


आगामी सर्व निवडणुकांमध्ये जिल्हा भाजपा अशोकअण्णांच्या पाठीशी : भाजपा जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे

आजरा नगरपंचायतीसह जिल्हा परिषद,पंचायत समिती व स्थानिक सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील भाजपा ही अशोकअण्णा चराटी यांच्या पाठीशी राहील व त्यांना सर्व ताकदीनिशी सहकार्य करेल असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केले. ते आजरा येथे अण्णाभाऊ सांस्कृतिक सभागृहात जयवंतराव शिंपी व अशोक अण्णा चराटी गटातर्फे आयोजित केलेल्या नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि. प.उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.
यावेळी बोलताना समरजीतसिंह घाटगे म्हणाले, यापुढे आपण आजरा,चंदगड व कागल तालुक्यात विशेष लक्ष घालणार असून सर्वांना सहकार्याची भूमिका राहील. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपा सरकारने दिलेले शब्द पाळलेले आहेत यामुळे भाजपाचे आकर्षण वाढू लागले आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना ही त्यातीलच एक योजना म्हणावी लागेल. अडीच वर्षात शेतकऱ्यांना एक रुपया दिला नाही अशी मंडळी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे पैसे कधी येणार?असा प्रश्न करीत आहेत परंतु टप्प्याटप्प्याने कर्जमुक्ती निधी लोकांना उपलब्ध करून दिला जात आहे. ८१ कोटी लोकांपर्यंत मोफत धान्य पुरवण्यामध्ये मोदी सरकार यशस्वी झाले आहे. यापुढे कार्यकर्त्यांनी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना यासाठी मोठ्या संख्येने प्रस्ताव करून सर्वसामान्यांना लाभ मिळवून द्यावेत. येत्या काळात अशोकअण्णा व जयवंतराव शिंपी यांच्यासोबत आपण निश्चितच राहू. उत्तुर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पाहता २०२६ च्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उत्तूर मध्ये निश्चितच कमळ फूलंणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अशोकअण्णा चराटी म्हणाले, ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये सर्वसामान्य जनतेने आपल्या उमेदवारांच्या बाजूने कौल दिला आहे. त्यांना मदत करण्यास कुठेही कमी पडणार नाही. तालुका संघाच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागले असून कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त ठराव स्वतःच्या बाजूने करावेत. ५० ठराव सध्या आपल्या बाजूने असल्याचे दावाही त्यांनी केला. ५०० रुपयाचे भाग भांडवल असणाऱ्यानाच मतदान करता येईल अशी अफवा देखील पसरवली जात आहे, परंतु शंभर रुपये भरून सभासद झालेल्यानाही मतदान करता येणार आहे हे कदापिही विसरू नये. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आजरा तालुक्याला आणण्यासाठी आपला प्रयत्न राहील यासाठी राजेंनी सहकार्य करावे. त्याचबरोबर आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यात जयवंतराव शिंपी यांनी निधी आणावा. कोणत्याही परिस्थितीत जयवंतराव शिंपी यांना येत्या निवडणूकीत जिल्हा परिषद सदस्य बनवणारच व शेवटी त्यांनी भाजपात यायचे की नाही हे निकालानंतरच ठरवावे असेही त्यांनी सांगितले . भविष्यात शिंपी भाजपात येथील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.३६ पैकी २५ ग्रामपंचायत मध्ये शिंपी-चराटी गटाच्या नेतृत्वाखाली सरपंच असून पाच ग्रामपंचायतीमध्ये सरपंच वगळता अन्य सदस्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना जयवंतराव शिंपी म्हणाले, चंदगडप्रमाणे आजरा तालुका अति पावसाचाव दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो.यामुळे तालुक्याच्या विकासाकरीता विशेष प्रयत्न करण्याची आपली भूमिका आहे.यापूर्वीही माणसांना ताकद देण्याचे काम आपण केले आहे v यापुढेही तालुका प्रगतीपदावर नेण्यासाठी आपण कदापिही कमी पडणार नाही असेही त्यांनी सांगितले.

यावेळी तालुक्यातील नूतन सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांचा व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अशोक अण्णा चराटी व समरजितसिह घाटगे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक विलास नाईक, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, रमेश कुरुणकर, आशिषकुमार देसाई, सौ.सुनीता रेडेकर,रमेश रेडेकर, नामदेवराव नार्वेकर, किरण कांबळे, अभिषेक शिंपी, अनिकेत चराटी, डॉ. दीपक सातोसकर,बाळ केसरकर,जनार्दन नेऊँगरे,संजय पाटील, आजरा कारखान्याचे माजी संचालक राजू जाधव, तानाजी देसाई, रेश्मा सोनेखान, सूमैय्या खेडेकर, सुनील शिंदे, एस. पी. कांबळे,शैला टोपले,राजू पोतनीस,शशिकांत सावंत,प्रकाश वाटवे, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, प्रकाश पाटील,शकुंतला सलामवाडे,जी.एम. पाटील,रमेश रेडेकर, आनंदा घंटे, मुकुंद तानवडे, प्रकाश वाटवे, विजयकुमार पाटील, रामचंद्र पाटील,मसनु सुतार, दशरथ अमृते, नारायण मुरकुटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक भाजपा तालुकाध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती
आजचा कार्यक्रम भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेटका झाला असला तरी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, माजी जिल्हा उपाध्यक्ष अरुण देसाई, नगरसेविका शुभदा जोशी,नगरसेवक आनंदा कुंभार, आजरा साखर कारखान्याचे संचालक मलिक बुरुड, आदींनी या कार्यक्रमास अनुपस्थित असल्याचे दिसत होते. याची कार्यक्रम स्थळी चर्चाही होती.





