गुरुवार दि. १२ डिसेंबर २०२४

अखेर जीव गेलाच…

ज्योतिप्रसाद सावंत
संकेश्वर – बांदा महामार्गावरील वनहद्दीतून जाणाऱ्या सोहाळे नजिकच्या मार्गावर काल बुधवारी अखेर सौ. सुरेखा कुडाळकर या महिलेला नाहक अपघाती मृत्यूला सामोरे जावे लागले. कधीतरी हे होणारच होते. याला वन हद्दीतून जाणाऱ्या मार्गाला अडवणारे वनखाते जबाबदार की धोकादायक पद्धतीने व घाई गडबडीने रस्ता तयार करणारा महामार्ग विभाग जबाबदार ? हा आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महामार्गावर ठिकठिकाणी तयार करण्यात आलेले पूल, मो-या व त्यांना जोडणारे रस्ते, विविध गावाला जोडणारे ॲप्रोच रस्ते व त्यावरील गतिरोधक यामध्ये व्यवस्थितपणा नसल्याने वाहनधारकांना अशा ठिकाणी वाहने चालवताना बरीच कसरत करावी लागते. विशेषत: या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नवीन वाहनधारकांना याचा निश्चितच त्रास होतो.
काल बुधवारी घडलेला अपघात हा या रस्त्याचा दर्जा स्पष्ट करणारा अपघात ठरला आहे. रस्ता तयार केल्यापासून कित्येक दिवस दुचाकी व चार चाकी वाहनधारकांना या अपघाती क्षेत्राचा दणका बसला आहे. सुदैवाने कालपर्यंत जीवित हानी झाली नव्हती. काल ती झाली. संपूर्ण रस्ता सरळ व सपाट असल्याने मध्येच तयार झालेल्या या धोकादायक जागेकडे वाहन चालकांचे फारसे लक्ष जात नाही परिणामी वाहनांना अचानकपणे जोरदार धक्का बसून वाहकांचे नियंत्रण सुटण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
या महामार्गावरून सध्या गोवा व कोकणच्या दिशेने जाणारी वाहने सुसाट आहेत. आजरा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या उसाचे ट्रॅक्टर्सची वाहतूकही वाढली आहे. या वाहनांचा त्रास स्थानिक वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
महामार्ग विभागाने पुन्हा एक वेळ या संपूर्ण रस्त्याचा सर्वे करून अशी धोकादायक ठिकाणे शोधून भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून योग्य ती उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
गव्यांचाही उपद्रव…
या ठिकाणी रस्ता ओलांडणाऱ्या गव्यांचाही उपद्रव वाहन चालकांना वारंवार होऊन अपघाताचे प्रकार घडले आहेत. रस्ता व्यवस्थित करण्याबरोबरच म्हसोबा देवस्थानच्या दिशेला असणाऱ्या वन क्षेत्रालाही गव्यांचा उपद्रव टाळण्यासाठी तारेचे कुंपण करणे गरजेचे ठरत आहे.
‘व्यंकटराव ‘ व महसूलच्या संयुक्त विद्यमाने मानवी हक्क दिन संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
व्यंकटराव हायस्कूल व आजरा तालुका महसूल विभागाच्या वतीने मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. तहसीलदार समीर माने, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी शशिकांत सावंत यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी गटशिक्षण अधिकारी शशिकांत सावंत म्हणाले , समाजात माणसाला माणूस म्हणून जगत असताना कायद्याने त्याला काही मूलभूत अधिकार ,हक्क देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे त्याची काही कर्तव्य पण आहेत याची जाणीव असणे गरजेचे आहे.तसेच समाजातील दारिद्र्य, विषमता, भेदभाव, पिळवणूक ,छळ इत्यादी कारणामुळे नागरी ,सामाजिक राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक बाबी संदर्भातील मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये म्हणून सर्वांना समान संधी सुनिश्चित करण्यासाठी अशा उल्लंघनाची चौकशी व अन्वेषणाचे कार्य आयोगामार्फत करण्यात येते असे सांगण्यात आले.
अध्यक्ष जयवंतराव शिंपी म्हणाले, मानवी अधिकाराबाबत होणाऱ्या उपेक्षेस पायबंद घालण्यासाठी व मूलभूत मानवी अधिकार ,मानवी व्यक्तिहिताची जन्मजात प्रतिष्ठा, योग्यता आणि स्त्री-पुरुषाचे समान हक्क तसेच त्यास भाषण स्वातंत्र्य ,धर्म स्वातंत्र्य, भय व आभावापासून मुक्ती अशी सर्वसाधारण लोकांची सर्वोच्च आकांक्षा शाबूत राहण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत १० डिसेंबर १९४८ रोजी मानवी अधिकाराची सार्वभौम घोषणा करण्यात आल्याचे सांगितले. तसेच राज्यात मात्र १५ जानेवारी २००० रोजी या आयोगाची स्थापना झाली.
तहसीलदार समीर माने यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत विविध उदाहरणांसह या मानवी हक्क आणि त्यांची कर्तव्य कोणती आहेत हे विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमासाठी प्राचार्य आर.जी. कुंभार, तहसील अव्वल कारकून माळी, दुय्यम निबंधक मुल्लाणी ,आजरा तलाठी समीर जाधव ,पर्यवेक्षिका सौ. व्ही जे. शेलार ,कलाशिक्षक कृष्णा दावणे,सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक शिवाजी पारळे यांनी केले व आभार पी. एस. गुरव यांनी मानले.
वनस्पती शास्त्रज्ञ डॉ.बाचूळकर यांचे शनिवारी हारूर येथे व्याख्यान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संवेदना फाउंडेशन , आजराच्या वतीने व संवेदना निसर्ग मित्र व स्थानिक संवेदना टीम हारूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ निसर्ग संवर्धन पर्यावरण जनजागृती, पर्यावरण पूरक शेती आणि वनस्पतीशास्त्र ‘ या विषयावर जेष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ, पर्यावरण तज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांचे शनिवार दिनांक १४ रोजी सकाळी दहा वाजता संवेदना फाउंडेशन, हरून येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
शेळप येथे दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम

गवसे : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सदगुरू पद्मनाभाचार्य स्वामी महाराज शिष्य संप्रदाय मंडळ, श्रीक्षेत्र दत्त मंदिर ,शेळप यांच्या वतीने हरिनाम सप्ताह व दत्त जयंती उत्सवाचे आज गुरुवार दिनांक १२ ते शनिवार दिनांक १४ डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीमध्ये महा अभिषेक, अखंड विणा नामस्मरण, ध्वज पूजन व ध्वजारोहण, महा अभिषेक पूजन,गुरुचरित्र पारायण, हळदी – कुंकू, दत्त जन्मोत्सव ,कीर्तन व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
निधन वार्ता
विश्वास कदम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सुलगाव तालुका आजरा येथील विश्वास गणपती कदम (वय ४९ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा,मुलगी,भाऊ असा परिवार आहे.
मारुती गोरे

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चव्हाणवाडी (ता.आजरा) येथील मारुती आबा गोरे (वय १०३)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा,मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.





