mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार  २९ मे  २०२६

सुळेराननजिक अपघातात तरुण ठार…
एक गंभीर जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा – आंबोली मार्गावर सुळेराननजीक काल गुरुवारी सायंकाळी मोटरसायकल घसरून मोठ्या दगडाला आदळल्याने मोटरसायकल वरील मेढेवाडी येथील शुभम पांडुरंग दळवी ( वय २६ वर्षे ) हा तरुण जागीच ठार झाला तर मंगेश शिवराम पाटील ( वय २५ वर्षे ) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. यामध्ये मोटरसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की…

दोघेजण पर्यटन निमित्याने कोकणामध्ये गेले होते. परत येत असताना मोटरसायकल घसरून दगडावर आपटली व दोघेही मोटरसायकलवरून बाजूला फेकले गेले. शुभमच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच मृत पावला. तर मंगेश पाटील हा देखील गंभीर यांनी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शुभमची परिस्थिती बेताची असून त्याची आई अंगणवाडी सेविका म्हणून काम करते तर तो स्वतः पोल्ट्रीच्या गाडीवर काम करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. मंगेश हा देखील खाजगी दुकानातील कामगार आहे.

रात्री उशिरापर्यंत पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

गजरगाव येथे रस्ता कामाचे उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जयवंत सुतार यांच्या विशेष प्रयत्नातून गजरगाव ता. आजरा येथे तांडा वस्ती सुधार योजनेतून ₹ २२ लाख मंजूर असलेल्या अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन जयवंत मसणू सुतार यांचे हस्ते करण्यात आले. या कामासाठी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोकअण्णा चराटी होते.

याप्रसंगी आजरा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य समीर पारदे, संभाजीराव सरदेसाई, एम. टी. पाटील, सुरेश रेडेकर, आनंदराव कांबळे, सरपंच महादेव पाटील, भूषण भिऊंगडे , माजी सरपंच बाळासाहेब चव्हाण, भागोजी पाटील, गोविंद चव्हाण, विठ्ठल चव्हाण, गजानन कुलकर्णी, शिवाजीराव पाथरवट, अण्णापा पाथरवट,पार्थ पाटील, दयानंद चव्हाण, तुकाराम बामणे, आनंदा कातकर, अमोल सुतार, गणपती पाटील आदी उपस्थित होते.

सयाजीराव सरदेसाई यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सयाजीराव सरदेसाई रा. पोळगाव ता. आजरा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .निधन समयी त्यांचे वय ७९ वर्षे होते.

त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे .युवराज सरदेसाई व विनायक सरदेसाई यांचे ते वडील होत. रवळनाथ सेवा सोसायटी पोळगावचे ते माजी चेअरमन होते. 

नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच/ उपसरपंच यांचा सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आजराच्या वतीने पांडुरंग तोरगले यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार संपन्न झाला. यावेळी कोरीवडे सरपंच विवेक पाटील, चाफवडे उपसरपंच विजय भडांगे, वडकशिवाले उपसरपंच अमर पाटील, पेरणोली सरपंच सौ. वनश्री देसाई यांचा सत्कार करण्यात आला.

अध्याक्षिय मनोगतामध्ये तालुकाध्यक्ष पांडूरंग तोरगले म्हणाले,शासन स्तरावरील विविध उपक्रमामध्ये प्रत्येक गावाने हिरीरीने भाग घेऊन गावचा विकास साधावा त्यासाठी लागणारे मार्गदर्शन करणेची तयारी त्यांनी दर्शविली.

चाफवडे गावचे सरपंच धनाजी दळवी यांनी आभार मानले.

यावेळी राजू पोतनीस, सौ. शारदा गुरव, जी.एम. पाटील. सुनील बागवे, विलास जोशिलकर सरपंच मेंढोली, अनिल पाटील सरपंच मुरुडे, पांडुरंग खवरे सरपंच सुलगांव, लहू वाक्कर सरपंच किटवडे, सौ. रत्नप्रभा भुतूर्ले सरपंच चिथळे, मारुती बुरुड उपसरपंच देवर्डे, सौ. वैशाली गुरव सरपंच बुरुडे, वसंत कोडूसकर उपसरपंच सोहाळे , आनंदा कांबळे सरपंच गजरगाव, इत्यादी मंडळी उपस्थित होती.

तीस वर्षानंतर शालेय आठवणींना दिला उजाळा


उत्तूर…

उत्तूर विद्यालयातील दहावी १९९५-९६ बॅचचे विद्यार्थी तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा शाळेच्या उंबरठ्यावर एकत्र येत भावनिक स्नेहमेळावा भरविला. जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

उत्तूर येथील उत्तूर विद्यालयाच्या १९९५-९६ बॅचच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तीन दशकांनंतर पुन्हा एकत्र येत आपल्या  शिक्षकांच्या उपस्थितीत शाळा भरवली. या कार्यक्रमाला विद्यमान मुख्याध्यापक श्री. महापुरे यांच्यासह निवृत्त शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गुरव यांच्या हस्ते शाळेचे संस्थापक कै. अनंतराव आजगावकर आणि शाळेचे आधारस्तंभ कै. देशमाने डॉक्टर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सर्व शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. अनेकांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विद्यार्थी संग्राम आपके यांनी केले, तर प्रा. डॉ. बाळगोंडा पाटील सर यांनी आभार मानले.

या स्नेहमेळाव्याचे नियोजन डॉ. शैलेश ढबू, नंदा पाटील, संदीप काटे, सुधीर सावेकर, सुहास शेवाळे, कुबेर मोरे, संदीप भिऊंगडे आणि युवराज नाईक या स्थानिक वर्गमित्रांनी सर्वांच्या सहकार्याने केले.उपस्थित सर्व सहकारी मित्रांना युवा उद्योजक संतोष लोकरे यांचे कडून समीसह आरती ताट भेट स्वरूपात देण्यात आले.

(Advt.)

छायावृत्त..

हंदेवाडी ता. आजरा येथील विठ्ठल रुक्मिणी वसाहतीतील महात्मा गांधी रोजगार हमी योजना मधून मंजूर झालेल्या रस्त्यांची सुमारे ९९ लाखांची कामे प्रशासनाच्या निष्काळजीपणाने रखडली असून,संबंधितांवर कारवाई करून सदर कामे पावसाळ्यापूर्वी मार्गस्थ लावून ग्रामस्थांची चिखलातून चालण्याची सुटका करावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जस्मिन व जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आजऱ्यात बकरी ईद उत्साहात साजरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

येथे ईद-उल-अजहाँ / बकरी ईद उत्साहात आणि शांततेत पार पडली. ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधव एकत्र आले होते. मौलाना जक्रिया काकतिकर यांनी प्रवचन दिले. नमाज पठण आणि दुआ हाफिज नईम मुराद यांनी केली. यावेळी त्यांनी विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. तर कुतबा पठण हाफिज अल्ताफ नेसरीकर यांनी केले.

बकरी ईद सण म्हणजे त्यागाचा, शांतीचा आणि बलिदानाचा संदेश देणारा सण आहे. प्रेषित हजरत इब्राहिम यांच्या काळापासून कुर्बानी केली जाते. यंदाही हा सण उत्साहात साजरा झाला. मुस्लीम बांधवानी नवीन कपडे, अत्तर, सुकामेवा, दूध, शेवया या खरेदी केला. आज प्रत्येक घराता शिरकुर्माचा बेत होता. मुस्लीम बांधवानी अनुशासन पाळीत नमाज पठण केले. त्यांनी एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस नाईक अनंत देसाई उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

♦ कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अखेर आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर केला असून उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागणार हे स्पष्ट झाले आहे.

♦ ऑनलाइन आयपीएल क्रिकेट बॅटिंग प्रकरण भाजपाचे इचलकरंजीचे नगरसेवक नितेश उर्फ गोट्या किरण पवार यांच्यासह तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

♦ पिंपरी – चिंचवड शहरातील फुगेवाडीत हातभट्टीच्या विषारी दारूमुळे २४ तासात आठ जणांचा बळी गेल्या चे आणि दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.

♦ पेट्रोल, डिझेल, गॅस पाठोपाठ आता घरगुती वापरातील खाद्य तेलाचे दरही वाढले असून प्रति लिटर पाच रुपयांनी खाद्यतेले महाग झाली आहेत.

आजचे पंचांग

दिनांक : २९ मे २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : त्रयोदशी (सकाळी ०९.५० पर्यंत) त्यानंतर चतुर्दशी तिथी
नक्षत्र : स्वाती नक्षत्र (सकाळी १०.३७ पर्यंत) त्यानंतर विशाखा नक्षत्र
योग : परिघ योग (३० मे पहाटे ०४.३५ पर्यंत) त्यानंतर शिवा योग
करण : तैतुला करण (सकाळी ०९.५० पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : तूळ राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी १०.५७ ते दुपारी १२.३६ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१० ते दुपारी ०१.०२
सूर्योदय : सकाळी ०६.०२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१०
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज

आज दुसऱा क्वालिफायर सामना होत असून गुजरात विरुद्ध राजस्थान अशी ही लढत असून वैभव सूर्यवंशी हे मोठे आव्हान गुजरात समोर राहणार आहे. यातील विजयी संघ फायनल मध्ये दाखल होणार आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BREAKING NEWS

mrityunjay mahanews

करवाढीविरोधात आजरेकर एकवटले

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा अर्बन बँकेची वार्षिक सभा उत्साहात…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!