शुक्रवार दि.११ सप्टेंबर २०२६


जीवित हानी झाल्यावरच वनखाते हत्तीसाठीची उपाययोजना करणार का?
पंचायत समिती सभेत वनखाते धारेवर

आजरा : प्रतिनिधी
आम्हाला नुकसान भरपाई नको,हत्तीबाबत ठोस उपाययोजना करा.मनुष्यहानी झाल्याशिवाय वनखाते जागे होणार की नाही अशी विचारणा करत पंचायत समितीच्या बैठकीत वनखात्याला धारेवर धरले. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी सभापती यशोदा पोवार होत्या.
सभेत चौथी,सातवीच्या शिष्यवृत्ती पात्र व बॅडमिंटनमध्ये गोल्ड मेडलीस्ट ठरलेल्या सिद्धी करमळकर यांचाअभिनंदनाचा ठराव करण्यात आला.यानंतर विभागवार चर्चा झाली. वनखात्याच्या विभागाची माहिती देत असताना जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई यांच्यासह प्र.सभापती यशोदा पोवार, सदस्य समीर पारदे,विकास चोथे यांनी वनखात्याला चांगलेच धारेवर धरले.आजऱ्यामध्ये असणारे दोन हत्ती केंव्हा हुसकावून लावणार? यावेळी हत्ती संगोपन केंद्र होणार असल्याचे वन प्रतिनिधी यांनी सभेत सांगितले यावर केंद्र व्हायला दोन वर्षे लागतील पण या दरम्यान जर हत्तीकडून मनुष्यहानी झाली तर याला जबाबदार कोण?जर हानी झाली तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करु असा इशारा जि.प.सदस्य देसाई यांनी दिला. तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नको पण कायमस्वरूपी उपाययोजना हवी.हत्ती व वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे शेतकरी शेताकडे जाणे सोडले आहे.शेती ओसाड पडत आहे त्यामुळे तालुक्यातील दोन्ही हत्तींना त्वरित हुसकावून लावावे अशी मागणी यासभेत करण्यात आली.
पंचायत समितीच्या मासिक सभेस अधिकारी अनुपस्थित असतात याबद्दल पुन्हा नाराजी व्यक्त करण्यात आली. खातेप्रमुखांच्या सवडीने सभा घेवूया. कांही अधिकाऱ्यांना या सभेचे गांभीर्य नाही त्यामुळे मनमानी सुरु आहे.आठ दिवसांपूर्वी नोटीस देऊनही सभेस गैरहजर असतात. प्रत्येकवेळी नवीन प्रतिनिधी येतात त्यामुळे मागील मुद्दे रहातात.लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही येतो पण याचा उपयोग होत नसेल तर काय उपयोग?अशी नाराजी सदस्य विकास चोथे यांनी व्यक्त केली.
भागात संमत्ती असेल तरच वीज स्मार्ट मिटर बसवावे, क्रीडा संकुलन हस्तांतरित करावे अशी मागणी प्र.सभापती पोवार यांनी केली.श्रृंगारवाडी येथील क्रेशरमुळे रस्ता खराब होत असल्याचे जि.प.सदस्य देसाई यांनी निदर्शनास आणून दिले.गौण खनिज विभागाकडून कारवाईचे पत्र पाठवावे असे सांगितले.गणपती सणासाठी मुंबई,पुणे येथे जादा बसेसची सोय करण्यात आल्याचे आगार व्यवस्थापक यांनी सांगितले.तालुक्यात ६६ प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.२१ शिक्षक पवित्र पोर्टल मधून मिळणार असल्याचे शिक्षण विभागाने माहिती दिली.शासनाच्या निर्णयानुसार २०११ पूर्वीची १३० अतिक्रमणे कायम करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाने सांगितले.यावेळी गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

राघव सरदेसाई युवा मंचची दहीहंडी गडहिंगलच्या नेताजी पालकर व्यायाम शाळेच्या गोविंदांनी फोडली
आजरा : प्रतिनिधी
आजरा शहरासह जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेली राघव सरदेसाई युवा मंचच्या दहीहंडीचा कार्यक्रम दणक्यात पार पडला. गडहिंग्लजच्या नेताजी पालकर व्यायाम शाळेच्या गोविंदांनी १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत राजापूर रत्नागिरी येथील हनुमान व्यायाम शाळा, खंडोबा तालीम, आजरा आदींनी सहभाग नोंदवाला.
दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर ढोल ताशा पथक, सांस्कृतीक कार्यक्रम, विद्युत रोषणाई, डीजे, आतषबाजी विविध कार्यक्रमांची रेलचेल ठेवण्यात आली होती.
मंडळाचे प्रमुख राघव सरदेसाई, जयबाबा सरदेसाई यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले.माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रम प्रसंगी हिंदू राष्ट्रीय सेना प्रमुख धनंजय भाई देसाई यांनीही मार्गदर्शन केले. रिल स्टार अस्मिता खटावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम प्रसंगी अण्णाभाऊ संस्था समूहाचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, माजी सभापती सौ. रचना होलम, डॉ. राजलक्ष्मी देसाई, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, अनिकेत चराटी, धनश्री देसाई, विजयकुमार पाटील, सुधीर कुंभार, विलास नाईक, युवराज पोवार, नगरसेवक परशुराम बामणे, नगरसेविका सौ. स्मिता कुंभार, समीर चांद, पांडुरंग तेरसे, आय.के. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण सरदेसाई, नाथा देसाई, शिवराज देसाई, महेश दळवी, अभिषेक रोडगी, सचिन इंदलकर, हर्षद कोलते, हर्षद सावंत, राहुल नेवरेकर, रुपेश निर्मळे, सुयोग बेळगुंदकर, दिगंबर सुतार, गौरव देशपांडे, सूर्यकांत भादवणकर ,अवधूत नाईक, ओम चंदनवाले, दीपक पवार, श्रेयस सकट, मीनल चाळके, कीर्ती पाटील, अनिल वाघोजी, समर्थ सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.

श्री लक्ष्मी सहकारी दूध संस्था मर्या., किणेकडून रिबेट वाटप

किणे : प्रतिनिधी
श्री लक्ष्मी सहकारी दूध संस्था मर्यादित, किणे यांच्या वतीने सन २०२५–२६ सालाकरिता रिबेट वाटप कार्यक्रम आज उत्साहात पार पडला.यावेळी दूध उत्पादक सभासदांना म्हैस दूध – ₹६.१० प्रति लिटर गाय दूध – ₹२.५० प्रति लिटर या प्रमाणे रिबेट देण्यात आले.
तसेच सन २०२५–२६ मध्ये उच्चांकी दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांना भाजप युवा नेते श्री. जयवंत मसणू सुतार यांच्या मार्फत बक्षीस वितरण करून सन्मानित करण्यात आले.
बक्षीस प्राप्त सभासद :
प्रथम क्रमांक: श्री. एकनाथ यशवंत सुतार – ₹५,००१/- द्वितीय क्रमांक: श्री. बाळासाहेब जकाणा दळवी – ₹४,००१/-,तृतीय क्रमांक: श्री. देवाजी भिमा दळवी – ₹३,००१/-, चतुर्थ क्रमांक: श्री. गणपती पांडुरंग केसरकर – व ₹२,००१/, पाचवा क्रमांक: श्री. चाळू नरसू केसरकर – ₹१,००१/-
याप्रसंगी भाजप युवा नेते श्री. जयवंत मसणू सुतार, चेअरमन श्री. बाळासाहेब दळवी, व्हा. चेअरमन श्री. देवाजी दळवी, श्री. गणपती पाटील, सेक्रेटरी श्री. आप्पा दळवी, श्री. कृष्णा तुपट, श्री. चाळू केसरकर, श्री. गणपती केसरकर, श्री. एकनाथ सुतार, श्री. अशोक गिलबिले आदी दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.

समता तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ रणनवरे

उत्तूर : प्रतिनिधी
समता तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ रणनवरे, तर उपाध्यक्षपदी दीपक कांबळे यांची निवड करण्यात आली. मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मारुती जाधव होते. खजिनदारपदी भैरू निऊंगरे, तर सचिवपदी सर्जेराव धूरे, अनिल हुले व विकास कांबळे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मंडळाच्या सदस्यांनी अभिनंदन केले.
पंडित दीनदयाळ विद्यालय चे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये यश

आजरा : प्रतिनिधी
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पं. दीनदयाळ विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघाने तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून यश प्राप्त केले. त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन! सहा.शिक्षिका सुनीता कुंभार, शुभांगी निर्मळे तसेच मुख्याध्यापक संजीव देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधीर मुंज तसेच सचिव मलिक कुमार बुरुड यांचे प्रोत्साहन लाभले.
बुद्धिबळ स्पर्धेत नवकृष्णा व्हॅली स्कूलचे वर्चस्व.

उत्तूर : प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर व आजरा तालुका बुद्धिबळ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय क्रीडा स्पर्धांअंतर्गत तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत नवकृष्णा व्हॅली स्कूल, उत्तूरच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी करत वर्चस्व राखले. उत्तूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत शाळेच्या तब्बल १४ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली.
१४ वर्षांखालील मुलांमध्ये ओम संतोष पाटील प्रथम, तीर्थंकर किरण विश्वास द्वितीय व प्रणव विनायक पाटील तृतीय, तर १७ वर्षांखालील मुलांमध्ये तन्मय तानाजी पाटील प्रथम, केदार अशोक शिंदे द्वितीय व पियुष राजाराम पोटे तृतीय आले. १७ वर्षांखालील मुलींमध्ये श्रेया संदीप वाटवे प्रथम, तर १९ वर्षांखालील मुलांमध्ये वीरेन विजय गुजरे प्रथम, राजवीर बाबासाहेब पाटील द्वितीय व ऋतुराज सुनील गुंड तृतीय ठरले. १९ वर्षांखालील मुलींमध्ये श्रावणी अनिल पवार प्रथम, मेरा रफिक जमादार द्वितीय व ऋग्वेदी संदीप नलवडे तृतीय आल्या.
स्पर्धेसाठी पंच म्हणून शंकर सावंत व विशाल वडवळे यांनी काम पाहिले. प्राचार्य रामकृष्ण मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली योगिता पाटील, प्रियंका राजाराम व सुखदेव चव्हाण यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले.

‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित शालेय वकृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात दिप्ती सावंत, माध्यमिक गटात संस्कृती गुरव प्रथम

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा संचालित ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंचतर्फे कै. लक्ष्मण पाटील गुरूजी स्मृती प्राथमिक शालेय वक्तृत्व स्पर्धत कु. दिप्ती दिलीप सावंत आजरा हायस्कुल आजरा व कै. रमेश टोपले स्मृती माध्यमिक शालेय वक्तृत्व स्पर्धेत कु. संस्कृती रविंद्र गुरव व्यंकटराव हायस्कुल आजरा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
प्राथमिक गटात व्दितीय क्रमांक कु. आसावरी पवन कालेकर केंद्रशाळा विद्यामंदिर पेरणोली, तृतीय क्रमांक कु. नेहा दयानंद माडभगत केंद्रिय प्राथमिक शाळा गवसे यांना मिळाला. माध्यमिक गटात व्दितीय क्रमांक कु. अश्विता दत्तात्रय सिमणे – भादवण हायस्कुल भादवण, तृतीय क्रमांक कु. रिया संतोष पारपोलकर आजरा हायस्कुल आजरा यांना मिळाला. या स्पर्धेमध्ये ४५ स्पर्धकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत, कै. लक्ष्मण पाटील व कै. रमेश टोपले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने स्पर्धेची सूरवात झाली. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष श्री वामन सामंत होते. श्री चंद्रशेखर बटकडली, आप्पासो पावले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेसाठी डॉ. आप्पासाहेब बुडके, डॉ. महेंद्र जाधव, सौ सुषमा गोवेकर, बी. एम. कामत, तानाजी पावले, गिता तेजम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले इंजिनिअर विजयकुमार पाटील व इंजिनिअर निनाद टोपले यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले .
कार्यक्रमाला वाचनालयाच्या उपाध्यक्षा विद्या हरेर, सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संचालक संभाजीराव इंजल, बंडोपंत चव्हाण, सुभाष विभुते, विजय राजोपाध्ये, महंमदअली मुजावर, विनायक आमणगी, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, बाबूराव पाटील, सुनिल शिंदे, बाबाजी पंडित, प्रा. संदिप देसाई, निखिल कळेकर, चंद्रकांत ठाकूर महादेव पाटील, महादेव पोवार, शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते बाचनालयाचे अध्यक्ष वामन सानंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी सुत्रसंचालन केले तर उपाध्यक्षा विद्या हरेर पाटील यांनी आभार मानले.

निधन वार्ता
प्रल्हाद धंदले

उत्तूर : प्रतिनिधी
येथील ज्येष्ठ नागरिक श्री. प्रल्हाद नारायण धंदले (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, सून, दोन नातवंडे, एक नात असा परिवार आहे.

आजचे पंचांग
दिनांक : ११ सप्टेंबर २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : अमावस्या तिथी (सकाळी ०८.५६ पर्यंत) त्यानंतर प्रथम तिथी
नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी नक्षत्र (दुपारी ०१.१५ पर्यंत) त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र
योग : साध्य योग (सायंकाळी ०५.०१ पर्यंत) त्यानंतर शुभ योग
करण : नागवा करण (सकाळी ०८.५६ पर्यंत) त्यानंतर किंस्तुघना करण
चंद्र राशी : सिंह राशी (सायंकाळी ०७.०७ पर्यंत) त्यानंतर कन्या राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०३ ते दुपारी १२.३५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१० ते दुपारी १२.५९
सूर्योदय : सकाळी ०६.२६
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


