


आजरा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याला न्याय देण्यास महाराष्ट्र शासन बांधील : पालकमंत्री केसरकर

कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला आजरा तालुका नैसर्गिक दृष्ट्या संपन्न तालुका आहे. सुदैवाने आमदार प्रकाश आबीटकर यांच्यासारखे धडाडीचे आमदार या भागाला लाभले आहेत. यामुळे या भागातील पाणी प्रश्नासह विविध प्रश्न सोडवणुकीसाठी त्यांचा पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर एक मोठा उद्योग आणण्याचा आपला प्रयत्न सुरू असून शासनाकडून या भागाला योग्य तो निधी दिला जाईल यासाठी शासन निश्चितच कटिबद्ध आहे असे उदगार शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काढले. ते आजरा येथील पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
आमदार प्रकाश आबीटकर, पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
स्वागत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांनी अनेक वर्षे उद्घाटनाचा प्रलंबित असणारा प्रश्न आज मार्गी लागत आहे असे सांगून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल अशी ग्वाही दिली.

आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले, तत्कालीन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यां च्या माध्यमातून आजरा पोलीस ठाण्याची नूतन इमारत उभारण्यास वेळोवेळी मदत झाली आहे. नूतन इमारतीच्या उभारणीतून पोलिसांना भौतिक सुविधा देण्याचा आपला प्रयत्न राहिला असून आता समाधानकारक काम करण्याची जबाबदारी कार्यालयात काम करणाऱ्या मंडळींची आहे. यावर्षी सर्फनाला प्रकल्प पूर्णत्वास जाईल व घळभरणी होईल अशी अपेक्षा होती परंतु महसूल, पुनर्वसन व पाटबंधारे विभागातील काही अडचणीमुळे सदर प्रकल्पाची घळ भरणी होऊ शकली नाही. तरी देखील सध्या पूर्णत्वास गेलेल्या पाणी प्रकल्पामुळे आजरा साखर कारखानाच्या गळीत हंगामास मदत होणार आहे असे स्पष्ट केले.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले आजरा हे कोकणचे प्रवेशद्वार आहे. होऊ घातलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे येथील वाहतुकीत व आंतरराज्य गुन्हेगारीत मोठी वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसोयीनीयुक्त पोलीस ठाणे बांधण्यात आले आहे अशावेळी सर्वसामान्यांचा विश्वास जिंकून जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावर म्हणाले बदलत्या काळानुसार पोलीस प्रशासनाचा चेहरा मोहरा बदलत आहे ही समाधानाची बाब आहे. भौतिकदृष्ट्या पोलीस कर्मचारी समाधानी राहिल्यास अधिक क्षमतेने त्यांना काम करणे शक्य होणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता जाधव, पोलीस महानिरीक्षक फुलारे, अशोकअण्णा चराटी, आलम नाईकवाडे, सुधीर कुंभार, गीता पोतदार, आनंदा कुंभार, मलीककुमार बुरुड, सुधीर मुंज, जनार्दन टोपले, समीर चांद, बंडोपंत चव्हाण, मारुती मोरे, नगरसेविका सौ.शुभदा जोशी, यासीराबी लमतुरे, यास्मिन बुड्डेखान,अनिकेत कवळेकर, बशीर खेडेकर, रमेश रेडेकर, विजय थोरवत, संतोष भा, रणजीत सरदेसाई सौ. भैरवी सावंत, गीता पोतदार, पूनम पाचवडेकर, तहसीलदार सूरज माने, गुरुदत्त गोवेकर यांच्यासह विविध गावचे सरपंच,ठेकेदार विलास भादवणकर, डी. टी.पवार, पोलीस पाटील उपस्थित होते. विभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी आभार मानले.

शहाणपण सुचले… पण वेळ निघून गेली

आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून बिनविरोधची चर्चा सुरू राहीली.एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे सहजपणे ही निवडणूक बिनविरोध होईल असा अंदाज प्रमुख राजकीय मंडळींनी बांधला होता. यामुळे गाफीलपणा वाढल्याने व ऐनवेळी निवडणूक प्रक्रियेला सामोरे जावे लागल्याने बिनविरोधची चर्चा झाली प्रत्यक्षात मात्र निवडणूक प्रक्रियेला सामोरे जावे लागले. वेळ निघून गेल्यानंतर नेते मंडळींना बिनविरोधच्या चर्चेचे शहाणपण सुचले. यामुळे तालुका खरेदी विक्री संघावर मात्र नाहक निवडणूक खर्चाचा बोजा पडला आहे हे नाकारता येत नाही.
जनता बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात राष्ट्रवादीच्या मंडळींना यश आले. या संस्थेवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्यामुळे राष्ट्रवादी अंतर्गत संघर्ष थांबवण्यात आ. हसन मुश्रीफ आ. राजेश पाटील यांना यश आले या बिनविरोध प्रक्रियेस आमदार प्रकाश आबीटकर यांनीही हातभार लावला त्यामुळे इतिहासात प्रथमच निवडणूक बिनविरोध पार पडली. हाच पायंडा तालुका खरेदी विक्री संघामध्ये पुढे सुरू राहील अशी अपेक्षा तालुकावासीयांकडून व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर अगदी सुरुवातीला प्राथमिक चर्चा झाली. परंतु जिल्हा बँकेच्या निमित्ताने तालुका संघाचे सर्वेसर्वा सुधीर देसाई व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांच्यामध्ये ताणले गेलेले टोकाचे संबंधही या निवडणूक बिनविरोध प्रक्रियेस अडथळा ठरले. समोर असणारी आजरा साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकही यास कारणीभूत ठरली आहे.
निवडणुकीमध्ये आपल्या गटाला पाच जागा दिल्यास आपण बिनविरोध निवडणुकीस तयार आहोत असे पत्रकार बैठकीच्या माध्यमातून जयवंतराव शिंपी व अशोकअण्णा चराटी यांनी स्पष्ट केले.या पत्रकार बैठकीनंतर माघारीची प्रक्रिया पार पडली. दरम्यानच्या कालावधीत बिनविरोधच्या दृष्टीने कोणतीही हालचाल व चर्चा झाली नाही. सत्ताधारी गटाच्या प्रमुख मंडळींनी आपल्या बाजूच्या ठरावधारकांना विरोधकांपासून अलिप्त ठेवण्याच्या उद्देशाने सहलीवर पाठवले.
ठराव धारक हाताला लागल्यानंतर मात्र सत्ताधाऱ्यांचा विश्वास दुणावला. बिनविरोध साठी तीन जागा देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. पाच जागांसाठी आग्रही असणाऱ्या विरोधकांच्या दृष्टीने हा प्रस्ताव अपमानास्पद असल्याने निवडणूक निकालाचे काहीही होवो परंतु निवडणुकीला सामोरे जायचे असा निर्णय घेत ऐनवेळी चराटी व शिंपी गटाने पॅनल रचना केली.
आश्चर्याची बाब म्हणजे आजरा साखर कारखान्याच्या अशोकअण्णा चराटी, अल्बर्ट डिसोझा व उदय पवार या तीन माजी अध्यक्षांनी आपली उमेदवारी तालुका संघात ठेवली. तालुका संघासारख्या सहकारी संस्थेमध्ये वास्तविक दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी देणे आवश्यक होते. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे पुढचे पुढे बघू अशी भूमिका घेत त्यांनी आपली उमेदवारी ठेवली.
संवादाच्या अभावामुळे बिनविरोधच्या टप्प्यावर येऊन ठेपलेली आजरा तालुका संघाची निवडणूक आता लागलीच आहे. तालुका संघापाठोपाठ साखर कारखान्याच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. या निवडणुकीमुळे साखर कारखान्याची निवडणूकही जोरात होणार असे दिसू लागले आहे. जून महिन्यामध्ये सदर निवडणूक प्रक्रिया होण्याची शक्यता असल्यामुळे तालुका संघाच्या निवडणुकीचे पडसाद साखर कारखाना निवडणुकीमध्ये निश्चितच उमटणार आहेत. कारखान्याच्या निवडणुकीत बिनविरोधी चर्चा करणार तरी कोण ? हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरत आहे.
एकंदर काय बिनविरोधचे शहाणपण सुचले होते पण वेळ निघून गेली.
अनेक मान्यवर निवडणूक रिंगणात…
तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आजरा कारखान्याचे माजी संचालक अल्बर्ट डिसोझा, उदय पवार, अशोकअण्णा चराटी, या साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांसह आजरा नगरपंचायतीचे नगरसेवक अभिषेक शिंपी, अनिरुद्ध केसरकर, आजरा सूतगिरणीचे चे संचालक इंद्रजीत देसाई, कारखान्याचे संचालक व जि. प. सदस्या सौ. सुनिता रेडेकर, जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. मनीषा गुरव, कारखान्याचे विद्यमान संचालक मधुकर देसाई, माजी संचालक बयाजी मिसाळ, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, जनता बँकेचे माजी संचालक विजय देसाई, उद्योजक उत्तम रेडेकर यांच्यासह तालुका संघाचे बहुतांशी आजी – माजी संचालक निवडणूक रिंगणात आहेत.
विद्यमान ९ संचालकांना विश्रांती
संघाच्या निवडणुकीमध्ये ज्येष्ठ संचालक नारायण सावंत यांच्यासह रामचंद्र आजगेकर, अबूताहेर तकीलदार, संभाजी रामचंद्र पाटील, गोविंद नारायण पाटील, निवृत्ती जानबा कांबळे, शिवानंद अर्जुन पाटील, श्रीपती रामचंद्र यादव व भीमराव गणपती वांद्रे या नऊ विद्यमान संचालकांना विश्रांती देण्यात आली आहे.


आजरा पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे आज उद्घाटन
आजरा पोलीस स्टेशनच्या आजरा- आंबोली मार्गावरील नूतन इमारतीचे आज शनिवारी सायंकाळी चार वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी दिली.
या उद्घाटन समारंभास खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक,आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचेही हारुगडे यांनी स्पष्ट केले.




‘इंजिनिअर्स’च्या अध्यक्षपदी कृष्णात घोरपडे

गडहिंग्लज येथील आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कृष्णात घोरपडे यांची निवड झाली आहे. अजित उत्तूरकर व संदीप पाटील यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. राजेंद्र पाटील यांची सचिवपदी तर राजेंद्र देशमाने यांची खजिनदारपदी निवड झाली आहे. बैठकीला रमेश गायकवाड, संजय नाईक, दयानंद गुरव, श्रीरंग राजाराम, दत्ताराम पाटील, अशोक रोटे, राजेंद्र देसाई, शैलेंद्र कावणेकर, बाजीराव पाटील, अमित मिसाळ आदी उपस्थित होते.





