
गुरुवार दि.१७ सप्टेंबर २०२६


मडीलगे येथे ‘मैत्री फाऊंडेशन’तर्फे वनराई बंधारा
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमातून जलसंधारणाला चालना ; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

मडीलगे : प्रतिनिधी
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने मडीलगे येथे ‘मैत्री फाऊंडेशन’च्या वतीने वनराई बंधारा बांधण्यात आला. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मडीलगे परिसरात पावसाळ्यामध्ये पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढतो. मात्र, हे पाणी योग्य ठिकाणी अडविले गेले नाही तर ते वाहून जाऊन त्याचा अपेक्षित उपयोग होत नाही. ही बाब लक्षात घेऊन मैत्री फाऊंडेशनने जलसंधारणाचा उपक्रम हाती घेतला. उपलब्ध स्थानिक साधनसामग्रीचा वापर करून वनराई बंधारा उभारण्यात आला. बंधाऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह काही प्रमाणात अडविला जाऊन पाणी साठण्यास तसेच परिसरातील जमिनीत पाणी मुरण्यास मदत होणार आहे.
या कामात फाऊंडेशनचे सदस्य आणि ग्रामस्थांनी प्रत्यक्ष सहभाग घेत श्रमदान केले. बंधाऱ्याच्या ठिकाणी मातीची कामे, पोती भरणे व त्यांची योग्य रचना करून पाण्याचा प्रवाह अडविण्याचे काम करण्यात आले. वनराई बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणी काही काळ अडून राहण्यास मदत होणार असून, त्याचा फायदा आजूबाजूच्या शेती क्षेत्राला आणि नैसर्गिक जलस्रोतांना होऊ शकतो. पाणी जमिनीत मुरल्यामुळे भूजलसाठा वाढण्यासही हातभार लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा
या उपक्रमावेळी सरपंच बापू निऊंगरे, उपसरपंच सौ. मनीषा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य अभिजित मोहिते, पांडुरंग जाधव यांच्यासह मैत्री फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच ग्रामस्थ उत्तम जाधव, तानाजी येसणे, शैलेश निऊंगरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
यावेळी उपस्थितांनी जलसंधारणाची कामे केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहभागातून सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त केली. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने पाणी बचत, जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

उत्तूर प्राथमिक केंद्रावर औषधटंचाईचे सावट..
उपकेंद्रे रिकामी, रुग्णांची फरफट…

उत्तूर :उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्राला वारंवार मागणी करूनही आवश्यक प्रमाणाच्या अवघा ५० टक्के पेक्षाही कमी औषधपुरवठा होत असल्याने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचा दिसत आहे. वाढती लोकसंख्या आणि रुग्णसंख्या लक्षात घेता मिळणारा साठा अपुरा ठरत असल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तूर पीएचसीअंतर्गत आरदाळ, बहिरेवाडी, बेलेवाडी, चिमणे, होण्याळी व वडकशिवाले ही सहा उपकेंद्रे कार्यरत आहेत. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रालाच पुरेसा साठा मिळत नसल्याने उपकेंद्रांकडे पाठवण्यासाठी औषधे शिल्लक राहत नाहीत. परिणामी बीपीच्या रुग्णांना उपचारासाठी उत्तूर गाठावे लागत आहे.ॲम्लोडिपिन, टेल्मिसार्टन ॲपस्पिरिन या बीपीच्या औषधांची मागणी केली जाते मात्र पुरवठा अपुरा असल्याने बीपीच्या रुग्णांना ही औषधे बाहेर विकत घ्यावी लागतात त्यामुळे रुग्णांच्या खर्चात भर पडत आहे.
शुगरच्या गोळ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना शुगर तपासणीसाठी आवश्यक टेस्टिंग स्ट्रिप्स मात्र अत्यल्प उपलब्ध आहेत. त्यामुळे उपकेंद्रांना स्ट्रिप्स देता येत नाहीत. एका बॉक्समध्ये १०० स्ट्रिप्स असून त्याची किंमत सुमारे १,००० ते १,२०० रुपये आहे आणि एका स्ट्रिपमधून एका व्यक्तीची तपासणी होते. उत्तूर पीएचसीमध्ये दररोज सुमारे ५० ते ६० रुग्ण शुगर तपासणीसाठी येतात, तर उपकेंद्रांमध्ये चार ते पाच रुग्ण येतात.
याशिवाय TT इंजेक्शन आणि ARV (Anti-Rabies Vaccine) यांचीही नियमित मागणी असते. विशेषतः प्राण्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये ARV वेळेत उपलब्ध असणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून संबंधित आरोग्य विभागाच्या औषध पुरवठा यंत्रणेकडे मागणी केली जाते मात्र मंजूर मागणीच्या तुलनेत प्रत्यक्ष पुरवठा कमी मिळत असल्यास त्याचा थेट परिणाम उपकेंद्रांवर होतो. ग्रामीण आरोग्यसेवेचा भार कमी करण्यासाठी उपकेंद्रांना पुरेसा औषधसाठा उपलब्ध असणे आवश्यक असताना उलट पीएचसीलाच अपुरा पुरवठा होत असल्याने संपूर्ण साखळीवर परिणाम होत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने उत्तूर पीएचसीला मागणीनुसार पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्याबरोबरच बीपीची औषधे, ॲपस्पिरिन,शुगर टेस्टिंग स्ट्रिप्स, TT इंजेक्शन आणि ARV यांचा नियमित पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
“सार्वजनिक सुविधा जितक्या महत्त्वाच्या आहेत त्याहून अधिक आरोग्यसेवा ही थेट माणसाच्या जीवनाशी निगडित असल्याने तिचे महत्त्व अधिक आहे. औषध टंचाईमुळे ग्रामीण रुग्णांची होणारी गैरसोय चिंताजनक आहे. प्रशासनाने आरोग्य सुविधांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.”
…..भास्कर भाईगडे (प्रतिष्ठित व्यापारी)

‘व्यंकटराव’ मध्ये हिंदी दिवस उत्साहात संपन्न

आजरा : प्रतिनिधी
येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये हिंदी दिनानिमित्त मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संचालक श्री सचिन शिंपी यांचे हस्ते करण्यात आले.हिंदी दिनाचे महत्त्व आणि त्याबद्दल माहिती आयोजक इयत्ता दहावी ड या वर्गातील विद्यार्थ्यांसह प्राचार्य श्री एस एन पाटील, श्री डी आर पाटील, श्री.व्ही टी कांबळे, यांनी सांगितली. या दिनानिमित्त खालील अभिवाचन स्पर्धा व काव्य गायन स्पर्धा संपन्न झाल्या यातील निवडक विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सादरीकरण करण्यात आले.
हिंदी दिन स्पर्धा निकाल…
अभिवाचन (मोठा गट)
१) हाजीक सय्यद — प्रथम,२) सावनी लक्ष्मण चौगुले — द्वितीय,३) राजलक्ष्मी शिवानंद गवळी — तृतीय,४) रुद्रा संजय देसाई — उत्तेजनार्थ,५) सृष्टी सुनील भिकले — उत्तेजनार्थ
काव्यवाचन (मोठा गट)
१) संस्कृती गुरव — प्रथम,२) प्रणाली प्रसाद कुंभार — द्वितीय
गायन (मोठा गट)
१) जान्हवी प्रकाश बागडी,२) मनस्वी महेश पाटील३) प्राप्ती सुभाष गुरव
काव्यगायन (लहान गट)
अद्विता किशोर खोत – प्रथम,आजविका विकास हरेर – द्वितीय,अफझल तौफीक नसरदी – तृतीयसुमित सुनील खराडे – उत्तेजनार्थ, विराज बाळु मिसाळ –
अभिवाचन _स्वर्णिका संदिप खामकर – प्रथम,आरोही विश्वास कदम – द्वितीय,वैदेश्री विक्रमसिंह देसाई – तृतीय ,उत्तेजनार्थ- स्वरांजली पाटील , इक्रा लमतुरे
काव्यवाचन- ,अमृता उंडगे, करण राजाराम बोलके
शर्वरी विलास शिंत्रे,
उत्तेजनार्थ -आराध्या अशोक वडर ईश्वरी गुंजाटे
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. आर.एन.पाटील यांनी केले व आभार श्रीम. एस. के. कुंभार यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.

गणेश दर्शन
समता तरुण मंडळ, उत्तूर.

अध्यक्ष : जगन्नाथ रणवरे
उपाध्यक्ष : दिपक कांबळे
सचिव : सर्जेराव धुरे
खजिनदार : भैरू निउंगरे
श्री.गणेश मित्र मंडळ ,उत्तूर (स्थापना -१९९५)

अध्यक्ष :श्री. संतोष लोखंडे
उपाध्यक्ष : संदीप चव्हाण
सचिव : अनिकेत धुरे
खजिनदार : अमर घेवडे

आजचे पंचांग
दिनांक : १७ सप्टेंबर २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : षष्ठी तिथी (सकाळी १०.४७ पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
नक्षत्र : अनुराधा नक्षत्र (सायंकाळी ०७.५३ पर्यंत) त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र
योग : विष्कुम्भ योग (दुपारी १२.४८ पर्यंत) त्यानंतर प्रीति योग
करण : तैतुला करण (सकाळी १०.४७ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी
सूर्य राशी : सिंह राशी (सकाळी ०७.५२ पर्यंत) त्यानंतर कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.०४ ते दुपारी ०३.३६ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०७ ते दुपारी १२.५७
सूर्योदय : सकाळी ०६.२७
सूर्यास्त : सायंकाळी ०६.३८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

पं. दीनदयाळ विद्यालय मध्ये ‘सुजाण पालकत्व’ मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरा : प्रतिनिधी
पं .दीनदयाळ विद्यालयामध्ये पार पडलेल्या ‘ सुजाण पालकत्व ‘मेळाव्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सहशालेय उपक्रम ,शैक्षणिक प्रगती,पालकांच्या समस्या ,सुजाण पालकत्व याबद्दलचे विचार विद्यालयाचे मुख्याध्यापक एस .वाय .देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकेत मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधीर मुंज यांनी मुलांचे भावविश्व पालकांनी समजून घेऊन समजदार पालक व्हावे असे विचार व्यक्त केले.
प्रत्येक पालकाने आत्मचिंतन करून आपल्या पाल्याचे व्यक्तिमत्व घडवले पाहिजे. संगोपन हे एक कौशल्य आहे. असे मौलिक विचार शैक्षणिक सल्लागार एम. के. नोरेंज यांनी आपल्या मनोगतात मांडले.आताची मुले भावनिक दृष्ट्या प्रगल्भ होत आहेत. पालकांना प्रेम आणि शिस्त यांच्यामध्ये समन्वयता साधता आली तर पालक सुजाण पालक होऊ शकतो. आपल्या पाल्याला वेळ देऊन त्यांना समजून घ्या, स्वतःच्या भावना ओळखून मुलांविषयी भावना व्यक्त करा .त्याला सुधारण्याऐवजी त्याच्याशी नातं जोडा. तुमचे प्रेम मुलापर्यंत पोहोचवा. मुलाच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करा. मुलांचे फक्त सल्लागार होऊ नका अशा अनमोल विचारांनी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शेरोन नोरेंज यांनी पालकांना मार्गदर्शन केले. प्रमुख व्याख्याते रत्नाकर पाटील यांनी सामाजिक कार्य करताना आलेले अनुभव सांगून पालकांना योग्य मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या या जगात ,गतिमान युगात ,कुटुंब व्यवस्थेत झालेला बदल यामुळे मुलांच्या होत चाललेल्या वर्तनातील बदल ओळखून पालकाने मुलांचे मालक न होता सुजाण पालक झाले पाहिजे. पाल्याला वेळ देऊन समजून घेऊन त्याच्या हुशारीला चालना दिली पाहिजे.मुलांशी शांतपणे बोलून त्यांच्या मनातील द्वंद्व थांबवा . त्यांना आलेल्या अनुभवातून समर्पक मार्गदर्शन पालकांना केले. सध्या त्यांनी ‘पालकांची शाळा’ हा उपक्रम सुरू करून पालकांना सुजाण पालक होण्याचे आवाहन केले. बदलत्या जीवनशैलीमध्ये पालकत्वाची ,जबाबदारीची आणि संवेदनशील भूमिका त्यांनी अधिक स्पष्ट केली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव मलिक कुमार बुरुड, संस्थेचे संचालक सुधीर कुंभार, नाथ देसाई, आजरा नगरपंचायतीच्या नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार, सौ. रेश्मा बुड्डेखान, माजी विद्यार्थी नौशाद बुड्डेखान, पालक आणि आजरा गावातील सुजाण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी प्रभू तर आभार बी.पी बुरुड यांनी मानले.
आज आजऱ्यात शिक्षण हक्क परिषद...
आजरा : प्रतिनिधी
शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीप्रमाणे सरकारी शाळांचे मजबुतीकरण करणे (पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालये, मैदान इत्यादी अकरा भौतिक सुविधांसह पुरेसे शिक्षक),शाळा व्यवस्थापन समितीचे अधिकार व कर्तव्ये यासह व्यवस्थापन समितीचे बळकटीकरण करणे,दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासह गाव, वाडी, वस्ती, तांडा तिथं शाळा या मुद्द्यांवर गंभीर चर्चा करण्यासाठी आज गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच तर्फे शिक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
वेळ-
गुरुवार दि १७ सप्टेंबर २०२६ रोजी ठीक ११.०० वाजता.
ठिकाण-
‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत स्मृतीदालन, आजरा.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दर्डेवाडी यांच्या वतीने रक्तदान शिबीर उत्साहात

गवसे : प्रतिनिधी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दर्डेवाडी यांच्या मार्फत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन मंडळाचे उपाध्यक्ष श्री. संतोष शिवाजी केरकर व ग्रामपंचायत सदस्या सौ.विद्या सुरेश पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले रक्तदान शिबीर मध्ये मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

