



डेंग्यूने विवाहितेचा मृत्यू…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सौ.रंजना रमेश जाधव. ( रा . विद्यानगर, आजरा) या ३० वर्षीय विवाहितेचे डेंग्यू या आजाराने बुधवारी सकाळी निधन झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की…
सौ.रंजना यांना डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना वळीवडे/कोल्हापूर येथे खासगी डॉक्टरना दाखविले होते. यामध्ये त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्या सासरी आजरा येथे आल्यानंतर प्रथम आजरा व त्यानंतर गडहिंग्लज येथे त्यांचेवर उपचार सुरू होते.
त्यांची प्रकृती अचानक चिंताजनक बनल्याने त्यांना कोल्हापूर येथे पुढील उपचारासाठी हलवत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, सासू, सासरे,आई-वडील असा परिवार असून त्या व्यंकटराव हायस्कूल येथील सेवानिवृत्त शिक्षक आर. टी. जाधव यांच्या स्नुषा होत.



दिवसाढवळ्या चोरी…
६५ हजारांचा ऐवज लंपास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
निंगुडगे तालुका आजरा येथील दिनकर नारायण मगदूम यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी बुधवारी दुपारी चावीने कुलूप खोलून प्रवेश करून सोन्यासह आठ हजार रुपये रोख असा ६५ हजारांचा ऐवज लंपास केला.
घराला कुलूप लावून मगदूम कुटुंबीय शेतामध्ये गेले असताना सदर प्रकार घडला. याबाबतची फिर्याद दिनकर नारायण मगदूम यांनी पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार विठ्ठल कांबळे करीत आहेत.



टोल आंदोलन आता जनतेच्या हातात…
आजरा येथील बैठकीत निर्धार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
धडक मोर्चा, धरणे आंदोलन यासह लेखी पत्रव्यवहार करूनही आजरा आंबोली मार्गावर मसोली नजीक उभारण्यात येत असलेल्या टोलबाबत गांभीर्याने विचार केला जात नाही. तालुकावासीया आपण कोणत्याही परिस्थितीत टोल देणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत. परंतु टोल लादण्याच्या हालचाली सुरू आहेत. आता पक्षीय लेबल व लोकप्रतिनिधींना बाजूला ठेवून जनतेने हे आंदोलन हाती घेण्याचा निर्धार आज हॉटेल मॉर्निंग स्टार येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ. संपत देसाई होते. बुधवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी टोलनाका स्थळी रास्ता रोको करण्याचेही यावेळी ठरले.
टोल मुक्ती संघर्ष समितीची बैठक कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडली.यावेळी प्रशासन व लोकप्रतिनिधींची भूमिका, टोलबाबत लांबलेला निर्णय व वारंवार वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करूनही राष्ट्रीय महामार्ग विभाग व प्रशासनाला याचे नसलेले गांभीर्य या पार्श्वभूमीवर उपस्थितांनी आक्रमक भूमिका मांडली.
टोलला विरोध असल्याचा स्वातंत्र्य दिनाच्या ग्रामसभेत विविध ग्रामपंचायतीने ठराव करून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यापुढे लोकप्रतिनिधींना बाजूला ठेवून स्थानिक तालुकावासीयांनी आंदोलन करून या प्रश्नावर उठाव करण्याचे ठरले. जेणेकरून शासनाला याचे गांभीर्य लक्षात येईल.
परशुराम बामणे, प्रभाकर कोरवी, रणजीत सरदेसाई, काशिनाथ मोरे, कॉ. शांताराम पाटील पद्मिनी पिळणकर, प्रकाश मोरुस्कर, डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी चर्चेत भाग घेतला.
बैठकीस पांडुरंग सावरतकर, गौरव देशपांडे, गोपाळ होण्याळकर, द्वारका कांबळे, आनंदा कांबळे, किरण के.के. गीता पोतदार, प्रवीण कश्यप, प्रसाद पिळणकर, रवी देसाई, दयानंद कांबळे, यांच्यासह विविध भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.



‘महाराष्ट्र टॅलेंट सर्च’ मध्ये व्यंकटराव हायस्कूलचे यश
गुणवत्ता यादीमध्ये तब्बल ७४ विद्यार्थी…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित सेंटर फॉर टॅलेंट सर्च अँड एक्सलन्सद्वारे महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा संपूर्ण राज्यामध्ये शासन मान्यताप्राप्त स्पर्धा परीक्षा आयोजित केली जाते. व्यंकटराव हायस्कूलच्या आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी राज्य,जिल्हा,तालुका व स्पेशल प्राईस व कन्सोलेशन प्राईस गुणवत्ता यादीमध्ये एकूण ७४ विद्यार्थ्यांनी स्थान पटकाविले. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व गुणपत्रक देऊन गौरविण्यात आले.
यशस्वी विद्यार्थी ….
इयत्ता आठवी…
आजगेकर माधवी जीवन, भोसले अंशुमन हिम्मत, देसाई ऋषा मनोज, देशमुख रिया अरविंद, गिरी शलाका ओंकार, हुबळे कार्तिक सुरेश, केंबळे आर्यन अमर, मोटे ईशान सुरजीत, नाईक सृष्टी संजीव, पाटील प्रणव भगवान,सावंत अवधूत अमित, शेख जुवेरिया समीर, येसणे प्रेम रमेश
इयत्ता नववी…
बागडी जान्हवी सुशांत, शिमणे अक्षता रघुनाथ,चौगुले विठ्ठल संदीप,देसाई संयोगिता मदन, देसाई उत्कर्षा दिगंबर, देसाई यशिता नंदकुमार, दळवी ओमकार प्रभाकर, डोणकर अमोल महेश, दोरुगडे सुजल सूर्यकांत, गिलबिले असावरी अशोक, गोरे शर्वरी विजय, गुरव गुरुदास पंढरीनाथ, गुरव कौस्तुभ राजेंद्र, गुरव सोनाक्षी संजय, गुरव वेदिका शांताराम, होरटे, दिव्या परशराम, इलगे स्नेहल सागर, जाधव अर्णव दत्तात्रय, जाधव राजलक्ष्मी ज्ञानदेव, कांबळे ऋषिकेश भगवान, कानडे आर्यन नारायण, कविटकर शार्दुल लक्ष्मण, केसरकर समीक्षा संदीप, कोलते हर्षवर्धन किरण, कोलते वैष्णवी प्रकाश, कुंभार ईश्वरी महादेव, कुंभार श्रेयस सचिन,मस्कर तनवी अनिल, मुळीक श्रेया तानाजी, नरके तेजस्विनी विकास, निकम रिया बाबुराव, पंडित तन्वी रवींद्र, पाटील आदिती अंकुश, पाटील गंधर्वराज दत्तात्रय, पाटील गौरव भारत, पाटील प्रथमेश विजय, पाटील प्रीती प्रभाकर, पाटील श्रेया संजय, पेडणेकर प्रणव बाळकृष्ण, पोतनीस श्रावणी शंकर, पवार वैष्णवी सदानंद, प्रभु गौरव तुकाराम, राणे श्रीकृष्ण चंद्रकांत, सासुलकर प्राची धनाजी, सावरतकर शुभम राजेंद्र, सय्यद असद महंमद युनूस, सोनार समर्थ संदीप,वेंगुळकर सिद्धी संदीप
इयत्ता दहावी…
हेब्बाळकर अनुष्का उदय, जोशीलकर मैथिली रविराज, खवरे कादंबरी जयदीप, खोराटे निवेदिता नितीन, लांडे संचिता संजय,नवार राखी राजू, पंडित सिद्धी सुभाष, पाटील आदित्यराज दीपक, पाटील गायत्री बाबासो, राठोड मेघा राजू, सावंत अपूर्वा अमित, शिवणे समृद्धी सुरेश, येरुडकर मेघा श्रीधर
या विद्यार्थ्यांना मदन देसाई,प्रशांत गुरव,अस्मिता पाटील,महेश यलगार या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी, प्राचार्य श्री.आर.जी. कुंभार,पर्यवेक्षिका व्ही.जे.शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.



वेळवट्टी परिसरातील काजू झाडांना मर रोगाची लागण…
झाडे वाळली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वेळवट्टी परिसरात गेले दोन सव्वा दोन महिने सततचा जोरदार पाऊस पडल्यामुळे तसेच या पावसाच्या काळात एकदाही उघडीप न झाल्याने व सुर्यप्रकाश न मिळाल्याने काजू झाडांची पानगळ झालेली असून काजू झाडांचे खोड, फांद्या वाळत आहेत.तसेच खोड, फांद्या,व पानांना बुरशीजन्य रोग झालेला दिसत आहे अशा मेलेल्या काजू फांदीला मोहर येवून काजू बी लागत नाही.सदर काजू पिकातील लक्षणे या तीन-चार दिवसांत उघडीप व सुर्यप्रकाश पडल्यामुळे तीव्र प्रमाणात दिसत आहेत असे काजू उत्पादक शेतकरी डॉ. धनाजी गोविंद राणे यांनी सांगितले
सद्यस्थितीत डॉ. धनाजी गोविंद राणे, तानाजी विठोबा राणे,अजित तुकाराम प्रभू, जयसिंगराव देसाई, प्रणेल फत्तेसिंह महागावकर विजयकुमार पाटील यांच्या काजू बागेतील झाडे बाधित झालेली आहेत. कृषी आणि महसूल खात्यांचा पावसाळ्यातील फळ पिके व इतर पिकांचा नुकसान भरपाई संदर्भात सर्वे व पंचनामे सुरू आहेत. याच दरम्यान आपल्याही नुकसान झालेल्या काजू झाडांचे पंचनामे करून नुकसान झालेल्या झाडाची शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी परिसरातील काजू उत्पादक शेतकऱी मागणी करत आहेत.






