mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरुवार दि.५ फेब्रुवारी २०२६

कार्यकर्त्यांच्या मागणीवरून मीच सुधीर देसाई यांना उमेदवारी दिली आहे : नाम. हसन मुश्रीफ

आजरा येथे राष्ट्रवादीची प्रचार सभा


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आपल्याकडे जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांची जिल्हा परिषद पेरणोली मतदार संघातून उमेदवारीचा आग्रह धरल्याने मीच देसाई यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असे स्पष्ट करत देसाई यांच्यावर होत असलेले उमेदवारी बाबतचे आरोप वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी खोडून काढले.
राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, मी हिमालयासारखे तुमच्या पाठीशी राहीन असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बाजार मैदान आजरा येथे आयोजित प्रचार सभेचे बोलत होते.

आजरा तालुक्यातील पाणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, आजरा साखर कारखान्याला NCDC कडून मदत मिळवून देण्यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा वाटा राहिला आहे.राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गट या उमेदवारांना निवडून देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे भावनिक आवाहनही केले.

यावेळी माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत सरड्यासारखे रंग बदलणाऱ्यांच्या टिकेकडे दुर्लक्ष करा. ते काल कुठे होते आज कुठे आहेत व उद्या कुठे राहतील याचा काही भरवसा नाही. त्यांना फार महत्त्व देऊ नका. त्याचबरोबर तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या मंडळींपासून सावध रहा असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ.नंदाताई बाभूळकर म्हणाल्या, चंदगडची हक्काचे आमदारकी आपापसातील मतभेदामुळे दुसऱ्याच्या पदरात टाकली गेली. आठ हजार लोकसंख्येच्या चंदगड नगरपंचायतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना चंदगड मध्ये यावे लागले तरी देखील फारसा फरक पडला नाही. वैचारिक बैठक असलेल्या राष्ट्रवादीचे घड्याळ जिवंत ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे ही निवडणूक विचारांचा वारसा पुढे नेणारी निवडणूक असून राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पाठीशी रहा.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय देवणे म्हणाले, मंत्री मुश्रीफ म्हणजे विकास आहे. रात्रंदिवस सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या देसाई यांना उमेदवारी दिल्याने या भागातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यास त्यांच्या पाठीशी मंत्री मुश्रीफ निश्चित राहतील असे सांगितले.

जि.प.उमेदवार सुधीर देसाई म्हणाले अनुभवाची जोड व विकासाची ओढ आहे.निधी आणून मतदार संघाचा चेहरामोहरा बदलण्याची संधी आहे. निवडून आल्यावर लोक दरबार घेऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

केसरकर यांना आम्ही पं.स. सभापती, कारखाना अध्यक्षपद ही पदे दिली. त्याचा त्यांना विसर पडला आहे. संघामध्ये अल्बर्ट डिसोझा यांना पाडण्याचा प्रयत्न कुणी केला? सौ.कामीना पाटील यांचा जातीचा दाखला रद्द करण्यासाठी कोणी खटाटोप केली? याची त्यांनी उत्तरे द्यावीत. त्यांच्या काळात कारखाना बंद पडला. आम्ही तो चालवला. कारखाना चालू ठेवणे म्हणजे कारखान्याची वाट लावणे म्हणणे निश्चितच योग्य नाही. अटी शर्ती घालून आम्ही कोणतेही काम केले नाही. प्रत्येक निर्णय घेताना त्यांचा सहभाग असताना आता जी टिका करत आहेत हे योग्य नाही असे त्यांनी सांगितले.

यावेळी मुकुंदराव देसाई, युवराज पोवार,राजू होलम,काॅ.संपत देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.

या सभेस पेरणोली पंचायत समिती उमेदवार सौ. यशोदा पोवार, अनिल फडके, उपाध्यक्ष सुभाष देसाई,संचालक एम.के.देसाई,उदय पवार, अनिल फडके, रशीद पठाण, रचना होलम, दिगंबर देसाई, शिवाजी नांदवडेकर, संभाजी पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे, अनिकेत कवळेकर, अल्बर्ट डिसोझा, सुरेश होडगे, विक्रम देसाई, अशोक तर्डेकर, सौ.राजलक्ष्मी देसाई, सौ. रचना होलम, सौ‌. कामिना पाटील, सौ.मनीषा देसाई, रेजिना फर्नांडिस, निवृत्ती कांबळे, भीमराव वांद्रे, विजय देसाई, गोविंद पाटील, प्रकाश मोरुस्कर, आरिफ खेडेकर, महेश पाटील, सूर्यकांत नार्वेकर, मधुकर यलगार, जनार्दन बामणे, अमित गुरव, चंदर पाटील, सुरेश पाटील यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते व पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघातील ग्रामस्थ उपस्थित होते.

दुचाकीची गव्याला धडक…
दोघे जखमी


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा साखर कारखान्यावरून आजऱ्याच्या दिशेने परतत असताना आजरा – आंबोली मार्गावर मसोली फाटयानजिक रस्ता ओलांडणाऱ्या गव्याला दुचाकीची धडक बसल्याने कासिम नसरुद्दीन लतीफ व विजयकुमार येजरे हे दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना गडहिंग्लज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी…

आजरा कारखान्या कडून रात्रीची शिफ्ट संपवून पहाटे लतीफ व येझरे हे आजऱ्याच्या दिशेने दुचाकीवरून चालले होते. मसोली नजीक दुचाकी आली असता रस्ता ओलांडणाऱ्या गव्याला दुचाकीची जोरदार धडक बसली. यामध्ये दोघेही खाली पडून जखमी झाले. पाठीमागून येणाऱ्या धनाजी डोंगरे व अन्य कामगारांनी रुग्णवाहिका बोलावून तातडीने त्यांना उपचारासाठी हलवले यामध्ये दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

लाडकी बहीण, शेतकऱ्यांचा भाजपला आशीर्वाद : अशोकअण्णा चराटी

पोळगाव, एरंडोळ, चितळे भागात प्रचार दौरा…


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भारतीय जनता पार्टीने आजरा तालुक्यात विकासात्मक आणि रचनात्मक काम व्हावं यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांना व्यक्तिगत योजनांचा लाभ देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. आज सर्वांनाच त्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष होत आहे. सुरू असलेल्या सर्वच योजनांचा लाभ अधिक गतिमान पद्धतीने व्यक्तीगत पातळीवर होण्यासाठी आजरा तालुक्यातील सर्वसामान्य जनता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदानरुपी आशीर्वाद देऊन विजयी करतील असा विश्वास भाजपा नेते अशोकअण्णा चराटी यांनी व्यक्त केला. ते पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयवंत सुतार, स्मिता देसाई व समीर पारदे यांच्या प्रचार दौऱ्यात बोलत होते. यावेळी पोळगाव एरंडोळ, चितळे भागात भाजपचा झंझावती प्रचार करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद उमेदवार जयवंत सुतार म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. त्यांच्याच विचारांची सत्ता कोल्हापूर जिल्हा परिषद व आजरा पंचायत समितीत असायला हवी. एकाच विचाराचे लोक सगळीकडे असतील तर सहजरीत्या निधी मोठ्या प्रमाणात येतो आणि विकासाची संकल्पना पूर्ण होते. त्यामुळे ७ फेब्रुवारी रोजी कमळ चिन्ह समोरील बटन दाबून भाजपला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.

यावेळी विजय पाटील, विलास नाईक, अनिकेत चराटी, जी. एम. पाटील, संभाजीराव सरदेसाई, डॉ. इंद्रजीत देसाई, संदीप देसाई, उदयसिंह सरदेसाई, शशिकांत नार्वेकर, लक्ष्मण खामक,र गुणाजी धडाम, शामराव खामकर, संभाजी तेजम, पांडुरंग दळवी, जोतिबा साबळे, जीवन शेवाळे, भिकाजी पाटील, विजय सुतार, शिवाजी पाटील, सुदेश अतकरी, ओंकार पाटील, तानाजी नेवरेकर, भरत पाटील, बंडू कोरगावकर, ईश्वर पताडे, दयानंद घरपणकर, बाळासो तर्डेकर, फत्तेसिंह सरदेसाई, यशवंत तर्डेकर, प्रकाश तर्डेकर, प्रकाश घुरे, राणबा खवरे, लक्ष्मण घुगे, श्रीपती ढोणुक्षे, अशोक तर्डेकर, भाऊ खवरे, गोविंद नेवरेकर, उत्तम सरदेसाई, पुंडलिक सुतार, धोंडिबा मळेकर, शंकर भुतुर्ले यांच्यासह महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकारी संस्थेतील पदांना न्याय देऊ न शकणारे जिल्हा परिषदेत जाऊन काय करणार : जयवंत सुतार

पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघात राष्ट्रवादी व शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे उमेदवार जिल्हा बँक, साखर कारखाना, तालुका संघ अशा सहकारी संस्थांत संचालक आहेत. मात्र या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य जनता किंवा सभासद हिताचा कोणताही कारभार केलेला नाही. अशी मंडळी जिल्हा परिषदेत जाऊन काय काम करणार आहेत? याउलट कोणतेही पद नसताना मी जिल्हा परिषद मतदार संघामध्ये ४० कोटी हून अधिक रकमेचा विकास निधी आणला आहे. त्यामुळे जनतेने कामाचा माणूस म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी करावे असे आवाहन पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयवंत सुतार यांनी केले. ते होनेवाडी येथे आयोजित भाजपच्या प्रचार दौऱ्यात बोलत होते.

यावेळी वाटंगी पंचायत समितीचे भाजपचे उमेदवार समीर पारदे उपस्थित होते.

सुतार पुढे म्हणाले, विरोधी उमेदवार साखर कारखान्यात संचालक असतानाही शेतकरी व कामगार वाऱ्यावर पडला आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून देण्याची माझी जबाबदारी राहील. प्रत्येक गावात चांगल्या पद्धतीचा विकास करायचा आहे. ही निवडणूक विकासासाठी असल्याने विकास करणाऱ्याच्या पाठीशी सर्वांनी राहावे असेही ते म्हणाले. यावेळी समीर पारदे, कृष्णा सुतार, बळवंत शिंत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संदीप देसाई, सचिन पाटील, प्रियांका आजगेकर, संगीता सुतार, रेश्मा पाटील, तानाजी पाटील, सुनील घेवडे, अरुण पाटील, रघुनाथ कातकर, तातूअण्णा बटकडली, स्वप्नील शेंडे, नारायण कातकर, ईश्वर आजगेकर, गणपत जाधव यांच्यासह महिला युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

सभेला किती डोकी होती…?
किती पत्रावळ्या संपल्या…?

प्रश्नांची उत्तरे ठरवत आहेत उमेदवारांचा विजय

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचार शिगेला पोहोचला असून अंतिम टप्प्यात जाहीर सभा, कोपरा सभा व जेवणावळींना ऊत आला आहे. सभेला किती डोकी होती ? जेवणाला किती पत्रावळ्या संपल्या यावरून आता उमेदवारांना कितपत पाठिंबा आहे व त्यांच्या विजयाची कितपत शक्यता आहे याचे अंदाज बांधले जात आहेत.

निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर प्रचार फेऱ्या, कोपरा सभा, जाहीर सभा, घर टू घर प्रचार असे विविध प्रकार सध्या अवलंबले आहेत.

कुणाच्या रॅलीत, प्रचार सभेत किती मतदार होते, किती लोक जेवले यावरून आता रिंगणातील उमेदवारांच्या विजयाची गणिते मांडली जात आहेत. उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघात तर सर्वच सभांना मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याने मतदारांची भूमिका ही संभ्रमावस्था निर्माण करणारी ठरत आहे. परंतु काही राजकीय जाणकार मंडळी प्रचार सभांवरून अंदाज व्यक्त करताना दिसत आहेत.

राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत आजरा हायस्कूलच्या हितेश राजबंशी याचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांचे वतीने आयोजित राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत आजरा हायस्कूलच्या हितेश राजबंशी याला अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले.

या स्पर्धेत आजरा हायस्कूलच्या वतीने सादर केलेल्या सर तुम्ही गुरुजी व्हा…या नाटकातील गुरुजी या पात्रासाठी कु. हितेश दीपक राजबंशी या विद्यार्थ्यास अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणत्र प्राप्त झाले. या बालनाट्याचे दिग्दर्शन सहाय्यक शिक्षक श्री.व्ही.ए.पोतदार यांनी केले होते तसेच श्री.टी.एम.पाटील, सौ.एम.एस. शेलार, सौ.व्ही.एच.अडकुरकर,श्री.आय.के. पाटील, कु. अभिषेक देशपांडे यांचे सहकार्य लाभले तर शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.एल.तोडकर, उपमुख्याध्यापिका सौ. एच.एस.कामत, पर्यवेक्षक श्री. ए.आर. व्हसकोटी यांचे प्रोत्साहन मिळाले.

६ व ७ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील काही शाळांना सुट्टी….

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवार ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मतदान केंद्रावर मतदान कर्तव्य बजावण्यासाठी मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळेतील अधिकारी/कर्मचारी यांचा समावेश आहे. मतदान कर्तव्याकरिता नियुक्त मतदान पथकांना शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून संबंधित तालुका स्तरावरून निवडणूक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. साहित्य घेऊन मतदान पथकांनी नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून पोहोचण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कार्यरत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे, त्या शाळांना शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तसेच ज्या शाळेतील (प्राथमिक व माध्यमिक) सर्व शिक्षकांची निवडणूक कामासाठी नियुक्ती झालेली नाही, त्या शाळा शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत भरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक मतदान होणाऱ्या क्षेत्रातील सर्व शाळांना शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा नगरपंचायतीला पाच वर्षे पूर्ण : विविध कार्यक्रमांचे आयोजन

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कै. केदारी रेडेकर यांचा आज स्मृतिदिन… विविध कार्यक्रमांचे आयोजन… निपाणी येथील अपघातात आजऱ्यातील तरुण जखमी… रामा शिंदे यांना मातृशोक… कुमार भवन प्रकरणावरून अधिकारी धारेवर

mrityunjay mahanews
error: Content is protected !!