मंगळवार २ जून २०२६



चारचाकीच्या धडकेत चौघे जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा आंबोली मार्गावर हाळोली गावाजवळ एका भरधाव चारचाकीने चौघांना उडविले. यामध्ये संजय काळू कांबळे (वय ४५), उषा संजय कांबळे (वय ४०), श्रुतिका संजय कांबळे (वय १४, सर्व रा.सोहाळे ता. आजरा) व मालुबाई अशोक कांबळे (वय वर्षे ३५, रा. महागोंड ता. आजरा) हे सर्वजण जखमी झाले आहेत. सर्व चारजण हाळोली गावात यात्रेसाठी पाहुण्यांकडे रविवारी गेले होते. यात्रा आटोपून सोमवारी सकाळी ८ च्या दरम्यान आपल्या गावी परतण्यासाठी बस स्टॉपवर थांबले होते. याच दरम्यान गोव्याकडून हैदराबाद कडे जाणाऱ्या भरधाव चारचाकीने (MH १४ HD २७२१) या चौघांसह मोटरसायकल (MH ०९ FZ ०७७) उडविले. या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यानंतर पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहेत. चारचाकी चालक भरतराज सुब्रमण्यम रा. हैदराबाद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पार्टी करतानाच वीज कोसळली… एकाचा मृत्यू
आरळगुंडी परिसरातील दुर्घटना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सुट्टी निमित्त मित्रांसमवेत
फिरण्यासाठी गेलेल्या तरुणावर वीज कोसळून अजित दत्तात्रय चौगले (वय २४, रा. नरतवडे, ता. राधानगरी) त्याचा मृत्यू झाला. आरळगुंडी (ता. भुदरगड) येथील चिकोत्रा धरणाच्या बॅकवॉटर परिसरात सदर घटना घडली तर मित्र रोहित राजेंद्र मोरे (रा. खानापूर, ता. भुदरगड) हा जखमी झाला आहे.
गारगोटी येथे खासगी विक्री केंद्रावर काम करणारे पाच कर्मचारी सोमवारी (दि. १ जून) सुटृटी असल्याने चिकोत्रा धरणाच्या बॅकवॉटर परिसरात पार्टीसाठी गेले होते. त्यांनी पाण्यापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर आरळगुंडी गावच्या रस्त्यालगत झाडाखाली चुलीवर जेवण बनवण्याचे काम सुरू होते.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यावेळी अजित चौगले व रोहित मोरे हे दोघेजण झाडाखाली जेवण करीत थांबले होते, तर इतर तिघेजण पाणी आणण्यासाठी गेले होते. यादरम्यान वीज कोसळल्याने या दुर्घटनेत अजित चौगले यांचा जागीच मृत्यू झाला, तर रोहित मोरे जखमी झाला.
जखमी रोहित मोरे यांना तातडीने गारगोटी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करूनच प्रगती साधता येते : सुदाम पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजच्या धावपळीच्या जगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याने बँकिंग व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करता येतात. याच्याने मनुष्यबळावरील ताण कमी होऊन, गतिमान आणि कार्यक्षम प्रणाली विकसित करता येते. त्याचा फायदा बँकांनी घेतला, तरच त्यांची प्रगती होईल, असे प्रतिपादन सुदाम पाटील यांनी केले. जनता सहकारी गृहतरण संस्था मर्यादित आजराच्या वतीने आयोजित संचालक-कर्मचारी प्रशिक्षण शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. त्यानंतर त्यांनी संस्थेकडे सुरू केल्या जाणाऱ्या सीबीएस प्रणालीची सविस्तर माहिती दिली. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मारुती मोरे होते.
दुसऱ्या सत्रात सहकार क्षेत्रापुढील आव्हाने या विषयावर बोलताना प्रा. रवींद्र आजगेकर म्हणाले बदलते सहकार कायदे, वाढती स्पर्धा आणि ग्राहकांच्या अपेक्षा यामुळे सहकार क्षेत्रासमोर रोज नवीन आव्हाने येत आहेत. त्यांचा मुकाबला योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.
तिसऱ्या सत्रात व्हाईस चेअरमन डॉ.अशोक बाचुळकर यांनी गृहतारण संस्थाना उज्वल भविष्य काळ असल्याचे सांगितले. आपल्या कडे येणाऱ्या ग्राहकाचे पूर्ण समाधान झाले पाहिजे, त्यांना चांगली आणि तत्पर सेवा दिली पाहिजे, असे सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संचालक प्राचार्य, डॉ. अशोक सादळे यांनी केले. आभार व्यवस्थापक मधुकर खवरे यांनी मानले.
दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षण शिबीरासाठी संस्थेचे मॅनेजर मधुकर खवरे प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार व सर्व शाखेचे शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

निधन वार्ता
मालुबाई ईळके

धामणेपैकी इळकेवाडी येथील श्रीमती मालूबाई कृष्णा इळके वय ७० वर्षे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून आज मंगळवारी रक्षा विसर्जन आहे.

मलिग्रे येथे वॉटर एटीएमचे उद्घाटन

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे येथे वॉटर एटीएमचे उद्घाटन उत्साहात पार पडले. संयुक्त वाघाची तालीम मंडळाच्या संकल्पनेतून व मलिग्रे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला. एअरटेक प्रा.लि. कंपनीचे उद्योजक साईनाथ नेसरीकर यांच्या आर्थिक सहकार्याने ३.५० लाख खर्च करून गावाला फिल्टर केलेले आर. ओ. चे थंडगार व साधे पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले. उद्घाटन नाना नेसरीकर, सुशिला नेसरीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गुरव होत्या.
स्वागत व प्रास्ताविक संजय घाटगे यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सरपंच गुरव म्हणाल्या, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वॉटर एटीएमसाठी बोअरवेल सुरू करून देण्यात आला आहे. शुद्ध पाण्याच्या माध्यमातून मंडळाने चांगली सोय केल्याने ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. पंचायत समिती सदस्य समीर पारदे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून गावच्या विकासाला चालना मिळणार असून नेसरीकर कुटुंबियांकडून शुद्ध पाणी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष राऊ बुगडे यांनी किशोर जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केले असून याचा लाभ गावकऱ्यांना मिळणार आहे. यापुर्वीही मंदिराजवळ सौर दिवा बसविण्यात आला आहे. तसेच रूग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली असल्याचे सांगून त्यांनी कौतुक केले.
माजी सरपंच अशोक शिंदे यांनी गुजरात राज्यातील यशस्वी उद्योजक साईनाथ नेसरीकर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाला अर्थव वॉटर सेल्सचे प्रमुख ज्ञानेश्वर कांबळे, माजी सरपंच गजानन देशपांडे, उपसरपंच चाळू केंगारे, ग्रामसेवक धनाजी पाटील, आनंदा बुगडे, शंकर नेसरीकर, अनिल कागिनकर, आप्पाजी नेसरीकर, बाबू सावंत, सागर कांबळे, सुनील सावंत, अमर जोंधळे, सचिन सावंत, कल्पना बुगडे, सुनंदा बुगडे, शिवाजी नेसरीकर, उत्तम कागिनकर, शंकर बुगडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. संयुक्त तालीम मंडळाचे अध्यक्ष किशोर जाधव यांनी आभार मानले.

आजचे पंचांग
दिनांक : २ जून २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : द्वितीया (सायंकाळी ०७.०० पर्यंत) त्यानंतर तृतीया तिथी
नक्षत्र : मूळ नक्षत्र (रात्री १०.० पर्यंत) त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र
योग : साध्य योग (सकाळी ०७.१५ पर्यंत) त्यानंतर शुभ योग
करण : गराजा करण (सायंकाळी ०७.०० पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : धनु राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.५४ ते सायंकाळी ०५.४४ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१० ते दुपारी ०१.०३
सूर्योदय : सकाळी ०६.०१
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१२
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संभाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाटील प्रेमी कार्यकर्ते व शिवसैनिकांनी येथील आजरा ग्रामीण रुग्णालयामध्ये फळ वाटपासह वृक्षारोपण केले. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.



