शुक्रवार दि. २२ ऑगस्ट २०२५

प्रभाग रचनेवर हरकती दाखल…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर शासनाकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. ही प्रभाग रचना सदोष असल्याचे सांगत संजयभाऊ सावंत, परेश पोतदार, रवींद्र भाटले, विक्रमसिंह देसाई, नौशाद बुड्डेखान आदींनी याबाबत हरकती नोंदवल्या आहेत.
प्रसिद्ध प्रभाग रचनेमध्ये २०११ ची जनगणना प्रभागानुसार केलेली असून सदर प्रभाग पद्धती लोकसंख्येवर आधारित आहे. ती सदोष आहे. सदर प्रभागांमध्ये मतदार समान संख्येने येणार नसून काही ठिकाणी अत्यंत कमी व काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदार येणार आहेत. प्रभाग रचनेमध्ये अनेक ठिकाणी चुकीच्या मतदारांची नोंद झाली असून याचा परिणाम सदोष मतदार यादी मध्ये होणार आहे. यामुळे सदर प्रभाग रचना रद्द करून मतदार संख्या समान येऊ शकेल अशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

शेती औजारातून महिलांना नवा व्यवसाय मिळणार : विजयालक्ष्मी आबिटकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेती औजारातून एक वेगळा व्यवसाय महीलांना मिळणार आहे. औजार बँकेतून त्यांना रोजगाराची संधी मिळेल. उमेद अभियानामार्फत महीला सक्षमीकरणाचा शासनाचा उद्देश सफल होईल असे प्रतिपादन विजयालक्ष्मी आबिटकर यांनी येथे केले.
येथील पंचायत समितीमध्ये रणरागीणी महीला प्रभाग संघ आजरा यांच्यावतीने समृध्दी महीला ग्रामसंघ हरपवडे, एकता महीला ग्रामसंघ गवसे यांना औजार बँक सौ. आबिटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, आजरा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, तालुका अभियान व्यवस्थापक प्रविण बोकडे प्रमुख उपस्थित होते.
बँक सखी आरती भादवणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सौ. आबिटकर बल्या, महीलांना बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राईस मिल, पापड, लोणचे, बांबूपासून हस्तकला यासारखे उद्योग सुरु केले आहेत. सध्या शेती व्यवसायात मनुष्यबळाची कमतरता भासत असून शेती अडचणीत आली आहे. अशा काळात औजार च्या माध्यमातून शेतीमधे यांत्रिकीकरण आणता येईल. शेतीमधील अडचणी दूर होतील. महीलांना रोजगाराची संधी मिळेल. माजी नगराध्यक्षा सौ. चराटी, गटविकास अधिकारी श्री. टिळक यांनी मार्गदर्शन केले.
माजी जिल्हा परिषद सद्स्या मनिषा गुरव, रणरागीणी महीला प्रभाग संघाचे पक्ष राजश्री पाटील, अनिता हजारे, उषा पाटील, सोनाली परीट, मिलींद पाटील, हरपवडेचे सरपंच रपाटील, कानोलीच्या सरपंच सुषमा पाटील, सोहाळे सरपंच भारती डेळेकर, पदाधिकारी, महीला बचत गटातीच्या पदाधिकारी,उपस्थित होते.
मेघा देसाई यांनी आभार मानले.

आज-यात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आज-यात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
भजन, कीर्तन,प्रवचन यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाभिक समाजाचे अध्यक्ष गौतम भोसले, बाळासाहेब पाचवडेकर, सागर पाचवडेकर, रामा शिंदे, दत्ता पवार, कृष्णा यादव, उत्तम भोसले, आकाश शिंदे , संजय यादव, संजय पाचवडेकर यांच्यासह नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला.

आजरा शहरात विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरात मुख्यमंत्री गतिमानता अभियान अंतर्गत आजरा तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व चैतन्य सृजन्य संस्था आजरा यांनी नाट्य अभिनय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मुक अभिनय, नाटक, नाट्यछटा याबाबत प्रसिद्ध रंगकर्मी संजय हळदीकर यांनी मार्गदर्शन केले.
आजरा व भादवण व मडिलगे केंद्रातील साठ विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
जेपी नाईक पतसंस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेस संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवशंकर उपासे. प्रभारी गट शिक्षणाधिकारी बसवराज गुरव, डॉ. अंजनी देशपांडे, सुभाष विभुते, पुष्पलता घोळसे यांच्यासह शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
पुढील कार्यशाळा उत्तूर केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

गंगामाई वाचन मंदिरातर्फे वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा संचलित ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत मंचर्फे आजरा तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धांचे मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी १०.३० वाजता डॉक्टर जे.पी. नाईक सभागृह आजरा येथे वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
कै. लक्ष्मण धोंडीबा पाटील शालेय वक्तृत्व स्पर्धा/ प्राथमिक गटाकरीता स्वच्छता : काळाची गरज, जीवनात व्यायामाचे महत्त्व, आमची माऊली : संत ज्ञानेश्वर, माझा भारत देश. ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत असे विषय असून या गटामध्ये पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.
कै. रमेश वामन टोपले शालेय वक्तृत्व स्पर्धा/ माध्यमिक गटा करता मृत्युंजयकारांचा कर्ण, आरोग्यम् धनसंपदा, भारतीय संस्कृती, मोबाईल एक आय आणि आपण, पुस्तकांची संगत… वाढेल आयुष्याची रंगत… हे विषय ठेवण्यात आले आहेत.
दोन्ही गटाकरीता प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १५०१/-,१२०१/-, १००१/- व स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत. प्रत्येक शाळा प्रत्येक गटासाठी दोन स्पर्धक पाठवू येऊ शकते .स्पर्धकांनी आपली नावे १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत शाळेमार्फत वाचनालयाकडे नोंदवावीत असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह पुंडलिक नावलकर व सहकार्यवाह रवींद्र हुक्केरी यांनी केले आहे.

सूर्यदर्शन झाले…
दिवसभर पावसाची उघडीप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यात पावसाने काल दिवसभर उघडीप दिल्याने तालुका वासीयांना तब्बल चार ते पाच दिवसानंतर सूर्यदर्शन झाले.
पावसाचा जोर ओसरला असल्याने तालुक्यातील बंधारे वाहतुकीसाठी खुले झाले असून पात्राबाहेर गेलेल्या नद्यांचे पाणी पुन्हा एक वेळ ओसरत आले आहे.
पाऊस कमी आल्याने थंडावलेले व्यवहार पुन्हा एक वेळ पुर्ववत सुरू झाले आहेत. घरांची पडझड मात्र सुरूच आहे.

निधन वार्ता
संतोष कवळेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडीलगे ता. आजारा येथील संतोष मुरलीधर कवळेकर ( वय ४९ वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कागल मुक्कांमी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई असा परिवार आहे.



