mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 

तालुक्यात मटका चालकांविरोधात कारवाई सत्र… तिघांविरोधात गुन्हा नोंद


                 ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

        आजरा तालुक्यामध्ये मटक्याविरोधात कारवाईचे सत्र स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून सुरू करण्यात आले असून वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कारवाईत तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

        उत्तुर येथील स्वस्तिक डेअरी समोरील बस स्टॉप जवळ मटका घेताना मधुकर कोंडीबा मांडे राहणार कर्पेवाडी ता. आजरा याला आजरा पोलिसांनी तर आजरा येथील मयूर पेट्रोल पंपा समोर असणाऱ्या साईलीला हॉटेलच्या बाजूस उघड्यावर मटका घेताना अनिल बंडू कांबळे रा. कुंभार गल्ली व शिवाजी तुकाराम कांबळे रा. उत्तुर या दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग कोल्हापूर यांनी रंगेहात पकडून त्यांच्याकडून रोख रकमेसह मटका घेण्याचे साहित्य ताब्यात घेतले आहे.

        उत्तुर येथील आजरा पोलिसांच्या कारवाई प्रकरणी निरंजन जाधव यांनी तर आजरा येथील कारवाई प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे राजू ललिता कांबळे यांनी फिर्यादी दिल्या आहेत.

बिगर शेती प्रकरणी मुक्ती संघर्षचा एक नोव्हेंबर रोजी ‘संघर्ष मोर्चा ‘…

तहसील समोर करणार बेमुदत ठिय्या आंदोलन


                    ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

       बुरुडे ता.आजरा येथे बिगर शेती भूखंड तयार करून पायाभूत सुविधा न देता जागामालकांनी भूखंडांची विक्री केलेली आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वी तहसील कार्यालयाला दिलेल्या निवेदनानंतरही योग्य ती कार्यवाही न झाल्याचा आरोप करत श्रमिक मुक्ती दलाने १ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे.

        याबाबत बोलताना मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत म्हणाले, बुरुडे येथील नवीन असलेल्या भावेश्वरी कॉलनीमध्ये रहिवासी लोकांना पायाभूत सुविधा अद्याप मिळालेल्या नाहीत. याचा त्रास संबंधित रहिवाशांना होत आहे. या प्रकरणासह तालुक्यातील बिगर शेती प्रकरणांची रीतसर कायदेशीर चौकशी होऊन संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती.पण याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर सदर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

        याबाबतचे  निवेदन उपविभागीय अधिकारी,भुदरगड – राधानगरी यांना देण्यात आले असून निवेदनावर सुनील हरेर यांच्यासह मान्यवरांच्या सह्या आहेत.

वेळवट्टी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मारुती पोवार


                ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

        आजरा तालुक्यातील वेळवट्टी ग्रामपंचायत सरपंचपदी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांचे कट्टर समर्थक मारुती लक्ष्मण पोवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

        बिनविरोध निवड झालेल्या पाच सदस्यांपैकी प्रभाग ३ मधून शामराव विठोबा पोवार, शोभा संजय माने व संपदा सुनील कुंभार हे देसाई गटाचे तीन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत तर प्रभाग १ मधून इंद्रजीत रावसाहेब देसाई,सुरेखा वसंत कुंभार हे विरोधी गटाचे सदस्य निवडून आले आहेत.

        प्रभाग दोन मधील दोन जागांकरिता निवडणूक प्रक्रिया सुरू असून सुधीर देसाई यांच्या गटातून आदित्य/शरद उत्तम निर्मळे व शुभांगी अनिल निकम तर विरोधी गटातून अनिल धोंडीबा नार्वेकर व मनीषा अमित निकम असे उमेदवार आहेत.

मुम्मेवाडीच्या उपसरपंचपदी सागर घाटगे बिनविरोध


                   ◼️आजरा:प्रतिनिधी◼️

       मुम्मेवाडी (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सागर शिवाजी घाटगे यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरेखा एकनाथ पाटील होत्या.

        ग्रामसेवक सचिन येसादे यांनी स्वागत केले. संजय भिऊंगडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला.यामुळे रिक्त पदासाठी सरपंच पाटील यांनी विशेष सभा आयोजित केली. उपसरपंचपदासाठी घाटगे यांचा एकमेव अर्ज दाखल झालेने त्यांची उपसरपंच पदी निवड जाहीर करणेत आली.

       यावेळी ग्रामपंचायत सदस्या छाया गुरव, आनंदी परीट, सदस्य संतोष काटे ,
विश्वास देसाई, विजय गुरव, गणेश परीट, गणपती पोटे, गणपती राजीगरे, चंद्रकांत करबळें, उत्तम करबळें, सुनील पाटील, शिवाजी घाटगे, एकनाथ पाटील उपस्थित होते.

धनगरमोळा येथे हत्तीचा धुमाकूळ… ऊस व भात पिकाचे नुकसान


                   ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

        धनगरमोळा ता.आजरा येथे गेले आठ दिवस हत्तीने प्रचंड धुमाकूळ घातला असून येथील शेतकरी बाळकृष्ण पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे ऊस व भात पिकाचे मोठे नुकसान केले आहे.

        गेले आठ दिवस हत्ती धनगरमोळा येथे तळ ठोकून आहे. वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी वर्गाला मात्र मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

हालेवाडीत डस्टबिन वाटप


                  ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

       हालेवाडी(ता.आजरा) येथील श्री दूर्गामाता दूध संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सदस्य उमेश  आपटे यांच्या पंधराव्या वित्त आयोगामधून डस्टबीन वाटप करण्यात आले.

        यावेळी कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, दुर्गामाता दूध संस्थेचे अध्यक्ष अमर पाटील, रामचंद्र पाटील, प्रकाश पाटील, शामराव पन्हाळकर, जानबा पाटील, किरण आजगेकर, वसंत येजरे, बाळासाहेब आजगेकर, रामदास येजरे, शरद सुतार, रवी बेलकर, गणपती बेलकर, वसंत पाटील, रणजित कांबळे, गंगाराम पाटील, दादू पंडीत, शामराव साळोखे, भीमराव आयवाळे, कुंडलिक येसादे, पांडुरंग पाटील, सुशीला पाटील, शीला पन्हाळकर, शारुबाई पाटील, जॅकिन फर्नांडिस, सोनाबाई पाटील, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचलन संजय येजरे यांनी केले.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!