mrityunjaymahanews
अन्य

एसटी चालकाला मारहाणप्रकरणी सातजणांविरोधात गुन्हा नोंद…

एसटी ड्रायव्हरला मारहाण
सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद

भडगाव वेगाने जाणारी इनोव्हा गाडी एसटीला घासल्याने गाडीतीलच सात जणांनी एसटीचे चालक रवींद्र रामचंद्र मगदूम (रा. पिंपळगाव ता. भुदरगड) यांना बेदम मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी मोहपाडा, रसायनी ता. खालापूर जि.रायगड येथील सात जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.सदर प्रकार सोमवारी सायंकाळी घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की… गडहिंग्लजकडून आज-या च्या दिशेने येणाऱ्या एसटी बसला एम एच ४६ ए.पी. २७३७ ही ईनोव्हा गाडी भरधाव वेगाने जात असताना घासली. या प्रकरणाला एसटी चालक जबाबदार आहे, असा समज करून चालक केबिनचे दार उघडून चालक रवींद्र मगदूम यांना रोशन बाळाराम राऊत, अजिंक्य विजय भिकोटे, प्रवीण जनार्दन गीत,अजित अनंत भोईर,राहुल बाळाराम राऊत, किशोर विठ्ठल भोईर, मिलिंद लक्ष्मण पांगत, सर्व रा. मोहपाडा, रसायनी ता. खालापूर, जिल्हा रायगड या सात जणांनी बेदम मारहाण करून जखमी केले. जखमी मगदूम यांना आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सदर घटनास्थळी आजूबाजूच्या नागरिकांनी व वाहन चालकांनी मोठी गर्दी केली होती. अशा घटना वारंवार घडत असून चार चाकी वाहन चालकांना आवर घालण्याची मागणीही आता होऊ लागली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी चालक मगदूम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

भटक्या कुत्र्यांना आवरा..
अन्यथा अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांना बांधून घालू

आजरा शहरामध्ये भटक्या जनावरांचा तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांचा वावर जास्त प्रमाणात वाढला असून , दोन दिवसांपूर्वी पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने सात जणांना गंभीर जखमी केले आहे. नगरपंचायतीकडून पिसाळलेल्या कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त आठ दिवसांत न झाल्यास अशा कुत्र्यांना पकडून नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या ऑफिस मधील टेबलला बांधण्यात येईल यांची खबरदारी घेवून ताबडतोब कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशा प्रकारचे निवेदन नगरसेवक व शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

यावेळी नगरसेवक अनिरुद्ध (बाळ) केसरकर,शिवसेना शहरप्रमुख ओंकार माद्याळकर ,महेश पाटील, अनिकेत देऊसकर , रोहन गीरी, गुडू खेडेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अक्षय भालेरावचा खून हा जातीव्यवस्थेचा बळी :

मोर्चाद्वारे श्रमिक मुक्ती दलाचा आरोप…


भारतातील जातीव्यवस्था संपवल्याशिवाय कष्टकऱ्यांची मुक्ती नाही. त्यामुळे आमच्यात फुट पाडणाऱ्या जातीव्यवस्थेचा खातमा केलाच पाहिजे अशी भूमिका श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई यांनी आज मोर्चासमोर बोलतांना मांडली.

श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली.देसाई आपल्या भाषणात पुढे म्हणाले, अपार मेहनत आणि कष्ट घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या निर्मितीत सर्वाधिक योगदान दिले. दलित, आदिवासी, भटके, विमुक्त आणि स्त्रिया यांना मुक्तीचा मार्ग दाखविला. त्याच बाबासाहेबांची जयंती साजरी केली म्हणून एका तरुणाचा निर्घुण खून केला जात असेल तर आपण माणूस म्हणण्याच्या लायकीचे तरी आहोत काय? आता केवळ निषेध करून चालणार नाही आपण जातीअंतासाठी सर्वांनी आपल्यातले भेद विसरून एकत्र आले पाहिजे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी सुध्दा आपल्या आडवी जात येत असेल तर तिला गाडून टाकले पाहिजे.

सावित्रीबाईनी मुलीसाठी केवळ शाळा सुरु केली असं नाही तर इथल्या धर्माने लादलेल्या स्त्रियांना गुलाम करणाऱ्या आणि त्यांना सतत हीन वागणूक देणाऱ्या प्रथांच्या विरोधात संघर्ष केला. विधवा केशवपनाच्या विरोधात नभिकांचा संप घडवून आणला. इथल्या बुरसटलेल्या धर्मव्यवस्थेला हादरा दिला त्यांच्याबद्दल बदनामीकारक लेख लिहण्याच धाडस कसं काय केलं जाऊ शकतं? ज्या मुलीनी देशाची मान आंतराराष्ट्रीय पातळीवर उंचावली त्या मुलींशी लैंगिक गैरवर्तन करणारे गुन्हेगार खुलेआम फिरत आहेत. उलट न्यायासाठी लढणाऱ्या मुलीना पोलिसी बळाचा वापर करून त्यांचे आंदोलन मोडीत काढले जाते. कारण त्यांना सरकारी पाठबळ आहे. याविरोधात आपल्याला एकत्र लढावेच लागेल.

यावेळी डॉ. नवनाथ शिंदे म्हणाले, या देशात अजूनही दलित आणि स्त्रियांना न्यायसाठी संघर्ष करावा लागत आहे ही दुर्दैवाची बाब आहे. जाती आणि धर्माच्या नावाखाली माणस मारली जात आहेत. स्त्रियांच्यावरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याविरोधात आपल्याला लढावेच लागेल.

सर्व श्रमिक संघटनेचे कॉ.शांताराम पाटील म्हणाले, आपण सर्वांनी एकत्र येऊन लढल्याशिवाय आता पर्याय नाही. आपल्यातील सगळे भेद विसरून एकत्र येवूया. येणाऱ्या निवडणुकीत या धर्मांध आणि जातीयवादी सरकारला सत्तेवरून पायउतार करूया.

यावेळी नारायण भडांगे, दशरथ घुरे, व्ही डी जाधव यांचीही भाषणे झाली. प्रकाश मोरुस्कर, अशोक मालव, संजय घाटगे, युवराज जाधव, भीमराव माधव, मुकुंद नार्वेकर, काशिनाथ मोरे, अमरसिंग ढोकरे, अनुबाई धनुकटेकर, संतोष सुतार, बाळू जाधव, रामू कोकरे, बयाजी येडगे यांच्यासह श्रमिक मुक्ती दल व सर्व श्रमिक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजऱ्यात मनसेचे खळ्ळ -खट्याक : नगरपंचायतीचे गाळे अखेर मूळ मालकांना देण्याचा निर्णय…… पोलिसांकडून साडेपाच लाखांची दारू नष्ट….. चारचाकी ने धडक दिल्याने जाधेवाडीतील महिला जखमी

mrityunjay mahanews

चांदेवाडी येथे मारामारी… सात जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!