शनिवार दि.१५ मार्च २०२५

वडिलांचे दिवस कार्य करून जाणाऱ्या मुलीचा दुचाकीवरून पडून मृत्यू….

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ईटे ता. आजरा येथे वडिलांचे दिवस कार्य आटोपून माहेरी आलेली सौ. उषा रामचंद्र दोरुगडे (रा. सोहाळे त्या.आजरा) या चाळीस वर्षीय महिला दुचाकीवरून सोहाळे या आपल्या सासुरवाडीच्या दिशेने भावासोबत जात असताना दुचाकीवरून सटकून पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा कोल्हापूर येथे रुग्णालयात मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी…
सौ. उषा यांचे इटे हे माहेर आहे. वडील बाळकू चंद्रू पाटील हे वारल्यानंतर दिवस कार्य करण्यासाठी त्या सोहाळे येथून इटे आल्या होत्या. दिवस कार्य झाल्यानंतर भावासोबत पुन्हा सोहाळे येते परतत असताना करपादेवी देवस्थान नजीक असणाऱ्या चढावादरम्यान दुचाकीवरून भोवळ आल्याने सटकून त्या खाली पडल्या. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना गडहिंग्लज येथील खाजगी दवाखान्यात व त्यानंतर पुढे कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे. वडिलांच्या दिवस कार्यासाठी आलेल्या सौ.उषा यांच्या या अपघाती मृत्यूमुळे इटे व सोहाळे येथे हळहळ व्यक्त होत आहे. सोहाळे येथे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काका, क्यू आर कोड स्कॅन करा…
खुशालीच्या वसुलीसाठी बच्चे कंपनीची नवा फंडा

आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
होळीसाठी दिवसभर लाकडे गोळा करायची व होळी पेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवडीच्या निमित्त्याने आपापल्या हद्दी ठरवून घेऊन त्या मार्गावरून जाणाऱ्या लहान मोठ्या मंडळींकडून खुशाली वसूल करण्याची परंपरा आजही आहे.
काळाच्या ओघामध्ये व्यवहारात बदल होत गेले. डिजिटल युगात रोख पैशांऐवजी ऑनलाइन व्यवहार करण्याची पद्धत रूढ झाली आहे. त्यामुळे अनेकांकडे बऱ्याच वेळी रोख पैसे नसतात हे वास्तव आहे.
होळीची खुशाली वसूल करताना रोख रकमेची अडचण भासू नये म्हणून बच्चे कंपनीने चक्क क्यू आर कोडचा वापर करत काल हक्काची खुशाली वसूल केली.
काका, रोख पैसे नाहीत तर टेन्शन नको. क्यू आर कोड स्कॅन करा व पैसे पाठवा… असे म्हणत स्कॅनर जवळ बाळगून केली जाणारी ही वसुली निश्चितच चर्चेचा विषय बनली होती.

टिमक्या आणि हलग्या कडाडल्या…
ग्रामीण भागात धुळवड दणक्यात...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये टिमक्या आणि हलग्यांच्या निनादात विविध कार्यक्रम साजरे करत धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली.
काही गावांमध्ये रंगपंचमी साजरी करण्यात आली. तर आजरा शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. धुळवडीनिमित्त विविध स्पर्धांचेही ठीक ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.
लांबून दगडाने नारळ फोडणे, कबड्डी, रस्सिखेच या स्पर्धांसह लेझीम खेळाचे सादरीकरण करण्यात आले.
कांही भागांमध्ये रेकॉर्ड डान्स स्पर्धा, कलापथक इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. धुळवडीच्या निमित्याने बहुतांशी तालुका वासीयांनी मांसहाराचा बेत आखल्याने सकाळपासून चिकन व मटण दुकानांमध्ये गर्दी दिसत होती.
एकंदर तालुक्यात धुळवड दणक्यात साजरी झाली.

हत्ती माद्याळ मध्ये…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बरेच दिवस दर्शन न दिलेला हत्ती काल माध्याळ येथे काशीनाथ मोरे यांच्या शेतात वावरताना दिसला.संध्याकाळी ६ वाजता शेतातील घरापासून शंभर फुटाच्या अंतरावरून हत्तीने दर्शन दिले.मात्र कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे कोणतीही नुकसान न करता हत्ती मेढेवाडीकडे निघुन गेला.
यावेळी शेतातील विहिरीतील पाणी पिण्याचा प्रयत्न केला विहीर खोल असल्यामुळे पाणी पीता आले नाही. हत्तीकडून नुकसानीची शक्यता गृहीत धरून मोरे कुटुंबीयांनी डबे वाजवून हाकारा दिल्याने हत्तीने मोरे यांच्या शेतातून काढता पाय घेतला.

पदोन्नती…

आजरा पोलीस ठाण्याचे पांडुरंग येलकर यांची हवालदारपदी नुकतीच पदोन्नती झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.




साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९




