गुरुवार दिनांक १ मे २०२५


समाजभान असणारा लोकनेता : जयवंतराव शिंपी

समाजकारण, राजकारण, शैक्षणिक, सहकार, साहित्य ,यासह विविध क्षेत्रात उत्स्फूर्तपणे सहभाग घेणारे आजरा व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी अग्रभागी असणारे व सर्वसामान्याच्या हितासाठी धडपडणारे बहुजन समाजाचे नेतृत्व म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होत. आज त्यांचा ७४ वा वाढदिवस असून ते आजपासून अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या कर्तुत्वाचा घेतलेला वेध...
जयवंतरावांचा जन्म १ मे १९५१ रोजी आजऱ्यातील सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील गुडोपंत शिंपी यांचा तांदळाचा व्यापार होता. चार तालुक्यातील भात गोळा करून त्यांचे तांदुळ करून ते इचलकरंजी बाजारपेठेत विक्रीला नेत असत. दरम्यान त्यांनी लाकूड व्यवसाय सुरु केला. जयवंतराव कुमार वयात असतांना वडीलांचे छत्र हरपले. पुढे संघर्ष वाट्याला आला. त्यातही ते डगमगले नाहीत. मॅट्रीक पर्यंत शिक्षण घेवून त्यांनी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरु केला. लहानपणापासूनच वाचनाची आवड असल्याने त्यांची विचारांची बैठक पक्की होत गेली. आजही ते कॉंग्रेसच्या विचारधारेवर राजकारणात टिकून आहेत.
१९८४ मध्ये त्यांनी आजरा ग्रामपंचायतीची निवडणुक लढवली व विजयीही झाले. आजरा कारखान्याच्या उभारणीमध्ये योगदान दिले. १९९२ मध्ये आजरा ग्रामपंचायतीचे सरपंच झाले. त्यांनी ग्रामपंचायत उत्पन्नवाढीसाठी व जनतेच्या हितासाठी निर्णय घेतले. त्यांच्या कामाची चुणुक दिसून आल्यांने माजी खासदार सदाशिवराव मंडलिक व माजी आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील यांनी दखल घेतली व त्यांना जिल्हा परिषदेवर संधी दिली. १९९८ मध्ये त्यांनी बांधकाम समिती सभापती व पक्षप्रतोद म्हणून काम पाहीले. आजरा साखर कारखान्याचे सन २००१ मध्ये अध्यक्ष झाले. कारखान्याच्या माध्यमातून शेतीसाठी पाण्याच्या योजना, ऊस क्षेत्र, उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले.पक्षप्रतोद म्हणून काम पाहीले. आजरा साखर कारखान्याचे सन २००१ मध्ये अध्यक्ष झाले.
कारखान्याच्या माध्यमातून शेतीसाठी पाण्याच्या योजना, ऊस क्षेत्र, उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले. सचोटीने, काटेकोरपणे कारभार केला. २०१६ जिल्हापरिषदेवर निवडून आल्यावर त्यांना उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. ते सध्या आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहेत. त्यांनी आजरा व आजरा परिसरातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची विनामुल्य सोय व्हावी म्हणून प्रयत्न केले आहेत. ग्रामिण भागातील विद्यार्थी शिकला पाहीजे याचा ध्यास घेवून ते कार्यरत आहेत. त्यांनी स्वखर्चातून व्यंकटराव हायस्कूलची इमारत सुसज्ज बनवली आहे. रवळनाथ राईस मिल, जनता बँक, आजरा यासह विविध संस्थावर काम करत आहेत.
दूरदृष्टीचे निर्णय
आजरा साखर कारखाना अडचणीत आल्यावर त्यांनी कारखाना खाजगी तत्वावर चालवण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयावर टिका झाली. पण कारखाना टिकून राहीला. राज्यात हा प्रयोग यशस्वी ठरला.
सरपंचपदी असताना त्यांनी घरफाळा आकारणीचे बांधकाम व रिकाम्या जागेचे चौरस फुटावरील धोरण अमलात आणले. संपूर्ण राज्यभर पुढे अवलंबले गेले. वयाच्या ७५ वर्षांमध्ये पदार्पण करत असताना त्यांचा विविध सामाजिक कार्यामध्ये असणारा सहभाग निश्चितच कौतुकास्पद आहे….

जयवंतराव शिंपी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आम. सतेज पाटील यांच्या शुभेच्छा !

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा य़ेथील श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या पार्श्वभुमीवर शुभेच्छा दिल्या.
यावेळी कृष्णा पटेकर, भिकाजी गुरव, अभिषेक शिंपी, विलास पाटील, विश्वास जाधव, आप्पासाहेब सरदेसाई, मुकुंद तानवडे, सुनील शिंदे, संकेत सावंत, आनंदा कुंभार, पांडुरंग जाधव, किरण कांबळे, अशोक पवार यांच्यासह श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संचालक पदाधिकारी उपस्थित होते.

भिडे गुरुजींच्या हस्ते पूजन…
महाआरतीने महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याची सांगता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेले तीन दिवस उत्साहात पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याचा संभाजीराव भिडे गुरुजी वारकरी संप्रदायाच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करून सायंकाळी महाआरती झाल्यानंतर सांगता समारंभ पार पडला.
तीन दिवस लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतीक, धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाची रेलचेल यामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते.

बुधवारी संभाजीराव भिडे गुरुजींनी महाराजांच्या पुतळ्याला भेट देऊन अभिवादन केले. वारकरी संप्रदायाने यावेळी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. दुपारच्या सत्रामध्ये आमदार आमदार सतेज पाटील यांनी पुतळा परिसराला भेट देऊन शिवरायांना अभिवादन केले. सायंकाळी महाआरती नंतर या लोकार्पण सोहळ्याचा सांगता समारंभ पार पडला.

आजरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आम.पाटील यांची भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरण व उत्सव समिती, आजरा यांच्याकडून महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा काल संपन्न झाला. या पार्श्वभुमीवर आम. सतेज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी आजरा साखर कारखानाचे चेअरमन मुकुंदादा देसाई, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, सुनील शिंत्रे, संभाजीराव पाटील, युवराज पोवार, अभिषेक शिंपी, गोडसाखर कारखान्याचे विद्याधर गुरबे, युवराज बर्गे, समितीचे अध्यक्ष महादेव टोपले, किरण कांबळे, संकेत सावंत, मारुती मोरे, जितेंद्र शेलार, सुफियान खेडेकर, रवींद्र भाटले, रणजीत देसाई यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा कमिटी शिवप्रेमी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दाभिल येथे आजपासून हनुमान मंदिराचा कळसारोहण, मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दाभिल (ता. आजरा) येथे उभारण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिराचा कळसारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा दि. १ ते ३ मे दरम्यान होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दाभिल येथील श्री सद्गुरू ह.भ.प. पर्वता महाराज परब स्वामी यांच्या कृपा छायेखाली सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या साहाय्याने श्री हनुमान मंदिर उभारण्यात आले आहे.
यानिमित्त आज गुरुवारी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत घटस्थापना, ध्वजपूजन, वीणापूजन, तुळस पूजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पूजन, नित्य पूजा, काकडा आरती, पंचपदी, नामजप होणार आहे. सकाळी ११ वाजता श्री हनुमान देवाची प्रतिमा व कळस मिरवणूक, दिंडी नगर प्रदक्षिणा तर सायंकाळी ५ वाजता हरिपाठ व रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत ह. भ. प. वारकरीभूषण नारायण एकल महाराज (जोगेवाडी) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम व त्यानंतर जागर होणार आहे.
शुक्रवारी (दि. २) मे सकाळी ७ ते १०.३० काकड आरती, होमहवन पूजा विधी सकाळी १०.३० नंतर माहेरवाशिर्णीचा गारवा, कलश आगमन व पूजन गुरुवर्य ह. भ. प. नारायण दादा अलिबागकर, वाजे महाराज मठाधिपती पंढरपूर यांच्या हस्ते कळसारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना गुरुवर्य प.पू. किसन महाराज रामदासी (भडगाव) यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी ५ वा. हरिपाठ, रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत कीर्तन रात्री ११.३० नंतर पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळाचा हरिजागर होणार आहे.

किणे येथे साखर वाटप शुभारंभ…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. गवसे मार्फत किरणे येथे सवलतीच्या दरात सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर वाटप उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी व्हा. चेअरमन श्री.सुभाष देसाई यांच्या हस्ते साखर पोत्याचे पूजन करून कारखान्याच्या सभासदांना व ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना साखर देवून उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी आजरा तालुका खरेदी-विक्री संघ संचालक मधुकर यलगार शिरसंगी शाखा मॅनेजर श्री.राजेंद्र कोलेकर रवळनाथ विकास सेवा सोसायटीचे व्हा.चेअरमन भीमराव सडेकर, सचिव सुभाष चौगुले व सभासद धोंडीबा कुंभार जगन्नाथ घोरपडे, महादेव देसाई दत्तात्रय देसाई, प्रताप देसाई, अनिल मुळीक, बाबुराव देसाई, दत्तात्रय देसाई, विजय देसाई, रमेश गिलबिले, शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.


आजरा साखर कारखान्याचे नूतन चेअरमन मुकुंदराव देसाई यांचा सत्कार..

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आम. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी
जनता सहकारी बँक लिमिटेड आजरा या बँकेच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संचालक मंडळाशी संवाद साधला.
यावेळी मुकुंदराव देसाई यांची वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे, सुनील शिंत्रे, संपत देसाई, रविंद्र भाटले, गोडसाखर कारखान्याचे संचालक विद्याधर गुरबे, रणजित देसाई, विक्रम देसाई, अमित सामंत, युवराज बर्गे, अभिषेक शिंपी, संकेत सावंत, सुफीयान खेडेकर ,संचालक एस. डी. पाटील, बँकचे सीईओ मारुती पाटील यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि पदाधिकारी उपस्थित होते.


निधन वार्ता
नितीन केसरकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साळगाव येथील नितीन काशीनाथ केसरकर ( वय ४६ वर्षे) यांचे मंगळवार दि.२९ रोजी आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.






