
मंगळवार दि.१५ सप्टेंबर २०२६

आजरा शहरासह तालुक्यात बाप्पांचे दणक्यात आगमन; पारंपारिक वाद्यांसह आतषबाजीने बाजारपेठ दणाणली

आजरा : प्रतिनिधी
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आजरा शहरासह संपूर्ण तालुक्यात गणरायाचे जल्लोषात आणि दणक्यात आगमन झाले. पारंपारिक वाद्यांच्या तालावर आणि आतषबाजीच्या धमाक्यात संपूर्ण बाजारपेठ दणाणून गेली होती.
आजरा शहरातील कुंभार गल्ली,मुख्य बाजारपेठ, संभाजी चौक परिसरासह विविध मंडळांच्या ठिकाणी सकाळपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात तरुणाई मोठ्या उत्साहाने नाचत होती. अनेक ठिकाणी लेझीम पथक, पारंपारिक वाद्ये व बँजो पथकांनी लक्ष वेधून घेतले.
तालुक्यातील गावागावातून आणलेल्या गणेश मूर्तींचे वाजत-गाजत आगमन झाले. यावेळी प्रचंड आतषबाजी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आजरा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. घरगुतीसह सार्वजनिक मंडळांच्या मुर्त्या आणण्यासाठी तरुणाई पुढाकार घेताना दिसत होती.
आजरा शहरासह भादवण,हात्तीवडे पेरणोली, गवसे, किणे, मलिग्रे सरंबळवाडी, वाटंगी मडिलगे यासह विविध गावांमध्ये उत्साहात गणरायाचे स्वागत करण्यात आले.
ढोल-ताशांच्या गजरात उत्तूर नगरीत गणरायाचे मंगलमय आगमन

उत्तूर : प्रतिनिधी
गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर उत्तूर नगरीने लाडक्या गणरायाचे पारंपरिक जल्लोषात स्वागत केले. सकाळी सात वाजल्यापासून कुंभार गल्ली ही गणेशमूर्ती घेण्यासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली. विविध आकारांच्या मूर्ती घेण्यासाठी कुटुंबांसह मोठी रेलचेल दिवसभर पाहायला मिळाली.
गणेशमूर्ती घेऊन निघालेल्या मिरवणुका ढोलताशा,टाळ,झांज आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात दिवसभर मार्गक्रमण करत होत्या. गणपती बाप्पा मोरया च्या अखंड जयघोषाने रस्ते, चौक आणि गल्लीबोळ भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक घरातून गणरायाच्या स्वागतासाठी उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
यंदाच्या उत्सवात पर्यावरणपूरकतेचा संदेशही ठळकपणे उमटला. ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी फटाक्यांना पूर्णपणे फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या साथीनेच गणरायाचे स्वागत करण्यात आले. मातीच्या मूर्ती आणि साधेपणातील देखण्या सजावटीमुळे यंदाची गणेश चतुर्थी उत्तूरमध्ये परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक जाणिवांचा संगम ठरली.
श्रीकांत कडोली यांचे निधन

आजरा : प्रतिनिधी
आजरा येथील शिवाजीनगर मधील हरहुन्नरी व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या गोवा पोलीस दलातील सेवानिवृत्त फौजदार श्री. श्रीकांत शंकर कडोली यांचे वृद्धापकाळाने वेरणा/ गोवा मुक्कामी निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८० वर्षे होते
त्यांच्या पश्चात दोन सुना, एक मुलगी, दोन नाती असा परिवार आहे.

गणेशोत्सवानिमित्त मडिलगे येथे स्वच्छता मोहीम

मडिलगे : प्रतिनिधी
“स्वच्छ गाव सुंदर गाव “माझा कचरा माझी जबाबदारी” मोहिमे अंतर्गत गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मडिलगे ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने साफसफाई केली .
साफसफाई करताना जो काही कचरा होता नेण्यासाठी वाहन उपलब्ध केले होते .गावातील ग्रामस्थांनी याला उत्तम असा प्रतिसाद दिला. संपूर्ण गावभर वाहन फिरवून कचरा गोळा करण्यात आला .प्रत्येकाने आपापला कचरा वाहना टाकून एक गावात उत्तम असा स्वच्छ गाव माझं गाव या उद्देशाने या उपक्रमाला सुंदर असे सहकार्य केले .इथून पुढेही हे असेच सहकार्य ग्रामस्थांनी ठेवून, मला माझं गाव मडिलगे स्वच्छ गाव ही संकल्पना मनात बाळगून मडिलगे ग्रामपंचायत मडिलगेला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच बापू नेऊंगरे यांनी केले.

प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांची राज्यस्तरीय तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून निवड

आजरा : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्यावतीने विद्यार्थ्यांमधील वाढत्या व्यसनाधीनतेविरोधात जनजागृतीसाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष उपक्रमासाठी आजरा महाविद्यालयाचे प्रा. मल्लिकार्जुन रामाप्पा शिंत्रे यांची राज्यस्तरीय तज्ज्ञ प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून निवड झाली आहे.
राज्यातील युवकांमधील व्यसनांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वयक व शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पर्यावरण आणि सामाजिक जनजागृती क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात प्रा. शिंत्रे व्यसनांचे दुष्परिणाम, प्रतिबंधात्मक उपाय आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका यावर मार्गदर्शन करणार आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल आजरा महाविद्यालय व परिसरातून अभिनंदन होत आहे.

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत आजरा हायस्कूलचे यश

आजरा: प्रतिनिधी
आजरा हायस्कूलच्या १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या कबड्डी संघाने आजरा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली आहे. मुलांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.१४ वर्षे वयोगटातील मुलीच्या कबड्डी संघाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकवला.
विजयी संघातील सहभागी खेळाडू :
सिद्दीक नजबुलाक वाडीकर,रुद्र कमलाकर केरकर, महंमद आयाज यासीन माणगावकर, अनंत संतोष गिरी, कुमार संतोष गोंडाडकर, अरहान मजीद तकिलदार, आयुष दौलत साबळे, सार्थक दिनकर हासबे, प्रज्वल प्रकाश लाड, समर्थ बाबुराव गुरव,समर्थ चिमाजी कदम, अथर्व रवींद्र लोहार
मुलीचा संघ…
वंदना भागोजी शेळके, रागिणी सचिन पाटील,श्रावणी तानाजी इलगे
,उत्कर्षा अनिल निर्मळे,ईश्वरी प्रकाश यादव ,वैष्णवी सुरेश गुरव,मनस्वी मारुती जाधव ,आफिफा सादिक नेसरीकर
श्री. एम. एस. गोरे , सौ.एम. पी. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
निधन वार्ता
शिवाजी कांबळे

होन्याळी (ता.आजरा) वृत्तपत्र विक्रेते शिवाजी रामचंद्र कांबळे (वय ५५) यांचे निधन झाले. उत्तूर व होन्याळी गावचे पोलीस पाटील म्हणून ते कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
गंगूबाई कागिनकर

मलिग्रे येथील गंगूबाई आकाराम कागिनकर वय ( वर्षे ८५ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्या पश्चात मुलगा सुन नातवंडे विवाहित तीन मुली असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन आज मंगळवारी सकाळी नऊ वाजता आहे.
यशवंत सावंत

पेरणोली येथील यशवंत रामा सावंत ( वय ७६ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. अमृत सावंत यांचे ते वडील होत.
आजचे पंचांग
दिनांक : १५ सप्टेंबर २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : चतुर्थी तिथी (सकाळी ०७.४४ पर्यंत) त्यानंतर पंचमी तिथी
नक्षत्र : स्वाती नक्षत्र (दुपारी ०३.२० पर्यंत) त्यानंतर विशाखा नक्षत्र
योग : इन्द्र योग (दुपारी १२.१९ पर्यंत) त्यानंतर वैधृति योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ०७.४४ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : तूळ राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.३७ ते सायंकाळी ०५.०८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०९ ते दुपारी १२.५८
सूर्योदय : सकाळी ०६.२७
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४०
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

गणेश दर्शन…२०२६
जय बजरंग तरुण मंडळ (पाथरवट समाज) गजरगाव

अध्यक्ष – सुशांत तानाजी पाथरवट
उपाध्यक्ष – दीपक श्रीकांत पाथरवट
खजिनदार – नेताजी अण्णासो पाथरवट
सचिव – गिरीश सुनील पाथरवट
