गुरूवार २८ मे २०२६


सामूहिक श्रमदानातून बनवले आनंदवन कॉलनीतील गटर.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील आनंदवन कॉलनीतील पाणी निचरा समस्येवर तात्काळ कार्यवाही
आजरा येथील आनंदवन कॉलनी परिसरातील रहिवाशांनी पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून तळी निर्माण होणे तसेच रहदारीमुळे चिखल होऊन नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची मागणी स्थानिक नगरसेवक श्री. परशुराम बामणे यांच्याकडे केली होती.
या मागणीची तात्काळ दखल घेत नगरसेवक श्री. परशुराम बामणे यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी प्रवीण बैले. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. सुरज सुर्वे तसेच स्थानिक रहिवासी यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी करून चर्चा केली. पावसाळ्यात परिसरातील पाण्याचा योग्य निचरा व्हावा या दृष्टीने कच्च्या गटारी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
निर्णयानुसार तत्काळ जेसीबीच्या सहाय्याने कामाला सुरुवात करण्यात आली. रहिवाशांनी मागणी केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत कार्यवाही करून काम सुरू करण्यात आल्यामुळे आनंदवन कॉलनीतील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
गटार काम सुरू असताना नगरसेवक श्री. परशुराम बामणे , अध्यक्ष श्री. शिवाजी देसाई, उपाध्यक्ष श्री. मुसा भाई दरवाजकर, श्री. दयानंद भंडारी तसेच श्री. सुतार उपस्थित होते.स्थानिक रहिवाशांनी संबंधित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

वाटंगी येथील म्युरलची मुंबई पोलीस दलात निवड

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाटंगी तालुका आजरा येथे शाहू वस्तीत राहणाऱ्या म्युरल बेन डिसोझा हिची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. वाटंगी रोजरी हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण व त्यानंतर आजरा येथील रोजरी हायस्कूल मध्ये माध्यमिक शिक्षण व आजरा महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील पदवी घेतल्यानंतर तिने जी.एस. पाटील अकॅडमी गडहिंग्लजच्या माध्यमातून सदर भरतीसाठी प्रयत्न केले होते.
तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

आजरा हायस्कूलमध्ये एच .पी .व्ही. लसीकरण मार्गदर्शन संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा हायस्कूल येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी व उपकेंद्र पारेवाडी येथील आरोग्य सेवक दीपक हरणे तसेच आरोग्य सेविका सुचिता यांनी एच. पी .व्ही. लसीकरणासंदर्भात प्रशालेतील शिक्षक शिक्षिका ,पालक व विद्यार्थिनी यांना आयोजित कार्यक्रमांमध्ये सांगितली.
मुख्याध्यापक श्री.ए.एल.तोडकर यांनी आरोग्यसेवकांचे स्वागत केले. महाराष्ट्र शासनाने अथवा भारत सरकारने हा आजार होण्याअगोदरच त्याची लस जर वय वर्ष १४ ते १५ या वयोगटातील शालेय मुलींना दिली तर त्यांचे जीवनमान समृद्ध होईल. महत्त्वाचे म्हणजे हि लस प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनामार्फत मोफत दिली जाते. त्यामुळे प्रसार माध्यमांमध्ये पसरलेल्या अफवांवर विश्वास न ठेवता कॅन्सरसारखा जीवघेणा भयंकर आजार भविष्यकाळात होऊ नये म्हणून मुलींनी ही लस घेणे गरजेची आहे. यासाठी संबंधित मुलीना त्यांच्या पालकांनी आरोग्य केंद्रात स्वतः घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले.
मुख्याध्यापक श्री. ए.एल.तोडकर यांनी शासनाच्या या मोफत लस टोचणे उपक्रमाचे स्वागत करून आभार मानले. कारण बाहेर खाजगी दवाखान्यात भरमसाठ पैसे देऊन तीन- तिन डोस घ्यावे लागतात. म्हणून संबंधित पालकांनी जागृत होऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले.
कार्यक्रमासाठी श्री.महेश केसरकर, सौ.मेघा पाटील श्री.एस.जी.पाटील, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.

पर्यटनस्थळी स्वागत कचऱ्याने…
शहरवासीयांतून संताप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रामतीर्थ या निसर्गरम्य अशा प्रसिद्ध ठिकाणच्या मार्गावरील प्रवेशद्वारावरच अज्ञातांनी रस्त्याच्या मधोमध कचरा टाकून रामतीर्थचे सौंदर्य बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहरवासीयातून संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या उन्हाळी सुट्टीमुळे अनेक पर्यटक रामतीर्थ परिसराला भेट देत आहेत. हिरवाईने नटलेल्या निसर्गरम्य अशा रामतीर्थ परिसराला भेट देत असताना रस्त्याच्या मधोमधच काही मंडळींनी टाकलेल्या कचऱ्याचा त्रास या पर्यटकांना सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला तर कचरा टाकला जातोच परंतु चक्क रस्त्याच्या मधोमध कचरा टाकल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांकडून संताप व्यक्त होत आहे.
सामाजिक भान असणाऱ्या काही मंडळींकडून सदर कचरा तातडीने हटवण्यात येत असला तरीही रस्त्यावर कचरा टाकणे ही बाब निश्चितच लाजिरवाणी आहे.

निधन वार्ता
जनाबाई नांदवडेकर

वाटंगी ता. आजारा येथील जनाबाई तुकाराम नांदवडेकर ( वय वर्ष ८२ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
आजरा कारखान्याचे संचालक व शिक्षक नेते शिवाजी नांदवडेकर यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना,नातवंडे असा परिवार आहे.
सुवर्णा कुंभार

वाटंगी तालुका आजरा येथील सुवर्णा संभाजी कुंभार (वय वर्ष ५०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी संभाजी कुंभार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती व दोन मुले आहेत.
मऱ्याप्पा पाटील

हात्तीवडे ता. आजरा येथील श्री.मऱ्यापा रामा पाटील ( वय ९५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्याच्या पश्चातत दोन मुले, सुना, तिनं मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उत्तरकार्य आज गुरूवारी आहे.
आजचे पंचांग
दिनांक : २८ मे २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : द्वादशी (सकाळी ०७.५६ पर्यंत) त्यानंतर त्रयोदशी तिथी
नक्षत्र : चित्रा नक्षत्र (सकाळी ०८.०७ पर्यंत) त्यानंतर स्वाती नक्षत्र
योग : वरीयान योग (२९ मे पहाटे ०३.५४ पर्यंत) त्यानंतर परिघ योग
करण : बलवा करण (सकाळी ०७.५६ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : तूळ राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.१४ ते दुपारी ०३.५३ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१० ते दुपारी ०१.०२
सूर्योदय : सकाळी ०६.०२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१०
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
महत्त्वाच्या बातम्या
♦ कॉलेजमधील नावापुरती हजेरी व कोचिंग क्लासच्या नेटवर्कला शिक्षण विभागाकडून लगाम घालण्याचा आला असून महाराष्ट्रातील ९५११ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बायोमेट्रिक हजेरी पद्धत सुरू होणार आहे. त्यामुळे नावापुरता प्रवेश कनिष्ठ महाविद्यालयात व हजेरी खाजगी क्लासमध्ये हा प्रकार थांबवण्यास मदत होणार आहे.
♦ आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावपूर्ण परिस्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी घसरण नोंदवण्यात आली असून शेअर बाजार १४१.९० अंकांनी घसरून ७५८६७.८० बर बंद झाला. तर अमेरिकेत डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा ३ पैशांनी घसरला आहे.

आयपीएल न्यूज
सामनावीर वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक अशा २८ चेंडूत ९७ धावांच्या जोरावर राजस्थानने हैदराबादचा दणदणीत पराभव केला.
छायावृत्त



