

साखर उचल प्रकरणी फौजदारी गुन्हे नोंद करा… स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

आजरा:प्रतिनिधी
आजरा साखर कारखान्यातून तब्बल दोन मे. टन साखर बाहेर काढली गेली याबाबत अध्यक्षांनी केलेला खुलासा हास्यास्पद व तकलादू असून कारखान्याकडून काटामारी व रिकव्हरीतील तफावतीच्या माध्यमातील साखर परस्पर बाहेर काढण्याचा हा प्रयत्न असल्याचा आपला दावा असून हे प्रकरण गांभीर्याने घेऊन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पत्रकार बैठकीद्वारे करण्यात आली आहे.
कारखान्यातील बहुचर्चित साखर वाहतूक प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पत्रकार बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना कारखान्याचे माजी संचालक तानाजी देसाई म्हणाले साखरेला गेट पास नाही साखरेचे बिलिंग नाही यामुळे संशयाला वाव असून कारखान्यातून एक नट बोल्टही बाहेर जाण्याची शक्यता नसताना साखर बाहेर जातेच कशी हा प्रश्नही महत्त्वाचा आहे वास्तविक या प्रकरणी पोलिसात फौजदारी गुन्हा नोंद करून प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे असे देसाई यांनी स्पष्ट केले.
यावेळी नरेंद्र कुलकर्णी, संजय देसाई, धोंडीबा सावंत, श्रीपती गुरव यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.



पाण्याच्या नियोजनाची बैठक आजऱ्यात घ्या : शेतकऱ्यांची मागणी आजऱ्यात मोटरपंपधारकांचा मेळावा, फेडरेशनची स्थापना

आजरा: प्रतिनिधी
धरणातील पाण्याच्या नियोजनाबाबतची बैठक दरवर्षी नोव्हेंबर महीन्यात होते. जानेवारी उजाडला तरी अद्याप बैठक झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्या पर्यंतच्या पाण्याचे नियोजन कसे करणार. त्यामुळे ही बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर व आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत आजऱ्यात घ्या. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
येथील रवळनाथ मंदिराच्या सभागृहात मोटरपंपधारकांचा मेळावा झाला. या वेळी आजरा तालुका मोटरपंपधारक असोसिएशनची स्थापना करण्यात आली. माजी सभापती अल्बर्ट डिसोझा, आजरा सूतगिरणीचे उपाध्यक्ष डॉ.अनिल देशपांडे, विलास नाईक, संजय तर्डेकर, कॉ. संपत देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), आनंदा कुंभार (साळगाव), सुरेश दोरुगडे,हरीभाऊ कांबळे, जोतिबा चाळके, दशरथ घुरे प्रमुख उपस्थित होते.
कॉ. संपत देसाई यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला, पाण्याचे नियोजन करणे हा महत्वाचा मुद्दा आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना लागणारे पाणी व गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना द्यावे लागणारे पाणी याचे नियोजन करताना जमीनीचा पोत पाहणे आवश्यक आहे. दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे समन्यायी पध्दतीने पाण्याचे वाटप होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पाटबंधारे विभागाने नियोजन करावे. याबाबत तालुक्यात पाणी नियोजन बैठकीचे आयोजन करावे. जलसिंचन विभागाकडून शेतकऱ्यांच्या मोटर पंपाना जलमापक यंत्र बसवण्यासाठी आग्रही आहे. जितका पाणीवापर तितकी पाणी पट्टी आकारली जाणार आहे. जे शेतकरी यंत्र बसवणार नाहीत त्यांना पाणीपट्टीच्या दरात दहापट दंड आकारण्यात येणार आहे. एका बाजूला वीजेची वाढती बिले आणि दुसऱ्या बाजूला वाढती पाणीपट्टी अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. शेतकऱ्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
यावेळी पाणीपट्टी व वीज दर वाढीच्या पार्श्वभूमीवर फेडरेशनच्या माध्यमातून लढा उभारण्याचे ठरले.
यावेळी सचिन देसाई, प्रकाश मोरुसकर, मारुती चव्हाण, पांडुरंग सावंत, विनय सबनीस, आनंदा कुंभार, निवृत्ती कांबळे, रविंद्र देसाई, नामदेव देसाई, नितीन कुंभार, तानाजी गुरव, पांडुरंग पाटील, मसाजी पाटील, श्रावण लांडे, संजय देसाई, दत्तात्रय देसाई, नामदेव फगरे, सुरेश दोरुगडे, बाजीराव देसाई, एकनाथ पोवार यांच्यासह तालुक्यातील मोटरपंपधारक उपस्थित होते.
तर शेतकऱ्यांचे पाणी पळवून नेले जाईल….
यापुढे गडहिंग्लज व आजरा तालुक्यात पाण्यासाठी मोठा संघर्ष होणार आहे. धरणासाठी जमिनी आमच्या, पुनर्वसनासाठी जमिनी आमच्या आणि पाणी मात्र गडहिंग्लजला. पाणी नियोजनाच्या बैठकाही गडहिंग्लजला असे प्रकार कदापिही चालणार नाहीत. असे यावेळी सुनावण्यात आले. या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास शेतकऱ्यांचे पाणी पळवून नेण्याचा उद्योगही केला जाईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.



वाहन चालकांकडून अन्यायकारक दंड वसुली बंदसाठी मनसेचे आजरा तहसीलदार यांना निवेदन

आजरा : प्रतिनिधी
केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन दंड आकारणी विरोधात आजऱ्यात वाहन चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करत मनसे जनहित जिल्हाध्यक्ष परशुराम बामणे (भाऊजी) यांच्या नेतृत्वाखाली आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
सरकारने लागू केलेला अन्यायकारक वाहन चालकांच्या विरोधात असणारा नियम रद्द व्हावा अश्या मागणीचे निवेदन आजऱ्यातील वाहन चालकांनी मनसे जनहित तालुका अध्यक्ष रिक्सन डिसोझा, शहर अध्यक्ष प्रशांत गजरे,जिल्हा संघटक सौ.पूनम भादवणकर,तालुका संघटक सौ. वर्षा चव्हाण,उपसंघटक सौ.वर्षा पाटील,सौ.शोभा कांबळे,सौ.जानकी मडगावकर यांच्या उपस्थितीत तहसीलदार यांना देण्यात आले.



आजरा तहसील कार्यालयात ग्राहक दिन संपन्न

आजरा: प्रतिनिधी
आजरा तहसील कार्यालयात नुकताच ग्राहक दिन साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय आजरा, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्या वतीने सदरचा ग्राहक दिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार समीर माने होते. स्वागत तलाठी वंदना शिंदे यांनी केले.
यावेळी तहसीलदार माने म्हणाले, ग्राहक संरक्षण कायदा अभ्यासणे काळाची गरज असून अनेक फसव्या जाहिराती, ऑनलाइन खरेदी विक्री व्यवहार यामध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहक कायदा सायबर कायदा अभ्यासणे गरजेचे आहे. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे जिल्हा विभाग प्रमुख शिवाजी गुरव म्हणाले वास्तविक वीज मंडळ, एस्.टी महामंडळ, भूमी अभिलेख कार्यालय, बँक प्रतिनिधी या सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करणे गरजेचे होते सर्व विभागाची एक व्यापक बैठक बोलावून ग्राहक कायद्यावर चर्चा करावी व ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहकांच्या समस्या समजून घ्याव्यात अशी मागणी केली.
ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अरुण यादव यांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ या विषयावर मांडणी केली. यावेळी ग्राहक चळवळीचे देशपांडे , चंद्रकांत देसाई, ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष महादेव सुतार ,सुमन कांबळे यांच्यासह कार्यकर्ते व पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
आभार नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी मानले.



निधन वार्ता
सौ.कमळाबाई निकम

आवंडी वसाहत आजरा येथील सौ. कमळाबाई कृष्णा निकम(वय ७५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात
पती- कृष्णा निकम, ५ विवाहित मुले , २ मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
आक्रम ढालाईत

वृत्तपत्र विक्रेते आक्रम मन्सूर ढालाईत ( वय ५३ ) अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात दोन भाऊ, बहिण असा परिवार आहे.





