शनिवार ३० मे २०२६

सरकारने सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडले…
महागाई विरोधात शिवसेना ठाकरे गटाचा आजऱ्यात आक्रोश मोर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सरकारने सर्वसामान्यांना महागाईच्या काही लोटली असून देशाच्या आर्थिक स्थितीचे पूर्ण वाटोळे करून टाकले आहे . महागाई बरोबरच, पेट्रोल गॅस डिझेल इंधन दरवाढ तर होत आहेच त्याचबरोबर लाडक्या बहिणींचा घासही हिरावून घेण्याचे काम सुरू आहे असा आरोप करत सरकार विरोधात शिवसेना ठाकरे गटाचा आजऱ्यात आक्रोश मोर्चा काढला.छत्रपती संभाजी चौकात जोरदार निदर्शने केली.
या मोर्चाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला.माजी जिल्हाप्रमुख विजय देवणे व उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
विजय देवणे, युवराज पोवार, संजय येसादे, कॉं. शांताराम पाटील, संजय तर्डेकर आदींनी मार्गदर्शन केले.
आंदोलनात पंचायत समिती उपसभापती सौ.यशोदा पोवार, सौ.अनुसया पाटील, सौ.गिता देसाई,सौ.मिना पुजारी, दिनेश कांबळे, अमित गुरव, समीर चांद, सुनील डोंगरे, विलास किल्लेदार, सुयश पाटील, चंदर पाटील, बिलाल लतीफ, महेश पाटील, राजू बंडगर , प्रभाकर कोरवी यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले होते.

आजरा आगारातील अनियमित बससेवेबाबत निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सामाजिक सेवा प्रतिष्ठान प्रणीत अन्याय निवारण समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आजरा आगारातील अनियमित बससेवा, अपुरी वाहतूक व्यवस्था तसेच प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आजरा तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर एसटी बससेवेवर अवलंबून आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आजरा–कोल्हापूर तसेच आजरा–बेळगाव मार्गावरील वाहतूक सेवेमध्ये गंभीर त्रुटी जाणवत आहेत. चालक व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वारंवार बसगाड्या रद्द होणे, वेळापत्रकाचे पालन न होणे, बसगाड्यांची दुरवस्था, सकाळच्या वेळेत अपुऱ्या फेऱ्या, ऑनलाइन आरक्षणातील अडचणी तसेच ऑनलाइन पेमेंट व NCMC कार्ड स्वीकारण्यामध्ये होणाऱ्या तांत्रिक समस्या यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
आगारातील अनेक बसगाड्यांमध्ये स्वच्छतेचा अभाव असून नियमित साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी आगार व्यवस्थापक यांनी निवेदनातील प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून १५ जूनपूर्वी संबंधित बाबींवर आवश्यक कार्यवाही करून समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
या चर्चेमध्ये नगरसेवक परशुराम बामणे, माजी नगरसेवक अनिरुद्ध केसरकर, पांडुरंग सावरतकर, बंडोपंत चव्हाण, जावेद पठाण, जोतिबा आजगेकर, दिनकर जाधव आणि मिनीन डिसोझा यांनी सहभाग घेतला.

रुग्ण कल्याण समितीमध्ये गडहिंग्लज, आजरा,चंदगड, भुदरगड तालुक्याला प्रतिनिधित्व मिळावे…
शिवसेनेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गडहिंग्लज उपविभागात नागरिकांना आरोग्याची सेवा चांगल्या प्रकारे व माफक दराने मिळावी म्हणून उपजिल्हा रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे. गाडहिंग्लज तालुक्याबरोबरच आजरा, चंदगड, भुदरगड व कागल आणि सीमा भागातील रुग्ण आपले दैनंदिन आरोग्याचे उपचार करून घेण्यासाठी येथे येत असतात. गेली अनेक वर्षे रुग्णालयाच्या रुग्ण समिती वरती गडहिंग्लज तालुक्यालाच प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. उर्वरित तालुक्यातील नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून समावेश केल्यास त्यांच्या अडीअडचणी समजून येण्यास मदत होणार आहे. तसा समावेश करण्यात यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गट तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर संजय पाटील यांच्यासह संजय संकपाळ, राहुल खोत, संग्राम सिंह पाटील, सागर शिंत्रे आदींच्या सह्या आहेत.
छाया वृत्त

युवा नेते जयवंतराव सुतार यांचे विशेष प्रयत्नातून मलिग्रे ता.आजरा येथे मंजूर असलेल्या रुपये ९० लाखाच्या पूल आणी रस्ता कामाचे उद्घाटन भाजप चंदगड मतदारसंघ संयोजिका सौ.भारतीताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुक्याचे नेते अशोकअण्णा चराटी होते. याप्रसंगी जयवंत दादा सुतार यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या उतूरच्या तिघांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

उतूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर ग्रामपंचायतीच्या वतीने मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या गावातील तिघांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. नुकतीच मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या साक्षी उतूरकर, अक्षता भाईगडे आणि रोहन भोसले यांचा सत्कार सरपंच किरण आमणगी, उपसरपंच सुनिता हतिरगे तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी यांनी केले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य भैरू कुंभार, संदेश रायकर, अनिता घोडके, सुवर्णा नाईक, सुनिता केसरकर, आशा पाटील, सरिता कुरुणकर, सविता सावंत, ग्रामपंचायत अधिकारी पी. के. पाटील, रंजना उतूरकर, प्रभाकर भाईगडे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. आभार उपसरपंच सुनिता हतिरगे यांनी मानले.

गजरगाव येथे उद्या तुकाराम महाराज मूर्ती स्थापना व किर्तन सोहळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गजरगाव ता. आजरा येथे किसन महाराजांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संतश्रेष्ठ सद्गुरु तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमानापूर्ती मिरवणूक मूर्ती स्थापना, अनावरण व कीर्तन सोहळ्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
रविवार दिनांक ३१ मे रोजी ग्रामपंचायत पासून विठ्ठल मंदिर पर्यंत मूर्ती मिरवणूक निघणार आहे सायंकाळी साडेपाच वाजता हरिपाठ तर विठ्ठल मंदिर येथे सायंकाळी आठ वाजता महाप्रसाद होणार आहे.
सोमवार दिनांक १ जून रोजी सकाळी काकड आरती व श्री गुरु पुंडलिक महाराज देवकर यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण, विठ्ठल मंदिर ते लखमेश्वर मंदिर पर्यंत भव्य दिंडीने महाराजांचा प्रस्थान कार्यक्रम, सकाळी दहा वाजता ह.भ.प. पुंडलिक महाराज देहूकर यांचे कीर्तन व दुपारी लख,मेश्वर मंदिर येथे महाप्रसाद असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

नवचेतना अकॅडमीच्या वतीने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण येथील नवचेतना अकॅडमीच्या वतीने सरपंच सौ माधुरी गाडे यांचा वाढदिवस व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला . प्राचार्य रणजीत गाडे, श्रीकांत पाटीलनिवृत्त मुख्याध्यापक श्री मारुती देसाई , श्री तुकाराम सुतार , श्री संभाजी पाटील , श्री बाळासाहेब कुंभार ,श्री जाधव ,श्री किरण हणबर ,श्री संजय चौगुले यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
निधन वार्ता
विठोबा सुतार

कानोली ( ता. आजरा ) येथील विठोबा लक्ष्मण सुतार ( वय ७९ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे.
विठूबाई जाधव

घागरवाडी या.आजरा गावच्या रहिवासी श्रीमती विठूबाई दत्तू जाधव (वय ७२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. पांडुरंग तुकाराम जाधव यांच्या त्या आई होत.

आजचे पंचांग
दिनांक : ३० मे २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : चतुर्दशी (सकाळी ११.५७ पर्यंत) त्यानंतर पौर्णिमा तिथी
नक्षत्र : विशाखा नक्षत्र (दुपारी ०२.२० पर्यंत) त्यानंतर अनुराधा नक्षत्र
योग : शिवा योग (३१ मे पहाटे ०५.२४ पर्यंत) त्यानंतर सिद्ध योग
करण : वाणीजा करण (सकाळी ११.५७ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : तूळ राशी (सकाळी ०६.३८ पर्यंत) त्यानंतर वृश्चिक राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.१९ ते सकाळी १०.५८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१० ते दुपारी ०१.०२
सूर्योदय : सकाळी ०६.०२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.११
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८
आयपीएल न्यूज
गुजरात इन राजस्थान आऊट…
सांघिक खेळाच्या जोरावर गुजरातने राजस्थानला सात गाड्यांनी नमावले. कर्णधार शुभमन गिलने ५३ चेंडूत १०४ धावा फटकावत गुजरात संघाला अंतिम फेरीत तर पोहोचवले त्याचबरोबर राजस्थानला घरचा रस्ता दाखवला. राजस्थानच्या धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी याची संघाला विजयापर्यंत नेण्याची एकतर्फी धडपड व्यर्थ ठरली. रविवारी बंगळुरू विरुद्ध गुजरात अशी अंतिम फेरीची लढत होईल.


