

तरीही आपण आमदार प्रकाश आबिटकर यांच्या सोबतच…अशोक चराटी
अण्णाभाऊ संस्था समूह पदाधिकाऱ्यांची बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आमदार प्रकाश आबिटकर हे विकास कामांमध्ये निश्चितच आघाडीवर आहेत. तालुक्यातील आपल्या गटाचे कार्यकर्ते म्हणजेच आमदार प्रकाश आबिटकर यांचे कार्यकर्ते आहेत. माजी आमदार के. पी पाटील यांना बाजूला ठेवून आम.आबिटकर यांच्या पाठीशी आपण नेहमीच राहीलो आहोत. असे असतानाही आमदार प्रकाश आबिटकर हे काही मंडळींना परस्पर ताकद देण्याचे काम करीत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. कार्यकर्ते ती बोलून दाखवताना दिसतात. असे असले तरीही आपण आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठीशी राहणार आहोत. असे प्रतिपादन अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी केले. अण्णाभाऊ संस्था समूहाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
अशोकअण्णा पुढे म्हणाले,आजरा तालुक्यामध्ये विकास कामांचा शुभारंभ,इतर बैठका घेताना किमान कल्पना तरी देणे गरजेचे आहे. असे होत नसल्यानेही कार्यकर्त्यांची नाराजी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी हि नाराजी बाजूला ठेवावी. सर्वजण आमदार आबिटकर यांच्या पाठीशी राहूया असे आवाहनही केले.
प्रास्ताविकपर भाषणामध्ये विजयकुमार पाटील यांनी बैठक बोलावण्यामागचा हेतू स्पष्ट केला. विलास नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
अशोकअण्णा हे कामामध्ये व्यस्त असल्याने वेळेत उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळा ग्रामीण भागातील सरपंच, कार्यकर्ते हे आमदार प्रकाश आबिटकर यांच्याशी त्यांनी नेमलेल्या जिल्हा परिषद मतदार संघ संपर्क प्रतिनिधीच्या माध्यमातून थेट संपर्क साधताना दिसतात. यामुळे कामेही झटकन मार्गी लागतात असे कार्यकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एकीकडे कांही विरोधक मंडळी थेट गावागावात कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून आपला गट वाढवण्यामध्ये प्रयत्नशील असताना अण्णाभाऊ गटातील प्रमुख मंडळी कार्यकर्त्यांशी संपर्कात कमी पडत असल्यामुळे कार्यकर्त्यांची अडचणीच्या वेळी गोची होताना दिसते असे मतही कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
यावेळी रणजीत सरदेसाई, पांडुरंग लोंढे, गोविंद गुरव, अनिकेत चराटी आदींनीही आपली मते मांडली.
बैठकीस डॉ. अनिल देशपांडे, अतिशकुमार देसाई, जनार्दन टोपले, दशरथ अमृते, मारुती मोरे, ॲड. सचिन इंजल, शकुंतला सलामवाडे , अनिरुद्ध केसरकर, दत्तात्रय पाटील, मनीषा गुरव, ज्योत्स्ना चराटी, अस्मिता जाधव यांच्यासह अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख पदाधिकारी व विविध गावचे सरपंच उपस्थित होते.

भादवण हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण हायस्कूल भादवण मध्ये एसएससी मार्च २०२४ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा महाल शिक्षण मंडळाचे चेअरमन श्री जयवंतराव शिंपी होते.
मुख्याध्यापक संजयकुमार पाटील यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेऊन प्रास्ताविक केले. स्वागत गीत शाळेच्या सांस्कृतिक विभागाने सादर केले. यावेळी इयत्ता दहावी मध्ये रुणाली बाळू पाटील (प्रथम क्रमांक ) आर्यन सुधीर जाधव (द्वितीय) शुभम हरि दोरुगडे (तृतीय) श्रेयश दत्तात्रय खोराटे( चतुर्थ ) पृथ्वीराज कृष्णा देसाई ( पाचवा) तसेच होतकरू विद्यार्थी यश सुतार, आर्यन गोडसे, तन्वी पाटील, पुनम कुंभार, या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
कै. मनाली उत्तम रेडेकर यांचे स्मरणार्थ होतकरू विद्यार्थिनींना अर्थसहाय्य करण्यात आले. श्री. व्ही. एस. कोळी बक्षीस वाचन केले. मार्गदर्शक शिक्षक एस. टी. पाटील , डी. आर. पाटील , व्ही ए वडवळेकर , बी पी कांबळे , एस. एस. नाईक , आर. पी. होरटे यांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
माजी प्राचार्य व संचालक सुनील देसाई व माजी शिक्षणाधिकारी आनंदा जोशीलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी संचालक श्री सचिन शिंपी, पांडुरंग जाधव, माजी मुख्याध्यापक टी. ए. पाटील , प्राचार्य आर. जी. कुंभार , माजी सरपंच दत्तात्रय शिवगंड, एम. एम. येल्गार, पी.एम. वडर, मारुती गोडसे, नामदेव कांबळे, संतोष पोवार उपस्थित होते. को. जि. मा. शि. संस्था शाखा गड हिंग्लज सदस्यपदी निवड झाल्याबद्दल एम. एम. देसाई यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्री.होरटे यांनी केले. आभार एम. एम. देसाई यांनी मानले.

आजरा महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालय आजरा येथे ज्युनिअर कला व वाणिज्य विभागाचा पालक मेळावा संपन्न झाला. पालक मेळाव्यासाठी पालकांनी मोठ्या संख्येने आपल्या सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे होते.
या मेळाव्याचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. विनायक चव्हाण यांनी केले . या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य डी.पी. संकपाळ व अधीक्षक योगेश पाटील होते. शिक्षकांच्या मनोगतातून प्रा. विठ्ठल हाके, प्रा. रत्नदीप पवार, प्रा. रूपाली फोंडेकर यांनी पालकांशी संवाद साधला. पालकांच्या मनोगतामध्ये सौ. पाटील, सौ.चोडणकर, श्री. खरुडे यांनी आपली मते सांगितली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे यांनी आपल्या मनोगतात ‘समाजातील दरी कमी करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षणाने सुसंस्कृत समाज घडतो. उत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याची महाविद्यालयाची उज्वल परंपरा आहे आपण विद्यार्थी घडवण्यासाठी, उद्याचा जबाबदार नागरिक बनवण्यासाठी प्रयत्न करूया.’ असे सांगितले
मेळाव्यास प्रा. सुवर्णा धामणेकर, स्वाती माने, प्रा. वैशाली देसाई, प्रा .संजीवनी कांबळे, प्रा.अनिल निर्मळे , प्रा. मलिकार्जुन शिंत्रे, उपस्थित होते आभार प्रा. पूनम लीचम यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली देसाई यांनी केले.

निधन वार्ता
रामचंद्रआपगे

कानोली ता. आजरा येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी रामचंद्र तुकाराम आपगे (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
निमसोड (ता. खटाव )येथील पंचदीप इंडस्ट्रिज चे अमरदीप आपगे यांचे वडील होत, रक्षाविसर्जन मंगळवार दि. ६ रोजी आहे.
शामराव देसाई

सुलगाव ता. आजरा येथील शामराव यशवंत देसाई (वय ७५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, पत्नी, सून, जावई,नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन मंगळवार दिनांक ६ रोजी सकाळी आहे.

पाऊस पाणी
आजरा शहर व परिसरात २८ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून रविवार सायंकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे.




