मंगळवार दि.२६ नोव्हेंबर २०२४




वेध मंत्रीपदाचे…

ज्योतिप्रसाद सावंत
सलग तीन वेळा घसघशीत मताधिक्याने राधानगरी-भुदरगड मतदार संघाने आमदार प्रकाश आबिटकर यांना निवडून दिले आहे. मतदारांच्या कसोटीवर उतरलेल्या आबिटकर यांना यावेळी मंत्रिपदाची संधी मिळेल अशी अपेक्षा संपुर्ण मतदारसंघ बाळगून आहे.
आम.आबिटकर यांची या मतदारसंघातील वाटचाल ही निश्चितच कौतुकास्पद आहे. वक्तृत्व आणि कर्तुत्व या जोरावर संसदरत्न म्हणून झालेली निवड, मतदारसंघात कोट्यावधींची विकास कामे आणून मतदारसंघाचा बदललेला चेहरा मोहरा, समाजातील वाड्यावस्त्यांवरील सर्व स्तरात असणारा त्यांचा दांडगा संपर्क, विकास कामांच्या जोरावर त्यांना पराभूत करण्यासाठी एकवटलेल्या विरोधकांना दिलेली धोबीपछाड यामुळे ते मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत.
कागल तालुक्यातील मंत्री मुश्रीफ हे आता ‘परमनंट मंत्री’ म्हणून ओळखले जातात. मंत्रिमंडळ रचना म्हटले की मुश्रीफ आणि मंत्रीपद हे समीकरण बनले आहे. सलग सहा वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे मंत्री मुश्रीफ हे लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाते. मंत्री मुश्रीफ यांच्या पावलावर पाऊल ठेवून आ. आबिटकर यांची वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यामध्ये राहुल आवाडे, विनय कोरे, अमल महाडिक यासारखी बडी मंडळी मंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. पण त्यांचे पक्ष वेगवेगळे आहेत.
शिवसेनेतून सलग तीन वेळा प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आबिटकर हे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. कोणतेही संस्थात्मक पाठबळ नसताना त्यांची ही वाटचाल वरिष्ठांच्या दृष्टीने निश्चितच दखल घेण्याजोगी आहे.
त्यांच्या विजयाने केवळ मतदार संघाच्याच नाही तर जिल्ह्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी मतदारांना आमदार प्रकाश आबिटकर यांना पुन्हा आमदार करा मी त्यांना मंत्री करतो असा जाहीर शब्द दिला आहे. आता ‘ तो ‘ शब्द पाळण्याची वेळ आली आहे. कारण या शब्दामुळेच आमदार प्रकाश आबिटकर यांच्या सोबत मतदारांनाही मंत्रीपदाचे वेध लागले आहेत.



अभिनंदनीय निवड…..

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील आजरा महाविद्यालयाची १२ वी विज्ञान शाखेची माजी विद्यार्थीनी कु. वैष्णवी धनंजय मुळे हिला पुणे येथील लिला पूणावाला फौंडेशनची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
कु. वैष्णवी हिने १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्यातील जी.एच. रायसोनी कॉलेजमध्ये आय. टी. इंजिनिअरींग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. पूणे येथील पद्मश्री लिला पूणावाला फौंडेशनच्या वतीने दरवर्षी हुशार व होतकरू मुलींसाठी रु.६०,००० इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी तिची निवड झाल्याने फौंडेशनच्या अध्यक्षा लिला पूणावाला यांच्या हस्ते तिला गौरवण्यात आले. याबद्दल तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


‘व्यंकटराव’च्या एन.सी.सी कॅडेट साहिल पाटीलने पूर्ण केला ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प कोल्हापूर येथे नुकतीच पार पडला. त्यामध्ये शिवाजी ट्रेल ट्रेकिंग कॅम्प २०२४ या मोहीमेअंतर्गत पाच राज्यातील एन.सी.सी. विद्यार्थी सहभागी झाले होते. कोल्हापूर ते विशाळगड चालणे होते.
या कॅम्प साठी ५६ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल पुनीत गोगिया यांचे मोलाचे मार्गदर्शन या कॅपसाठी व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील साहिल पाटील यांनी सहभाग घेतला आणि तो यशस्वीपणे कॅम्पच्या
नियमानुसार पार पाडला.
त्याच्या या यशाबद्दल आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, व्यंकटराव हायस्कूलचे प्राचार्य आर. जी. कुंभार, पर्यवेक्षिका सौ. व्ही .जे .शेलार यांनी अभिनंदन केले. साहिलला एनसीसी ऑफिसर श्री महेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


कोल्हापुरात ‘मविआ’ समोरील आव्हाने गडद!

कोल्हापूर
विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने दणदणीत यश मिळवले असताना एकही जागा मिळू न शकलेल्या महाविकास आघाडी समोरील आव्हान अधिकच वाढीस लागले आहे. महाविकास आघाडीला जिल्ह्यातील राजकारणात नव्याने स्थान निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अस्तित्व दाखवताना आघाडीच्या नेत्यांचा कस लागणार आहे.
विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल कोल्हापुरातही महायुतीला उभारी देणारा असताना महाविकास आघाडीचे पारंपरिक किल्ले धडाधड कोसळले. अशा बिकट परिस्थितीत राजकीय वाटचाल करणे हे जिल्ह्यातील मविआ समोर खडतर आव्हान असणार आहे. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनते सतेज पाटील यांच्याकडे मविआच्या प्रचाराची धुरा होती. त्यांनी सर्व दहा मतदारसंघांत समन्वय ठेवतानाच आवश्यक ती रसदही पुरवली होती. इतके करूनही कोल्हापूर उत्तर – दक्षिण या हक्काच्या मतदारसंघासह अन्य आठ ठिकाणी आघाडीचा बोजवारा उडाला. त्यामुळे आमदार पाटील हे किती ताकतीने पाय रोवून उभे राहतात यावर आघाडीतील अन्य सुभेदारांमधील लढण्याचे राजकीय धैर्य दिसून येणार आहे.
आगामी वर्ष कसोटीचे
विरोधकांसाठी उगवते वर्ष हे त्यांच्या नेतृत्वाचा संयम पाहणारे असणार आहे. नजीकच्या काळामध्ये कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या यशाने महायुतीला कमालीचा आत्मविश्वास मिळालेला आहे. त्यांच्याकडे चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, संजय मंडलिक, राजेश क्षीरसागर, विनय कोरे, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासारख्या तगड्या नेत्यांची फौज असणार आहे. त्यांच्याशी मुकाबला करताना सतेज पाटील यांना एकाकी – एकहाती लढत द्यावी लागणार आहे. ते विधान परिषदेत निवडून जातात. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद सदस्यांचे मतदान याचा निर्णय घेत असतात. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती – मविआ यांना कसे, किती प्रमाणात यश मिळणार यावर पाटील यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना या पक्षातील नेत्यांची कितपत साथ मिळते यावर राजकीय वाटचाल अवलंबून असणार आहे.
नव्या उमेदवारांचा शोध
विधानसभा निवडणुकीमध्ये मविआचे के. पी. पाटील, गणपतराव पाटील, सत्यजित पाटील सरूडकर तीन उमेदवार वरिष्ठ गटातील राहिले. त्यांनी चांगली लढत दिली असली तरी यावेळच्या आणि आधीच्या निवडणुकांचा अनुभव लक्षात घेऊन ते पुन्हा नव्याने राजनीतीचे द्वंद्व करण्यासाठी कितपत जोमाने सज्ज असणार हेही पाहावे लागणार आहे. वय हा त्यातील महत्त्वाचा घटक ठरणार आहे. समरजित घाटगे यांनी लढण्यासाठी आतापासून सज्ज असल्याचे सांगितले आहे. हा एक अपवाद दिसतो. ऋतुराज पाटील, राजू आवळे, मदन कारंडे, राजू आवळे यांच्यात लढण्याची ऊर्जा, उर्मी तयार करावी लागेल. निराशेचे सावट असलेली परिस्थिती पाहता मविआ कितपत उभारी घेणार हाच खरा मुद्दा आहे.
आव्हानांना सामोरे जाणे ही सतेज पाटील यांची खासियत मानली जाते. महाविकास आघाडी जिल्ह्यात नव्याने उभारी घेईल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. ‘राज्यात आणि जिल्ह्यात आघाडीची पीछेहाट झाली आहे. राजकारणाची दिशा बदलली आहे. त्याचा विचार केला जाईल. पराभवामुळे कार्यकर्ते खचणार नाहीत. दोन पावले मागे आलो असलो तरी भविष्यात निश्चितच पुढे जाऊ. आघाडीला पुन्हा चांगले दिवस येतील,’ अशा शब्दांत सतेज पाटील यांनी भिडण्यासाठी तत्पर असल्याचा सांगावा दिला आहे.
(Viral News…Source…online news)








