

शासकीय योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वावलंबी बनावे : आमदार प्रकाश आबिटकर
आजरा येथे रोजगार मेळावा उत्साहात

आजरा येथे रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, युवकांना रोजगार उभारण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा केवळ अनुदान मिळवण्यासाठी वापर न होता स्वतः स्वावलंबी बनण्याकरता चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो. बँकांसह इतर शासकीय कार्यालयातून आवश्यक ती मदत करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. युवकांनी याचा उस्फूर्तपणे फायदा घ्यावा व स्वतःचे भवितव्य सुखमय करावे असे आवाहन केले.
जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक सतीश शेळके यांच्यासह बँकांचे अधिकारी व रोजगाराशी संबंधित विविध अधिकाऱ्यानी मार्गदर्शन केले.

यावेळी आजरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा सौ. संजीवनी सावंत,तहसीलदार विकास अहिर, सतीश माने, शिवसेना तालुका प्रमुख राजू सावंत, युवराज पोवार, सचिन पवार, संजय येसादे, प्रकाश कोंडुस्कर, महादेव पोवार, विजय थोरवत, भास्कर निकम,कॉ. शांताराम पाटील,दत्ता पाटील,निशांत जोशी,जयसिंग खोराटे यांच्यासह मान्यवर व नवउद्योजक उपस्थित होते.
वेळवट्टी येथे हत्तींचा धुमाकूळ…
मेसकाठ्यांसह झाडांचे मोठे नुकसान...

आजरा तालुक्यातील , वेळवट्टी, हाळोली भागामध्ये हत्तीकडून पिकांच्या नुकसानीचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी रात्री अंकुश मांगले, सदानंद मांगले, डॉ. धनाजी राणे यांच्यासह या भागातील शेतकऱ्यांच्या मेसकाट्या व अन्य वृक्षांचे मोठे नुकसान केले आहे. खरीपाच्या तयारीत असणारा शेतकरी वर्ग हत्तीच्या या नुकसानसत्रामुळे धास्तावला आहे.
ना वीजा… ना ढगांचा गडगडाट आज-यात पावसाची हजेरी
विजांचा कडकडाट नाही अथवा ढगांचा गडगडाट नाही अशा परिस्थितीत आज-यात पाऊस होत असल्याने पावसाला सुरुवात झाली का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. गेले दोन दिवस आजरा तालुक्यातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे.तापमानातही कमालीची घट झाली आहे. पावसाची रिमझिम सुरू झाल्याने मृगनक्षत्र सदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. गतवर्षी अशाच पद्धतीने वातावरण होऊन १३ मे ते १५ मे दरम्यान जोरदार पाऊस झाला होता. या पावसाचा परिणाम म्हणून चक्क रामतीर्थ धबधबा प्रथमच मे महिन्याच्या १५ तारखेला पूर्ण क्षमतेने कोसळू लागला होता. गेल्या दोन दिवसात आंबोली परिसरातही पाऊस सुरू आहे.
आजरा बँकेच्या ना.म.जोशी मार्ग मुंबई येथील नुतनीकरण केलेल्या शाखा कार्यालयाचा उदघाटन कार्यक्रम उत्साहात

दि आजरा अर्बन को-ऑप. बँकेच्या नुतनीकरण केलेल्या ना.म.जोशी मार्ग मुंबई या शाखेच्या कार्यालयाचे उदघाटन आमदार श्री. प्रकाश आबिटकर याचे हस्ते करणेत आले. सदरच्या कार्यक्रमास आ. अजय चौधरी, विठ्ठल भोसलेसो- उपाध्यक्ष, विष्णू घुमरे, संचालक, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. उपस्थित होते.
सदरच्या कार्यक्रमावेळी आ. प्रकाश आबिटकर यांनी आजरा बँक ही आपल्या भागातील असून बँकेची प्रगती प्रशंसनीय असल्याचे आपल्या भाषणात गौरवोद्गगार काढले. तसेच मा. श्री. अजय चौधरीसो यांनी आपल्या भाषणात मुंबईतील गिरणगाव परिसरात गिरणी कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी आजरा बँक त्यांच्या मदतीकरिता कार्यरत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या बँकेचा सार्थ अभिमान असल्याचे संगितले. बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत करून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख श्री.अशोकअण्णा चराटी यांनी माहिती देताना बँकेमार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती दिली. तसेच प्रस्तावना व सूत्र संचलन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गंभीर यांनी केले. याप्रसंगी बँकेचे व्हा.चेअरमन श्री. किशोर भुसारी, यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

अज्ञाताने लावलेल्या आगीत शासकीय बागेचे मोठे नुकसान
आजरा आंबोली मार्गावरील पारेवाडी व आजरा शहराच्या हद्दीत असणार्या शासकीय बागेला अज्ञाताने आग लावल्याने बागेतील औषधी वनस्पती, दुर्मिळ वनस्पती आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मोठे नुकसान झाले आहे.अनेक मौल्यवान वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने निसर्गप्रेमीतून हळहळ व्यक्त होत आहे.कृषी विभागाच्या पर्यवेक्षकांनी वर्दी आजरा पोलीस ठाण्यात दिली आहे.

आजरा कारखान्याला ‘स्वाभिमानी’च्या राजू शेट्टी यांची सदिच्छा भेट

. आजरा कारखान्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेटटी तसेच राज्य सचिव राजेंद्र गड्डेनवार यांनी भेट देवून कारखाना कामकाजाची माहिती घेतली. या प्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.टी. ए. भोसले यांनी स्वागत करून कारखान्याने या हंगामात उशिरा सुरूवात करून कमी तोडणी वाहतुक यंत्रणा असतांना देखील 350074 मे. टनाचे गाळप करून 434000 क्वि. साखर उत्पादन केली. साखर उतारा 12.42 टक्के इतका मिळाला असून, कारखान्याकडे आलेल्या संपुर्ण ऊसाची बिले एफ.आर.पी. रू.2812/- बसत असतांना देखील रू. 2900/- प्रमाणे वेळेत आदा केली आहेत. तसेच तोडणी वाहतुकीची बिले देखील कंत्राटदारांना वेळेत आदा केली आहेत. कामगारांनी कारखाना सुरू करणेसाठी 50 टक्के पगारावर काम करण्याची तयारी दाखविलेमुळे हा कारखाना सुरू होणेस मोठी मदत झाली आहे. त्यामुळे कामगार पगार देखील वेळेत आदा केले जात आहेत असे सांगितले.
स्वाभिमानीचे राज्य सचिव श्री. राजेंद्र गड्डेनावर यांनी बंद असलेला हा कारखाना सुरू करून आजरा कारखान्यांने आदर्श निर्माण केलेला आहे. त्यामध्ये कामगारांनी पगार कपातीचे धोरण अवलंबून त्यामुळे हा कारखाना पुन्हा सुरू होणेंस मदत झालेली आहे. बरेच कारखाने आर्थिक अडचणीत येत असतांना आपला हा कारखाना पुर्व पदावर येत आहे. त्यामुळे संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील उचंगी व सर्फनाला इ. प्रकल्प पुर्ण झालेस कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढील काळात आजरा कारखाना ऊसाच्या बाबतीत स्वयंपुर्ण होणार आहे असे मत व्यक्त केले.
राजू शेट्टी यांनी आपल्या मनोगतात आजरा कारखाना हा बंद असतांना सुरू करणेसाठी आपण देखील प्रयत्न केले असून, कोल्हापूर जिल्हा मध्य सह. बँकेच्या माध्यमातून निधी उभा करणेसाठी आपण पाठपुरावा केला असलेचे सांगितले. . त्याचप्रमाणे कारखाना आर्थिक अडचणीत देखील सुरू ठेवून शेतक-यांना वेळत बिले आदा केलेबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
कारखान्याचे चेअरमन सुनिल शिंत्रे यांनी पुढील काळात कारखाना कर्जमुक्त करणेचा आपला प्रयत्न आहे आणि यासाठी आपले सतत सहकार्य मिळावे अशी विनंती या प्रसंगी केली व कारखान्यास सदिच्छा भेट दिलेबद्दल आभार मानले. याप्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. आनंदराव कुलकर्णी, संचालक मुकुंदराव देसाई, एम. के. देसाई, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, संचालक, तानाजी देसाई , सेक्रेटरी व्ही.के. ज्योती, चिफ अकौटंट पी. आर. चव्हाण, मुख्य शेती अधिकारी श्री. एस. एन. व्हरकट तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. .

देऊळवाडी विकास सेवा संस्थेत सत्तांतर
आजरा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या देऊळवाडी येथील रवळनाथ विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी रवळनाथ शेतकरी विकास आघाडीचा धुव्वा उडवत विरोधी रवळनाथ आघाडीने सत्ता काबीज केली. सत्ताधारी आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले. . संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू पोतनीस, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी विरोधी आघाडीचे नेतृत्व केले. विजयानंतर उमेदवार तसेच समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला.
सहा वर्षापूर्वी संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत संस्थापक अध्यक्ष पोतनीस यांच्याकडून सत्ता हस्तगत करण्यात विरोधी मंडळी यशस्वी झाली होती. मात्र, या निवडणूकीत पोतनीस यांनी शिवसेना तालुका प्रमुख पोवार यांना सोबत घेत निवडणूक जिंकून संस्था ताब्यात घेण्यात यश मिळविले. निवडणुकीपूर्वीच नव्या सभासद यादीवरून संस्था चर्चेत होती. उच्च न्यायालयापर्यंत सभासद पात्र-अपात्रतेचा बाद सुरू होता.
या निवडणुकीत विरोधी रवळनाथ आघाडीकडून सर्वसाधारण गटातून शंकर पोतनीस, युवराज पोवार, राजाराम पोतनीस, बंडू सावंत, विठोबा पोतनीस, उत्तम शेटगे,
महिला राखीव गटातून रत्नाबाई पोतनीस, सरस्वती पोतनीस, अनुसुचित जाती गटातून अर्जुन कांबळे, इतर मागास गटातून गंगुबाई कानोलकर, भटक्या विमुक्त जाती गटातून बाबू गावडे विजयी झाले. सत्ताधारी आघाडीचे सागर कदम हे एकमेव उमेदवार सर्वसाधारण गटातून विजयी झाले. सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व सुरेश सावंत, शांताराम सावंत, आप्पा मरगळे, जयराम पाटील यांनी केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयाकडील थैल यांनी काम पाहिले.




