mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

शनिवार  दि.१८ आक्टोंबर २०२५

ज्याचा नगराध्यक्ष त्याच पक्षाची सत्ता…
आजरा नगरपंचायत निवडणुक

आजरा : ज्योतिप्रसाद सावंत

ज्यांचा नगराध्यक्ष त्याच पक्षाची नगरपंचायतीवर सत्ता असे साधे समीकरण राज्य पातळीवर असल्याने आपापल्या पक्षाचे झेंडे नगरपंचायतीवर फडकवण्यासाठी कार्यकर्ते मंडळी कामाला लागली आहेत. स्थानिक आघाड्यांमध्ये मात्र हाच मुद्दा कळीचा ठरू लागला आहे.

आजरा नगरपंचायत कार्यक्षेत्राशी संबंधित पालकमंत्री प्रकाश आबीटकर हे शिवसेना शिंदे गटाचे असून सध्या त्यांच्याकडे राज्याच्या आरोग्य मंत्री पदाच्या धुरेसह पालकमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. मंत्री आबीटकर यांच्यावर शिंदे सेनेचे लेबल असले तरीही भाजपासह अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वेळोवेळी मदत केली आहे. त्यामुळे तालुक्यात इतर पक्षांच्या तुलनेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्राबल्य कमी असले तरी राज्याच्या सत्तेत याच भागातील प्रतिनिधीला आरोग्य मंत्री पदाची संधी मिळाली आहे हे विसरून चालणार नाही. नगरपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व ठेवण्यासाठी मंत्री आबिटकर यांचे प्रयत्न रहाणार आहेत.

तालुक्यात संस्थात्मक राजकारणामध्ये गट तट असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे वरचढ आहे. अडचणीच्या वेळी राष्ट्रवादीचे दोन्हीही गट एकत्र येऊ शकतात हे आजरा साखर कारखान्याच्या निवडणूकीत स्पष्ट झाले आहे. मंत्री मुश्रीफ यांचा या गटावर अंकुश आहे. राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्री मुश्रीफ यांचीही भूमिका काय रहाणार ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

सध्या नगराध्यक्षपदाचे दावेदार म्हणून अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी, माजी पंचायत समिती सदस्य अबुताहेर तकीलदार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार, माजी उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे, आजरा साखर कारखान्याचे संचालक रशीद पठाण, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, अन्याय निवारण समितीचे परशुराम बामणे,मंजूर मुजावर यांची नावे आघाडीवर आहेत.

सर्वच पक्ष आपापल्या पक्षांचे झेंडे नगरपंचायतीवर फडकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु कोणत्याही पक्षाला स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणे सध्यातरी शक्य नाही. यामुळे पक्षीय तडजोडी होण्याची शक्यता आहे. तडजोडीमध्ये दोन-चार जागा कमी मिळाल्या तरी चालतील परंतु नगराध्यक्षपदावरचा दावा कायम ठेवायचा असा होराही अनेकांचा आहे. राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाची मंडळींची जबाबदारीही वाढली आहे. तर जिल्ह्याचा खासदार काँग्रेसचा असल्याने माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही जोर लावला आहे.

अद्याप आघाड्यांबाबत संभ्रमावस्था आहे. कोण कुठे जाणार याचेही चित्र स्पष्ट नाही. असे असले तरीही नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांनी मात्र सर्वच प्रभागामध्ये आपापल्या परीने शक्य ती सर्व ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद हा होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीत कळीचा मुद्दा होऊ शकतो.

हरकतींचा पाऊस ‌…

प्रशासनाच्या गलथानपणामुळे व इच्छुकांनी केलेल्या जोरदार मोर्चेबांधणी मुळे अनेक ठिकाणी मतदारांची संख्या कमी जास्त झाली आहे याचा फटका ज्यांना बसू शकतो अशा संभाव्य उमेदवारांनी मतदार यादीवर हरकती घेतल्या आहेत. सुमारे २२०० घ्या वर हरकती दाखल झाल्याने हे मतदार नेमके कुठून व कसे आले हा संशोधनाचा विषय आहे.

निवडणूक कार्यक्रमाबाबत संभ्रमावस्था

नगरपंचायत निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नगरपंचायतीकरिता इच्छुक असणाऱ्या मंडळींना ‘वेटिंग’ वर रहावे लागणार आहे.

खोटे पुरावे जोडून मतदार यादीत नावे…
संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करा : सुनील शिंदे यांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही मंडळींनी हेतू पुरस्सर खोटे पुरावे जोडून वेगवेगळ्या प्रभागात बाहेरगावचे व इतर प्रभागातील मतदार नोंदणी केले आहेत. याबाबत शेकडो हरकती नगरपंचायतीकडे दाखल झाल्या आहेत. जे स्थानिक मूळ रहिवासी आहेत त्यांची नावे गायब व जे बाहेर गावचे व इतर प्रभागातील आहेत त्यांचा बोगस पुरावा जोडून मतदार यादीत नावे घुसडण्यात आली आहेत.हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणारा आहे. या तक्रारींच्या बाबत चौकशी करता ज्यावेळी अधिकारी येणार आहेत त्यावेळी तक्रारदार, नोंदणी झालेला मतदार, संबंधित घर मालक व साक्षीदार यांच्यासमोर खरी माहिती घ्यावी. या सर्व प्रकारामुळे प्रभाग निहाय मतदारांमध्ये मोठा फरक आहे. एखाद्या प्रभागात प्रचंड मतदान तर एखाद्या प्रभागात मतदारांची संख्या अत्यंत कमी असा प्रकार असून हा प्रभागामधील इच्छुकांवर अन्याय आहे. मुख्याधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पहावे असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

राजकारणाचा स्तर घसरला…

अनेक मंडळींनी नगरपंचायत ताब्यात घेण्याच्या उद्देशाने मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ घातला आहे. वोट चोरीचे प्रस्थ आता नगरपंचायतीमध्येही आले आहे. अशा बोगसगिरी करणाऱ्या मंडळींकडून विकासाची काय अपेक्षा करणार ? असा सवाल ही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

वानरांची मोटरसायकलला धडक…
तिघे जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

किटवडे येथून आजऱ्याच्या दिशेने आठवडा बाजाराकरीता दुचाकीवरून येणाऱ्या सावंत कुटुंबीयांच्या दुचाकीला वानराच्या कळपाने जोरदार धडक दिली. यामध्ये रवींद्र विष्णू सावंत (वय ३६ वर्षे) दीपा रवींद्र सावंत (वय २९ वर्षे) व नैतिक रवींद्र सावंत (वय २ वर्षे) असे तिघे जखमी झाले आहेत.

काल शुक्रवारी सकाळी सावंत दाम्पत्य आजऱ्याच्या दिशेने येत असताना वाटेत रस्ता ओलांडणाऱ्या वानरांच्या कळपाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकी घसरून ते तिघेही बाजूला फेकले गेले व जखमी झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

आजरा हायस्कूलच्या वेदिका पोतदारचा जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत गौरव

 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा हायस्कूलमधील विद्यार्थिनी कु. वेदिका विजय पोतदार हिने शाही दसरा महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक मिळवले.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी वेदिकाला पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. वेदिकाच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक ए.एल.तोडकर , उपमुख्याध्यापक एच.एस.कामत , पर्यवेक्षक ए.आर.व्हसकोटी तसेच जनता शिक्षण संस्था परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले.

यासाठी मार्गदर्शक व पालक श्री.पोतदार यांचे परिश्रम आणि प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले.

‘चतुरंग’ जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा पार्वती शंकर विद्यालयात संपन्न.

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

श्री पार्वती-शंकर शैक्षणिक संस्था व शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल ट्रस्टतर्फे आयोजित ‘चतुरंग’ जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडल्या. १४ व १७ वर्षाखालील गटात एकूण ८२ स्पर्धकांनी सहभाग घेत १२० सामने खेळले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विश्वनाथ करंबळी, शैलेश होनकट्टी, डॉ. दिनकर घेवडे व कृष्णात पाटील उपस्थित होते.

पारितोषिक वितरणावेळी प्रमुख पाहुणे बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक श्री. विनायक लठ्ठे यांनी ‘हरलात तरी हसतखेळत सातत्य ठेवा’ असा संदेश दिला. १४ वर्षाखालील गटात प्रेम निचळ (प्रथम), अर्णव पोर्लेकर (द्वितीय), वरद बाबर (तृतीय) तर १७ वर्षाखालील गटात रुद्र माळवदे (प्रथम), स्वरूप साळवे (द्वितीय) व प्रणित आमीनभावी (तृतीय) यांनी यश संपादन केले.

विजेत्यांना रोख पारितोषिक, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

वसुबारस…
मलिग्रे येथे महिलांनी केले गोमातेचे औक्षण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मलिग्रे येथील श्री भावेश्वरी सह. दुध संस्थेच्या वतीने वसुबारस निमित्ताने दुध ऊत्पादक सभासदांनी संस्थेच्या समोर महिलानी गायीचे औक्षण करून पुजन केले. या वेळी महिलांची ओटी भरण्याचा व सभासदाना फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. याचे नियोजन संस्थेचे मार्गदर्शक कारखाना संचालक अशोक तर्डेकर, संस्था चेअरमन विश्वास बुगडे, माझी सरपंच दत्ता परीट, संदीप कागिनकर यानी केले.

यावेळी उपस्थित बाबू सावंत, शिवाजी कागिनकर, बाळू सावंत, चंद्रकांत कांबळे, हिराबाई ईक्के, सुशीला सावंत, शांताबाई तर्डेकर याच्यासह महिला व सभासद उपस्थित होते आभार सचिव बाळू कांबळे यानी मानले.

पारेवाडीतील गणेश महिला दुध संस्थेमार्फत उत्पादकांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूचे वाटप


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पारेवाडी (ता. आजरा) येथील गणेश महिला दुध संस्थेच्यावतीने दूध उत्पादकांना दिवाळीनिमित्त बोनस म्हणून भेटवस्तू व रोख रक्कम देण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अनिल नार्वेकर होते.
स्वागत चेअरमन सौ. उज्वला अनिल नार्वेकर यांनी केले.

यावेळी चेअरमन उज्वला नार्वेकर, व्हा. चेअरमन अर्चना निर्मळे, संचालक सुरेखा निर्मळे, रेखा निर्मळे, चैत्राली घेवडे, मालुतााई निकम, सोनाबाई रेडेकर यासह वर्षा निकम व उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आभार सचिव अनिल निकम यांनी मानले.

 

संबंधित पोस्ट

डॉ. सोमशेट्टी यांचे निधन

mrityunjay mahanews

आज-यात दोन घरांना आग.. साडेपाच लाखांचे नुकसान 

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!