

रामतीर्थ परिसराची साफसफाई…यात्रा होणार…?

रामतीर्थयात्रेच्या पार्श्वभूमीवर आजरा नगरपंचायतीकडून रामतीर्थ परिसराची साफसफाई करण्यात आली. कोरोनाच्या निर्बंधामुळे यात्रा भरण्याबाबत नगरपंचायत प्रशासनाने कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही अथवा परवानगीही दिलेली नाही. एकीकडे नगरपंचायतीने अशी भूमिका घेतली असताना दुसरीकडे स्थानिक भाविकांनी मात्र यात्रेस उत्साहाने उपस्थिती दर्शवणार असल्याचे जाहीर केले आहे. उद्यापासून दोन दिवस असणाऱ्या या यात्रेबाबत आजही व्यापारी वर्ग व भाविकांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. कोरोनाचे संकट टळल्यामुळे प्रशासनाने अधिकृत परवानगी द्यावी अशी मागणी भाविकांकडून होत आहे. याबाबत आज सायंकाळपर्यंत निर्णय अपेक्षित आहे.
व्हायरल मेसेजमुळे गोंधळ.
रामतीर्थयात्रा होणार… प्रशासनाची परवानगी… प्रशासनाचे अभिनंदन… अशा आशयाचे मेसेज सोशल मीडिया वरून गेले काही दिवस सुरू आहेत परंतु शासनाकडून अशी कोणतीही परवानगी दिली गेली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असल्याने यात्रेसंदर्भातील निश्चिततेबाबत गोंधळाचे वातावरण आहे.
आजऱ्यातील नाट्य महोत्सवात ‘स्टार’ ची बाजी

कै. रमेश टोपले स्मृती ७ वा राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव : २०२२ निकाल
प्रथम-‘स्टार'( जिराफ थिएटर्स, मुंबई),द्वितीय- ‘संगीत तुका म्हणे’ (वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान, कणकवली), तृतीय-‘बाकी शून्य’- (साई कला मंच, कुडाळ)
दिग्दर्शन. प्रथम-स्टार द्वितीय-संगीत तुका म्हणे,
तृतीय-बाकी शून्य स्त्री पात्र. प्रथम-नभा- अक्षता टोले (स्टार,जिराफ थिएटर्स, मुंबई),द्वितीय-जानकी- प्रियांका मुसळे (संगीत तुका म्हणे, वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान),तृतीय-सोनल – तृप्ती राऊळ (बाकी शून्य साई कला मंच, कुडाळ)
रजिया – रीतिका राजे (सुलतान रजिया परिवर्तन फांऊडेशन, कोल्हापूर)
पुरुष पात्र. प्रथम-तुकाराम – कुणाल आंगणे (संगीत तुका म्हणे – वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान, कणकवली),द्वितीय-स्टार- अनिल आव्हाड (जिराफ थिएटर्स, मुंबई),तृतीय- सुधाकर- केदार देसाई (बाकी शून्य – साई कला मंच, कुडाळ) भगत सिंह- सतीश तांदळे (गगन दमामा बाज्यो, काफिला थिएटर्स, कोल्हापूर)
परीक्षक : श्री. शंकर ऊर्फ भैय्या टोपले
डॉ. अशोक बाचूळकर, प्रा. नीलांबरी फडणीस, चंद्रशेखर फडणीस
गव्याच्या हल्ल्यातील जखमींची ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याकडून विचारपूस

सोहाळे परिसरात गव्याने हल्ला करुन जखमी केलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थीनी शर्वरी सुनील कोंडूसकर (रा. बाची) हिची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट घेवून विचारपूस केली. व शर्वरीसह तिच्या कुटुंबियांना धीर दिला.
शुक्रवार दि. २५ रोजी दुपारी कॉलेज सुटल्यानंतर घरी जाताना सोहाळे अंतर्गत रस्त्यावरील मारुती कळेकर यांच्या शेताजवळ महाविद्यालयीन विद्यार्थीनींवर गव्याने अचानक हल्ला केला. त्यामध्ये शर्वरी सुनील कोंडूसकर, सानिका मारुती कोंडूसकर व स्नेहल सतीश कोंडूसकर (रा. बाची) या तिघी जखमी झाल्या. शर्वरीच्या मानेला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने ती गडहिंग्लज येथील खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहे.
दरम्यान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथील खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत असलेल्या शर्वरीला भेटून विचारपूस केली. व शर्वरीसह तिच्या कुटुंबियांना धीर दिला. यावेळी शर्वरीची आई सौ. सविता, महादेव पाटील, वसंत कोंडूसकर, वनपाल बाळेश न्हावी, वनमजूर प्रवीण कांबळे यासह अन्य उपस्थित होते.
उचंगी’ पुनर्वसन संदर्भात पुनर्वसन मंत्र्यांची तातडीने बैठक घेणार:ना.सतेज पाटील

उचंगी प्रकल्पाच्याा घळभरणीचे काम पुनर्वसनाच्या पार्श्वभूमीवर बंद पाडण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिल्यानंतर तातडीने पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रकल्पग्रस्त व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांची माहिती घेतली. प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने तातडीने पुनर्वसन मंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले. बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली.
सात धरणग्रस्तांचे ६५%रक्कम भरून घेण्याबाबत प्रस्ताव व ८ खातेदारांचा देय जमिनीचा प्रस्ताव
हे दोन्ही प्रस्ताव पूणे आयुक्त यांचे कडे गेली वर्षभर पडून आहेत त्या बाबत खातरजमा करून तातडीने ते पाठवून देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.
पुनर्वसन कायद्यातील ‘कुटुंब’ या संकल्पनेची व्याख्या आणि शिल्लक राहणारी जमीन(निर्वाह क्षेत्र)या बाबतीत कृषी विभागाने दिलेला अहवाल आधिकारी का मान्य करीत नाहीत? असा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला.
या दोन महत्वाच्या मुद्या बाबत सविस्तर चर्चा होवून याबाबत सविस्तर स्पष्टीकरणं आवश्यक आहे असे मंत्री महोदयांनी स्पष्ट करून यासाठी तातडीने पुनर्वसन मंत्री यांचे सोबत बैठक घेवू असे सांगितले. बैठकीस महाराष्ट्र धरणग्रस्त परिषदेचे कॉ.अशोक जाधव,कॉ. संजय तर्डेकर यांचे सोबत चाफवडे,जेऊरचे संजय भडांगे,मारुती चव्हाण,निवृत्ती बापट,धनाजी दळवी,सुरेश पाटील,प्रकाश मनकेकर सह धरणग्रस्त उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या मतदार जागृती स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा- आजरा तहसीलदारांचे आवाहन- विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे

भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य ” या विषयांवर राष्ट्रीय स्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, गीत स्पर्धा, व्हिडीओ मेकिंग स्पर्धा, आणि भित्तिचित्र स्पर्धा आयोजित केल्या असून ही स्पर्धा खुली असून आजरा तालुक्यातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन आजरा तहसीलदार विकास अहिर, निवडणूक नायब तहसीलदार डि. डि. कोळी यांनी केले आहे. या पाच स्पर्धा संस्थात्मक श्रेणी, व्यावसायिक श्रेणी व हौशी श्रेणी अशा तीन श्रेणीत होणार आहेत, गीत,व्हिडीओ मेकिंग व भित्तिचित्र स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना एक लाखापासन दहा हजारापर्यंत तसेच विशेष उल्लेखनीय बक्षिसे देणेत येणार आहेत, घोषवाक्य स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना रुपये २०,०००,रुपये१०,००० रुपये ७,५०० व सहभागी ५० स्पर्धकांना प्रत्येकी रुपये २,००० विशेष उल्लेखनीय पुरस्कार देणेत येतील, तर प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना भारत निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू व तिसरी पातळी पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना इ-प्रमाणपत्र देणेत येणार आहेत.अधिक माहितीसाठी व
स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी https://ecisweep.nic.in/contest या संकेतस्थळावर भेट द्यावी व दिनांक१५ मार्च २०२२ पर्यंत voter-contest@eci.gov.in वर नाव नोंदणी करण्याचे आवाहन आजरा तहसिलदार विकास अहिर, व निवडणूक नायब तहसिलदार कोळी यांनी केले आहे.

देवर्डे विद्यामंदिरमध्ये मराठी भाषा गौरव दिन

कवी कुसुमाग्रज जयंतीनिमित्त विद्यामंदिर देवर्डे शाळेमध्ये *मराठी भाषा गौरव दिन* उत्साहात संपन्न झाला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन केले होते. बालसभेच्या अध्यक्षस्थानी स्नेहा कांबळे ही विद्यार्थिनी होती. सातवीच्या सर्वच विद्यार्थिनींनी पारंपरिक वेषभूषा केली होती. या विद्यार्थिनींनी ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ हे गीत सादर केले. नंदिनी पाटील या विद्यार्थिनीने ‘कणा’ या कवितेचे वाचन केले. या वेळी सुनील सुतार यांनी मनोगतामध्ये मराठी भाषेच्या थोरवीचे वर्णन करत मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व अधोरेखित करीत आपली मराठी भाषा समृद्ध होण्याच्या आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. गौरी बागडी, अथर्व पाटील, ईशान गुरव, योगिता आडाव, आर्या चाळके, अथर्व चाळके, शिवराज बागडी, शिवम पाटील, ज्योती खवरे, कार्तिक कांबळे, आर्यन गुरव या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. कार्तिक चाळके या विद्यार्थ्याने सूत्रसंचालन केले. सौरभ नाईक या विद्यार्थ्याने आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन संयोगिता सुतार यांनी केले. मुख्याध्यापक नामदेव माईनकर, सरोजिनी कुंभार, रेश्मा बोलके, वंदना चव्हाण, महादेव तेजम शिक्षक उपस्थित होते.
…….. छाया वृत्त….

पंडित दीनदयाळ विद्यालय येथे मराठी राज्यभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

मराठी राज्यभाषा दिनानिमित्त मनसेच्या वतीने ‘माझी सही माझा अभिमान’ हा उपक्रम राबविण्यात आला.

आजरा -आंबोली मार्गावर मसोली नजीक दोन चारचाकी गाड्यांची धडक होऊन गाड्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.




