर फॉरवर्ड केल्यामुळे चिकनसेंटरवाल्यांनी भीतीपोटी १२० रु. वरून सरळ १६० रु. प्रति किलो चिकनचे दर केल्याने सर्व सामान्य चिकन प्रेमी ग्राहकांची चांगलीच पंचायत होऊन बसली आहे.

       आजऱ्यात चिकनची सुमारे पंचवीसभर दुकाने आहेत. कांही दुकाने मुख्य रस्त्यालगत आहेत तर काही आडवळणी आहेत. जी दुकाने मोक्याच्या ठिकाणापासून लांब आहेत त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने सुरुवातीला इतर दुकानपेक्षा किलोमागे १० ते २० रु. दर कमी करून चिकन विकू लागले. आणि यातूनच सुरू झालेली दराची स्पर्धा शेजारच्या इतर तालुक्यात २२० ते २४० रु. दर असताना आजऱ्यात १३० ते १२० रु. किलो पर्यंत दर खाली आणण्यास कारणीभूत ठरली. यामुळे सगळीकडे चिकनची मागणी वाढू लागली. मटणाला पर्याय म्हणून यात्रेसह, सणावारांना चिकनची मागणी वाढू लागली. शेजारच्या तालुक्यातील ग्राहक सुद्धा आजऱ्यातून चिकन घेऊन जाऊ लागला. परंतु मागील दोन दिवसापूर्वी कोणीतरी “ग्राहक जागा हो “या मथळ्याखाली व्हाट्सअप वर एक मॅसेज फॉरवर्ड केला आणि त्यामध्ये विक्री केल्या जाणाऱ्या चिकनच्या दर्जाचा प्रश्न, प्रशासनाकडून,ग्राहकांकडून याची चौकशी व्हावी,अन्न व भेसळ विभागकडून दुकानांचे परवाने व इतर बाबींची चौकशी व्हावी असा मजकूर व्हायरल केल्याने सर्व चिकन व्यावसायिकांच्या चर्चेत दर कमी केल्याने असे प्रश्न उपस्थित होत असल्याचे समोर आल्याने हाच दर १२५ रु. वरून सरळ १६० रु. प्रति किलो केला गेला आहे.

     यामुळे आता स्वस्तात चिकन देण्याचे धाडस तूर्तास तरी कोणी करेल असे दिसत नाही.

 

संबंधित पोस्ट

‘आजरा’ ची सभा उत्साहात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

हत्तीचा धुमाकूळ… ट्रॅक्टर सह बैलगाडी केली पलटी

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी-विक्री संघासाठी आज मतदान

आजऱ्यात आजीच्या समोरच नातीचा विहिरीत पडून मृत्यू

mrityunjay mahanews

अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी: आज-यात जि. प. उपाध्यक्ष शिंपी यांची मागणी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!