mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार  दि.२४ जानेवारी २०२६

उत्तूर जि. प. व उत्तुरसह भादवण पं. स. मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील : मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिरीष देसाई व भादवण पंचायत समिती मतदार संघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सौ.जयश्री गाडे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ऊमेदवार शिरीष देसाई व भादवण पंचायत समिती मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. जयश्री संजय गाडे यांच्या प्रचारार्थ मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. गजरगांव, हारूर, कानोली, निंगुडगे, कोवाडे, दाभेवाडी या गावांमध्ये मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या प्रचारसभा झाल्या. या प्रचारसभांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, हा भाग नव्यानेच उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये समाविष्ट झालेला आहे. हा भाग कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघांमध्येही समाविष्ट व्हावा, अशी माझी प्रार्थना आहे. गोरगरिबांचे कल्याण आणि विशेषता माता-भगिनींचे सक्षमीकरण यासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न करीत आलो आहोत. या परिसरात राजकीय सत्तेच्या माध्यमातून विकासकामे तर होतच राहतील. तसेच गोरगरिबांच्या विशेषता सर्वसामान्य माणसांच्या पेन्शन योजना, आरोग्यसेवा, बांधकाम कामगार कल्याण, बेघरांना घरकुले यासारख्या सामाजिक कल्याणकारी योजना राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य घरादारापर्यंत पोहोचवतील असेही ते म्हणाले.

उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिरीष देसाई म्हणाले, ना. हसन मुश्रीफ हे जनतेसाठी अहोरात्र राबणारे नेते आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघाचा कायापालट करू. विकास कामांबरोबरच गोरगरिबांच्या कल्याणाच्या योजना जनतेच्या घरा-दारापर्यंत पोहोचवू.

भादवण पंचायत समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. जयश्री संजय गाडे म्हणाल्या, ना.मुश्रीफ आणि माता भगिनींचे ऋणानुबंध घट्ट आहेत. मीही पंचायत समितीच्या सत्तेच्या माध्यमातून खेड्या-पाड्यातील माता-भगिनींच्या सबलीकरणासाठी अहोरात्र काम करीन.

उमेश आपटेच ताराराणीतून उमेदवारी बाबत बोलतील…

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघातील विरोधी उमेदवार उमेश आपटे यांचे मला तर आश्चर्यच वाटते. ते काँग्रेसमध्ये होते आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील त्यांचे नेते होते. त्यांनीच श्री. आपटे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले होते. भाजपची लाट आली आहे समजून ते त्या पक्षात गेले असते तर मी समजू शकलो असतो. परंतु त्यांनी ताराराणी आघाडीच का निवडली ? याचे मला कोडे सुटलेले नाही. त्यांच्यावर महात्मा गांधींचा प्रभाव पडला की आणखी काय झालं? याबाबत माझे संशोधन सुरूच आहे. त्यांनाही याचे उत्तर द्यावेच लागेल. तेच याबाबत बोलतील असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक व पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार सुधीर देसाई, उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार शिरीष देसाई, भादवण पंचायत समितीच्या उमेदवार सौ. जयश्री गाडे, आजरा साखर कारखान्याचे माजी चेअरमन वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, एम. के. देसाई, दिपकराव देसाई, राजेंद्र मुरकुटे, अल्बर्ट डिसोजा, मारुतराव घोरपडे, आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनिल फडके, संजय येजरे, बी. टी. जाधव, सुधीर सावंत आदी प्रमुख उपस्थित होते.

माघारीपूर्वीच प्रचाराचा धुरळा सुरु

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांच्या उमेदवारी अर्ज माघारी मुदतीपूर्वीच पक्ष व आघाड्यांच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराचे रान उठवले आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सभांचा धडाका कालपासून सुरू झाला आहे, तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर , प्रा. अर्जुन आबिटकर यांनी उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवारांसह पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेण्यास सुरुवात केली आहे. जयवंतराव सुतार यांनीही वैयक्तिक भेटी व बैठका सुरू केल्या आहेत. ताराराणी आघाडीचे जिल्हा परिषदेचे उत्तूर मधील उमेदवार उमेश आपटे यांनी पुन्हा एकदा मतदारांना रिचार्ज करण्यास सुरुवात केली आहे.

महायुतीच्या घटक पक्षातच सर्व उमेदवाऱ्या असल्याने या आघाडीतील नेत्यांनी आता आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन लावले असून किमान एक तरी सभा प्रमुख गावांमध्ये घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. आमदार शिवाजी पाटील यांच्याही प्रचार दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

एकंदर महायुतीतील प्रत्येक घटक पक्षांची तालुक्यातील स्थिती या निवडणुकीने स्पष्ट होणार आहे.

कुत्रे आडवे आले…
आईस्क्रीमची चार चाकी पलटी


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा गडहिंग्लज मार्गावरहाजगोळी फाट्यानचीक कुत्रे आडवे आल्याने वाहनावरचा ताबा सुटून वाहन पलटी झाले व जगदीश लक्ष्मण लोहार (या.आजरा) यांना दीड लाखांच्या नुकसानीला सामोरे जावे लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

वाहन चालक जगदीश लोहार हे आपले आईस्क्रीमचे वाहन (एम.एच.०९जी.टी.४३०८) घेऊन भादवण येथील यात्रेकरता चालले होते. दरम्यान हाजगोळी फाट्यानजीक त्यांचे वाहन आले असता अचानक कुत्रे आडवे आल्याने त्यांनी ब्रेक लावून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. यात वाहन पलटी झाले व वाहनासह आईस्क्रीमचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले असून जगदीश हे किरकोळ जखमी झाले आहेत. 

कासार कांडगाव – चितळे मार्गावर बिबट्याचे दर्शन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कासारकांडगाव (ता. आजरा) येथे चंदगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर वहानधारकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. कासारकांडगाव घाटातील रस्त्याच्याकडेला आज सायंकाळी सात वाजता निवांतपणे पडला होता. अशी माहीती जयवंत सरदेसाई यांनी दिली.

या परिसरात वाहनधारक व शेतकऱ्यांना त्याचे अनेकदा दर्शन झालेले आहे.

सरदेसाई हे सायंकाळी आजऱ्यातील आठवडी बाजारात बाजार करून मोटारसायकलवरून गावी चितळ्याकडे चालले होते. याच दरम्यान त्यांना रस्त्याच्या कडेला आडवा झालेल्या स्थितीतील एक प्राणी दिसला. पहिल्यांदा त्यांना कुत्रे असावे असे वाटले. दरम्यान चंदगडहून आजऱ्याकडे जाणाऱ्या मोटारीचा प्रकाशझोत त्या प्राण्याच्या अंगावर पडल्यानंतर  तो बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले. सरदेसाई यांनी तेथे न थांबताच दुचाकी पळवली. ही गोष्ट रस्त्यावरील वाहनधारक व ग्रामस्थांना सांगीतली. बिबट्याच्या वावराने परिसरात भितीचे वातावरण आहे.

पुन्हा एसटीतून दारू पकडली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

खाजगी वाहनातून गोवा बनावटीची दारू वाहतूक करण्यापेक्षा एसटीतूनच बिनधास्तपणे वाहतूक करण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. दोनच दिवसापूर्वी बहिरेवाडी येथे सुमारे ३०० लहान मोठ्या दारूच्या गोवा बानावटीच्या बाटल्या पोलिसांनी जप्त करून संबंधितावर कारवाई केली असतानाच पुन्हा काल शुक्रवार दिनांक २३ रोजी घाटकरवाडी येथील चेक पोस्टवर पणजी ते तासगाव जाणाऱ्या एसटी बस मधून दारू वाहतूक करणाऱ्या संतोष सोमेश्वर पवार रा. चिखलगोठण ता. तासगाव याला गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांसह ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. याबाबतची फिर्याद महेश रावजी चिटणीस यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

लोकवाद्ये ही आपल्या लोकजीवनाचा आत्मा – ऋषिकेश देशमाने

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

लोकवाद्ये ही केवळ लाकूड किंवा चामड्याचे तुकडे नसून, लोकवाद्ये ही आपल्या लोकजीवनाचा आत्मा आहेत. त्यात आपल्या संस्कृतीचा प्राण वसलेला आहे. नवीन पिढीने या वाद्यांचे महत्त्व ओळखून ती शिकणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे मत लोकवाद्ये अभ्यासक आणि संग्राहक ऋषिकेश देशमाने यांनी व्यक्त केले.

आजरा महाविद्यालयात मराठी विभाग आणि विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत ‘लोकवाद्ये समजून घेताना’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून श्री. देशमाने बोलत होते. प्राचार्य डॉ. अशोक सादळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी समन्वयक डॉ. मल्हारराव ठोंबरे, उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील उपस्थित होते.
लोकवाद्ये ही मानवी संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे असे सांगून श्री. देशमाने पुढे म्हणाले की, संगीत ही मानवाला निसर्गाकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. माणसाने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी स्वरांचा आणि तालाचा आधार घेतला, त्यातूनच लोकवाद्यांचा जन्म झाला. लोकवाद्ये म्हणजे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती आपल्या मातीचा सुगंध, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. लोकवाद्ये ही त्या त्या प्रदेशाच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचे प्रतिबिंब असतात. महाराष्ट्रातील ढोलकी, तुतारी, संबळ किंवा एकतारी ही वाद्ये इथल्या मातीतील चैतन्य दर्शवतात. सण-उत्सव, जत्रा, लग्नकार्य किंवा शेतीकामाचा थकवा घालवण्यासाठी ही वाद्ये वाजवली जातात. आजच्या आधुनिक युगात पाश्चात्य वाद्यांच्या अतिवापरामुळे आपली पारंपरिक लोकवाद्ये काहीशी मागे पडत आहेत. या वाद्यांचे जतन करणे म्हणजे आपल्या वारशाचे जतन करणे होय. म्हणूनच लोकवाद्यांचा हा नाद असाच घुमत राहिला तरच आपली संस्कृती जिवंत राहील, असे मत श्री. देशमाने यांनी व्यक्त केले.

या कार्यशाळेत आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील सर्व महाविद्यालयातील निवडक विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे स्वागत डॉ आप्पासो बुडके यांनी, प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी, पाहुण्यांची ओळख अथर्व मोहिते याने करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती कांबळे आणि निदा इंचनाळकर यांनी तर विवेक कोंडूसकर याने उपस्थितांचे आभार मानले. विक्रांत सावंत, समृद्धी तांबेकर, विवेक पाटील, संचिता तरडेकर, परशुराम राणे, प्रथमेश कुंभार , सुप्रिया घुरे, श्रेया पसारे, ऋतुजा धडाम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

छायावृत्त

आजरा नगरपंचायतीमध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तालुका खरेदी  विक्री संघावर सत्ताधाऱ्यांचा झेंडा

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!