गुरुवार दि.६ फेब्रुवारी २०२५


जनरेटर साहित्याची चोरी प्रकरणी तिघांना अटक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गवसे ता.आजरा येथील हॉटेल अन्नपूर्णाच्या पाठीमागील बाजूस असलेले जनरेटरमधील अकरा हजार रुपये किमतीचा ऑइल फिल्टर व स्टार्टर चोरी करणाऱ्या तिघांना आजरा पोलिसांनी बुधवारी अटक केली. रविवारी रात्री ९.३० च्या दरम्यान चोरी झाली होती. याबाबतची फिर्याद रामचंद्र कदम (रा. हिरलगे, ता. गडहिंग्लज) यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सतीश गोपाळ नावलकर (३७, रा. साळगाव, ता. आजरा), धिरेंद्र विलास पाटील (३४, रा.आजरा.), जावेद सिलेमान भडगावकर (वय ३०, रा. जिजामाता कॉलनी, आजरा) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणात आणखी एकाचा समावेश असल्याचेही पोलीस तपासात पुढे आले आहे.

कानोली-सरंबळवाडी येथे आग… आंबा काजूची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कानोली – सरंबळवाडी सीमेवर असणाऱ्या खाजगी मालकीच्या जमिनीमध्ये लागलेल्या आगीत काजू, आंबा, जंगली झाडे यासह मेस काट्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
गट नंबर ५३१ या सरंबळवाडी नजीक असणाऱ्या क्षेत्रांमध्ये अचानक लागलेल्या या आगीमध्ये सुमन अण्णासो पाटील, वसंतराव रामचंद्र देसाई, सविता यशवंत पाटील, गणपती हरी पाटील, राजकुमार अनंत पाटील या शेतकऱ्यांच्या शेतातील काजू ,आंबा पिकासह इतर वृक्षांचे नुकसान झाले आहे, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे आजपासून काम बंद आंदोलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय विभागाचे शासकीय मान्यता प्राप्त कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर संस्था यांच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम, जलजीवन विभाग, ग्राम विकास विभाग यासह विविध विभागांमध्ये ठेकेदारांचे ८९ हजार कोटी रुपये अडकून पडले आहेत. यामुळे ही संपूर्ण यंत्रणा अडचणीत आली आहे. मोठ्या प्रमाणावर बिले थकल्याने अनेकांना कर्जबाजारी होऊन रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. कामासाठी लागणाऱ्या स्टील, सिमेंट, वाळू, जेसीबी यासह इतर साहित्यांची देणीही वाढली आहेत. या पार्श्वभूमीवर सदर आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर छेडण्यात आले असल्याचे संघटनेचे आजरा तालुका अध्यक्ष गोपाळ कुंभार यांनी सांगितले.

आज-यातील रिक्षा चालक आक्रमक…
जागेचा प्रश्न ऐरणीवर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील बस स्थानक परिसरात रिक्षा लावण्यास व्यवस्थापनाने प्रतिबंध केल्याने रिक्षा चालकांसमोर जागेचे मोठे संकट उभारले असून या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या रिक्षाचालकांनी अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वाखाली आजरा आगार कार्यालयावर रिक्षांसह जाऊन बस स्थानक आवारात जागा मिळावी यासाठी आगार व्यवस्थापकांशी चर्चा केली.
बस स्थानक आवारात रिक्षा लावण्यास एस.टी. प्रशासनाचा विरोध तर बस स्थानकाबाहेर रिक्षा लावण्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाचा अडसर अशा विचित्र परिस्थिती रिक्षा चालकांची झाली आहे हातावरचे पोट असणाऱ्या रिक्षाचालकांची अडचण लक्षात घेऊन आगार प्रमुखांनी वरिष्ठ पातळीवर निर्णय होत नाही तोपर्यंत बस स्थानक आवारातच रिक्षा लावण्यास परवानगी द्यावी अशी मागणी अन्याय निवारण समितीचे प्रमुख परशराम बामणे यांनी लावून धरली. यावेळी आगार प्रमुख व बामणे यांच्या जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
अखेर जिल्हा नियंत्रकांशी रिक्षा चालकांची बैठक घडवून यावर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत रिक्षा बस स्थानक आवारात लावण्याचे ठरले.
यावेळी झालेल्या चर्चेत परशुराम बामणे, विजय थोरवत, ज्योतिप्रसाद सावंत, बंडोपंत चव्हाण, नाथा देसाई, जोतिबा आजगेकर, राजेंद्र चंदनवाले, दिनकर जाधव, पुंडलिक कोले आदींनी भाग घेतला.जागा मागणीचे निवेदन आगार प्रमुखांना देण्यात आले.
यावेळी रिक्षाचालक रिक्षांसह मोठ्या संख्येने आजरा आगारात उपस्थित होते.

जि.प. शाळेत सीसीटीव्ही…
कोल्हापूर जिल्हा नंबर वन

कोल्हापूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्राथमिक शिक्षण विभागासाठी उल्लेखनिय काम करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) च्या वतीने जिल्ह्यातील सर्व सरपंच महोदय, जिल्ह्यातील सर्व ग्राम विकास अधिकारी व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांचा संयुक्तिक सत्कार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांचे हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाला. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या निधीचा सुयोग्य वापर करून ७८३२ पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे शाळेत बसविणेत आले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये १००% सीसीटीव्हु कॅमेरे बसविणारी महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची जिल्हा परिषद ठरली आहे.
शाळेचा सुट्टींचा कालावधी (शनिवार / रविवार) किंवा रात्रीच्या वेळी शाळाबाह्य विद्यार्थी किंवा अन्य नागरिक यांनी शाळेचा परिसर हा सिगारेट/ विड्या ओढणे व दारु पिणे इत्यादी व्यसने करण्यासाठीचा अड्डाच करून ठेवलेला असतो . त्यामुळे अशा गैरकृत्यांना आळा बसावा या उद्देशाने त्याचबरोबर शाळेमध्ये असणारे निवडणूक केंद्राचे कामकाज पारदर्शीपणे व्हावे यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा खात्रीशीर उपयोग होईल या उद्देशाने, त्याचबरोबर विदयार्थ्यांची सुरक्षितता हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेऊन जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे ग्रामपंचायतीमार्फत बसविणेत आले आहेत.
पालकमंत्री नाम. प्रकाशराव आबिटकर यांनी संघटनेतील जिल्हाध्यक्ष जी.एम. पाटील यांच्यासह सर्वांचे मन:पुर्वक अभिनंदन केले व या उल्लेखनिय कामगिरी बद्दल गौरवोद्गार काढले . यावेळी आमदार अशोकराव माने , जिल्हाधिकारी .अमोल येडगे , मुख्य कार्यकारी अधिकारी कर्तिकेयन एस., शिक्षणाधिकारी सौ. मीना शेंडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम) अरुण जाधव यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानपत्र, व पुष्पगुच्छ देऊन सम्मानित करण्यात आले.

आजरा आगारात प्रवासी दिन साजरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा आगारामध्ये दरवर्षीप्रमाणे रथसप्तमी दिवशी प्रवासी दिन साजरा करण्यात आला. आगार व्यवस्थापक प्रविण पाटील अध्यक्षस्थानी होते.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष रामदास चव्हाण, सदस्य सचिन इंदुलकर यावेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ प्रवाशांना तिळगुळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार झाला. आगार व्यवस्थापक श्री. पाटील यांनी एस.टी.च्यावतीने राबविण्यात येणा-या सोईसुविधा व सवलतीची माहीती दिली.सुतार यानी प्रवाशांच्या अडचणी मांडल्या. यावेळी वहातूक निरीक्षक अशोक मातले, सहाय्यक निरीक्षक श्री. गवळी, श्री. होडगे, प्रवाशी, एसटीचे अधिकारी उपस्थित होते.
वरिष्ठ लिपीक वासुदेव जोशी यांनी सुत्रसंचालन व आभार मानले.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९


निधन वार्ता
खलिल मुराद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गांधीनगर,आजरा येथील रिक्षा चालक खलिल इस्माईल मुराद (वय ४० वर्षे) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई असा परिवार आहे.
श्रीमती अनुसया देसाई

कानोली (ता. आजरा ) येथील श्रीमती अनुसया आबासो देसाई (वय ८६ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, विवाहित मुलगी सुना, नातवंडे असा परिवार आहे, येथील सूर्यकांत देसाई यांच्या त्या मातोश्री होत. रक्षा विसर्जन शुक्रवार दि. ७ रोजी आहे.


