mrityunjaymahanews
अन्य

बुधवार – सातच्या बातम्या

बुधवार दि.१६ सप्टेंबर २०२६

बीरेश्वर पतसंस्थेच्या अलीशान अशा मुख्य कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन…

केंद्रिय गृह व सहकार मंत्री अमित शहा राहणार उपस्थित

…विशेष प्रतिनिधी

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते श्री बीरेश्वर को-ऑप मुख्य कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

दक्षिण भारतातील अग्रगण्य पतसंस्था अशी ओळख असणारी श्री बीरेश्वर सहकारी पतसंस्था, १९ सप्टेंबर रोजी एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होणार आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एक्संबा येथे संस्थेच्या विस्तीर्ण अत्याधुनिक मुख्य कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. अमित शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

एका विस्तृत कॅम्पसमध्ये पसरलेले, नवीन मुख्यालय आधुनिक सहकारी सुविधा म्हणून विकसित केले गेले आहे ज्यामध्ये प्रशासकीय कार्यालय, कम्युनिटी हॉल, मनोरंजन सुविधा, कर्मचारी निवासस्थान, सौर उर्जा पायाभूत सुविधा, उद्याने आणि एक मोठे पार्किंग क्षेत्र आहे.

अण्णासाहेब जोल्ले, माजी खासदार, संस्थेचे संस्थापक आणि NCUI गव्हर्निंग कौन्सिल सदस्य म्हणाले, “उद्घाटन सोहळा एक भव्य आणि यशस्वी कार्यक्रम बनवण्यासाठी आम्ही जोरदार तयारी करत आहोत.” “आमची टीम सर्व व्यवस्था सुरळीतपणे पार पडावी आणि कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी अथक परिश्रम घेत आहे. आम्ही केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे स्वागत करण्यासाठी आणि श्री बीरेश्वर सहकारी पतसंस्था आणि सहकारी चळवळीसाठी हा एक संस्मरणीय मैलाचा दगड बनवण्यास उत्सुक आहोत.”

ते पुढे म्हणाले. मुख्य प्रशासकीय इमारतीचे अंगभूत क्षेत्र सुमारे ८०,८०० चौरस फूट आहे आणि सुमारे २५० कर्मचारी सामावून घेऊ शकतात. कॅम्पसमध्ये श्री बीरेश्वर भवन,१५०० लोकांच्या आसनक्षमतेसह वातानुकूलित कम्युनिटी हॉल देखील आहे. सोसायटीने २० टू-बीएचके आणि तीन वन-बीएचके युनिट्सचे तीन निवासी कर्मचारी क्वार्टर देखील बांधले आहेत, ज्याचे एकूण बिल्ट-अप क्षेत्र ७२,०५६ चौरस फूट आहे. प्रत्येक ब्लॉकमध्ये खाजगी कार्यक्रम आणि लिफ्ट सुविधांसाठी एक हॉल समाविष्ट आहे.

संस्थेच्या कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा येथे एकूण २३३ शाखा असून सद्यस्थितीस ५७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी आहेत.

प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्था व गृहनिर्माण संस्थांपुढे सभासद टिकवण्याचे आव्हान ; सेवानिवृत्तीच्या लाटेने भवितव्य धोक्यात

आजरा : प्रतिनिधी

१९९० च्या दशकात प्राथमिक शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर भरती झाली होती. त्यावेळी शिक्षकांच्या आर्थिक गरजा, जागा, घर आदी प्रश्न सोडवण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी पतसंस्था आणि गृहनिर्माण संस्थांची स्थापना केली होती. या संस्थांमुळे शिक्षकांना मोठा आधारही मिळाला.

मात्र, या संस्थांच्या पोटनियमात सेवानिवृत्तीनंतर सभासदत्व संपुष्टात आणण्याची तरतूद असल्याने, अनेक सेवानिवृत्त शिक्षकांचे सभासदत्व कालांतराने रद्द झाले. सध्या ९० च्या दशकातील भरतीचे रूपांतर सेवानिवृत्तीमध्ये होत असून, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत.

एकीकडे सेवानिवृत्तांचे प्रमाण वाढत आहे, तर दुसरीकडे नवीन शिक्षक भरती अत्यल्प होत आहे. त्यामुळे पतसंस्थांसह इतर संस्थांना नवीन सभासद मिळणे कठीण झाले असून सभासद संख्या झपाट्याने घटत आहे. येत्या चार ते पाच वर्षांत सेवानिवृत्तीचे प्रमाण आणखी वाढणार असल्याने या संस्थांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

त्यातच सरकारी प्राथमिक शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच बाहेरच्या जिल्ह्यातून होणारी शिक्षक भरती मोठ्या प्रमाणावर असल्याने ते शिक्षक तालुक्यात कायम राहतीलच याची शाश्वती नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थांसह इतर सहकारी संस्थांपुढे सभासद टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

पोटनियमात बदल करण्याची गरज…

केवळ प्राथमिक शिक्षकांसाठी उभारण्यात आलेल्या या सहकारी संस्थांच्या पोटनियमात आता बदल अपेक्षित आहे. काही संस्थांच्या कारभाऱ्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून प्राथमिक शिक्षकांबरोबरच अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका या स्थानिक मंडळींना सभासदत्व देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केलेल्या आहेत

ठेवी वाढल्या कर्जाला मागणी नाही…

विविध संस्थांचे सभासद असणारे अनेक प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्तीनंतर कृतज्ञतेपोटी सभासद असलेल्या संस्थांमध्ये सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमा गुंतवताना दिसतात. त्यामुळे संस्थांच्या ठेवी वाढत आहेत परंतु सद्यस्थितीत बहुतांशी सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण झाल्या असल्याने कर्जाला अपेक्षित मागणी नाही. त्यामुळे ठेवीत भरमसाठ वाढ होत आहे परंतु कर्जाला मागणी नाही अशी अवस्था दिसत आहे.

उत्तूर येथील वसंतरावदादा पाटील विद्यालयात अभियंता दिन उत्साहात संपन्न

उत्तूर : प्रतिनिधी

वसंतरावदादा पाटील विद्यालय उत्तूर येथे महाराष्ट्र शासन-महावितरण यांचे वतीने महावितरणचे कार्यकारी अभियंता तसेच वसंतरावदादा पाटील विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. संजय कृष्णा पोवार यांनी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षक- शिक्षकेतर वृंद यांना तसेच उपस्थित पालकांना विद्युत सुरक्षा- हरित ऊर्जा व ऊर्जा बचत याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांना ऊर्जा बचतीची शपथ दिली. कार्यक्रमाची सुरुवात मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. मुख्याध्यापक एस.एस.कांबळे यांनी प्रास्ताविक तसेच प्रमुख वक्त्यांचे स्वागत केले. श्री. किरण आमणगी यांनी उपस्थितांना प्रमुख वक्त्यांची ओळख करून दिली. व सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कु.शरयू दिगंबर कुंभार तसेच कु. सानवी संतोष नाईक यांनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची ओळख करून दिली. उपस्थितांचे स्वागत एच.एस.हळवणकर सर यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. बी. राठोड यांनी केले तर आभार सौ.अस्मिता विद्याधर गुरव यांनी मानले. यावेळी श्री. आर व्ही थोरवत , ध्रुववत मोहिते तसेच महावितरणचे शांताराम भिऊंगडे, विजय पाटील, संदीप सावरतकर व इतर कर्मचारी देखील उपस्थित होते.

आजरा महाविद्यालयाच्या खेळाडूंची नॅशनल गेम्समध्ये चमकदार कामगिरी

आजरा : प्रतिनिधी 

मथुरा (उत्तर प्रदेश) येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची कमाई केली. सांघिक कबड्डीमध्ये मुलींच्या संघाने सुवर्णपदक पटकावत नॅशनल चॅम्पियनशिपवर नाव कोरले.

बॅडमिंटन वैयक्तिक प्रकारात सिद्धी राकेश करमळकर हिने सुवर्णपदक, साक्षी धनाजी पाटील हिने रौप्यपदक तर सिद्धी सतीश मोहिते हिने कांस्यपदक मिळविले.

ॲथलेटिक्समध्ये रेहान समीर शेख याने १०० मीटर धावण्यात, अश्विन शिवाजी कांबळे याने २०० मीटर धावण्यात, ओमकार संभाजी मांगले याने ३ किलोमीटर धावण्यात आणि रामचंद्र महादेव वास्कर याने ५ किलोमीटर धावण्यात सुवर्णपदक पटकावले. किशोर सुरेश लाड याने १०० मीटर धावण्यात रौप्यपदक मिळविले.

कबड्डीच्या विजेत्या मुलींच्या संघात पायल कोकितकर, सुप्रिया घुरे, ऋतुजा धडाम, वैभवी तेजम, समृद्धी तांबेकर, सिद्धी मोहिते, सुहाना हिंग्लजकर, सिद्धी करमळकर, सानिका करमळकर, साक्षी पाटील, प्रतीक्षा पाटील, रसिका सुतार, समीक्षा केसरकर, मानसी पोटे व समीक्षा पाटील यांचा समावेश होता.

या यशाबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे चेअरमन श्री. अशोक अण्णा चराटी, श्री. विलासराव नाईक, डॉ. अनिल देशपांडे, श्री. रमेश कुरुणकर, डॉ. दीपक सातोस्कर, श्री. विजयकुमार पाटील, श्री. के. व्ही. येसणे, श्री. अनिकेत चराटी, श्री. आय. के. पाटील, प्राचार्य डॉ. किरण पोतदार, उपप्राचार्य श्री. दिलीप संकपाळ, श्री. योगेश पाटील, श्री. मनोज पाटील, क्रीडा संचालक डॉ. धनंजय पाटील व श्री. अल्बर्ट फर्नांडिस यांनी अभिनंदन केले. खेळाडूंना संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य व क्रीडा विभागाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

आजऱ्यात आज भव्य स्वतंत्र तबला व मृदंग वादन स्पर्धा – २०२६

आजरा : प्रतिनिधी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आजरा तालुका यांच्यावतीने भव्य स्वतंत्र तबला व मृदंग वादन स्पर्धा – २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा आज बुधवार दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता ‘मृत्यूंजय’ कार शिवाजीराव सावंत सभागृह, आजरा येथे होणार आहे.

स्पर्धा दोन गटात होणार आहे.
लहान गट (वय १४ वर्षापर्यंत) – प्रवेश फी १५० रु. प्रथम बक्षीस ३,००० रु. सह सात बक्षिसे. तर मोठा गट (वय १५ ते २९)* – प्रवेश फी २०० रु. प्रथम बक्षीस ५,००० रु. सह सात बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्व विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी व सर्व सहभागींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

लहान गटासाठी स्पर्धा फक्त आजरा तालुक्यापुरती मर्यादित असून मोठा गट आजरा, गडहिंग्लज व चंदगड या तीन तालुक्यांसाठी खुला आहे.

पंडित दीनदयाळ विद्यालय, आजरा येथे आज पालक प्रबोधन

आजरा : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या भावनिक, मानसिक, सामाजिक व नैतिक विकासासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत पालकांनी आपल्या पाल्यांना समजून घेत योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असून, याच उद्देशाने पंडित दीनदयाळ विद्यालय, आजरा येथे ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर पालक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम आज बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ठीक १२ वाजता विद्यालयाच्या परिसरात होणार आहे. कार्यक्रमास माननीय श्री. रत्नाकर पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून ते उपस्थित पालकांना ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

पाल्यांच्या अभ्यासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मुलांशी प्रभावी संवाद, त्यांच्या भावविश्वाची जपणूक, मोबाईल व डिजिटल माध्यमांचा योग्य वापर, संस्कारांची रुजवणूक तसेच मुलांच्या क्षमता व आवडी ओळखून त्यांना योग्य दिशा देणे, अशा विविध महत्त्वपूर्ण बाबींवर या कार्यक्रमातून मार्गदर्शन मिळणार आहे.

पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंडित दीनदयाळ विद्यालय, आजरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

गणेश दर्शन…

श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आजरा (वर्ष ९८ वे )


अध्यक्ष : किशोर म्हापसेकर
उपाध्यक्ष : सुधीर उर्फ बापू कुंभार
खजिनदार : रमण केसरकर, गौतम देशपांडे, अभिजित केसरकर
सचिव : किशोर पारपोलकर

सुभाष चौक गणेशोत्सव मंडळ, आजरा


अध्यक्ष – सचिन सुभाष नलवडे
उपाध्यक्ष – मनिष माधव टोपले
सचिव – नितीन सुभाष कारेकर
खजिनदार – कपिल दिवाकर नलवडे

आजचे पंचांग

दिनांक : १६ सप्टेंबर २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : पंचमी तिथी (सकाळी ०८.५९ पर्यंत) त्यानंतर षष्ठी तिथी
नक्षत्र : विशाखा नक्षत्र (सायंकाळी ०५.२२ पर्यंत) त्यानंतर अनुराधा नक्षत्र
योग : वैधृति योग (दुपारी १२.२२ पर्यंत) त्यानंतर विष्कुम्भ योग
करण : बलवा करण (सकाळी ०८.५९ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : तूळ राशी (सकाळी १०.४८ पर्यंत) त्यानंतर वृश्चिक राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.३३ ते दुपारी ०२.०५ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.२७
सूर्यास्त : सायंकाळी ०६.३९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

काँग्रेसची उद्यापासून जनसंवाद यात्रा

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तरुणाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सर्वसामान्यांच्या चुली पेटवण्याचे काम आम. आबिटकर यांनी केले

mrityunjay mahanews
error: Content is protected !!